आशिया कप : मॅच संपताच मोहम्मद सिराजनं ग्राउंड स्टाफला दिला सुखद धक्का

फोटो स्रोत, ANI
मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियानं श्रीलंकेला हरवून आशिया चषक जिंकला.
कोलंबोत झालेल्या अंतिम सामन्यात सिराजच्या माऱ्यापुढे श्रीलंकेनं अक्षरश: शरणागती पत्कारल्याचं चित्र दिसलं. त्यांची अख्खी टीम 15.2 ओव्हरमध्ये 50 धावांतच गारद झाली.
सिराजनं एकट्यानं सहा विकेट्स काढल्या आणि लंकेची दाणादाण उडाली.
मग विजयासाठी 51 धावांचं लक्ष भारतानं 6.1 ओव्हर्समध्ये अगदी आरामात पार केलं. भारतासाठी सलामीवीर इशान किशननं नाबाद 23 तर शुबमन गिलनं नाबाद 27 धावा केल्या.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पहिल्या चार ओव्हरमध्येच त्यांचा निम्मा संघ माघारी परतला.
चौथ्या ओव्हरमध्ये सिराजचा लंकेला दणका
श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात मोहम्मद सिराजनं टाकलेली चौथी ओव्हर निर्णायक ठरली. त्या ओव्हरमध्ये सिराजनं चार विकेट्स काढल्या.
खरंतर जसप्रीत बुमरानं सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कुशल परेराला भोपळाही न फोडू देता बाद केलं होतं आणि भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला.
मग दुसऱ्या ओव्हरमध्ये सिराजनं बॉल हातात घेतला. त्या अख्ख्या ओव्हरमध्ये सिराजनं एकही रन दिली नाही, उलट कुशल मेंडिसला तीनदा चकवलं. पुढच्या ओव्हरमध्ये बुमरानंही केवळ एकच रन दिली.
श्रीलंकेवर दबाव वाढला, तेव्हा त्यांच्या डावात सिराजनं एका मागोमाग एक सुरुंग पेरले.
चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर सिराजनं पथुम निशांकाला रविंद्र जाडेजाकरवू झेलबाद केलं.
तिसऱ्या बॉलवर त्यानं सदिरा समरविक्रमाला पायचीत केलं. सिराजच्या या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर ईशान किशननं चरिता अशलांकाचा झेल टिपला.
पाचव्या बॉलवर धनंजय डिसिल्वानं चौकार लगावला. पण सहाव्या चेंडूवर सिराजनं त्याला राहुलकरवी झेलबाद केलं.

फोटो स्रोत, Getty Images
सिराजच्या त्या ओव्हरनं श्रीलंकेचं कंबरडंच मोडलं आणि त्यांची टीम सावरू शकली नाही. सामन्यातल्या सहाव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर सिराजनं दसुन शनाकाचा त्रिफळा उडवला. तर बाराव्या ओव्हरमध्ये त्यानं अखेर कुशल मेंडिसला माघारी धाडलं.
श्रीलंकेचा डाव संपल्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला, "हे स्वप्नासारखे आहे. गेल्यावेळी श्रीलंकेविरुद्ध मी चार विकेट घेतल्या होत्या. पण पाचवी विकेट घेऊ शकलो नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, जे काही तुमच्या नशिबात असतं, तेच तुम्हाला मिळतं. आज ते माझ्या नशिबात होतं, म्हणून मला ते मिळालं."
सिराज पुढे म्हणाला, "आजच्या सामन्यांइतका स्विंग मला पूर्वीच्या सामन्यांमध्ये मिळाला नाही. मला फलंदाजांना खेळू द्यायचे होते. मला आऊटस्विंगर्ससह विकेट मिळाल्याचे खूप समाधान आहे. कारण सहसा अशा परिस्थितीत मला विकेट मिळत नाहीत."
सिराजशिवाय जसप्रीत बुमराहने एक, तर हार्दिक पांड्यानं 3 विकेट्स काढून भारताच्या विजयाची पायाभरणी केली.

फोटो स्रोत, ani
मोहम्मद सिराजने त्याचं या मॅचचं मानधन स्टेडिअमच्या ग्राउंड स्टाफला दिलं आहे. श्रीलंकेत झालेल्या सामन्यांदरम्यान पावसानं सतत व्यत्यय आणला. पण प्रत्येक वेळी ग्राउंड स्टाफनं मॅचसाठी मैदान पूर्ववत करून दिलं.
त्यांच्या या मेहनतीची दखल घेत सिराजनं त्याचं मानधन या स्टाफला दिलंं. “5 हजार अमेरिकी डॉलरचं हे मानधन आहे. यावर त्यांचा हक्क आहे. त्यांच्या मेहनतीशिवाय ही मॅच शक्य झाली नसती,” असं सिराजनं म्हटलं आहे.
हा विजय भारतासाठी का महत्त्वाचा?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा नववा आशिया कप अंतिम सामना आहे. ही स्पर्धा जिंकणं भारतासाठी महत्त्वाचं होतं.
तीनच आठवड्यात भारतात ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारताकडेच असल्यांनी सर्वांचं त्याकडे लक्ष आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 च्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत केलेल्या किमयेची पुनरावृत्ती करण्याचा दबाव कर्णधार रोहित शर्मावर नक्कीच असेल.
यंदाच्या आशिया कप स्पर्धेत भारताची कामगिरी ही चढ-उतारांनी भरलेली आहे.
आशिया कपमध्ये भारताची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने झाली. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात भारताची कामगिरी विशेष काही झाली नव्हती. यानंतर नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला आणि सुपर फोर फेरीत प्रवेश केला.
सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. पण राखीव दिवस असल्यामुळे हा सामना पूर्ण झाला. यामध्ये भारताने मोठा विजय मिळवला. नंतर श्रीलंकेविरुद्धही रोमांचक विजय मिळवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
मात्र, सुपर फोर फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताचा मुकाबला बांगलादेशविरुद्ध झाला. या सामन्यात पराभव झाल्यानं भारतीय संघावर टीकाही झाली.
पण आशिया कपच्या फायनलमधला विजय टीम इंडियाचा आत्मविश्वास आणि भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा उंचावणारा ठरला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








