'स्तनपानास नकार दिल्यामुळे लोक मला वाईट आई म्हणायचे, पण...'

    • Author, स्वाती जोशी आणि तझीन पठान
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सोनाली बंडोपाध्याय वयाच्या 29 व्या वर्षी आई झाली. तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता. पुढच्या एक वर्षानंतर तिला आणखी एक मूल झालं.

आता त्यांचा मुलगा सात वर्षांचा आणि मुलगी आठ वर्षांची आहे. दोन्ही मुले निरोगी आहेत.

पण जेव्हा दोन्ही मुले जन्माला आली तेव्हा सोनालीने ठरवलं होते की, ती त्यांना स्तनपान करणार नाही. म्हणजेच बाळांना दूध पाजणार नाही.

कारण त्यावेळी सोनाली एका मानसिक आजारावर (स्किझोफ्रेनिया) उपचार घेत होती.

वयाच्या 19 व्या वर्षापासून ती हा आजार बरा होण्यासाठी औषधं घेत होती.

मुलाच्या जन्माच्या वेळी तिने आपल्या मुलाला स्तनपान द्यायचं की नाही याविषयी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी सोनालीला स्तनपान करण्यास सांगितले. पण सोनालीने काही विचार करून निर्णय घेतला होता.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, "माझ्या शरीरात इतकी औषधे जात होती की मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हती. त्यामुळेच मी माझ्या मुलांना माझं दूध न पाजण्याचा निर्णय घेतला होता."

भीती आणि असुरक्षितता

सुरुवातीच्या दिवसात लोक तिला सांगायचे की मुलाला दूध न पाजल्याने आई आणि मुलामधील भावनिक नातेसंबंधावर परिणाम होतो. त्यामुळे सोनाली घाबरायची. तिला असुरक्षित वाटायचं.

पण आता सोनाली यावर विश्वास ठेवत नाही. "मला या सगळ्या पुराणातल्या कथा वाटतात. त्यात काहीही तथ्य नाही. आई नेहमीच आई असते, त्यात काहीही कमी होत नाही."

सोनालीला माहीत होतं की बाळाला स्तनपान करण्याचे अनेक फायदे आहेत. पण सोनाली अजूनही मानते की तिने त्यावेळी बाळाला स्तनपान न करण्याचा निर्णय हा तिच्या मुलांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम पाऊल होतं.

आजकालच्या जगात मातांना स्तनपानाविषयी वेगवेगळे अनुभव येतात. तसंच मुलांच्या आरोग्याबाबत अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो.

आई झालेल्या महिलेचे बाळाबाबत उत्तर सकारात्मक असेल तर तिला लोकांकडून प्रोत्साहन मिळते. पण जर तिने प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिली नाहीत तर तिला खोचकपणे बोललं जातं.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्तनपान हे आई आणि मूल दोघांसाठीही फायदेशीर आहे. जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांत बाळांना फक्त आईचेच दूध पाजावे.

तसं पाहायला गेले तर माता बनलेल्या बहुतेक स्त्रिया त्यांच्या बाळाला स्वतःचे दूध पाजू शकतात. पण या प्रकरणात काही विरोधाभास आहे.

बाळाच्या जन्मानंतर आईला दूध पाजता येत नसेल तर त्याची अनेक कारणे असू शकतात.

हा तिच्यासमोर एक नाईलाज असू शकतो किंवा तो त्या आईचा स्वतःचा निर्णयही असू शकतो.

पण एखाद्या महिलेने आपल्या मुलाला स्तनपान न करण्याचा निर्णय घेतला तर तिचा लगेच अपमान करायला सुरुवात होते, असं सोनाली सांगते.

काही स्त्रिया मुलाच्या जन्मानंतर लगेचच त्यांना स्तनपान न देण्याचा निर्णय घेतात. तर इतर माता काही काळानंतर बाळाला स्तनपान करणे थांबवतात.

हिमाचलच्या कसौली येथे राहणाऱ्या रोली निगम यांचं उदाहरण घ्या. आई होण्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिच्या बाळाला दूध पाजण्याचा अनुभव रोलीसाठी खूप समाधानकारक होता.

पण चार महिन्यांनंतर रोलीला पान्हा फुटणं कमी झालं. त्यामुळे बाळाला दूध पाजणे तिच्यासाठी मोठं आव्हान बनलं.

“माझ्या बाळाला दूथ पाजण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागायचे. तरीही काही केल्या पान्हा फुटत नव्हता. ही समस्या दिवसेंदिवस वाढत गेली. माझ्या बाळाचे पोट भरत नव्हते,” रोली सांगते.

'मी खरंच सामान्य आई आहे का?'

मिशेल मॉरिसलाही याच समस्येचा सामना करावा लागला होता. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर तिला आपल्या मुलाला स्तनपान करता आलं नाही. त्यावर मिशेल दीर्घकाळ विचार करत बसायची.

"मी खरंच एक सामान्य आई आहे का?" हा प्रश्न तिच्या मनात घोळत राहायचा.

मिशेल यांना दुसरं अपत्य झालं तेव्हा पण तोच प्रकार घडला. पण असं का घडलं असावं याविषयी विचारलं असता, त्या सांगतात, “याचं एकच उत्तर आहे ते म्हणजे याचं उत्तरच नाहीये”

स्त्रीरोग तज्ज्ञांनी मिशेल यांना यात काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही असं आश्वासन दिलं.

दरम्यान मिशेल यांना तिसरं मूल झालं. त्यांनी बाळाला काही दिवस स्तनपान केलं. पण तेही त्या महिनाभरच करू शकल्या.

मिशेल खूप जोर लावून बाळाला दूध पाजायच्या. त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली. शेवटी मिशेल यांनी मुलाला स्तनपान करण्यासाठी इतके कष्ट करण्याचं थांबवलं.

"त्यानंतर आम्ही जसं चाललंय तसंच चालू दिलं. स्तनापासाठी अधिकची मेहनत घेणं थांबवलं. तरीही मुलांची वाढ त्यांच्या सामान्य गतीने होत राहिली," असं मिशेल सांगतात

स्तनपानाची जास्त काळजी करण्याऐवजी रोली निगमने तिच्या आरोग्यावर आणि निरोगीपणावर अधिक भर दिला. सोबत तिच्या बाळाला दूध देणे बंद केले.

रोलीच्या या निर्णयावर कुटुंबातील लोकांनी नाराजी व्यक्त केली. तिच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

आजकाल महिला त्यांच्या बाजूने कोणतेही प्रयत्न करत नाहीत. त्यांना स्तनपान टाळण्यासाठी फक्त निमित्त हवं असतं, असं लोक म्हणून लागले.

"मी किती वाईट आई आहे हेच, लोक सांगत राहतात," असं रोली सांगतात.

पण आपल्या मुलाबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तिच्या आईलाच आहे, यावर रोली यांचा ठाम विश्वास आहे.

बदलता काळ, बदलती परिस्थिती

डॉ. शची खरे-बावेजा दिल्लीतील BLK-मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे वरिष्ठ सल्लागार आहेत .

आजकाल बाळांना स्तनपान करणे कठीण होत आहे का, की या पिढीतील माता स्वतःच्या सोयीसाठी स्तनपान टाळतात? असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला.

नवीन पिढीतील महिला आपल्या सोयीनुसार स्तनपान करतात हा विचार चुकीचा असल्याचे डॉ.शची सांगतात. याचा संबंध जीवनशैलीतील बदलाशी असल्याचं त्यांना वाटतं.

यात शारीरिक हालचाल कमी होणं आणि बैठे काम वाढणं याचा समावेश आहे. त्यामुळे महिलांच्या शरीररचनेत बदल आणि हार्मोन्सची कमी होते असल्याचे डॉ.शची सांगतात.

“आपले शरीर आणि हार्मोन्समध्ये बदलत आहेत. त्यामुळे स्त्रियांच्या बाळ देण्याच्या पद्धतीतही बोलत होतायत. त्याचा थेट परिणाम स्तनपानावर होतोय,” असं डॉ शची सांगतात.

2020 च्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या फक्त 64 टक्के बाळांना केवळ आईचं दूध दिले जात आहे.

तसंच जन्माच्या एका तासाच्या आत दहापैकी फक्त चार बाळांना आईचे दूध दिले जाते.

बाळाला जन्मानंतर एक तास किंवा एक दिवस उलटूनही आईचे दूध न पाजण्याची अनेक कारणे असल्याचं डॉ शची सांगतात.

त्यांच्यामते या गोष्टी करणं काही महिलांना शक्य नसतं. विशेषत: ज्या महिलांची सिझेरियन ऑपरेशनने प्रसूती झाली आहे. अशा नवजात बालकांना तातडीने ICUमध्ये ठेवणे आवश्यक असते.

नेहा सिंग यादवलाही अशाच समस्येचा सामना करावा लागला जेव्हा तिच्या जुळ्या मुलांचा जन्म अवघ्या 28 आठवड्यात झाला होता.

दोघांनाही महिनाभर नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आणि ती त्यांना तिचे दूध पाजू शकली नाही.

महिनाभर बाळांना दूध न पाजल्याने नेहा यांना दूध येणंही जवळपास बंद झालं होतं.

मुलांना स्तनपान करणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण आणि वेदनादायी बनलं होतं.

शेवटी नेहा आणि तिच्या कुटुंबीयांनी आईच्या दुधाच्या बँकेची मदत घेतली. यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पान्हा येण्यासाठी अनेक प्रयत्न केले.

मुलांना दूध पाजणं नेहा यांच्यासाठी खूप कठीण होतं. त्यांना व्यवस्थित झोपता येत नव्हतं. 24 तासांत नेहा जेमतेम तीन ते चार तास झोपू शकायच्या. तसंच त्यांना अर्ध्या तासाच्या टप्प्याने झोप घ्यावी लागायची.

अशा तीव्र ताणामुळे त्यांच्या शरीरात दूध कमी तयार व्हायचं. जुळ्या मुलांना दूध कधीच पुरलं नाही असं त्या सांगतात.

यामुळे त्यांना मुलांना वरचं दूध पाजावं लागलं.

"समाज अनेकदा आई होण्याचं खूप कौतुक करतो. पण मी देखील एक माणूस आहे. मलाही इतरांप्रमाणेच वेदना होतात," अशी खंत नेहा व्यक्त करतात.

मुलाला स्तनपान न केल्याने आई आणि मुलामधील भावनिक बंध कमकुवत होतात या गैरसमजुतीचा नेहा सारख्या अनेक महिलांना फटका बसला आहे.

डॉ. शची बावेजा यांच्याकडेही असेच प्रश्न येतात.

त्या सांगतात, "बाळाला स्तनपान करणं योग्य आहे की नाही याचं उत्तर होय किंवा नाही असं देता येणार नाही. जर आई आणि मूल एकत्र आनंदी असतील, तर आईने बाळाला दूध पाजले की नाही याचा काहीही फरक पडत नाही”

मेहज खान लहानपणापासूनच प्रोलॅक्टिन स्त्रवण्यासाठी औषधं घेत आहे. शरीरात प्रोलॅक्टिनचे प्रमाण जास्त असल्याने ज्या महिला गरोदर नाहीत किंवा आई झाल्या नाहीत त्यांच्यामध्येही दूध बाहेर पडू लागते.

आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे मेहज जेव्हा आई झाल्या तेव्हा त्यांना दूध येणं कमी झालं. आपल्या मुलासाठी पुरेसे दूधही मेहज यांच्या स्तनपानातून मिळत नव्हतं.

"मी तासनतास प्रयत्न करायचे तेव्हा दुधाचे एक-दोन थेंबही पडायचे. माझ्या पतीला माहीत होते की मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांनीही मला जास्त जबरदस्ती केली नाही.”

डॉ शची बावेजा या बाबतीत कुटुंब आणि समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानतात.

“बाळांना स्तनपान करता न आल्यामुळे नवीन मातांच्या मानसिक आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतोय. त्यांचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे आईची ही एक नैसर्गिक जबाबदारी आहे. जी ती पूर्ण करू शकत नाही, असा त्यांना समज निर्माण होतो.”

त्या पुढे सांगतात, "बाळांच्या पालकांनी स्तनपानाविषयी आधीच समजून घेतलं पाहिजे आणि शिकले पाहिजे.

तुमचे बाळ या जगात कधी पाऊल टाकेल याची वाट पाहू नका. त्याआधीपासूनच अभ्यास केला तर बाळ झाल्यावर स्तनपान न करण्याचा धक्क बसणार नाही.

डॉक्टर शची बावेजा म्हणतात की, बाळाला स्तनपान देण्याची प्रक्रिया मागणी आणि पुरवठ्यानुसार कार्य करते तेव्हाच जेव्हा तो जन्माच्या पहिल्या दिवसापासून आईचे दूध पिण्यास सुरुवात करतो. यामुळे आईला स्तनपानाचा चांगला अनुभव मिळतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)