You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'वर्क फ्रॉम होम' कसं ठरत आहे 'निरोगी जीवनशैली'साठी उपयोगी? अभ्यासातून समोर आले निष्कर्ष
- Author, हॉली फिलिप
- Role, बीबीसी न्यूज
धावपळीचं जीवन, दिवसभर एकाच ठिकाणावर बसून काम करण्याचं वाढतं प्रमाण, अतिरिक्त ताण यामुळे अनेकांचं आरोग्य ढासळू लागलं आहे. कामाचा वाढता व्याप आणि दगदगीचं आयुष्य यात आपलं शरीराकडे दुर्लक्ष होतं. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
विविध अभ्यास आणि संशोधनाच्या माध्यामतून या समस्यांवर उपाय शोधण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत.
अशाच एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यायामाचे प्रमाण वाढले असून त्याचे आरोग्याच्या दृष्टीनं सकारात्मक बदल दिसून आले आहेत.
हा नेमका काय अहवाल आहे, त्यात काय माहिती देण्यात आली आहे आणि त्याचं महत्व काय, याबाबत जाणून घेऊयात.
यॉर्कशायर आणि हंबर भागातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी सांगितलं की घरून काम केल्यानं त्यांचे व्यायामाचे प्रमाण वाढले आहे. बेटर या धर्मादाय सामाजिक संस्थेने हा अहवाल सादर केला. त्यांनी एका कार्यशाळेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची त्यांच्या कार्यशैली आणि आयुष्याबाबत अभ्यास केला.
यामध्ये कामाचा कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यात आला.
नोकरीसाठी अर्ज करताना हायब्रिड मोडवरील काम प्राधान्यक्रमांच्या यादीत सर्वात वर असल्याचं सांगितलं.
एनएचएसमध्ये काम करणाऱ्या हल येथील रेबेका थॉम्पसन म्हणाल्या की, रिमोट वर्कमोडमुळे तिला 'व्यायाम करण्यासाठी पुरेसा आणि अधिक वेळ' मिळतो. कारण तिला प्रवास करण्याची गरज नसते आणि ती कामाच्या आधी व दुपारच्या जेवणाच्या वेळी व्यायाम करू शकते.
यासह आता तिला सँडविच आणि कॅन्टीनमधील चिप्सवर अवलंबून राहावं लागत नाही. कारण, घरी स्वत: स्वयंपाक करुन जेवत असल्यामुळं आहारदेखील अधिक पोषक झाल्याचं ती सांगते.
'व्यायाम - निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली'
यॉर्कशायर आणि हंबर प्रदेशातील 42% लोकांनी सांगितलं की, घरून काम केल्याने त्यांना व्यायामासाठी अधिक वेळ मिळतो, असं अभ्यासातून दिसून आलं आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 25% लोकांनी सांगितलं की घरून काम केल्यामुळे त्यांची व्यायामाची क्षमता काहीशी वाढली, तर 16% लोकांनी त्यांच्या व्यायामाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असल्याचं सांगितलं.
हुल येथील वैयक्तिक प्रशिक्षक क्लेअर हेंडरसन म्हणाल्या, "कामाच्या या पद्धतींमुळे लोकांची जीवनशैली आणि आरोग्य यात सकारात्मक बदल घडून आले आहे. कारण पाच दिवस सातत्याने आठ तास टेबलावर चिकटून बैठं काम केल्यानं शारीरिक आणि मानसिक थकवा येतो आणि याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
"समजा तुम्हाला घर ते ऑफिस आणि परत घरी जाण्यासाठी साधारण तासभर लागत असेल. तर, घरुन काम करताना तो वेळ वाचतो आणि घरी सोप्या पद्धतीनं व्यायाम करण्यासाठी तो वेळ उपयोगी ठरतो," असं त्या म्हणाल्या.
मानसिक आरोग्यात सुधारणा
हुल विद्यापीठाच्या स्पोर्ट्स आणि ॲक्टिव्ह वेलबीइंग विभागाच्या क्रीडा विकास व्यवस्थापिका सोफी जॉन्सन-रीड म्हणाल्या की, हायब्रिड वर्कमोड मॉडेल ऑफिसच्या कामातील लवचिकतेसह 'उत्पादकता वाढवण्यासही मदत करते.
"कामातील व्यस्तता आणि ताण यामुळे शरीरावर आणि मनावर ताण येतो. परंतु आपण याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, व्यायाम हा शरीरासाठी आवश्यक असून निरोगी आयुष्य आणि कामासाठी या व्यायामासारख्या गोष्टींवर आपण प्राथमिकतेनं लक्षं द्यायला हवं", असं त्या म्हणाल्या.
एनएचएसनुसार, नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांना स्ट्रोक्स, टाइप 2 डायबिटीस आणि कर्करोग यांसारख्या मोठ्या आजारांचा धोका कमी असतो. यामुळे नैराश्य तर कमी होतंच आणि एकूण मानसिक आरोग्यदेखील सुधारते.
आठवड्यातून किमान 150 मिनिटं वेगवान चालणे, सायकल चालवणे किंवा नृत्य करण्यासारखा साधा व्यायाम केल्यास त्याचे सकारात्मक बदल पाहायला मिळतात. त्यामुळे निरोगी आयुष्याच्या दृष्टीनं हल्का व्यायामही उपयोगी पडतो, असं एनएचएसचा अभ्यास सांगतो."
सोफी जॉन्सन-रीड पुढे म्हणाल्या, "मी क्रीडा क्षेत्रात काम करत असल्याने याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोण थोडासा पक्षपाती वाटू शकतो, पण मी प्रामाणिकपणे मानते की नित्यनियमाने व्यायाम करणे आणि त्याप्रति सक्रिय राहणे हे निरोगी आयुष्यासाची लॉटरी लागण्यासारखं आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.