You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोन्याचे दर गगनाला भिडले, आता गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल का?
सोन्याची किंमत काय आहे?
सोन्याची किंमत किती वाढत आहे?
सोन्याचे दर नेमके किती वाढू शकतात?
सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?
आणि आतापर्यंत सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघितल्या जाणाऱ्या सोन्याच्या बाबतीत या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवर शोधली जात आहेत.
मंगळवारी (4 फेब्रुवारी) बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा तेजी आली आहे.
अखिल भारतीय सराफा असोसिएशनच्या मते, 10 ग्रॅम (म्हणजेच एक तोळा) सोन्याची किंमत 83 हजारांच्या वर गेली आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सतत वाढत आहेत.
एका बाजूला सोन्याचे दर वाढत चाललेत, तर दुसऱ्या बाजूला डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे.
सोमवारी (3 फेब्रुवारी) रुपया आजवरच्या विक्रमी निच्चांकी पातळीवर पोहोचला होता. त्यादिवशी एका डॉलरची किंमत 87 रुपये 17 पैसे एवढी होती. रुपयामध्ये एका दिवसात 55 पैशांची घसरण झाली होती.
महागाई वाढण्याची शक्यता
ट्रम्प प्रशासनाने केलेल्या या कडक उपाययोजनांमुळे जगभरात महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सोन्याकडे गुंतवणुकीचा मोर्चा वळवला आहे.
शेअर बाजाराचे विश्लेषक आसिफ इक्बाल म्हणतात, "सध्याच्या वातावरणात अनेक गुंतवणूकदार सोन्याला हेजिंग स्ट्रॅटेजी म्हणून बघत आहेत. त्यांना भीती आहे की, त्यांना शेअर बाजारात तोटा होऊ शकतो, म्हणून ते सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय शोधत आहेत."
अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अरुण कुमार यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कामुळे अनिश्चिततेचं वातावरण आहे. जेव्हा जगात अनिश्चितता असते तेव्हा लोकांना सुरक्षितता हवी असते. सोन्याची मागणी वाढते, ज्यामुळे त्याच्या किमती वाढतात."
खरंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के आणि चीनवर 10 टक्के कर लादण्याचे आदेश दिले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ते मेक्सिको आणि कॅनडावर 25 टक्के कर लादण्याची योजना 30 दिवसांसाठी पुढे ढकलतील.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला कोणतीही सूट दिली नाही आणि त्यांनी युरोपियन युनियनवर शुल्क लादण्याबाबतही भाष्य केलं आहे.
चीनने देखील अमेरिकन वस्तूंवर कर लादणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच, येणाऱ्या काळात टॅरिफ वॉरची (कर युद्धाची) शक्यता वाढली आहे.
सोन्यातली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते
सोन्याच्या किमती वाढण्याचं आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे जगभरातील मध्यवर्ती बँका सोने खरेदी करत आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे आणि मध्य पूर्व आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे, सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही बघितलं जात आहे.
प्राध्यापक अरुण कुमार म्हणतात, "डॉलर हे एक मजबूत चलन आहे. 2007 ते 2009 दरम्यानच्या आर्थिक मंदीच्या काळात डॉलरचे किंमत वाढली पण इतर चलने घसरली. डॉलर आणि सोन्याचं मूल्य घसरणार नाही असं मानलं जातं."
अरुण कुमार म्हणाले, "जर रुपया घसरला तर लोक डॉलर आणि सोन्याकडे वळतील."
डॉलर इंडेक्समध्ये देखील वाढ होत आहे. आणि अलिकडेच हा इंडेक्स (निर्देशांक) 109च्या वर गेला आहे. याचा अर्थ डॉलरच्या किमतीचा परिणाम सोन्यासह संपूर्ण कमोडिटी मार्केटवर होत आहे.
प्राध्यापक अरुण कुमार म्हणतात, "रुपया इतर चलनांच्या तुलनेत नाही तर डॉलरच्या तुलनेत घसरला आहे. पौंड आणि इतर चलनांच्या तुलनेत रुपया घसरलेला नाही."
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही अलिकडेच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचं मान्य केलं, पण त्या म्हणाल्या, "रुपया केवळ मजबूत होत असलेल्या डॉलरच्याच तुलनेत कमकुवत झाला आहे. मात्र रुपयाचा पाया मजबूत असल्यामुळेच इतर सर्व चलनांच्या तुलनेत रुपया स्थिर आहे."
आता सोन्यात गुंतवणूक करायला हवी का?
ज्याप्रमाणे शेअर बाजार आणि कमोडिटी बाजारात अनिश्चितता आहे, त्याचप्रमाणे अनेक तज्ञांना सोन्याच्या भविष्यातील वाटचालीबद्दल खात्री नाही. तज्ञांचा असा विश्वास आहे की एकरकमी गुंतवणुकीऐवजी, लोकांनी सोन्याची किंमत कमी झाली की लगेच गुंतवणूक करण्याची रणनीती अवलंबली पाहिजे.
शेअर बाजाराचे अभ्यासक आसिफ इक्बाल म्हणतात की, ज्यांना दीर्घकाळासाठी सोन्यात गुंतवणूक करायची आहे ते 'गोल्ड ईटीएफ' आणि 'सॉवरेन गोल्ड फंडा'मध्ये गुंतवणूक करू शकतात.
असिफ इक्बाल म्हणाले, "प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्याचा देखील एक पर्याय असू शकतो, पण हे करत असताना सोन्याची घडणावळ आणि साठवणुकीचा खर्च देखील लक्षात घेतला पाहिजे."
ते म्हणतात की, जगभरातील अनेक देशांमध्ये अस्थिरता आहे आणि महागाईचा परिणाम देखील दिसतो आहे. अशा परिस्थितीत, सोन्यातील वाढीचा कल कायम राहू शकतो, परंतु तो एकतर्फी राहणार नाही आणि त्यादरम्यान, गुंतवणूकदारांना खरेदीच्या संधी मिळत राहतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)