अधिक महिना नेमका काय असतो? हा महिना दर तीन वर्षांनी कसा येतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जयदीप वसंत
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
भारतीय पंचांग आणि हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार 18 जुलैपासून अधिक महिना सुरू झाला आहे. या महिन्याला ‘पुरुषोत्तम मास’ असंही म्हणतात.
पूर्वी 'मलमास' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अतिरिक्त महिन्याला विष्णू आणि कृष्ण यांच्याशी जोडल्या गेलेल्या पौराणिक कथांमुळे, श्रद्धांमुळे ‘पुरुषोत्तम मास’ असंही म्हटलं जातं.
अधिक महिन्यात कोणतंही शुभ काम करणं टाळलं जातं, परंतु दान-धर्माला मात्र या महिन्यात विशेष महत्त्व दिलं गेलं आहे.
पण या महिन्याचं महत्त्व केवळं धार्मिक भावनांशी जोडलं गेलं नाहीये, तर खगोलशास्त्रीय दृष्ट्याही हा महिना महत्त्वाचा असतो. मुळात हा अतिरिक्त महिना पंचागात येतो कसा? खगोलशास्त्रातील कोणत्या गोष्टीमुळे दर तीन वर्षांनी अतिरिक्त महिना येतो? त्यामागचं गणित काय आहे?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही आपण जाणून घेऊयात.
अधिक महिन्याशी संबंधित पौराणिक कथा
गेल्या 25 वर्षांपासून ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासात गुंतलेल्या अर्चित रावल सांगतात, "या वर्षी 18 जुलैपासून अधिक महिना सुरू होत आहे. 16 ऑगस्टपर्यंत अधिक महिना असेल. या काळात मुंडन, जानोई, साखरपुडा, लग्न, नवीन घरात प्रवेश, नवीन वाहन खरेदी, संपत्ती खरेदी करणे टाळतात."
"हा महिना भगवान विष्णूंचा आवडता महिना मानला जातो. या काळात विष्णू सहस्त्राचे पठण आणि उपासना महत्त्वाची मानली जाते. याशिवाय पवित्र नद्यांमध्ये स्नान, गोदान, दीपदान आणि तांबूलदान महत्त्वाचे आहे."
धार्मिक विषयावरील स्तंभलेखक आणि पौराणिक साहित्याचे अभ्यासक सुरेश प्रजापती सांगतात, “भागवत पुराण आणि पद्म पुराण यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याशी एक अधिष्ठाता देवता संबंधित आहे. परंतु अधिकामासोबत कोणतीही अधिष्ठाता देवता जोडलेली नाही. यामुळे तो 'अपवित्र महिना' म्हणून ओळखला जाऊ लागला. मलमास किंवा अपवित्र महिना असल्याने यात कोणतंही शुभ काम करण्यास मनाई केली गेली.”
“यामुळे व्यथित झालेल्या मलमासाने विविध देवांकडे जाऊन आपला अधिष्ठाता होण्यासाठी विनवणी केली, परंतु कोणीही त्याचा स्वीकार केला नाही. देव आणि मनुष्यांनी त्यागलेल्या या महिन्याने वैकुंठात विष्णुला शरण जाऊन त्याची प्रार्थना सुरू केली. विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या महिन्याला श्रीकृष्णाला शरण जायला सांगितलं.”

फोटो स्रोत, Getty Images
हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार श्रीराम हा विष्णुचा सातवा अवतार मानला जातो. रामाला 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून ओळखले जाते, श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे आणि 'पूर्ण पुरुषोत्तम' रूप असल्याचं मानलं जातं.
प्रजापती पुढे म्हणतात, "मलमासाने श्रीकृष्णाला आपली प्रमुख देवता बनण्याची प्रार्थना केली. श्रीकृष्णाने ती स्वीकारली आणि मलमास हा 'पुरुषोत्तम मास' म्हणून ओळखला जाऊ लागला.”
कृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले, त्यामुळे तो पवित्र झाला. या महिन्यात श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी व्रत-वैकल्यं, पूजा करतात. त्यामुळेच ‘मलमास’ हा ‘भक्तिमास’, ‘पुरुषोत्तममास’ बनला.
पुराणात या महिन्यात भक्तीची अनेक उदाहरणे आहेत.
अधिक महिना हा कसा मोजला जातो?
कार्तिकी पंचागचे संपादक वसंतलाल पोपट यांच्या म्हणण्यानुसार, "सामान्यत: एक चांद्र वर्ष हे सौर वर्षापेक्षा सुमारे 10 दिवसांनी लहान असते. सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करतो. याला 'सूर्य संक्रांती' म्हणतात. उदाहरणार्थ- सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला 'मकर संक्रांती' म्हणतात. अशा प्रकारे महिन्यात 12 संक्रांती असतात."
"ज्या महिन्यात सूर्य संक्रांत येत नाही, तो 'अधिक महिना' मानला जातो. अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास तीन वर्षांतून एकदा येतो. सौर आणि चांद्र वर्षांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करणे हा त्यामागचा उद्देश आहे."
वसंतलाल पुढे सांगतात, "याशिवाय ऋतू आणि सण यांचा समन्वय साधण्यातही अधिक महिन्याची भूमिका असते.”
वसंतलाल गेली 31 वर्षे हरिलाल प्रेस पंचांगचे संपादन करत आहेत. हे पंचांग जवळपास 80 वर्षांपासून प्रकाशित होत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पंचांगात तिथी, वर, नक्षत्र, योग आणि करण (तीस तासांच्या वेळेचे एकक) असे पाच भाग आहेत. संपूर्ण दिवस हा काळ मोजण्याचं एक प्राचीन एकक आहे.
भारतीय पंचाग आणि धर्मशास्त्रांत सौर, चंद्र, पृथ्वीवरील वृत्तं आणि नक्षत्र यांच्या स्थानांनुसार कालगणना केली जाते.
एका ऋतूपासून सुरुवात करून त्या ऋतूत परत येणे हे वर्ष मानले जाते आणि त्यात सूर्याचा राशींमधला प्रवेश 22 दिवसांनी उशीरा मानला जातो.
गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटीने प्रकाशित केलेल्या 'अॅस्ट्रॉनॉमिकल लेक्चर सिरीज' मध्ये (पृष्ठ 50-51) वर दिलेल्या वर्णनानुसार:
राशींच्या संक्रांतीनुसार, सूर्य जेव्हा बारा राशींमधलं संक्रमण पूर्ण करतो तेव्हा एक 'सौरवर्ष' पूर्ण होतं. परंतु व्यवहारात चांद्रमास प्रचलित आहेत. हा महिना शुद्ध प्रतिपदा ते वद्य अमावस्या असा मोजला जातो.
चांद्रमासात एका महिन्यात 29 दिवस 31 तास 50 सेकंद असतात, तर सौर महिन्यात 30 दिवस, 26 तास, 19 मिनिटं आणि 31 सेकंद असतात.
अशा प्रकारे दर महिन्याला 54 तास, 29 मिनिट आणि 31 सेकंदांचा फरक पडतो. म्हणजे बत्तीस सौर महिने आणि साडे तीस चंद्रमहिने.
अशा प्रकारे सुमारे बत्तीस सौर महिने, साडेतीस चंद्र महिने. त्यामुळे पाच वर्षांत सरासरी दोन लीप महिने असतात. त्यामुळे सरासरी पाच वर्षांनी दोन अधिक मास येतात.
इंग्रजी कॅलेंडर आणि पंचागातला फरक
भारतात अधिकृतपणे आणि व्यवहारात इंग्रजी दिनदर्शिका वापरली जाते. त्यामुळे पंचांग आणि या कॅलेंडरची तुलना होणे स्वाभाविक आहे.
सौराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. एच. पी. जोशी यांच्या म्हणण्यानुसार, "इंग्रजी कॅलेंडर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालते. रात्री बारा वाजता दिवस बदलतो. तर हिंदू कालगणना चांद्र कॅलेंडरवर चालते. चांद्र आणि सौर वेळेमध्ये दररोज 54 मिनिटांचा फरक असतो, जो तिथीतल्या घटाने समायोजित (adjust) केला जातो. याचा अर्थ एका इंग्रजी तारखेला दोन तिथी असतात."
"तसेच इंग्रजी कॅलेंडरनुसार 365 दिवस अधिक एक चतुर्थांश दिवस आहेत. ज्यामध्ये दर चार वर्षांनी एकदा फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जोडला जातो. याला लीप वर्ष म्हणतात."
एका चांद्र महिन्यात सूर्याने आपली राशी बदलली तर त्याला ‘शुद्ध मास’ म्हणतात, जर राशी बदलली नाही तर त्याला ‘अधिक मास’ म्हणतात आणि जर दोनदा राशी बदलली तर त्याला ‘क्षय मास’ म्हणतात.
सूर्याचं विषुवृत्तापासूनचं अंतर सर्वांत जास्त असतं आणि एकदा सर्वांत कमी अंतर हे चांद्रमासामध्ये शुद्ध प्रतिपदा आणि अमावस्येच्या दिवशी येत असेल, तर त्याला क्षय मास म्हणतात. अशावेळी वर्षांत अकराच महिने येतात. क्षय मास हा सहसा कार्तिक, पौष आणि मार्गशीर्ष महिन्यातच येतो.
याउलट अधिक मास हा सहसा फाल्गुन ते अश्विनपर्यंत येतो. दोन अधिक महिन्यांमध्ये किमान 27 महिने ते कमाल 35 महिन्यांपर्यंतचा कालावधी असतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








