सोन्याचे दर सातत्याने का वाढत आहेत? काय आहेत कारणं?

भारतात सोन्याची खरेदी केवळ गुंतवणूक करण्यासाठी नाही तर विविध सणसमारंभासाठी देखील केली जाते. शिवाय, अलिकडच्या काळात लोक सोन्यात अधिकाधिक गुंतवणूक करत आहेत.

आर्थिक अनिश्चितता आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना सोन्यात केलेली गुंतवणूक सुरक्षित वाटते.

मात्र अलिकडच्या काळात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 2 एप्रिलपर्यंत 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,400 रुपये प्रति ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,430 रुपये प्रति ग्रॅम होता.

मद्रास गोल्ड ज्वेलरी अँड डायमंड मर्चंट्स असोसिएशनचे सरचिटणीस सनथकुमार यांनी बीबीसी तमिळशी बोलताना सोन्याच्या दरवाढीमागे नेमकं काय कारण आहे याची माहिती दिली.

सोन्याचे भाव सातत्याने का वाढत आहेत?

शांता कुमार म्हणतात की, ॅआंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलांमुळे सोन्याचे दर वाढत आहेत. जगातील प्रमुख मार्केट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणारं लंडन बुलियन मार्केट सोन्याची किंमत ठरवते. मोठमोठे खाणमालक, मोठे उद्योगपती या संघटनेत आहेत. या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत वाढत आहे.ॅ

इथे सोन्याचा एक ट्रॉय औंस 31.1 ग्रॅम इतका आहे. सोन्याचा एक ट्रॉय औंस 1,800-1,900 डॉलर होता, त्यात किरकोळ वाढ झाली आहे आणि तो आता 2,256 डॉलरच्या वर आहे. डिसेंबर 2023 मध्ये 2,135 डॉलर इतकी वाढ झाली होती. या वाढीपेक्षा आत्ताचा दर 8 टक्क्यांनी जास्त आहे.

दुसऱ्या बाजूला भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 83.40 रुपये आहे. भारतातील सोन्याचे भाव वाढण्यामागचं हे देखील एक कारण आहे.

याशिवाय आयात शुल्क, युद्धजन्य परिस्थिती आदी कारणांमुळे देखील भाव वधारले आहेत. भारत दरवर्षी सरासरी 800 टन सोने आयात करतो. स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, दुबई इत्यादी देशांतून सोन्याची आयात केली जाते.

मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतील आर्थिक संकट. तिथे रोजगार निर्देशांक खूप खाली गेला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रालाही मंदीचा फटका बसला आहे. शेअर बाजारातही मंदी आहे.

सोन्यात गुंतवणूक केली पाहीजे का?

आपल्याकडे पैसे असतील तेव्हा सोनं खरेदी करावं असं सहसा बोललं जातं. आता सोनं खरेदी करणं ही अल्पकालीन गुंतवणूक आहे. पण लग्नासारख्या मोठ्या समारंभासाठी सोनं नक्कीच खरेदी करता येईल.

भारतीय लोक सोन्यात मोठी गुंतवणूक करतात. पण हेच पैसे बँकेत भरल्यास, व्याजदर कमी असतो. अनेक लोक सोन्यात गुंतवणूक करतात कारण ती सुरक्षित गुंतवणूक आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढून भाववाढ झाली आहे.

मुख्य वित्तीय अधिकारी आणि गुंतवणूक सल्लागार असलेले सतीश कुमार यांनी सोन्याच्या वाढत्या किमतींवरील विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

सतीश कुमार म्हणतात, "अमेरिकेतील महागाई हे सोन्याच्या किमती वाढण्याचं प्रमुख कारण आहे. जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अमेरिकेत चलनवाढीचा दर 3.1% होता. अजूनही यूएस फेडरल रिझर्व्हच्या 2% च्या लक्ष्यापेक्षा हा दर जास्त आहे. सोन्याच्या किमती वाढण्याचं हे देखील एक कारण आहे."

लोक गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय शोधत आहेत. सोने ही सुरक्षित गुंतवणूक असल्याचं सिद्ध झालंय.

भारतासह आशियाई देशांमध्ये सोन्याकडे मालमत्ता म्हणून पाहिलं जातं. परंतु इतर देशांमध्ये सोनं ही गुंतवणूक मानली जाते.

किंमत वाढल्यावर तुम्ही सोनं विकू शकता का?

जेव्हा सोन्याची किंमत सतत वाढत असते तेव्हा बरेच लोक सोनं विकण्याचा विचार करतात. स्टॉक मार्केटच्या बाबतीत, जेव्हा किंमत वाढते तेव्हा आपण स्टॉक विकतो.

पण सोन्याबाबत असं करू नका, कारण सोनं कायम तेजीत असणार आहे.

गेल्या 20 वर्षांचा विचार करता सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत कारण सोन्याची मागणी वाढली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे.

यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल अशी अनेकांची अपेक्षा होती. पण आता त्यासाठी जून उजाडेल अशी शक्यता आहे.

अमेरिकेत सध्या निवडणुकीचा हंगाम आहे. त्यामुळे भू-राजकीय बदलही सोन्याच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरेल. महागाई कायम राहिल्याने सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा फर्म जे.पी मॉर्गनसह अनेक कंपन्यांच्या मते सोन्याचे भाव आणखी वाढतील. सोन्याच्या किमती 2025 पर्यंत वाढतच राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.