You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुरमीत राम रहीम ज्यांच्या कार्यकाळात 6 वेळा तुरुंगातून बाहेर आला, त्या माजी जेलरला भाजपचं तिकीट
- Author, सत सिंह
- Role, बीबीसी हिंदीसाठी
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं रोहतक कारागृहाचेमाजी तुरुंग अधीक्षक सुनील सांगवान यांना चरखी दादरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
सुनील सांगवान तुरुंग अधीक्षक असताना गुरमीत राम रहीमला सहावेळा पॅरोल किंवा फर्लो रजा मिळाली होती. त्यामुळे सांगवान सध्या चर्चेत आहेत.
गुरमीत राम रहीम बलात्कार आणि हत्येच्या आरोपात दोषी असून सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे.
गुरमीत राम रहीमला देण्यात आलेल्या पॅरोल/फर्लो रजेमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं सुनील सांगवान यांनी बीबीसीशी बोलताना दिली. तसंच, राम रहीम बरोबरच्या संबंधांबाबतही भाष्य केलं.
स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात
सुनील सांगवान यांनी अलीकडेच कारागृह अधीक्षक पदावरुन VRS (स्वेच्छानिवृत्ती) घेतल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना चरखी दादरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
VRS पूर्वी सुनील गुरुग्रामच्या भोंडसी तुरुंगात अधीक्षक म्हणून काम करत होते. याआधी त्यांनी रोहतक कारागृहात पाच वर्षं तुरुंग अधीक्षक म्हणून काम केलं होतं.
2017 मध्ये डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आणि शिक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला रोहतकमधील सुनारिया तुरुंगात पाठवण्यात आलं.
त्यावेळी सुनील सांगवान हे रोहतक तुरुंगाचे अधीक्षक होते. यानंतर त्यांची गुरुग्रामच्या भोंडसी तुरुंगात बदली करण्यात आली.
सुनील सांगवान यांना भाजपमध्ये घेण्यासाठी करण्यात एवढी घाई करण्यात आली की, एक सप्टेंबर म्हणजेच रविवारच्या दिवशीच हरियाणा सरकारनं त्यांची VRS साठीची अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
कारागृह महासंचालक (DG) यांनी 1 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तुरुंग अधीक्षकांना ईमेल पाठवून त्याच दिवशी 'नो ड्यूज प्रमाणपत्र' जारी करण्याचे निर्देश दिले.
DG यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं, "कारागृह अधीक्षक सुनील सांगवान यांनी स्वेच्छानिवृत्तीची विनंती केली आहे. त्यामुळे सुनील सांगवान यांच्या नावे ‘नो ड्यूज प्रमाणपत्र’ दुपारी 4 वाजेपर्यंत जारी करण्यात यावे.”
राम रहीम 10 वेळा पॅरोल आणि फर्लोवर तुरुंगाबाहेर
राम रहीमला एकूण 10 वेळा पॅरोल किंवा फर्लो रजेवर तुरुंगाबाहेर पाठवण्यात आलं आहे. त्यापैकी सुनील सांगवान यांच्या कारागृह अधीक्षकपदाच्या कार्यकाळात 6 वेळा हा प्रकार घडला.
सुनील सांगवान यांनी 22 वर्षांहून अधिक काळ कारागृह विभागात काम केलं आहे. ते 2002 मध्ये हरियाणा तुरुंग विभागात रुजू झाले. राज्यातील अनेक तुरुंगांमध्ये त्यांनी तुरुंग अधीक्षक म्हणून काम केलं आहे.
यात रोहतकच्या सुनारिया कारागृहाचाही समावेश आहे, जिथं सुनील यांनी पाच वर्षं काम केलं. हा तोच तुरुंग आहे जिथं राम रहीम शिक्षा भोगत आहे.
सांगवान यांच्या काळात राम रहीमला तुरुंगातून बाहेर पाठवण्यात आलेले प्रसंग पुढीलप्रमाणे आहेत.
- 24 ऑक्टोबर 2020 रोजी एक दिवसाचा इमर्जन्सी पॅरोल
- 21 मे 2021 रोजी एक दिवसाचा आणीबाणी पॅरोल
- 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी 7 ते 28 फेब्रुवारी अशी 21 दिवसांची फर्लो रजा देण्यात आली.
- हरियाणा महानगरपालिका निवडणुकीपूर्वी 17 जून ते 16 जुलै 2022 पर्यंत 30 दिवसांचा पॅरोल
- आदमपूर विधानसभा पोटनिवडणूक 2022 पूर्वी 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत 40 दिवसांचा पॅरोल
- अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यापूर्वी 21 जानेवारी ते 3 मार्च 2023 पर्यंत 40 दिवसांसाठी पॅरोल.
नियम काय सांगतात?
हरियाणा गुड कंडक्ट प्रिझनर्स (टेम्पररी रीलिज) कायदा, 2022, तुरुंग अधीक्षकांना कैद्यांच्या पॅरोल किंवा फर्लो रजेप्रकरणी शिफारस करण्याचा अधिकार देतो.
ही शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. पण सुटकेचा आदेश केवळ सक्षम अधिकाऱ्याकडूनच जारी केला जाऊ शकतो. ज्यामध्ये उपायुक्त किंवा विभागीय आयुक्त असू शकतात.
भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर सुनील सांगवान यांच्यावर सोशल मीडियावरही टीका होत आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिलंय की, इतके अज्ञानी कोण आहे की जे या बातमीने आश्चर्यचकित झाले आहे.
याशिवाय सोशल मीडिया यूजर्स गुरमीत राम रहीमला अनेकदा मिळालेला पॅरोल, सांगवान यांची उमेदवारी आणि भाजपसोबतचे संबंध यावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
पण आपल्यामुळे गुरमीत राम रहीमला सहा वेळा पॅरोल किंवा फर्लो रजा मिळाली, यात तथ्य नसल्याचं सांगवान यांनी बीबीसी हिंदीबरोबर बोलताना सांगितलं.
ते म्हणतात, "माझ्या कार्यकाळात बाबांना सहा वेळा पॅरोल किंवा फर्लो मिळाल्यानं मला ट्रोल केलं जात आहे. पण यात पहिली गोष्ट म्हणजे पॅरोल तुरुंग अधीक्षकांच्या सहीनं मिळत नाही. त्याच्या परवानगीसाठी विभागीय आयुक्तांची सही आवश्यक असते.”
ते पुढे म्हणतात, “मी बाबा राम रहीमचा पॅरोल तीनदा रद्द केला याबद्दल माझं कौतुक केलं पाहिजे. पहिल्यांदा 29 जुलै 2019 रोजी, दुसऱ्यांदा 30 ऑक्टोबर 2019 रोजी आणि तिसऱ्यांदा 20 एप्रिल 2020 रोजी बाबांनी त्यांच्या आजारी आईची काळजी घेण्याचं कारण सांगून पॅरोलची मागणी केली होती. पण ती मी नाकारली होती. कोणताही सामान्य कैदी त्याच्या शिक्षेच्या एक वर्षानंतर पॅरोलसाठी पात्र ठरतो. बाबांना तर तीन वर्षे पॅरोल मिळाला नाही.”
सुनील सांगवान सांगतात की, गुरमीत राम रहीमनं तीनदा इमर्जन्सी पॅरोलची मागणी केली होती. पण ती फेटाळण्यात आली होती. अशाप्रकारची पॅरोल फेटाळण्याचा अधिकार तुरुंग अधीक्षकांकडे असतो.
ते म्हणतात, “जी पॅरोल असले तिला विभागीय आयुक्तांकडून मान्यता दिली जाते. बाबांनी जेव्हा-जेव्हा अर्ज केला तेव्हा त्यांना कायदेशीर प्रक्रियेतून पॅरोल मिळाला आहे.”
वडिलांचा राजकीय वारसा सांभाळणार?
सुनील सांगवान यांचे वडील सतपाल सांगवान हरियाणा सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सुनील सांगवान यांचे वडील सतपाल सांगवान 1996 मध्ये राजकारणात येण्यापूर्वी बीएसएनएलमध्ये उपविभागीय अधिकारी (एसडीओ) पदावर कार्यरत होते.
नंतर त्यांनी राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला.
त्यांनी माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या हरियाणा विकास पक्षाचे उमेदवार म्हणून चरखी दादरी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.
पुढे त्यांनी आणखी निवडणुका लढवल्या.
2009 मध्ये ते हरियाणा जनहित काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून जिंकले आणि भूपेंद्र हुडा सरकारमध्ये मंत्रीही झाले. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला.
2019 मध्ये काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी जननायक जनता पार्टी (JJP) मध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. पण त्यांचा पुन्हा पराभव झाला.
बीबीसीला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सांगवान यांना तुरुंग अधीक्षक पद सोडायचं नव्हतं. पण वडील सतपाल सांगवान यांच्या वाढत्या वयामुळे दादरीमध्ये भाजप पक्ष तरुण चेहऱ्याच्या शोधात होता. असा चेहरा जो जाट समाजाची मतं मिळवू शकेल आणि त्याला दादरीमध्ये स्वतःची राजकीय ओळखही असेल.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत हरियाणाच्या चरखी दादरी मतदारसंघातून बबिता फोगट भाजपच्या उमेदवार होत्या. पण त्या तिसऱ्या स्थानावर राहिल्या. तर सतपाल सांगवान दुसऱ्या स्थानावर होते. इथून अपक्ष उमेदवार सोमबीर विजयी झाले होते.