केरळजवळ बुडलेल्या मालवाहू जहाजातून तेलगळती; महाराष्ट्राच्या किनाऱ्याला काय धोका?

फोटो स्रोत, ANI
- Author, इमरान कुरेशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
अरबी समुद्रात 25 मे रोजी एक मालवाहू जहाज बुडल्याची घटना घडली आहे. हे जहाज केरळच्या किनाऱ्याजवळ बुडले असून त्यातून झालेल्या तेलगळतीमुळे केरळ सरकारने किनारपट्टीवरील भागांसाठी अलर्ट जारी केला आहे.
लायबेरियाच्या एमएससी इएलएसए – 3 या मालवाहू जहाजावर एकूण 640 कंटेनर होते. त्यापैकी 13 कंटेरनमध्ये धोकादायक रसायन होते. यातील 12 कॅल्शियम कार्बाईड हे रसायन होतं, ज्याचा समुद्राच्या पाण्याशी संपर्क आल्यास ज्वलनशील वायू तयार होतो.
या व्यतिरिक्त जहाजात 84.44 मेट्रिक टन डिझेल आणि 367.1 मेट्रिक टन फर्नेस ऑइलदेखील होते, तर 73 कंटेनर रिकामे होते. या घटनेमुळे जलप्रदुषणासह पर्यावरणाचे नुकसान होण्याची भीती आहे.
नैऋत्य मान्सूनच्या तीव्रतेमुळे, आतापर्यंत झालेल्या नुकसानीचा तत्काळ अंदाज घेणे कठीण झाले आहे.
या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः अलप्पुझा, कोल्लम, एर्नाकुलम आणि तिरुवनंतपुरम येथे सतर्कता वाढवली आहे.
दरम्यान, किनाऱ्यालगतच्या काही भागांत काल (26 मे) रात्री आणि आज (27 मे) सकाळी नऊ कंटेनर्स वाहुन आले, त्यापैकी चार कंटेनर्स एकट्या अलप्पुझा जिल्ह्यातील विविध ठिकाणी आढळून आले आहेत.
मच्छिमारांना दिल्या या सूचना
सरकारने नागरिकांना, विशेषतः मच्छिमारांना जहाज बुडाल्याच्या ठिकाणापासून 20 नाविक मैलांच्या परिघात मासेमारी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आपत्कालीन उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

फोटो स्रोत, ANI
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मच्छिमारांना समुद्रातून वाहुन आलेल्या कंटेनर्सच्या जवळ न जाण्याचे आवाहन केले आहे. बुडालेल्या किंवा वाहत आलेल्या कंटेनरपैकी कोणतेही कंटेनर दिसल्यास त्याला स्पर्श करणे किंवा त्याच्या जवळ जाण्याचे टाळावे, अशा सूचना दिल्या आहेत.
तसेच याबाबत तत्काळ 112 या क्रमांकावर सूचित करण्याचे आवाहनही केले आहे. यासह कंटनेरपासून किमान 200 मीटर अंतर ठेवा, गर्दी करू नका असंही सांगतानाच या वस्तू काढून टाकताना अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणू नका, योग्य अंतर ठेवा, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
मदतकार्य
दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाने शनिवारीच जहाजावरील 24 कर्मचाऱ्यांची सुटका करण्याचे काम हाती घेतले. यापैकी 21 जणांची सुटका झाली होती. तर, उर्वरित कप्तान आणि इंजिनियर अशा तीन कर्मचाऱ्यांचीही सुटका करण्यात आली आहे.
तेलगळतीचा धोका लक्षात घेत सुरुवातीलाच प्रदुषणाचा प्रतिकार करण्यासाठी तीन आयसीजी जहाजं तैनात करण्यात आली होती आणि "1.5 नाविक मैलांच्या क्षेत्रात तेलगळती दिसून आली, जी नंतर 2.2 नाविक मैलांपर्यंत पसरली."

फोटो स्रोत, ANI
वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईहून एक विशेष जहाज रवाना करण्यात आले आहे, जे या ऑपरेशनमध्ये मदत करेल.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कमांडर अतुल पिल्लई (कोची) यांनी BBC हिंदीला सांगितले की, "आम्ही निरीक्षणासाठी जे डॉर्नियर विमान पाठवले होते, त्याला तेलगळतीचा माग सापडल्यानंतर लगेच प्रदूषण नियंत्रणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 'ऑइल स्पिल डिस्पर्संट (OSD)' चा तत्काळ वापर करण्यात आला. मात्र, पावसामुळे खूप अंधार असल्याने काल संध्याकाळी आणि आज सकाळी पुनर्मूल्यांकन होऊ शकलं नाही."
सुरुवातीच्या अडचणी
हे जहाज अरबी समुद्रात, अलप्पुझा जिल्ह्यातील थोट्टापल्ली बंदरापासून 14.6 नाविक मैल अंतरावर बुडाले.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, ही टीयर-2 श्रेणीची आपत्ती असून राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणा, साधनसंपत्ती आणि सुविधा यांच्या माध्यमातून प्रतिसाद आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
जर कंटेनर्स किनाऱ्याच्या दिशेने वाहुन आले, तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतर्गत 'फॅक्टरी आणि बॉयलर विभागाच्या दोन रॅपिड रिस्पॉन्स टीम्स (आरआरटी)' आधीच तैनात ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, X/@indiacoastguard
जहाज एका बाजुला झुकले तेव्हाच सुमारे 100 कंटेनर समुद्रात पडले आणि पावसामुळे ते आता आता किनाऱ्याच्या दिशेने वाहात येत आहेत. त्याच आधारे ही पूर्वतयारी करण्यात आली आहे.
जहाजात असलेले तेल समुद्राच्या तळाशी बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे तटरक्षक दल, नौदल, वन विभाग आणि फॅक्टरी व बॉयलर विभाग यांच्या समन्वयाने एक व्यापक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अजूनही मोठी लढाई बाकी
केरळ युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशन स्टडीजमधील अॅक्वाटिक एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट विभागाच्या प्रमुख प्रा. अनु गोपीनाथ यांच्या मते, पर्यावरण, सागरी जीवन आणि मच्छिमारांच्या उपजीविकेवर झालेल्या परिणामांचे पूर्ण आकलन येत्या काही दिवसांत शक्य होणार नाही.
बीबीसी हिंदीसोबत बोलताना ते म्हणाले, "आपल्याला परिस्थितीची तीव्रता समजून घेण्यासाठी आकडेवारीची प्रतीक्षा करावी लागेल. किती कंटेनर उघडे होते आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारची रसायने होती हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण तेल गळती फक्त जहाजातूनच झाली आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही."
पुढे बोलताना प्रा. गोपीनाथ म्हणाले, "आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर्स स्टीलचे आहेत. जर तसे असेल, तर सागरी जीवनावर फारसा परिणाम होण्याची किंवा मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाही. तसेच जर कंटेनर्समधील साहित्य समुद्रात पसरलं नसेल, तर घाबरण्याचं काही कारण नाही."
"परंतु, कंटेनर्समधील रसायने समुद्रात मिसळली, तर पुढील 6 ते 12 महिने या परिसरावर बारकाईने नजर ठेवावी लागेल. कारण कॅल्शियम कार्बाइडसारखी रसायने एक्वेटिक सिस्टीममध्ये विरघळण्यास वेळ घेतात. ही रसायनं माशांच्या शरीरात पोहोचण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी मच्छिमारांना काही काळ त्या भागात मासेमारी करण्यापासून रोखावे लागेल. तसेच संपूर्ण भागावर सातत्यानं लक्ष ठेवावं लागेल."

फोटो स्रोत, ANI
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडताना प्रा. गोपीनाथ म्हणाले, "अशीही शक्यता वर्तवली जात आहे की कॅल्शियम कार्बाइड असलेले 13 कंटेनर जर पाण्याच्या संपर्कात आले, तर त्याचा अॅसिटिलीन गॅसप्रमाणे स्फोट होऊ शकतो. जोपर्यंत ही खात्री होत नाही की कंटेनर्स स्टीलचे आहेत, तोपर्यंत तोपर्यंत पूर्णपणे खात्री देता येणार नाही. जर कंटेनर्स स्टीलचे असतील, तर आग लागण्याची शक्यता नाही, असंही त्यांनी सांगितलं.
प्रो. गोपीनाथ पुढे सांगतात, "आम्ही रसायनांच्या साहाय्याने तेल काढून टाकण्याच्या उपाययोजना केल्या आहेत. असे असले तरी, तेल गळतीच्या परिणामांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा हे तेल समुद्राच्या तळाशी साचेल. हे घटक समुद्री जीवांच्या, विशेषतः माशांच्या शरीरात साठण्याचा दीर्घकालीन परिणाम होतो, त्यामुळे याचा वैज्ञानिकदृष्ट्या तपास व्हायला हवा."
या तेलगळतीचा महाराष्ट्राला धोका आहे का?
सध्याच्या स्थितीनुसार महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात प्रवाहाची दिशा साधारण वायव्येकडून आग्नेयेकडे अशी आहे. त्यामुळे INCOSI नं दिलेल्या अलर्टमध्ये फक्त केरळचा समावेश आहे आणि महाराष्ट्राला थेट धोका दिसत नाही. पण तज्ज्ञांच्या मते हे सगळं किती प्रमाणात तेलगळती होते आणि समुद्रातल्या प्रवाहाची तसंच वाऱ्यांची दिशा काय आहे यावर अवलंबून असतं. तसंच सागरी जीवांवर याचा काय परिणाम होतो हेही महत्त्वाचं ठरेल. त्यामुळेच केरळजवळ बुडलेल्या जहाजावर नजर ठेवून राहणं गरजेचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











