शरद् पाटील : मार्क्सवादाला जातीअंताचं राजकारण शिकवणारा विचारवंत

फोटो स्रोत, Ravindra Ghodraj
- Author, दिलीप चव्हाण
- Role, बीबीसी मराठीसाठी
शरद् पाटील (17 सप्टेंबर 1925 – 12 एप्रिल 2014) यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील कापडणे या गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील तानाजी पाटील हे सत्यशोधक विचारांचे होते. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि कलासक्तीची चुणूक शरद पाटील यांनी शालेय जीवनातच दाखवून दिली होती.
या वयातच शेक्सपिअरची नाटके त्यांनी वाचली होती; तसेच चित्रकलेत पारंगत होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगली होती. चित्रकलेतील प्रगत अध्ययनासाठी त्यांनी 1943 मध्ये बडोद्याच्या कलाभवनात चित्रकलेच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला, तर त्यानंतर मुंबई येथील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये!.
कला आणि राजकारण यांच्यातील एक निवड करण्याचा कठीण प्रसंग शरद् पाटलांवर स्वातंत्र्य चळवळीने आणला. शेवटी, भारतीय जनतेच्या मुक्तीच्या चळवळीने घातलेली साद अधिक प्रभावी ठरली आणि त्यांनी 1945 मध्ये स्वातंत्र्यलढ्यात उडी घेऊन सार्वजनिक कार्यास सुरुवात केली. त्यांची ही राजकीय कारकीर्द त्यांच्या वयाच्या 89 व्या वर्षापर्यंत सुरू होती. त्यांची ही कारकीर्द तब्बल 75 वर्षांची होती.
मार्क्सवाद आणि डाव्या राजकारणात सुधारणेसाठी आग्रही
कोणत्याही विवेकी व्यक्तीला तरुणपणी ज्याप्रमाणे मार्क्सवादाची भुरळ पडते त्याप्रमाणे शरद पाटील यांना वयाच्या विसाव्या वर्षी मार्क्सवादाने संमोहित केले. मुंबईहून धुळ्याला आल्यानंतर गिरणी कामगार चळवळीत ते काम करू लागले.
1946-1951 दरम्यानच्या तेलंगणा उठावावेळी ते राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय झाले. भुसावळ येथे त्यांनी रेल्वे कामगारांना उठावाची माहिती देऊन संप करण्याचे आवाहन केले.
तथापि, त्या कामगारवर्गाची मनोभूमिका अशा उग्र चळवळीसाठी तयार नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढे चालून त्यांनी गोवामुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. 1956 ते 60 च्या दरम्यान त्यांनी उकाई धरण प्रतिबंधात्मक चळवळ उभारली.
भारतीय समाजाचा इतिहास आणि वर्तमान समजून घेत असताना त्यांना मार्क्सवादाच्या मर्यादा जाणवायला लागल्या. कार्ल मार्क्स व फ्रेडेरिक एंगल्स यांनी कम्युनिस्ट जाहीरनाम्याच्या प्रारंभीच ऐतिहासिक भौतिकवादाचे सूत्र मांडले होते : "आजपर्यंतच्या सर्व समाजाचा (लिखित) इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे."
भारतात वर्गाबरोबर वर्ण-जाती असल्याने हे सूत्र भारतीय इतिहासाला व समाजाला जसेच्या तसे लागू पडत नाही, अशी मांडणी मार्क्सवादी वर्तुळात प्रथम दा. ध. कोसंबी, नंतर देव राज चानना, देवीप्रसाद चट्टोपाध्याय, इर्फान हबीब, राम शरण शर्मा, नलिनी पंडित, सदा कऱ्हाडे, प्रभाकर वैद्य, गेल ऑमव्हेट यांनी करायला सुरुवात केली होती.
तथापि, श्रीपाद अमृत डांगे यांनी त्यांच्या 'इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी' (1949) या पुस्तकात वर्णजातींबरोबर प्रथमपासून वर्गव्यवस्था अस्तित्वात होती अशी जी मेथडॉलॉजिकल भूमिका घेतली होती, तिला या मार्क्सवादी विचारवंतांनी अबाधितच ठेवले, असा आक्षेप पाटलांनी घेतला.

फोटो स्रोत, Sandesh Bhandare
त्यांच्या मते, "संशोधनाभ्यासाधीन समाजाच्या गतीचे नियम त्याच्या वस्तुनिष्ठ संशोधनाभ्यासातूनच निघाले पाहिजेत, त्याच्यावर एकप्रवाही वर्गवादी अन्वेषणपद्धत लादून नाही."
त्यांच्या मते, मार्क्सवाद एकप्रवाही अन्वेषणपद्धती आहे. वर्गेतर शासनशोषणसंस्थांचा वेध घेण्यासाठी त्यांनी बहुप्रवाही अन्वेषणपद्धतीचा विकास केला. या सापेक्षत: नव्या अन्वेषणपद्धतीच्या आधारे त्यांनी भारतीय इतिहासाचा नवा अर्थ विषद केला.
या अन्वेषणपद्धतीनुसार, ब्रिटिशांनी भारतात नव्या भांडवलदारी उत्पादनव्यवस्थेची रुजवणूक करेपर्यंत भारतात वर्ग नव्हते. भारतीय समाज शोषणविरहित स्त्रीसत्ताक समाज, मातृवंशक राजर्षिसत्त्ताक दासप्रथाक समाज, पितृवंशक पुरुषसत्त्ताक चातुर्वण्याधारित शूद्रप्रथाक समाज आणि (बुद्धोत्तर) जातिव्यवस्थाक सामंती समाज आणि ब्रिटिशोत्तर जातवर्ग समाज अशा अवस्थांतून संक्रमित झाला, अशी मांडणी करण्यासाठी त्यांनी विद्वत्तापूर्ण ग्रंथांची मालिका लिहिली.

फोटो स्रोत, Sandesh Bhandare
शरद् पाटील यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची साथ-संगत सोडण्यासाठी तीन मुख्य कारणे कारणीभूत ठरली :
एक : शरद् पाटील यांचे मार्क्सवादाविषयीचे आकलन हळूहळू बदलत गेले. भारतीय समाजक्रांतीसाठी आणि एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मार्क्सवादाच्या अंगभूत उणीवा त्यांना जाणवत गेल्या. प्राथमिक साम्यवादी आदिम समाज हे मिथक आहे आणि मार्क्सवादी प्रमाणशास्त्र ही जाणीवकेंद्री आहे, या मर्यादांमुळे त्यांना मार्क्सवादाच्या पुनर्विलोकन आणि मुख्यप्रवाही कम्युनिस्ट पक्षाला सोबतची साथ-संगत सोडण्यास बाध्य केले.
दोन : भारतीय जातिव्यवस्थेच्या अंतासाठी त्यांना भारतामध्ये प्राचीन काळापासून असलेल्या बौद्ध / अवैदिक तात्विक परंपरा, मध्ययुगीन जातीविरोधी संत परंपरा आणि आधुनिक काळातील जातीविरोधी फुले-आंबेडकरी परंपरा यांच्याकडे आकृष्ट केले. फुले-आंबेडकरवादाची मांडणी आणि विकास केल्याशिवाय जातिअंताचा प्रश्न सुटणार नाही, हे आकलन त्यांना पारंपरिक कम्युनिस्ट चळवळीत राहून विकसित करता आले नसते.
तीन : भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी जातीविरोधी राष्ट्रव्यापी लढा उभारण्यास नकार दिला. जातीचा प्रश्न हा दुय्यम मानणे, जनतेतील जातीविरोधी संवेदनेला विधायक प्रतिसाद न देणे, जात्यंताशिवाय लोकशाही क्रांतीची कल्पना करणे, या डाव्या चळवळीच्या धारणांबाबत ते समाधानी नव्हते.
त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा 1978 मध्ये राजीनामा दिला आणि मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद या नव्या तत्त्वज्ञानावार आधारलेल्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. मार्क्सवादाच्या मर्यादा दाखवतानाच त्यांनी आंबेडकरवादाच्या मर्यादादेखील दाखविल्या.
1977 मध्ये जिल्हा किसान सभेच्या मंचावर मार्क्स, एंगेल्स आणि व्लादिमिर लेनिन यांच्यासमवेत जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे प्रदर्शित करणारे कम्युनिस्ट चळवळीतील शरद् पाटील पहिलेच होते.
नामांतराच्या चळवळीत अधिकृतपणे सहभागी होणारा एकमेव पक्ष म्हणजे त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष हा होता! या पक्षाने निर्माण केलेल्या ज्ञानमीमांसेचा प्रभाव महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींवर राहिला.
नवी मांडणी
भारतातील समाजपरिवर्तनासाठी शरद् पाटील यांनी सुरुवातीला मार्क्सवाद-फुले-आंबेडकवाद आणि नंतर सौत्रांतिक मार्क्सवादाची मांडणी केली. या दोन्हींमधील महत्त्वाचा मुद्दा आहे बहुप्रवाही अन्वेषणपद्धतीचा!
भारतीय सामाजिक रचनेचे यथायोग्य आकलन करून घेण्यासाठी शरद् पाटील यांनी नवे प्रमाणशास्त्र विकसित केले. प्रमाणशास्त्र म्हणजे ज्ञान मिळविण्याच्या साधनांचे शास्त्र. 'प्रत्यक्ष' (ज्ञानेंद्रियाद्वारे प्राप्त केलेले ज्ञान) आणि 'अनुमान' (जे दिसते त्याच्याआधारे न दिसणाऱ्या वस्तूचे ज्ञान) या प्रमाणांनी मिळणारे ज्ञान हे जाणिवेच्या सदराखाली येते, असे त्यांनी मांडले. त्यांच्या मते, मार्क्सवादाचे प्रमाणशास्त्र हे पारंपरिक जाणिवेच्या अद्वैती संकल्पनेवर उभे आहे.
या संदर्भात शरद् पाटील यांनी वसुबंधू या बौद्ध दार्शनिकाकडे लक्ष वेधले आहे. मेंदू वा मन हे 'द्वैती' रचनेचे असून त्यामध्ये 'जाणीव' (चित्तसप्रयुक्त) व 'नेणीव' (चित्तविप्रयुक्त) यांचा अंतर्भाव होतो, असे वसूबंधूने मांडले. कोणत्याही समाजातील रुढ मिथकांचे सम्यक आकलन हे नेणिवेचा ठाव घेतल्याशिवाय होणार नाही, अशी त्यांची धारणा होती.

फोटो स्रोत, Bombay High Court & Getty
मिथकांना सर्वथा अनैतिहासिक मानणे अथवा सर्वथा ऐतिहासिक मानणे, या दोन्ही टोकाच्या भूमिका घेण्याचे त्यांनी नाकारले. मिथके, देव-देवता, महाकाव्ये, धर्मग्रंथ यांचे आकलन हे नेणिवेच्या आधारेदेखील करून घेता येते, असे त्यांचे प्रतिपादन होते.
म्हणून 'रामायण' आणि 'महाभारत' या भारतातील दोन्ही महाकाव्यांचा त्यांनी नवा अर्थ प्रसृत केला. त्यासाठी त्यांनी बहुप्रवाही अब्राह्मणी ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषणपद्धतीचा स्वीकार केला.
यामुळे 'रामायण' व 'महाभारत' यांविषयीचे त्यांचे आकलन हे इतर अनेक उदारमतवादी, राष्ट्रवादी, मार्क्सवादी आणि फुले-आंबेडकरी आकलनापेक्षा भिन्न राहिले.
इतिहासातील महापुरुष हे जनतेच्या मनामध्ये 'महापुरुष' म्हणून टिकून राहण्याला काही भौतिक कारणे असू शकतात, अशी त्यांची धारणा होती.
रामाने कमी उत्पादक स्त्रीराज्ये आणि मातृवंशक राजके नष्ट करून अधिक उत्पादक पितृसत्ताक चातुर्वर्ण्य राजकप्रथेचा प्रसार केला आणि कृष्णाने चातुर्वर्ण्य राजकापेक्षा दासप्रथाक उत्पादन पराकाष्ठेला नेणारे पहिले द्वैवर्ण्य अराजक आणले.
हे राम आणि कृष्ण यांचे भारतीय समाजविकासाला दिलेले योगदान होते. त्यामुळे ते जनमानसात परमेश्वरपदी पोहोचले.

फोटो स्रोत, Sandesh Bhandare
राम आणि कृष्ण यांचे हे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या मर्यादांची चर्चा केली पाहिजे. त्यांनी समाजाला अधिक उत्पादक अशा समाजविकासाच्या टप्प्यावर नेले हे त्यांचे योगदान होते; पण ते पुरुषसत्ता आणि वर्णव्यवस्थेचे समर्थक होते!
म्हणून ते आजच्या समाजाचे आदर्श होऊ शकत नाहीत,असे त्यांचे प्रतिपादन होते. महाकाव्ये किंवा मिथके यांना बेदखल न करता त्यांनी सूचित केलेला सामाजिक अंतर्विरोध हेरला पाहिजे.
या भूमिकेतून "आमची प्रतिके समतेची, सीता, शंबूक, द्रौपदीची", ही सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची अधिकृत घोषणा होती.
भारतीय अथवा कोणत्याही समाजातील मिथके आणि देवदेवता यांचे आकलन बहुप्रवाही नेणीवलक्ष्यी अन्वेषणपद्धतीच्या आधारे करणे पाटलांना आवश्यक वाटले. ही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषणपद्धती नेणीवकेंद्रीततेमुळे अधिक विधायक आहे.
निरीक्षणांच्या कच्च्या मालाचे निष्कर्षांच्या पक्क्या वस्तुत संक्रमण करणारी अमूर्तीकरणाची प्रक्रिया ही नेणिवेतूनच आकारास येते. नेणीव ही जाणिवेला नियंत्रित करते. त्यामुळे प्रबोधन हे समाजक्रांतीची पूर्वशर्त असेल तर असे प्रबोधन केवळ जाणिवेच्या पातळीवर असायला नको.
जाणीवकेंद्री प्रबोधन हे मानवी मनातून विषमतेचा पूर्ण निरास करत नाही. भांडवलदारी व्यवस्थेतील प्रबोधन हे केवळ जाणीवकेंद्री होते. त्याचे कारण भांडवलशाहीला समाजमानस जुन्या सामंतशाहीकडून नव्या भांडवलदारी समाजव्यवस्थेकडे आणायचे होते.
हे संक्रमण एका विषमताधिष्ठित समाजाकडून दुसऱ्या विषमताधिष्ठित समाजाकडे नेणारे असणार होते. त्यामुळे, आधुनिक स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये भांडवलदारी व्यवस्थेतील शोषणाला पूरक अशी राहिली.
सरंजामशाहीऐवजी नवा विषमताधिष्ठित भांडवलदारी समाज यातून निर्माण झाला. पण समाजवादी क्रांतीला घडवायचा समाज हा अशा वरपांगी परिवर्तनातून निर्माण होणार नाही.
नवा समाजवादी समाज हा पूर्णतः शोषणमुक्त असणे आवश्यक आहे. यासाठी विषमतेला नेणिवेतून नष्ट करणे आवश्यक आहे, असे शरद् पाटील यांचे प्रतिपादन होते.
प्रतिभा ही जाणीव व नेणीव यांच्या संयोगातून आकारास येते, असे त्यांनी अर्नॉल्ड टॉईनबी यांच्या मताधारे मांडले. मात्र, जाणीव-नेणीवकेंद्री अशा सर्वंकष प्रबोधनाच्या अभावात लेखकांची प्रतिभादेखील विषमताधिष्ठित राहते, हे शरद् पाटील यांनी गिरीश कर्नाड यांच्या 'हयवदन' या नाटकाच्या विश्लेषणातून दाखवून दिले. पुढे चालून पर्यायी सौंदर्यशास्त्राची मांडणी केली.
जात्यंत्य न झाल्याचे शल्य
जातिअंत हा शरद् पाटलांचा ध्यास होता. भारतीय भांडवलदार वर्ग, उच्च जाती, शेतकरी जातींतील उच्चभ्रू आणि त्यांचे बुद्धिजीवी हे जातिअंताचे महत्तम विरोधक आहेत आणि त्यांच्याकडे भारतीय सत्तेची सूत्रे आहेत.
याबाबत त्यांची भूमिका अशी : "भारतीय भांडवलदार वर्ग मुख्यतः हिंदू बनिया जातींमधून विकसित झाला तर त्याचा राष्ट्रवादी बुद्धिजीवी ब्राह्मण जातींमधून. दोघांचेही हितसंबंध जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यात असल्याने व्यक्तिस्वतंत्राधिष्ठित पाश्चात्य लोकशाही विचारसरणीचा त्यांनी अव्हेर करणे अपरिहार्य होते."
सध्याच्या राजकारणात विविध जातींमधील उच्चभ्रुंची आघाडी राज्यकर्ती आहे, हे जयंत लेले यांचे प्रतिपादन शरद् पाटील यांनी स्वीकारले होते. आजचे शासन जातीद्वारे वर्गीय असे आहे.
गेल्या काही दशकांत जातींमधून वर्ग निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्टपणे मुखर झालेली आहे. अशा काळात, सर्व जातींमधील शोषित वर्गांची सर्व जातींमधील वरच्या वर्गांविरुद्ध वर्गीय एकजूट केली पाहिजे.

फोटो स्रोत, Dr. Subhash Gawari
दलित+आदिवासी+ओबीसी अशा एकेरी जातीय परिभाषेऐवजी सर्व जातींमधील विस्थापित / शोषित जनांची वर्गीय एकजूट असावी, अशी त्यांची भूमिका होती. ही 'जात्यंतक वर्गीय एकजूट' असेल. वर्ग बनण्यासाठी जातीचा निरास करावा लागेल. आज सर्वत्र प्रचलित असलेला विविध जातींच्या स्वतंत्र संघटनांचे प्रारूप त्यांनी नाकारले.
आज भारत सर्वार्थाने कुंठिथावस्थेत आहे. जात्यंतक लोकशाही क्रांतीच्या अभावात ही सर्वव्यापी कुंठितावस्था निर्माण झाली आहे. ही कुंठितावस्था भेदण्यासाठी जातिव्यवस्थेतील अंतर्विरोध क्रांतिकारी मार्गाने सोडवावा लागेल, असे त्यांचे निरीक्षण होते. केवळ वर्गीय अंतर्विरोध हे क्रांतिकारी मार्गाने सोडवावे लागतात, हे एस. बसवपुन्निया यांच्या प्रतिपादनाचा त्यांनी प्रतिवाद केला.
आनुवंशिकता, जन्मसिद्ध व्यवसाय, जातीत रोटीव्यवहार, जातीत बेटीव्यवहार, जातीनिहाय वस्त्या व जात पंचायत या लक्षणांनी युक्त असलेल्या जातिव्यवस्थेचा अंत करण्यासाठी लोकशाही क्रांती करावी लागेल. त्यासाठी जमिनीचे फेरवाटप आणि जात्यंतक प्रबोधन त्यांना आत्यंतिक महत्त्वाचे वाटले.
जातिव्यवस्थेचे सर्वांत प्रधान वैशिष्ट्य असलेल्या जातिअंतर्गत विवाहाच्या वैशिष्ट्याबाबत आंतरजातीय विवाह हे प्रसंगी कायद्याने बंधनकारक करण्याची भूमिका त्यांनी घेतली.
आपण काय केले पाहिजे?
'जातवर्गस्त्रीदास्यान्तक विचारकृतीशी प्रतारणाविहीन इमानदारी' बाळगून त्यांनी राजकीय कारकीर्द घालवली. त्यांचा हा प्रवास कोणत्याही वैचारिक तडजोडीशिवाय झाला असल्याने त्यांच्या भूमिका अनेकांना उग्र वाटल्या.
महाराष्ट्र सरकारने मुंबईतील घाटकोपर भागात झालेल्या दंगलीत 10 निरपराध दलितांची हत्या केल्याचा आरोप करीत शरद पाटील यांनी हा पुरस्कार नाकारला होता.
'मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद' या पुस्तकासाठी राज्य सरकारचा 'सर्वोत्कृष्ट मराठी वाङ्मय पुरस्कार' त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून नाकारला होता. मार्क्सवादाशी बांधिलकी आणि आपले डावेपण त्यांनी कधीही सोडले नाही.
मी जेव्हा कम्युनिस्ट चळवळीवर चाबकाचे फटकारे ओढतो तेव्हा माझ्याच पाठीवर वळ उमटत असतात, असे ते म्हणत.

फोटो स्रोत, Dr. Subhash Gawari
उकाई धरणाविरोधातील चळवळ जेव्हा शरद् पाटलांनी उभी केली, तेव्हा संपूर्ण सातपुडा पर्वतरांगा त्यांना पायथा घालाव्या लागल्या होत्या. चळवळीसाठीचा दौऱ्यापूर्वी त्यांनी नवी स्लीपर विकत घेतली होती.
जेव्हा ते दौऱ्याहून परत आले तेव्हा ती पूर्ण घासून चपटी होऊन गेली होती. आजच्या कार्यकर्त्यांच्या चपला अशाच झिजोत आणि आजच्या बुद्धिवंतांना असे सत्ताधार्यांचे दातृत्व नाकारण्याची सुबुद्धी लाभो, हीच त्यांना आदरांजली असू शकते.
(लेखक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक आहेत.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











