पहलगाम हल्ल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा तणाव पुन्हा एकदा वाढला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "माझे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. काश्मीरच्या मुद्दयावरुन दोन्हीं देशांतील संबंध हजारों वर्षांपासून ताणले आहेत. काश्मिरचा प्रश्न हजारों वर्षांपासून काय कदाचित त्याहूनही जास्त काळापासून सुरू असावा", असं ट्रम्प म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, "पहलगाममध्ये झालेला हल्ला अतिशय भयावह होता. त्या सीमेवर 1500 वर्षांपासून तणाव असून हा तणाव कायम आहे. पण मला खात्री आहे की ते यातून काहीतरी मार्ग काढतील. मी दोन्ही नेत्यांना ओळखतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप तणाव आहे, पण तो नेहमीच राहिला आहे."
ब्रिटिश राजवटीपासून 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभाजन झालं. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे.

फोटो स्रोत, X/ANI
दरम्यान, मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू-काश्मीरच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसर भागात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.
या घटनेनंतर भारत सरकारकडून पाकिस्तानसोबतच्या सिंधू नदीवरील जल कराराला स्थगित करण्याचा तसेच अटारी-वाघा सीमा त्वरित बंद करण्यासारखे विविध निर्णय घेतले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननंही अनेक पावले उचलली आहेत.
'हल्लेखोरांना मोठी शिक्षा मिळेल'- पंतप्रधान
"ज्यांनी हा हल्ला केलाय त्या दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचं नियोजन करणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल, शिक्षा मिळणारच. 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती कट्टरतावाद्यांचं कंबरडं मोडून काढेल", असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी प्रथमच जाहीर कार्यक्रमात आपली भूमिका व्यक्त केली. बिहारमध्ये पंचायती राज दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
ते म्हणाले, "आज मी बिहारमधून संपूर्ण जगाला सांगतो, प्रत्येक दहशतवाद्याला आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना शिक्षा देणारा म्हणून भारत आता ओळखला जाईल. दहशतवादाला शिक्षा मिळणारच. याप्रती सगळा देश कटिबद्ध आहे.
"मानवतेवर विश्वास ठेवणारे आमच्या बाजूने आहेत. जगातल्या विविध देशांतील लोक आणि नेते आमच्या बाजूने उभे राहिले, त्यांचे मी आभार मानतो."

फोटो स्रोत, SCREEN GRAB/ANI
मोदी पुढे म्हणाले, "दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांना ज्याप्रकारे मारलं आहे, त्यामुळे देश व्यथित आहे. सर्व पीडित कुटुंबांबरोबर सर्व देश उभा आहे. ज्यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत, ते लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहे. या हल्ल्यात काही लोकांनी आपला मुलगा गमावला, काहींनी भाऊ गमावला तर कोणी आपला जोडीदार गमावला.
"त्यात कोणी बंगाली भाषिक, कोणी कन्नड, कोणी मराठी, कोणी गुजराती होतं तर कोणी बिहारी. या सर्वांच्या मृत्यूत कारगिल ते कन्याकुमारीपर्यंत सर्वांचं दुःख समान आहे. हा हल्ला फक्त निःशस्त्र पर्यटकांवर हल्ला नसून या देशाच्या शत्रूंनी भारतीयांच्या आत्म्यावर हल्ला करण्याचं दुःसाहस केलं आहे."
1,500 स्थानिक नागरिकांना ताब्यात घेतल्याची पोलीस सूत्रांची माहिती
वरिष्ठ पातळीवरील पोलिसांच्या सूत्रांनी बीबीसीला माहिती दिली की, जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे 1,500 नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
या हल्ल्यात भारतीय आणि परदेशी नागरिकांसह चार कट्टरतावादी सहभागी असल्याचा संशय असल्याचंही सूत्रांनी बीबीसीला सांगितलं आहे. पोलिसांनी हल्लेखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 20 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
पहलगामच्या हल्ल्यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री काय म्हणाले?
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू नदी करार तत्काळ स्थगित केला आहे.
यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं म्हणणं आहे की, पाकिस्तान भारताकडून उचलल्या गेलेल्या पावलांवर तात्काळ प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही.

बीबीसी उर्दूने दिलेल्या माहितीनुसार, एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, भारतामध्ये घडलेली घटना निंदनीय आहे आणि दहशतवादाचं समर्थन कधीही केलं जाऊ शकत नाही.
सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यावर बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय की, भारत दीर्घकाळापासून या करारातून बाहेर पडू इच्छित होता.
पाकिस्तान भारताच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याच्या अवस्थेत 100 टक्के आहे.
ते म्हणाले की, हवाई हद्द उल्लंघन केल्यानंतर काय घडू शकतं, याचं अभिनंदन यांच्या रूपात दिलेले प्रत्युत्तर भारत लक्षात ठेवेल.
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या मते, "भारताच्या संरक्षणाखाली बलुचिस्तानमध्ये दहशतवाद फोफावत आहे. जाफर एक्सप्रेस घटनेत काय घडलं हे सर्वांना माहिती आहे. भारताने फुटीरतावाद्यांना आश्रय दिला आहे. बलुचिस्तानमधील फुटीरतावादी उपचारांसाठी भारतात जातात. याचे बरेच पुरावे आहेत."
पुढे त्यांनी म्हटलंय की, पहलगामच्या घटनेसाठी दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी भारताने स्वत:लाच दोषी ठरवलं पाहिजे.
"पहलगाम हल्ला हा भारतानेच केलेली 'बनावट कारवाई' असण्याचीही शक्यता आहे." असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.
ते म्हणाले की, "कुणीतरी भारताला हे विचारलं पाहिजे की जर काश्मीरमध्ये निष्पाप लोक मारले जात असतील तर तिथे अनेक दशकांपासून उपस्थित असलेले सात लाख सैनिक काय करत आहेत?"
पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याच्या क्षणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक पर्यटक उपस्थित होते. त्यातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर काहीजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (CCS) काल बुधवारी बैठक पार पडली.
या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते.
दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबतच- ऋषी सुनक
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यावर ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही अतिव दु:खात आहोत' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर त्यांनी लिहिलंय की, "पहलगाममध्ये झालेल्या नृशंस हल्ल्यामध्ये नवविवाहिता, लहान मुले आणि आनंद साजरा करायला आलेल्या कुटुंबीयांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं आहे. त्यांच्याबाबत आमच्या मनात प्रचंड दु:ख आहे."
ऋषी सुनक यांनी म्हटलंय की, ब्रिटन तुमच्या दु:खात सामील आहे. दहशतवाद कधीही जिंकणार नाही. आम्ही भारतासोबत आहोत.
काय आहेत कॅबिनेटचे मोठे निर्णय?
1) 1960चा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल, जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलिकडच्या दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील.
2) अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल. ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मे 2025 पर्यंत यामार्गाने भारत सोडण्याचे आदेश.
3) पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजना (SVES) या योजनेखाली भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याआधी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले कोणतेही असे व्हिसा रद्द मानले जातील. सध्या सार्क व्हिसा योजनेअंतर्गत भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी 48 तासांची मुदत देण्यात आलेली आहे.

फोटो स्रोत, X/Narendra Modi
4) नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण/लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना 'पर्सना नॉन ग्राटा' घोषित करण्यात आलं आहे. त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मदत देण्यात आलेली आहे. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारताच्या संरक्षण/नौदल/हवाई सल्लागारांना परत बोलावण्यात आलेलं आहे. संबंधित उच्चायोगांमधील ही पदे रद्द मानली जातात. दोन्ही उच्चायोगांमधून सेवा सल्लागारांचे पाच सहाय्यक कर्मचारी देखील काढून घेतले जातील.
5) 1 मे 2025पर्यंत आणखी कपात करून उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या 55 वरून 30 पर्यंत कमी केली जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











