You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कृषी सेवा केंद्रासाठी परवाना कसा मिळवायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गाव तसंच तालुका पातळीवर आज कृषी सेवा केंद्रांची दुकानं मोठ्या प्रमाणावर थाटल्याचं दिसून येत आहे.
कृषी विषयात शिक्षण घेतलेले तरुण कृषी सेवा केंद्रांकडे एक व्यवसायाचं साधन म्हणून पाहत आहेत.
कृषी सेवा केंद्रांमधून खते, बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करता येते. पण त्यासाठी कृषी विभागाकडून रीतसर परवाना घ्यावा लागतो.
त्यामुळे कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी परवाना मिळवण्याची प्रक्रिया काय असते? आणि कृषी सेवा केंद्राचा परवाना कशामुळे रद्द होऊ शकतो? सविस्तर माहिती जाणून घेऊया.
अर्ज कुठे करायचा?
कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी कृषी पदविका तसंच कृषी विज्ञान विषयात पदवी (BSc.) प्राप्त तरुण-तरुणी अर्ज करू शकतात.
कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागतो.
‘आपले सरकार’ या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. इथं सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि मग कृषी विभाग निवडून ‘कृषी परवाना सेवा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
इथं तुम्ही बियाणे, रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीसाठीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.
कोणतीही एक गोष्ट विक्रीचा किंवा तिन्ही प्रकारचे परवाने तुम्ही मिळवू शकता.
अर्जासाठी फी किती लागते?
तुम्ही नेमकं काय विक्रीसाठी परवाना मागत आहात, त्यानुसार शुल्काची रक्कम वेगवेगळी आहे. ती पुढीलप्रमाणे-
- कीटकनाशके विक्रीचा परवाना – 7,500 रुपये
- बियाणे विक्रीचा परवाना – 1,000 रुपये
- रासायनिक खते विक्रीचा परवाना – 450 रुपये
कागदपत्रे कोणती लागतात?
ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला त्यासोबत काही कागदपत्रं जोडायची आहेत. त्यामध्ये,
- जिथं दुकान टाकायचं आहे त्या जागेचा गाव नमुना-8
- ग्रामपंचायतचे ना-हरकत प्रमाणपत्र
- शॉप अॅक्टचं प्रमाणपत्र
- कृषी सेवा केंद्र उभारायची जागा तुमच्या मालकीची नसल्यास भाडेपट्ट्याचा करार
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- शैक्षणिक अर्हतेचं प्रमाणपत्र
अर्ज केल्यानंतर पुढे काय होतं?
एकदा का तुम्ही ऑनलाईन अर्ज सबमिट केला की तो जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यांच्याकडे जातो.
त्यांनी मंजुरी दिल्यानंतर कृषी उप-संचालक यांच्या टेबलावर तो अर्ज जातो. त्यांनीही मंजुरी दिली की तो अंतिम मंजुरीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे जातो.
जिल्हा कृषी अधीक्षकांच्या मंजुरीनंतर तुम्हाला कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळते.
साधारपणे एका महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणं अपेक्षित असतं.
परवाना कधी रद्द होतो?
कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द होण्याची प्रमुख दोन कारणं सांगितली जातात.
एक, कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचं दर 5 वर्षांनी नूतनीतकरण करणं गरजेचं असतं. तसं न केल्यास तुमचा परवाना रद्द होऊ शकतो.
दुसरं म्हणजे, तुम्ही तुमच्या कृषी सेवा केंद्रातून बेकायदेशीररित्या खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री करत असल्याचं स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आलं आणि त्यासाठी तुम्हाला जिल्हा कृषी अधीक्षकांनी दोषी ठरवलं, तर तुमचा परवाना रद्द होऊ शकतो.
त्यामुळे, कृषी सेवा केंद्र चालकांनी चढ्या दरानं खते, बियाण्यांची विक्री करू नये. तसंच बंदी असलेला माल दुकानात ठेवू नये, असा सल्ला दिला जातो.
कृषी सेवा केंद्रातून किती नफा राहतो?
कोणताही व्यवसाय सुरू करण्यामागे त्यातून नफा मिळावा, ही अपेक्षा असते.
कृषी सेवा केंद्राचा विचार केल्यास, कीटकनाशक विक्रीतून 7 ते 13 %, बियाण्यांच्या विक्रीतून 10 ते 11 % आणि खतांच्या विक्रीतून 3 ते 7 % एवढा नफा कमावता येऊ शकतो, असं कृषी सेवा केंद्र चालकांच्या बोलण्यातून समोर येतं.
यामध्ये उधारीवर किती प्रणामात माल दिला जातो, हाही फॅक्टर महत्त्वाचं असल्याचं कृषी सेवा केंद्र चालक सांगतात.
राहुल जऱ्हाड हे गेल्या 5 वर्षांपासून जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं कृषी सेवा केंद्र चालवत आहेत.
कृषी सेवा केंद्राच्या व्यवसायातून नफा मिळवण्यासाठी काय गरजेचं आहे, या प्रश्नावर ते सांगतात, "कृषी सेवा केंद्र चालकानं शेतकऱ्याच्या पिकाच्या प्लॉटवर जाऊन पिकांची पाहणी केली पाहिजे. तिथं रोग-कीड काय आहे, ते पाहून शेतकऱ्यास योग्य औषध किंवा सल्ला दिल्यास शेतकऱ्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो.
"यामुळे संबंधित शेतकरी शेवटपर्यंत आपल्याशी जोडला जातो. या माध्यमातून आपल्याला व्यवसायातून वृद्धी पण होते आणि नफाही मिळत राहतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)