मराठा आरक्षण GR : मनोज जरांगेंच्या कुठल्या मागण्या मान्य? अध्यादेशात नेमकं काय म्हटलंय?

मनोज जरांगे पाटील

फोटो स्रोत, ANI

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आता एकनाथ शिंदे सरकारने नवा जीआर काढला आहे.

‘सगेसोयरे’ असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. ती मान्य करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तो जीआर मनोज जरांगेंच्या हाती दिला आहे.

या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे. ते खालील प्रमाणे...

महाराष्ट्र अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग (जात प्रमाणपत्र देणयाचे व पडताळणी विनियमन) नियम 2012 मध्ये सुधारणा केली जात आहे. अधिनयमाच्या कलम 18 च्या पोटकलम 1 अंतर्गत सुधारणा केली जात आहे.

हा मसुदा महाराष्ट्र शासनाकडून 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येणार आहे. कोणालाही याबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास या तारखेपूर्वी त्या सरकारकडं सादर केल्यास त्यावर विचार केला जाईल.

या नव्या नियमाला महाराष्ट्र अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) (सुधारणा) नियम, 2024 म्हटले जाईल.

नियम क्र. 5 मधील उप-नियम (६) मध्ये क्रमशः पुढीलप्रमाणे तरतूद जोडण्यात येत आहे :-

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्‍तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल.

कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्‍त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्‍तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन ) नियम, 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील.

ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊनच सर्व सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील.

ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगेसोयरे म्हणजे, मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगेसोयरे, मात्र सगेसोयरे यांचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पध्दतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल.

मराठा

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करता येईल, मात्र या तरतुदीचा दूरुपयोग करता येऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीय आहे, यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जातप्रमाणपत्र देता येतील.

सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील.

नियम क्र. 16. अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती यामध्ये :-

(ज) उपलब्ध असल्यास, पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि/किंवा अर्जदाराच्या रक्‍तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्‍तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगेसोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र.

सगेसोयरे शब्दाची व्याख्या

(ज) (एक) सगेसोयरे — सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जजदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)