एखाद्या गावाइतक्या लोकसंख्येचं बेट, पण वेबसाईटच्या एका डोमेनमधून करतंय कोट्यवधींची कमाई

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेकब इवान्स
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
1980 च्या दशकात इंटरनेट तसं सुरुवातीच्या टप्प्यातच होतं. त्यावेळेस जगभरातील अनेक देशांना हे नवं ऑनलाइन जग चालवण्यासाठी त्यांच्या वेबसाईट्सना नवीन अॅड्रेस किंवा पत्ते दिले जात होते.
हे अॅड्रेस अर्थातच वेबसाईटच्या नावातून स्पष्ट होत असत. म्हणजेच, आजच्या भाषेत सांगायचं 'अमूक तमूक डॉट कॉम' इत्यादी.
उदाहरणार्थ, अमेरिकेतील वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटच्या डोमेननंतर 'डॉट यूएस' असं दिलं जायचं किंवा वेबसाईट जर ब्रिटनमधील असेल तर त्याला 'डॉट यूके' असं नाव दिलं जायचं.
त्यानंतर जवळपास प्रत्येक देशात आणि भागात इंग्रजी किंवा त्या देशाच्या भाषेतील नावाच्या आधारे एक डोमेन तयार झालं.
यात एका छोटाशा बेटाला डोमेन अॅड्रेस मिळाला होता 'डॉट एआय' (.ai). ते बेट म्हणजे कॅरेबियन द्वीपसमूहातील अँगुइला.
त्यावेळेस अँगुइला या बेटाला अजिबात कल्पना नव्हती की हा डोमेन अॅड्रेस भविष्यात त्याच्यासाठी जॅकपॉट ठरेल. याच्यामुळे त्याला दणकून कमाई करता येईल.
गेल्या काही वर्षात जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार होतो. त्याचा प्रभाव वाढतो आहे.
त्याचा परिणाम असा झाला आहे की आता जास्तीत कंपन्या आणि लोक 'डॉट एआय' टॅगनिशी नवीन वेबसाईटची नोंदणी करण्यासाठी ब्रिटिश ओव्हरसीज टेरिटरी असलेल्या अँगुइला बेटाला पैसे मोजत आहेत.
देशाच्या कमाईत डोमेन विक्रीचा एक चतुर्थांश वाटा
तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकन उद्योगपती धर्मेश शाह यांनी या वर्षाच्या सुरुवातीला 'यू डॉट एआय' (you.ai) या अॅड्रेससाठी कथितरित्या 7 लाख डॉलर्स मोजले होते.
बीबीसीशी बोलताना धर्मेश शाह यांनी सांगितलं की त्यांनी हा अॅड्रेस विकत घेतला कारण त्यांच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अशा उत्पादनाची कल्पना होती, ज्यामुळे लोकांना त्यांचं डिजिटल व्हर्जन बनवता येणार होतं आणि हे उत्पादन त्यांच्यासाठी विशिष्ट काम करू शकणार होतं.
डोमेन नावाच्या नोंदणीवर लक्ष ठेवणाऱ्या एका वेबसाईटनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये 'डॉट एआय' वेबसाईटची संख्या 10 पटींहून अधिकनं वाढली आहे. तर गेल्या फक्त 12 महिन्यांमध्ये यात दुपटीनं वाढ झाली आहे.
फक्त 16 हजार लोकसंख्या असलेल्या अँगुइलासमोर आव्हान आहे की या जबरदस्त कमाई करून देणाऱ्या संधीचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा आणि याला दीर्घकाळ टिकणारं कमाईचं साधन म्हणून कसं बनवायचं.
इतर छोट्या कॅरेबियन बेटांप्रमाणेच अँगुइलाची अर्थव्यवस्थादेखील पर्यटनावर अवलंबून आहे. आलिशान श्रेणीतील पर्यटकांना हे बेट आकर्षित करत आलं आहे. विशेषकरून अमेरिकेतील पर्यटकांना या बेटानं आकर्षित केलं आहे.

फोटो स्रोत, HUBSPOT
अँगुइलाच्या सांख्यिकी विभागाचं म्हणणं आहे की गेल्या वर्षी या बेटावर विक्रमी संख्येनं पर्यटक आले होते. या बेटावरील सुंदर समुद्र किनाऱ्यांचा आनंद तब्बल 1 लाख 11 हजार 639 पर्यटकांनी घेतला होता.
असं असतानाही अँगुइलाच्या पर्यटनाला दरवर्षी पानगळीच्या (साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर) मोसमात चक्रीवादळाच्या तडाखा बसतो.
कॅरेबियन द्वीपसमूहाच्या ईशान्येला असलेलं अँगुइला हे बेट पूर्णपणे उत्तर अटलांटिक महासागराच्या चक्रीवादळाच्या पट्ट्यात येतं.
त्यामुळेच वेबसाईटचे अॅड्रेस विकून मिळणारं उत्पन्न या बेटाच्या अर्थव्यवस्थेत वैविध्य आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं आहे. चक्रीवादळामुळे होणारं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी या उत्पन्नाची मदत होते आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (आयएमएफ) अँगुइलावरील त्यांच्या अहवालात या गोष्टीचा उल्लेख केला आहे.
2025 च्या अर्थसंकल्पीय दस्तावेजात अँगुइला सरकारनं म्हटलं आहे की 2024 मध्ये त्यांनी डोमेन नावं विकून 10 कोटीहून (105 मिलियन) अधिक ईस्ट कॅरेबियन डॉलर्सचं उत्पन्न मिळवलं. ही रक्कम जवळपास 4 कोटी (39 मिलियन) अमेरिकन डॉलर्सइतकी आहे.
गेल्या वर्षी अँगुइला सरकारला मिळालेल्या एकूण महसूलाच्या जवळपास एक चुतर्थांश इतकी ही रक्कम आहे. आंतरराष्ट्रीय नाणेविधीनुसार इथल्या उत्पन्नात पर्यटनाचा वाटा 37 टक्के आहे.
बेटावर आहे ब्रिटनचा प्रभाव
अँगुइलाच्या सरकारची अपेक्षा आहे की, 'डॉट एआय'मुळे होणारं त्यांचं उत्पन्न यावर्षी वाढून 13.2 कोटी ईस्ट कॅरेबियन डॉलर्सवर पोहोचेल, तर 2026 मध्ये ते 13.8 कोटी ईस्ट कॅरेबियन डॉलर्सवर पोहोचेल.
सध्या साडे आठ लाखांहून अधिक डॉट एआय डोमेन उपलब्ध असताना ही अपेक्षा ठेवली जाते आहे. 2020 मध्ये त्यांची संख्या पन्नास हजारांहूनदेखील कमी होती.
ब्रिटिश ओव्हरसीज टेरिटरी म्हणून हे बेट युके सरकारच्या अंतर्गत येतं. मात्र, याला उच्चस्तरावर अंतर्गत स्वायत्तता देण्यात आलेली आहे.
या बेटाच्या संरक्षण धोरणावर ब्रिटनचा पूर्ण प्रभाव आहे. संकटकाळात ब्रिटननं या बेटाला आर्थिक मदतदेखील दिली आहे.
2017 मध्ये 'इरमा' या चक्रीवादळामुळे या बेटाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर बेटावरील पुनर्उभारणीच्या कामासाठी ब्रिटननं पाच वर्षांमध्ये अँगुइला बेटाला सहा कोटी पौंडची मदत केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटनच्या परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास विभागानं बीबीसीनं सांगितलं की, आर्थिक विकासासाठी नवीन मार्ग शोधण्याच्या अँगुइलाच्या प्रयत्नांचं ते स्वागत करतात. कारण यामुळे या बेटाच्या 'आर्थिक स्वावंलबित्वा'ला मदत होते.
डोमेन नावांमुळे वाढणाऱ्या उत्पन्नाचं व्यवस्थापन करण्यासाठी अँगुइला बेटानं ऑक्टोबर 2024 मध्ये 'आयडेंटिटी डिजिटल' या तंत्रज्ञान क्षेत्रातील एका अमेरिकन कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार केला आहे. इंटरनेट डोमेन नावाच्या नोंदणीत ही कंपनी तज्ज्ञ आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला 'आयडेंटिटी डिजिटल' कंपनीनं जाहीर केलं होतं की त्यांनी त्यांच्या सेवा अँगुइलाच्या सर्व्हरवरून काढून त्यांच्या आंतरराष्ट्रीय सर्व्हर नेटवर्क टाकल्या आहेत. या सर्व्हर 'डॉट एआय'चं होस्टिंग केलं जातं.
यापुढच्या काळात बेटावर येणारं चक्रीवादळ किंवा वीज पुरवठा खंडित होणं इत्यादीसारख्या बेटावरील पायाभूत सुविधांमध्ये निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

लाखो डॉलरला होतो आहे लिलाव
'डॉट एआय' अॅड्रेसचं योग्य मूल्य उघडपणे सांगितलं जात नाही. मात्र असं म्हटलं जातं की याच्या नोंदणीचं मूल्य दीडशे अमेरिकन डॉलरपासून दोनशे अमेरिकन डॉलरपर्यंत असतं. दर दोन वर्षांनी जवळपास इतकीच रक्कम रिन्यूअल शुल्क म्हणून घेतली जाते.
याशिवाय अधिक मागणी असणाऱ्या डोमेन नावांचा लिलाव केला जातो. त्यातून काही लाख अमेरिकन डॉलर्सचं उत्पन्न मिळतं. मात्र त्यानंतर त्याच्या मालकांना इतरांप्रमाणेच कमी रिन्यूअल शुल्क भरावं लागतं.
या सर्व गोष्टींतून अँगुइला सरकारला जे उत्पन्न मिळतं, त्यातून 'आयडेंटिटी डिजिटल' कंपनीला जवळपास दहा टक्के वाटा दिला जातो. मात्र या विषयावर बोलण्यास ते संकोच करत होते. त्यामुळे दोघांनी मुलाखत देण्यास नकार दिला.
धर्मेश शाह यांचं 'यू डॉट एआय' हे सध्या सर्वाधिक किंमत मोजून विकत घेण्यात आलेलं डोमेन नाव आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे चाहते आणि हबस्पॉट या अमेरिकेन सॉफ्टवेअर कंपनीचे सह-संस्थापक असलेले धर्मेश शाह यांच्या नावावर इतरही अनेक डोमेन अॅड्रेस आहेत. मात्र त्यांचं मुख्य डोमेन यू डॉट एआय हे अद्याप सुरू झालेलं नाही. कारण सध्या ते इतर प्रकल्पांवर काम करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
शाह म्हणतात, "डोमेन अॅड्रेस स्वत:साठीच विकत घेतले जातात. मात्र कधीतरी तो विकण्याबद्दलदेखील विचार केला जाऊ शकतो. जर माझ्याकडे या डोमेन नावासाठी लगेचच एखादी योजना नसेल आणि दुसऱ्या एखाद्या उद्योगपतीला तो हवा असेल तर ते विकता येतं."
त्यांना वाटतं की लवकरच इतर एखादी व्यक्ती किंवा कंपनी 'डॉट एआय' या डोमेनला विकत घेण्यासाठी सर्वाधिक किंमत मोजण्याचा नवा विक्रम करेल.
ते म्हणतात,"आगामी काळात 'डॉट कॉम' डोमेनच्या किंमती आणखी वाढतील आणि दीर्घकाळ त्या तशाच राहतील, असं सध्या मला वाटतं."
गेल्या काही आठवड्यांमध्ये 'डॉट एआय'च्या लिलावात मोठ्या प्रमाणात लाखो डॉलर्सची किंमत मोजण्यात आली आहे.
जुलै महिन्यात क्लाऊड 'डॉट एआय' हे डोमेन सहा लाख अमेरिकन डॉलरला विकलं गेलं होतं. तर ऑगस्टच्या सुरुवातीला लॉ डॉट एआय हे डोमेन साडे तीन लाख अमेरिकन डॉलरला विकलं गेलं होतं.
या देशानं देखील डोमेन विकून कमावले लाखो डॉलर
मात्र डोमेन विकून कमाई करण्याचा मुद्दा फक्त अँगुइला या बेटापुरता लागू होत नाही. तुवालू या पॅसिफिक महासागरातील आणखी एका छोट्याशा बेटानं 1998 मध्ये डॉटटीव्ही या त्यांच्या डोमेन नावाचा परवाना देण्यासाठी एक विशेष करार केला होता.
वृत्तांमधून समोर आलं आहे की यातून डोमेनची नोंदणी करणाऱ्या 'वेरी साइन' या अमेरिकन कंपनीला दरवर्षी 20 लाख अमेरिकन डॉलरच्या बदल्यात एक्सक्लूझिव्ह अधिकार देण्यात आले. नंतर ही रक्कम वाढून 50 लाख अमेरिकन डॉलरवर पोहोचली.
एका दशकानंतर इंटरनेटचा वेगानं विस्तार झाल्यावर तुवालूचे अर्थमंत्री लोटोआला मेटिया म्हणाले की 'वेरी साइन'नं 'अतिशय किरकोळ' किंमतीला डोमेन नाव वापरण्याचा अधिकार मिळवला.
नंतर 2021 मध्ये या देशानं डोमेन सेवा पुरवणाऱ्या 'गो डॅडी' या आणखी एका कंपनीबरोबर करार केला.

फोटो स्रोत, Getty Images
अँगुइला एका वेगळ्या पद्धतीनं काम करतं आहे. त्यात डोमेन नावाचं व्यवस्थापन एका विशिष्ट ठरलेल्या रकमेवर देण्याऐवजी 'रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल' अंतर्गत देण्यात आलं आहे.
उत्पन्नाची ही नवी व्यवस्था टिकेल अशाप्रकारे बनवणं हे या देशासमोरील मोठं उद्दिष्टं राहिलं आहे.
अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे की या बेटाचं वाढलेलं उत्पन्न, पर्यटनाला चालना देण्याबरोबर बेटावरील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं, आरोग्याच्या चांगल्या सुविधा पुरवणं आणि एक नवीन विमानतळ बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
नोंदणी झालेल्या डॉट एआय डोमेनची संख्या 10 लाखांच्या जवळ पोहोचते आहे. अशावेळी अँगुइलाच्या लोकांना अपेक्षा असेल की या रकमेचा वापर योग्य प्रकारे आणि त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी केला जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











