हे गलिच्छ राजकारण; विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे- हसन मुश्रीफ

फोटो स्रोत, facebook
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी तसंच कारखान्यावर ईडीने छापे टाकले आहेत.
कोल्हापुरातील कागल येथे आप्पासाहेब नलावडे गडहिग्लज साखर कारखाना हा अनधिकृतपणे चालविला जात असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तसेच आमदार हसन मुश्रीफ यांचे जावई व स्वत: मुश्रीफ यांनी या कारखान्यात 100 कोटीचा घोटाळा तसेच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे सरकारच्या भ्रष्ट मंत्र्याला हिशेब द्यावाच लागेल असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी, हसन मुश्रीफ हे लढवय्ये नेते आहेत. संकटाशी सामना करणारे आहेत. ते या संकटातून बाहेर पडतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मागील वर्षी देखील आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी व कार्यालय येथे छापेमारी केली होती.
त्यानंतर आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि आयकर विभागाने धाडी टाकली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आज पहाटे सकाळी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी आयकर विभाग व ईडीने छापेमारी करत असल्याची माहिती मिळताच, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
कारण मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील त्यांना मानणार एक मोठा गट तसेच त्यांचा चाहता वर्ग आहे.
आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी पडल्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, कार्यकर्त आक्रमक झाले आहेत. तसेच कार्यकर्ते आयकर विभाग व ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत.
हे गलिच्छ राजकारण- हसन मुश्रीफ
“मी काही कामानिमित्ताने बाहेर आहे. कारखाना, निवासस्थान, नातेवाईकांची घरं हे सगळं तपासण्याचं काम सुरू आहे. मला दूरध्वनीवरुन ही बातमी समजली. मुलीच्या घरावर छापे घातले आहेत. कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी शांतता राखावी. प्रसारमाध्यमांमध्ये कागल आणि अन्यत्र ठिकाणी बंद पुकारल्याचं कळलं. बंद मागे घ्यावा अशी त्यांना विनंती करतो. ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे. कुठलाही दंगाधोपा करु नये. कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं”, असं हसन मुश्रीफ यांनी व्हीडिओच्या माध्यमातून सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “दीड दोन वर्षापूर्वीही असे छापे पडले होते. केंद्रीय यंत्रणांनी सगळी माहिती घेतली होती. छापा कशासाठी घालण्यात आला याची मला माहिती नाही. वास्तविक मी 30-35 मी सार्वजनिक जीवनात आहे. कोणत्या हेतूने छापा घालण्यात आला समजलेलं नाही. मी सगळी माहिती घेतल्यावर खुलासा करेन. तोवर कार्यकर्त्यांनी शांतता राखावी.
कागल परिसरातील भाजप नेत्यांनी माझ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांवर ईडीची कारवाई होईल असं सांगिततलं होतं. हे जे चाललं आहे ते गलिच्छ स्वरुपाचं राजकारण आहे.
राजकारणात अशा स्वरुपाच्या कारवाया होणार असतील तर याचा निषेधच व्हायला हवा. नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई होते आहे. विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे अशी शंका येते आहे”.
संबंधित कारखान्याशी माझा संबंध नाही. ब्रिस्क कंपनीशी माझा संबंध नाही. ईडीच्या छाप्याचं कारण माहिती नाही. शेतकऱ्यांचे पैसे घेऊनच आजपर्यंत सगळ्या कारखान्यांची उभारणी झाली आहे. मुलाबाळांना नाहक त्रास देणं चूक. कुटुंबाला का त्रास देता? वातावरण भयभीत करण्याचा प्रयत्न आहे. सत्ता आल्यानंतरसुद्धा ते थांबत नव्हते. चंद्रकांत गायकवाडांशी कोणतंही व्यावहारिक कनेक्शन नाही. गडहिंग्लजचा अप्पासाहेब नलवडे कारखाना लिलावात घेतलेला नाही. शासनाच्या नियमानुसार भाडेकरारपोटी ब्रिस्क कंपनीला चालवायला दिला. दोन वर्षांपूर्वी ही कंपनी मोठा तोटा झाला म्हणून सोडून गेली होती. संचालक मंडळातर्फे कामकाज चालतं. जावयाचा आणि त्या कंपनीचा काहीही संबंध नाही. आयकर विभागाने बेनामीची कारवाई सुरू केली होती. त्यासुद्धा वरिष्ठ न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मला आयकर विभागाने चौकशीला बोलावलं नव्हतं. मुलाला बोलवलं. असं ते पुढे म्हणाले.
केंद्रात आपलंच सरकार आणि राज्यात आपलं सरकार असलं म्हणून असं वागू नये.
पोलिसांना, आणि इतर तपास संस्थांना त्यांची कारवाई करण्याचा अधिकार आहे. पण आताची परिस्थिती पाहता शंकेला वाव आहे.
तपास संस्थांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. पण नाहक कोणालाही त्रास देता कामा नये. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








