सिलिया फ्लोरेस : मादुरो यांच्या पत्नी, ज्यांना व्हेनेझुएलाच्या 'फर्स्ट वॉरियर' म्हणून ओळखतात

व्हेनेझुएलामध्ये सिलिया फ्लोरेस या केवळ 'फर्स्ट लेडी' नाहीत तर त्यांचे समर्थक त्यांना अनेकदा 'फर्स्ट वॉरियर' म्हणून संबोधतात.

राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या पत्नी सरकारमधील प्रमुख महिलांपैकी एक आहेत.

1956 मध्ये जन्मलेल्या फ्लोरेस यांनी पतीच्या बरोबरीनं स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण केली आहे, आणि कधीकधी तर त्यांच्यापेक्षाही उच्च पदांवर त्या राहिल्या आहेत.

मादुरो 2013 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी देशाची राजकीय दिशा ठरवण्यात सक्रिय भूमिका बजावली.

शनिवारी(3 जानेवारी) व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या लष्करी कारवाईदरम्यान सिलिया आणि त्यांचे पती निकोलस मादुरो यांना ताब्यात घेण्यात आलं.

या दोघांवर न्यूयॉर्कच्या न्यायालयात अंमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित खटला चालवला जाईल.

फ्लोरेस आणि मादुरो दोघेही दुसऱ्या एका व्यक्तीच्या म्हणजेच व्हेनेझुएलाचे दिवंगत नेते ह्यूगो चावेझ यांच्या सावलीत सत्तेपर्यंत पोहचले.

चावेझ यांच्या मृत्यूनंतर 2013 च्या अध्यक्षीय प्रचारादरम्यान, मादुरो यांनीच फ्लोरेस यांचा उल्लेख 'फर्स्ट वॉरियर' (पहिली योद्धा) असा केला होता. 'फर्स्ट लेडी' हा शब्द 'उच्चभ्रू लोकांचा विचार' म्हणत त्यांनी फेटाळून लावला होता.

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या जवळच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून सप्टेंबर 2018 मध्ये अमेरिकेच्या वित्त विभागानं फ्लोरेस यांच्यावर आर्थिक निर्बंध लादले होते.

सर्वसाधारण सुरुवात

फ्लोरेस यांचा जन्म व्हेनेझुएलाची राजधानी काराकासच्या पश्चिमेस सुमारे 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या टिनाक्विलो नावाच्या गावात झाला.

मादुरो यांच्या मते, त्यांचा जन्म अगदी साध्या घरात झाला होता. फ्लोरेस चार वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब त्या गावातून काराकासला गेलं.

सहा भावंडांपैकी सर्वात लहान असलेल्या फ्लोरेस कुटुंबासह शहराच्या पश्चिम भागात असलेल्या कॅटिया आणि बोकेरॉन या दोन दाट लोकवस्तीच्या परिसरात काराकासमध्ये राहत होत्या.

वयाच्या 32 व्या वर्षी, त्यांनी सांता मारिया या खाजगी विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर गुन्हेगारी आणि कामगार कायद्यात विशेष प्राविण्य मिळवलं.

फेब्रुवारी 1992 मध्ये ह्यूगो चावेझ यांच्या नेतृत्वाखालील सत्तापालटाचा प्रयत्न अयशस्वी झाला तेव्हा त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण आलं.

बंडखोरी करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांचा बचाव करणाऱ्या वकिलांच्या पथकात फ्लोरेस सामील झाल्या. पुढे त्या त्यांच्या राजकीय चळवळीतही सहभागी झाल्या.

याच काळात फ्लोरेस यांची मदुरो यांच्याशी भेट झाली. त्या काळातील फोटोंमध्ये अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मादुरो, चावेझ यांच्यासोबत एखाद्या सुरक्षा रक्षकाप्रमाणे त्या दिसून येतात.

मादुरो यांनी आठवणी सांगताना म्हटलं होतं की, "आयुष्याच्या प्रवासातच माझी सिलियाशी ओळख झाली. तुरुंगात असलेल्या अनेक देशभक्त लष्करी अधिकाऱ्यांच्या त्या वकील होत्या. एवढंच नाही तर कमांडर चावेझ यांच्याही त्या वकील होत्या.

"संघर्षाच्या काळात आमची भेट झाली आणि मग आम्ही एकमेकांना अधिक ओळखू लागलो."

तेव्हापासून, या दोघांचं नशीब चावेझ आणि त्यांच्या राजकीय चळवळीशी चाविझ्मोशी जोडलं गेलं.

खासदार आणि वकील

फ्लोरेस यांनी 1990 च्या दशकात चाविझ्मोशी संबंधित अनेक संस्थांमध्ये काम केलं. 1998 च्या अध्यक्षीय निवडणुकीत चावेझ सत्तेवर सत्तेवर येताच त्या अनेक महत्त्वाच्या पदांवर पोहोचल्या.

नॅशनल असेंब्लीमध्ये त्या 2000 मध्ये निवडून आल्या. 2006 मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर त्या संसदेचं अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

त्यांनी जवळजवळ सहा वर्षे एका पक्षाच्या संसदेचं नेतृत्व केलं, कारण मुख्य विरोधी पक्षांनी निवडणुकीत भाग घेतला नव्हता.

फ्लोरेस यांनी चावेझ यांची लढाऊ सहकारी असल्याचं सिद्ध केलं. नॅशनल असेंब्लीच्या सभापती म्हणून त्यांचा कार्यकाळ लादग्रस्त होता. तसंच त्यांनी संसदेच्या सभागृहात माध्यमांच्या प्रवेशावरदेखील बंदी घातली होतो.

नवीन निवडणुकांनंतर व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षांनी नॅशनल असेंब्लीवर नियंत्रण मिळेपर्यंत, म्हणजे जानेवारी 2016 पर्यंत ही बंदी कायम राहिली.

फ्लोरेस यांच्यावर घराणेशाहीचा आरोपही करण्यात आला होता.

त्यांनी सुमारे 40 लोकांच्या नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यात त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा समावेश होता, असंही सांगण्यात आलं.

याबद्दल त्यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "माझं कुटुंब इथं आलं असून ते माझं कुटुंब आहे, याचा मला अभिमान आहे. मी नॅशनल असेंब्लीमध्ये कामगार म्हणून त्यांचं समर्थन करेन आणि खुल्या भरती प्रक्रियेचं देखील समर्थन करेन."

2012 च्या सुरुवातीस चावेझ यांनी त्यांना देशाच्या अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त केलं. मार्च 2013 पर्यंत म्हणजे अध्यक्ष चावेझ यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी हे पद सांभाळलं.

मादुरो अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तीन महिन्यांनी, त्याचवर्षी जुलैमध्ये फ्लोरेस औपचारिकरित्या 'फर्स्ट लेडी' बनल्या, कारण दोघांनी लग्न केलं होतं.

यामुळे त्यांच्या दीर्घकालीन नात्याला औपचारिकता मिळाली. दोघांनी आधीच्या लग्नांमधून झालेल्या मुलांचा म्हणजे फ्लोरेस यांची तीन आणि मादुरो यांच्या एका अशा चार मुलांचा एकत्रितपणे सांभाळ केला.

फ्लोरेस 2015 च्या निवडणुकीत पुन्हा नॅशनल असेंब्लीत निवडून आल्या. पण यावेळी 15 वर्षांत प्रथमच चाविझ्मो अल्पमतात आलं होतं.

दोन वर्षांनंतर, ऑगस्ट 2017 मध्ये, त्यांनी संसदेचा राजीनामा दिला आणि याचवेळी नवनिर्वाचित आणि वादग्रस्त ठरलेल्या नॅशनल कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या सदस्य बनल्या.

सिलिया यांचं कुटुंब

फ्लोरेस यांनी मे 2015 मध्ये, सार्वजनिक नेटवर्कवर 'विथ सिलिया, अ‍ॅज अ फॅमिली' नावाचा एक टीव्ही कार्यक्रम सुरू केला. एका वर्षानंतर सरकारी रेडिओवर 'डिसिजन' कार्यक्रम प्रसारित करण्यास सुरुवात केली.

पण गेल्या काही वर्षांत माध्यमांचं लक्ष त्याच्याकडं नाही, तर त्यांच्या कुटुंबावर राहिलं.

नोव्हेंबर 2015 मध्ये, न्यूयॉर्कच्या एका वकिलानं त्यांच्या दोन पुतण्यांवर ड्रग्ज तस्करीचा दावा ठोकला. या दोघांना हैतीमध्ये अटक करण्यात आली आणि यूएस ड्रग एन्फोर्समेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (DEA) च्या ताब्यात देण्यात आलं.

फ्लोरेस यांनी याला प्रत्युत्तर देताना अमेरिकन अधिकाऱ्यांवर आपल्या पुतण्यांचं 'अपहरण' केल्याचा आरोप केला. परंतु डिसेंबर 2017 मध्ये, एका न्यायाधीशानं या दोघांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

सरकारी वकिलांनी असा आरोप केला होता की, ते काराकासच्या मैक्वेटिया विमानतळावरील राष्ट्रपती हँगर वापरण्याचा कट रचत होते.

तिथून 800 किलो कोकेन होंडुरासला पाठवलं जाणार होतं आणि नंतर ते अमेरिकेत नेलं जाणार होतं.

ऑक्टोबर 2022 मध्ये, दोघांनाही एका करारानुसार सोडण्यात आलं. तत्कालीन अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना माफ केलं आणि त्या बदल्यात व्हेनेझुएलामध्ये कैदेत असलेल्या सात अमेरिकन नागरिकांना परत आणण्यात आलं.

परंतु ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर, हे दोन्ही पुतणे आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर पुन्हा निर्बंध लादण्यात आले. आता मात्र, मादुरो आणि फ्लोरेस यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.

(बीबीसी न्यूज मुंडो आणि बीबीसी ग्लोबल जर्नलिझमच्या रिपोर्टिंगसह)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.