'लाफिंग गॅस' ठरत आहे कायदेशीर विष, वाढत्या व्यसनामुळे अनेक तरुणांच्या जीवनात गंभीर समस्या

फोटो स्रोत, Submitted to BBC
- Author, इव्ह वेबस्टर
- Role, बीबीसी न्यूज
नायट्रस ऑक्साइड, ज्याला सामान्यतः 'लाफिंग गॅस' म्हणून ओळखलं जातं. या गॅसचा वापर प्रामुख्यानं औषध उपचारांमध्ये आणि खाद्यपदार्थांच्या उत्पादनात केला जातो.
याचे अनेक उपयोग आहेत, दातांच्या उपचारांदरम्यान वेदनाशामक म्हणून तो वापरला जातो, तसेच कॅनमधील व्हीप्ड क्रीमसाठी एजंट म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो.
पण गेल्या काही वर्षांत या गॅसचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
महामारीच्या काळात विशेषत: तरुणांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला, यामुळे अनेक तरुणांच्या जीवनात गंभीर समस्या निर्माण झाल्या.
याच्या दुष्परिणामांची माहिती पूर्वीपासूनच आहे, पण व्हेपिंगच्या वाढत्या वापरामुळे हा वायू शरीरात पोहोचवण्याचं एक परिपूर्ण माध्यम तयार झालं. त्यामुळे याचं व्यसन लागण्याचं एक सूत्रही तयार झाल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान, याचा कायदेशीर वापर, तसेच विक्रीच्या पद्धतींमध्ये झालेल्या बदलांमुळे या पदार्थाचा गैरवापर आणखी वाढला आहे.
उत्साही मेगची दुर्दैवी कहाणी
मेग काल्डवेलचा मृत्यू टाळता येणारा नव्हता.
फ्लोरिडातील घोडेस्वार मेग काल्डवेलने आठ वर्षांपूर्वी विद्यापीठात असताना विरंगुळ्यासाठी म्हणून नायट्रस ऑक्साइडचा वापर सुरू केला होता. परंतु, अनेक तरुणांप्रमाणेच तिने कोरोना साथीच्या काळात त्याचा अधिक प्रमाणात वापर सुरू केला.
चार बहिणींमध्ये सर्वात धाकटी असलेल्या मेगबद्दल तिची बहीण कॅथलीन डायल म्हणाली, "ती आमच्या आयुष्याला अर्थ आणि आनंद देणारी व्यक्ती होती."
परंतु, दुर्दैवानं मेग काल्डवेलकडून याचा वापर वाढतच गेला, इतका की त्याचं व्यसन "तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू लागलं".
ओव्हरडोसमुळे काही काळासाठी तिला चालण्याची क्षमताही गमवावी लागली. तिचे स्वतः वर नियंत्रणही राहिले नाही.
तरीसुद्धा ती या गॅसचा वापर करतच राहिली. स्थानिक स्मोक शॉप्समधून गॅस विकत घेऊन पार्किंगमध्येच ती श्वासाच्या माध्यमातून घेऊ लागली.

फोटो स्रोत, Getty Images
जवळचा गॅस संपला की, ती लगेच दुकानात जाऊन घेत असे. कधीकधी यासाठी ती दिवसाला शेकडो डॉलर्सही खर्च करत असे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये तिचा मृत्यू झाला. एका व्हेप शॉपच्या बाहेर अशाच एका कार पार्कमध्ये तिने अखेरचा श्वास घेतला.
"या सवयीमुळे काही त्रास होणार नाही, असं तिला वाटत होतं. कारण हा गॅस ती अधिकृत स्मोक शॉपमधून विकत घेत होती. हा गॅस कायदेशीरपणे वापरत आहोत, असं तिला वाटत होतं," असं डायल म्हणाल्या.
काल्डवेलच्या व्यसनाचा मार्ग, हा तरुण वयात सुरू झालेल्या गैरवापरापासून ते जीवघेण्या आवडीपर्यंत पोहोचणारा ठरला.
घातक अन् जीवावर बेतणारा गॅस
अमेरिकेत हे वाढते प्रमाण सामान्य होत आहे. अमेरिकेच्या पॉयझन सेंटरच्या वार्षिक अहवालात आढळून आलं की, 2023-2024 दरम्यान अमेरिकेत स्वतःहून नायट्रस ऑक्साइडच्या संपर्कात आलेल्यांच्या संख्येत 58 टक्के वाढ झाल्याचं म्हटलं आहे.
वाईट परिस्थितीत, नायट्रस ऑक्साइडचा श्वास घेतल्यामुळे हायपोक्सिया होऊ शकतो, यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे मृत्यू होऊ शकतो.
नियमितपणे याचा श्वास घेतल्यामुळे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता देखील जाणवू शकते, ज्यामुळे नसांची हानी, पाठीच्या कण्याचं नुकसान आणि अगदी पक्षाघात देखील होऊ शकतो.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) मते, 2019 ते 2023 दरम्यान नायट्रस ऑक्साइडच्या विषबाधेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 110 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे.
2023 मध्ये, ब्रिटनमध्ये तरुणांमध्ये कोरोना साथीच्या काळात नायट्रस ऑक्साइडचा दुरुपयोग वाढल्यामुळे तो बाळगणं देखील गुन्हेगारी कृत्य ठरवलं होतं.
परंतु, अनेक राज्यांनी अमेरिकेत या उत्पादनाच्या मनोरंजनासाठीच्या वापरावर बंदी घातली असली तरीही ते खाद्यपदार्थ म्हणून विकणं कायदेशीर आहे. फक्त लुईझियाना राज्याने या गॅसच्या किरकोळ विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
गॅसचेही फ्लेवर्स आणि आकर्षक पॅकिंग
गॅलक्सी गॅस ही एक मोठी गॅस उत्पादक कंपनी आहे. त्यांच्या वेबसाइटवर चिकन साटे विथ पीनट चिली फोम आणि वॉटरमेलन गाझपाचो यांसारख्या पदार्थांसाठी पाककृती शेअर केली जाते.
ब्लू रासबेरी किंवा स्ट्रॉबेरीज अँड क्रीम यांसारख्या फ्लेवर्ससह ते उपलब्ध आहेत. तज्ज्ञ इशारा देतात की, कायदेशीर मार्ग, तसेच पॅकेजिंग आणि रिटेलमध्ये झालेले मोठे बदल, गैरवापर वाढण्यास कारणीभूत ठरले आहेत.
अलीकडेपर्यंत, याचे युजर साधारणतः 8 ग्रॅम वजनाचे सिंगल-युझ मेटल कॅनिस्टर्स घेत असत आणि बलूनच्या सहाय्याने गॅस आपल्या श्वासात घेत होते.
परंतु, जेव्हा कोरोना साथीच्या काळात याच्या वापरात वाढ झाली, तेव्हा नायट्रस ऑक्साइड उत्पादकांनी खूप मोठ्या कॅनिस्टर्स ऑनलाइन विकायला सुरूवात केली.
अगदी 2 किलोग्रॅमपर्यंत आणि शेवटी, इलेक्ट्रॉनिक व्हेप्स आणि अन्य स्मोकिंग (धूम्रपान) सामानाची विक्री करणाऱ्या दुकानांतूनही ते विकले जाऊ लागले.
कंपन्यांनी गॅस आकर्षक रंगाच्या कॅनिस्टर्समध्ये पॅक करायला सुरुवात केली. ज्यावर कॉम्प्युटर गेम्स आणि टेलिव्हिजन मालिकांमधील कॅरेक्टर्सचे डिझाइन असलेले फोटोज होते.
'पार्टनरशिप टू एन्ड अॅडिक्शन'चे प्रतिनिधी पॅट ऑसेम यांचं म्हणणं आहे की, या घडामोडींमुळेच हायड्रोजन ऑक्साइडच्या गैरवापराचं प्रमाण वाढलं आहे.
"गॅलक्सी गॅस किंवा मियामी मॅजिक असं नाव ठेवलं तरी ते मार्केटिंग आहे," असं त्यांनी म्हटलं. "जर मोठ्या कॅनिस्टरची विक्री होत असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की, अधिक लोक त्याचा वापर करू शकतात."
बीबीसीने गॅलक्सी गॅस आणि मियामी मॅजिक यांच्याशी संवाद साधून यावर प्रतिक्रिया देण्याची विनंती केली. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
गॅस ऑनलाइन विकणाऱ्या अॅमेझॉनशी संवाद साधला असता त्यांनी ग्राहकांकडून नायट्रस ऑक्साइडचा चुकीचा वापर होत असल्याची माहिती दिली, आणि ते आणखी सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यावर काम करत असल्याचे सांगितले.
सीबीएस न्यूजकडून आलेल्या अहवालाला प्रतिसाद देताना, बीबीसीच्या अमेरिकेतील न्यूज पार्टनरला गॅलक्सी गॅसनं सांगितलं की, हा गॅस स्वयंपाकाला वापरण्यासाठी आहे आणि वेबसाइटवर याच्या चुकीच्या वापराविरोधी एक संदेशही दिला जात असल्याचे म्हटलं.
चुकीचा वापर आणि व्हायरल व्हीडिओ
गेल्या वर्षी जेव्हा काही लोकांचे या उत्पादनाचा वापर करत असलेले व्हीडिओज ऑनलाइन व्हायरल झाले, तेव्हा नायट्रस ऑक्साइडच्या चुकीच्या वापराबद्दलची चिंता वाढली.
सोशल मीडियावर, गॅसचा वापर करतानाचे तरुणांचे व्हीडिओज ट्रेंड झाले आहेत. 2024 च्या जुलै महिन्यात अटलांटा येथील एका फास्टफूड रेस्टॉरंटने एक व्हीडिओ अपलोड केला होता, त्यामध्ये एक तरुण "माझं नाव लिल टी आहे, मॅन" असं म्हणत असताना स्ट्रॉबेरी आणि क्रीम फ्लेवर्ड नाइट्रस ऑक्साइड श्वासात घेत होता, त्याचा आवाज या गॅसमुळं खोल झाला होता.
आजपर्यंत ही क्लिप सुमारे 4 कोटी वेळा पाहिली गेली आहे.
रॅप म्युझिक व्हीडिओ आणि ट्विच स्ट्रीमिंगमध्येही याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. जो रोगन शोवरने आणि रॅपर ये (पूर्वीचे कान्ये वेस्ट) यांनी सार्वजनिकपणे या पदार्थाचा दुरुपयोग केल्याचे बोलले जाते.

ये यांनी त्याच्या डेंटिस्टवर 'अविचारीपणे' आणि 'धोकादायक प्रमाणात नायट्रस ऑक्साइड' पुरवठा केल्याबद्दल न्यायालयात खटला दाखल केला आहे.
या ट्रेंडला प्रतिसाद म्हणून, टीकटॉकने 'गॅलक्सी गॅस' साठी सर्च ब्लॉक केले आणि यूझरला पदार्थाचा वापर आणि व्यसनाच्या संसाधनांबद्दल ऑफर देणाऱ्या एक सूचनेवर रिडायरेक्ट केलं.
रॅपरकडून जागरूकतेचाही प्रयत्न
रॅपर एसझेडएनेही तिच्या सोशल मीडियावर तिच्या फॉलोवर्सला याच्यामुळं होणाऱ्या हानीबद्दल जागरूकता पसरवण्याचं काम केलं. तसेच "कृष्णवर्णीय मुलांसाठी मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग केल्याबद्दल" टीका केली.
मार्च महिन्यात, अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गॅस श्वासात घेण्याच्या विरोधात अधिकृत इशारा जारी केला. कारण "नायट्रस ऑक्साइड उत्पादनं श्वासाद्वारे घेतल्यानंतर प्रतिकूल परिणामांबाबतच्या अहवालांमध्ये वाढ दिसून आली."
एफडीएने बीबीसीला सांगितलं की, ते "नायट्रस ऑक्साइडच्या गैरवापरासंबंधी प्रतिकूल घटनांचा सक्रियपणे मागोवा घेत आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल."
परंतु, काही लोकांसाठी, हे इशारे खूप उशिराचे ठरले.
उत्पादक कंपन्यांविरोधात कोर्टात खटले, बंदीची मागणी
2023 मध्ये, 25 वर्षांच्या मारिसा पोलिटेच्या कुटुंबाने नायट्रस डिस्ट्रिब्युटर युनायटेड ब्रँडसविरोधात 745 दशलक्ष डॉलरची नुकसानभरपाई मिळवण्यासाठी यशस्वी न्यायालयीन लढाई लढली.
कारण नायट्रस ऑक्साइडचा भरपूर प्रमाणात वापर करून त्या नशेच्या अमलाखाली असलेला ड्रायव्हर एका रेडिओलॉजी तंत्रज्ञाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला होता.
यूझरकडून चुकीच्या पद्धतीने ते वापरलं जाऊ शकतं, हे माहीत असतानाही कंपनीने त्याची विक्री केली, असं ज्युरींनी कंपनीला जबाबदार ठरवताना म्हटलं होतं.
"मारिसा पोलिटेचा मृत्यू पहिल्यांदा घडलेला नसावा, पण देवाच्या कृपेनं, हा मृत्यू शेवटचा ठरावा," असं त्या वेळी पोलिटे कुटुंबाचे वकील जॉनी सायमन यांनी म्हटलं होतं.
त्यानंतरच्या वर्षांत अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये नायट्रस ऑक्साइडसंबंधी अनेक गंभीर अपघात झाले.
दरम्यान, काल्डवेलच्या कुटुंबानं नायट्रस ऑक्साइडच्या उत्पादक आणि वितरकांविरुद्ध एक सामूहिक दावा दाखल केला आहे. या दाव्याद्वारे ते अमेरिकेत या उत्पादनाच्या किरकोळ विक्रीवर बंदी घालण्याची आशा करत आहेत.
"जे लोक डेंटिस्टकडे नायट्रस ऑक्साइडचे व्यवस्थापन करतात, त्यांना आता तासनतास प्रशिक्षण घ्यावं लागतं," असं त्या म्हणाल्या.
"कुणीही स्मोक शॉपमध्ये जाऊन हे ड्रग्ज खरेदी करू शकतो, हा माझ्या दृष्टीने शुद्ध वेडेपणा आहे."
"दुर्दैवाने, हे स्पष्ट झालं आहे की, या गॅसचे उत्पादक आणि स्मोक शॉपचे मालक त्यांच्या सद्सद् विवेकबुद्धीचा वापर करून त्यांच्या दुकानातील शेल्फवरून ही उत्पादनं काढणार नाहीत," असंही डायल यांनी स्पष्टपणे सांगितलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











