You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
WPL : मुंबई इंडियन्सने पटकावलं पहिल्या विमेन्स प्रीमिअर लीगचे विजेतेपद
फलंदाज नॅट सिव्हर-ब्रँटचं धडाकेबाज अर्धशतक आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या संयमी फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने पहिल्यावहिल्या विमेन्स प्रीमिअर लीगचं विजेतेपद पटकावलं आहे.
WPL च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघाचा 7 विकेट राखून पराभव केला. दिल्लीने दिलेलं 132 धावांचं आव्हान मुंबईने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 19.3 षटकांत पूर्ण केलं.
मुंबईकडून या स्पर्धेत धावांचा रतीब घालणारी नॅट सिव्हर-ब्रँट हीच आजच्या विजयाची शिल्पकार ठरली. नॅटने 55 चेंडूंमध्ये आक्रमक 60 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने तिला दिलेल्या संयमी साथीच्या बळावर मुंबईने आपला विजय साकार केला. हरमनप्रीत कौरने 37 धावा बनवल्या.
तत्पूर्वी, शिखा पांडे आणि राधा यादव यांच्या शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 132 धावांचे लक्ष्य दिलं.
दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबई इंडियन्सची गोलंदाज इसी वाँग हिने दुसऱ्याच षटकात एकापाठोपाठ दोन विकेट घेत दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का दिला.
त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ सावरू शकला नाही आणि सातत्याने विकेट पडत राहिल्या.
पण शेवटच्या षटकात शिखा पांडे आणि राधा यादव या जोडीने दिल्ली कॅपिटल्ससाठी वेगवान धावा केल्या आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. दोघांनी प्रत्येकी 27-27 धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्सची खराब सुरुवात
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सची सलामीवीर शेफाली वर्मा अवघ्या 11 धावा करून बाद झाली.
शेफालीच्या जागी आलेली अॅलिस कॅप्सी फक्त एक चेंडू खेळून शून्यावर बाद झाली.
जेमिमा रॉड्रिग्जलाही दुहेरी आकडा पार करता आला नाही. तिलाही वाँगने बाद केले.
यानंतर मारिजाने कॅपने कर्णधार लॅनिंगसह डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण 18 धावा केल्यानंतर तिला एमिलिया केरने बाद केले.
एका बाजूने विकेट पडत राहिल्या, तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने कमान राखली. पण लॅनिंग वैयक्तिक 35 धावांवर धावबाद झाली.
यानंतर अरुंधती रेड्डी खाते न उघडता बाद झाली. जेस जोनासेनला केवळ 2 धावा करता आल्या. मीनू मणी एक धाव आणि तानिया भाटिया खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले.
मात्र शेवटच्या षटकांमध्ये शिखा पांडे आणि राधा यादव यांची जोडी मैदानावर कायम राहिली. शिखा पांडेने एक षटकार आणि तीन चौकारांच्या जोरावर 27 धावा केल्या. आणि राधा यादवने 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सकडून इसी वाँग आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. एमिलिया केरला एक विकेट मिळाली.
अंतिम सामना- तुल्यबळ लढत
WPL च्या फॉरमॅटनुसार, गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला दिल्ली संघ थेट अंतिम फेरीत पोहोचला.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा सहज पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
दोन्ही संघांची या स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात 'काँटे की टक्कर' होणार हे निश्चित आहे.
दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मॅग लेनिंग हिने आतापर्यंत संघाकडून सर्वाधिक रन बनवले आहेत. मुंबई इंडियन्सची नॅट सिव्हर ब्रँट हिने 272 धावा बनवल्या आहेत.
दोन्ही संघातील खेळाडू -
दिल्ली कॅपिटल्स - मॅग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, मॅरिजेन कॅप, ऐलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधति रेड्डी, तानिया भाटिया, मीनू मणी, राधा यादव, शिखा पांडेय.
मुंबई इंडियंस विमेन- हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया, हेली मॅथ्यूज़, नॅट सिव्हर-ब्रँट, एमिलिया केर, पूजा वस्त्रकार, इसी वाँग, अमनजोत कौर, हुमेरा काझी, जिंतिमणी कलिता, साइका इशाक.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)