You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विमान प्रवासात पॉवर बँक घेऊन जात असाल तर आधी हे वाचाच
- Author, गॅविन बटलर
- Role, बीबीसी
गेल्या काही दशकात जगभरात विमान प्रवासात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र हे क्षेत्र विस्तारत असतानाच विमान प्रवासातील सुरक्षेचे मुद्देदेखील ऐरणीवर आले आहेत. विमानातील सुरक्षेबाबत नवनवीन आव्हानं समोर येत असताना आता यात पॉवर बँकेमुळे असणाऱ्या धोक्यांची भर पडली आहे.
पॉवर बँक, त्यामुळे विमानाला आग लागण्याचा धोका आणि एअरलाईन्स कंपन्यांनी यासंदर्भात घेतलेली भूमिका याबद्दल जाणून घेऊया.
दक्षिण कोरियात एअरबस ए 321 सीईओ या विमानात आग लागण्यामागचं कारण स्पष्ट झालं आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की पॉवर बँकेमुळे विमानात आग लागली होती.
दक्षिण कोरियातील गुमहाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 28 जानेवारी 2025 ला एअर बुसानच्या एका प्रवासी विमानात आग लागली होती. या दुर्घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाले होते.
14 मार्चला दक्षिण कोरियाच्या विमान वाहतूक मंत्रालयानं सांगितलं की तपासातून समोर आलं आहे की पॉवर बँकेत काहीतरी तांत्रिक दोष निर्माण झाला होता. त्यामुळेच विमानात आग लागली होती. पॉवर बँक विमानातील सर्वांत वरच्या भागात होती आणि तिथेच सर्वात आधी आग लागली होती.
आगीचा तपास करणाऱ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की त्यांना जी पॉवर बँक मिळाली, त्यावर जळाल्याच्या खुणा होत्या. अर्थात अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की शेवटी पॉवर बँकेतील बॅटरीमध्ये काय बिघाड झाला होता?
महत्त्वाची बाब अशी की हा फक्त अंतरिम तपास अहवाल आहे. अजून विमानाचा अंतिम तपास अहवाल समोर यायचा बाकी आहे.
कॅरी-ऑन सामानामध्ये पॉवर बँकेवर 2016 पासून बंदी
जगभरातील एअरलाईन्स कंपन्या अनेक वर्षांपासून सुरक्षेच्या कारणास्तव सामानात पॉवर बँक घेऊन जाण्यासंदर्भात सूचना देत आहेत.
पॉवर बँकेत लिथियम आयन बॅटरी असते. या बॅटरींमुळे तीव्र उष्णता निर्माण होऊ शकते. काही कारणास्तव त्यात बिघाड झाल्यास शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते.
आंतरराष्ट्रीय नागरी विमान उड्डाण संघटनेनं (ICAO) 2016 पासून प्रवासी विमानांमध्ये पॉवर बँकेला कॅरी-ऑन सामानात (केबिन लगेज) नेण्यास बंदी घातली आहे.
दक्षिण कोरियात एअरबस विमानात आग लागण्याची घटना घडल्यानंतर एअर बुसानच्या अधिकाऱ्यांनीदेखील सुरक्षेच्या कडक उपाययोजना अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे.
या अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे की ते प्रवाशांना त्यांच्या सामानातून पॉवर बँक घेऊन जाण्याची परवानगी देणार नाहीत.
1 एप्रिलपासून पॉवर बँकेवर बंदी
1 एप्रिलपासून सिंगापूर एअरलाईन्समध्ये विमानात पॉवर बँक नेण्यास बंदी असणार आहे.
तर चायना एअरलाईन्स आणि थाय एअरलाईन्सदेखील अशाच प्रकारचे नियम लागू करत आहेत.
लिथियम बॅटरीमुळे विमानात आग लागण्याच्या दुर्घटना याआधीदेखील झाल्या आहेत.
मार्च 2017 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्नहून बीजिंगला जाणाऱ्या एका विमानात एका महिलेच्या हेडफोनमध्ये छोटासा स्फोट झाला होता. त्यामुळे तिचा चेहरा भाजला होता.
हेडफोनमध्ये स्फोट झाल्याच्या आवाजानं ती महिला झोपेतून जागी झाली होती आणि तिथे तो हेडफोन लगेचच फ्लोअरवर फेकला होता.
ही दुर्घटना लिथियम आयन बॅटरीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे झाल्याची माहिती या दुर्घटनेनंतर समोर आली होती.
याआधी सिडनीत एक विमान थांबवण्यात आलं होतं. कारण या विमानातील सामानातून धूर निघताना आढळला होता.
नंतर समोर आलं होतं की या सामानात असलेल्या लिथियम आयन बॅटरीमध्ये आग लागली होती.
आग लागण्याच्या घटना का वाढत आहेत?
युकेच्या पर्यावरण सेवा संघटनेनं 2022 मधील एका अहवालात म्हटलं होतं की दरवर्षी कचऱ्याचे ढीग आणि कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्था किंवा कंपन्यांमध्ये आग लागण्याच्या 700 हून अधिक घटनांची नोंद होत असते. यामधील बहुतांश दुर्घटना फेकण्यात आलेल्या लिथियम आयन बॅटरींमुळे होतात.
एखादा तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे किंवा बॅटरी तुटल्यामुळे लिथियम आयन बॅटरीमध्ये छोटा स्फोट होऊ शकतो. या प्रकारच्या बॅटरींचा वापर फक्त पॉवर बँकांमध्येच होतो असं नाही. तर टूथब्रश, खेळणी, मोबाईल फोन आणि लॅपटॉपमध्ये देखील त्यांचा वापर केला जातो.
या बॅटरीमध्ये दोन इलेक्ट्रोड असतात. ते एकमेकांपासून वेगवेगळे ठेवले जातात आणि त्यामध्ये लिथियम आयनचे कण असतात. या बॅटरीला जेव्हा चार्ज केलं जातं, तेव्हा त्यातील कण किंवा आयन त्यांच्या मूळ स्थितीमध्ये परतात.
जर बॅटरीमध्ये बिघाड झालेला नसेल तर त्याचा वापर करणं सुरक्षित असतं. मात्र जर बॅटरीचे दोन इलेक्ट्रोड एकमेकांच्या संपर्कात आले तर स्फोट होऊ शकतो. त्यातून बॅटरीमध्ये असलेल्या रसायनामुळे आग लागू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)