गर्भनिरोधकं स्वीकारण्यास पुरुष किती तयार? 'त्या' 16 जणांवरील प्रयोगातून काय निष्पन्न झालंय?

    • Author, द इन्क्वायरी पॉडकास्ट
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

गर्भधारणा रोखण्यासाठी महिलांना गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. पण आता पुरुषांसाठीही अशी गर्भनिरोधकं तयार करण्यावर संशोधन सुरू आहे.

डिसेंबर 2023 मध्ये युकेमध्ये एका ट्रायल म्हणजे वैद्यकीय चाचणीदरम्यान सोळा जणांनी पुरुषांसाठीच्या एका हार्मोनरहीत गर्भनिरोधक गोळीचा वापर सुरू केला.

माणसांवर या गोळीचा प्रयोग करण्याची ती पहिलीच वेळ होती. या ट्रायलचा पहिला टप्पा 2024 मध्ये पूर्ण झाला आणि त्यात पुढचं संशोधन अजूनही सुरू आहे.

खरंतर महिलांसाठीच्या हार्मोनल गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर 1960 मध्येच सुरू झाला आणि आतापर्यंत महिलांसाठी गोळ्यांसोबतच इम्प्लांट, इंजेक्शन आणि कॉईलसह अनेक प्रकारची गर्भनिरोधक साधनं बाजारात आली.

पुरुषांसाठी मात्र गर्भनिरोधक साधनांचे तीनच पर्याय आहेत - योनीबाहेर स्खलन करणं, काँडोम किंवा नसबंदी.

पुरुषांसाठी गर्भनिरोधक पर्याय वाढवण्यावर अनेक दशकं प्रयोग सुरू आहेत.

पण या नव्या गर्भनिरोधक गोळीचा वापर करण्यासाठी पुरुष किती तयार आहेत? जाणून घेऊयात

शुक्राणूंच्या विशाल फौजेला रोखण्याचं आव्हान

अ‍ॅलन पेसी मॅन्चेस्टर विद्यापीठात अँड्रॉलॉजीचे प्रोफेसर आहेत. अँड्रॉलॉजी म्हणजे पुरुषांच्या प्रजनन आणि आरोग्याविषयीचं शास्त्र.

नव्या गर्भनिरोधकांविषयी अ‍ॅलन पेसी सांगतात, "महिलांसाठीची गर्भनिरोधकं त्यांच्या शरिरातील हार्मोन्समध्ये फेरफार करतात आणि एग्ज म्हणजे स्त्रीबीजे तयार होण्यापासून रोखतात.

"पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या तयार केल्या जात आहेत. पण यात एक समस्या आहे.

"पुरुषांच्या शरिरात खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी हृदयाच्या एका ठोक्यासोबत हजारो शुक्राणू तयार होतात. हे शुक्राणू म्हणजे स्पर्म तयार होण्यापासून रोखणं हे मोठं आव्हान ठरतं कारण अगदी थोड्याशा शुक्राणूंची निर्मिती होत असेल, तरी गर्भधारणा होऊ शकते."

अमेरिकेतल्या औषधे आणि खाद्यपदार्थांची नियंत्रण संस्था एफडीएनं महिलांसाठी गर्भनिरोधक हॉर्मोनल पिलला 1960 साली मंजुरी दिली होती.

पुरुषांसाठी अशी गर्भनिरोधक गोळी तयार करण्याविषयी संशोधन तेव्हाच सुरू झालं होतं.

पण जितक्या तत्परतेनं महिलांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्यांवर संशोधन केलं गेलं, तेवढी तत्परता पुरुषांसाठीच्या पिलसाठी दाखवली गेली नाही.

यामागे अनेक कारणं होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना गर्भधारणा होते, त्यामुळे त्यांच्यावरच लक्ष केंद्रीत केलं गेलं. पण यासाठी जीवशास्त्रही कारणीभूत असल्याचं अ‍ॅलन पेसी सांगतात.

"स्त्रीबीज फर्टिलाईज्ड अवस्थेत केवळ चोविस तासच गर्भधारणेसाठी अनुकूल राहतं. म्हणजे या छोट्या कालावधीत नको असलेली गर्भधारणा थांबवायची आहे.

"पण पुरुषाचे शुक्राणू किंवा स्पर्म महिलेच्या शरीरात पाच दिवस जीवंत राहू शकतात. म्हणजे असं औषध हवं, जे पाच दिवस प्रभावी ठरू शकेल. स्पर्मची संख्या लाखांमध्ये असते, म्हणजे गर्भनिरोधाचा प्रयत्न हा विशाल फौजेला रोखण्याचा प्रयत्न झाला."

महिलांसाठीच्या हॉर्मोनल पिल्स त्यांच्या शरिरातल्या हॉर्मोन्समध्ये बदल करून गर्भधारणा रोखतात. पण हॉर्मोनल गर्भनिरोधक पिल हा पुरुषांसाठी मात्र चांगला पर्याय ठरू शकत नाही.

"पुरुषांना हॉर्मोनल पिल देता येणार नाही कारण लिव्हर म्हणजे यकृत लगेचच हे हॉर्मोन पचवतं. पुरुषांना इंजेक्शन किंवा त्वचेवर लावायच्या जेल किंवा मलमाच्या रुपात हे औषध देता येऊ शकतं आणि यावर सध्या संशोधन सुरू आहे, असं अ‍ॅलन पेसी नमूद करतात."

पुरुषांसाठी तयार केलेल्या अशा गर्भनिरोधक गोळ्या किती काळ प्रभावी राहतील? हा प्रभाव किती काळानं संपेल म्हणजे एखाद्या पुरुषाला प्रजनन करायचं असेल तर तो करू शकेल? असे प्रश्न निर्माण होतात.

अ‍ॅलन पेसी सांगतात, की स्पर्म निर्माण झाल्यापासून पूर्णतः तयार होईपर्यंत तीन महिने लागतात.

त्यामुळे जे स्पर्म तयार आहेत ते शरिरात पूर्णतः संपल्यावरच गर्भधारणा टाळण्याचे गोळ्यांसारखे उपाय प्रभावी ठरतील.

याउलट अशा पुरुषाला पुन्हा प्रजनन करायचं असेल, तर या गोळ्यांचा वापर बंद केल्यावर गर्भधारणेसाठी अनुकूल स्पर्मची निर्मिती होईपर्यंत तीन महिने लागतील.

अ‍ॅलन पेसी त्यांच्या रुग्णांच्या अनुभवांवरून सांगतात की अनेक पुरुष सेक्सविषयी आणि नको असलेली गर्भधारणा टाळण्याविषयी जागृत आहेत. तसंच अनेकजण स्वतःहूनच जबाबदारीनं वागतात असंही त्या नमूद करतात.

दीर्घकाळ प्रतीक्षा

पुरुषांसाठीच्या नव्या गर्भनिरोधकाविषयी बातमी आली आणि हे औषध चार पाच वर्षांत येणार असल्याची चर्चा रंगली. पण हा दावा खरा नसल्याचं डायना ब्लाइथ सांगतात.

डायना अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट फॉर हेल्थमध्ये गर्भनिरोधक विकास कार्यक्रमाच्या प्रमुख आहेत. सध्या सुरु असलेलं संशोधन आशादायी असल्याचं त्या नमूद करतात.

"हे गर्भनिरोधक हॉर्मोन पिलद्वारा देता येत नाही, कारण टेस्टॉस्टेरॉनचा स्तर कायम राखण्यासाठी मग अनेक गोळ्या घ्याव्या लागतील, जे सोयीचं नाही.

"पण त्याऐवजी जेलचा पर्याय यात वापरला आहे. ही जेल त्वचेवर लावल्यानं हॉर्मोन्स त्वचेत मुरून शिल्लक राहतंत्यामुळे जेलद्वारा हॉर्मोन देणं सर्वात प्रभावी ठरतं."

एका संशोधनात ट्रायलदरम्यान सात देशांतल्या दोनशे जोडप्यांनी या जेलचा वापर केला. या प्रकरणात आतापर्यंतचे निकाल उत्तम आहेत, अशी माहिती त्या देतात.

" ट्रायल पूर्ण झाली आहे पण या माहितीचं विश्लेषण झालेलं नाही. त्यामुळे मी एवढंच सांगू शकते की या जेलच्या वापराचे परिणाम आमच्या अपेक्षेनुसारच आहेत.

"स्पर्मला थोपवता येतं आणि वेळ आली की ही प्रक्रिया रिव्हर्स करता येते. माझ्या माहितीनुसार हे एकच औषध आहे, ज्याची दुसऱ्या टप्प्यातली ट्रायलही यशस्वी ठरली आहे आणि चाचणीचा तिसरा टप्पा लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे."

मग हे औषध बाजारात कधी येऊ शकतं? डायना सांगतात की हे सगळं जर-तरवर अवलंबून आहे.

"आम्हाला संशोधन पूर्ण करण्यासाठी सहा वर्ष लागली. मध्येच कोव्हिडमुळे हे काम आणखी गुंतागुंतीचं झालं. एफडीए आम्हाला क्लिनिकल ट्रायल घ्यायला कधी परवानगी देतं आणि त्यासाठी किती निधी उपलब्ध होतो, यावरही बरंच काही अवलंबून आहे.

"त्यामुळे हे औषध बाजारात आणू शकेल अशा सहकाऱ्याचा शोध आम्ही घेतो आहोत. अशा ट्रायलसाठी लोकांना तयार केलं जातं, तेव्हा त्यानंतर पुढे दोन वर्ष जातात. पाचशे ते आठशे लोक सहभागी झाले असतील तर ती प्रक्रिया पूर्ण करायला जास्त वेळ लागतोच.

"मला वाटतं हे औषध बाजारात येण्यात आठ ते दहा वर्ष लागू शकतात."

लोक याचा वापर करतील का?

धनंजय वैद्यनाथन रोहिणी एल्सटोनिया इंपॅक्ट डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे संस्थापक आहेत.

ते चॅरिटेबल संस्थांच्या मदतीनं प्रजनना संबंधी निर्णयात दखल देण्याविषयी पुरुषांना काय वाटतं, याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.

औषधं बनवणाऱ्या कंपन्यां म्हणजे फार्मा कंपन्यांच्या दृष्टीनं महिला आणि पुरुषांसाठीची गर्भनिरोधक उत्पादनं तयार करण्यात नुकसान होण्याचा धोका असतो, असं ते सांगतात.

"गर्भनिरोधक औषधांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा ते अशा औषधांमध्ये जास्त पैसा ओततात ज्यातून जास्त फायद्याची आणि कमी जोखमीची अपेक्षा असते.

"त्यामुळे फार्मा कंपन्या आणि गुंतवणूकदारांच्या हे लक्षात आणून द्यावं लागेल की गर्भनिरोधक उत्पादनानाही चांगली मागणी आहे."

पण याची पुष्टी करण्यासाठी माहिती म्हणजे डेटा जमा करावा लागेल. धनंजय वैद्यनाथन रोहिणी आणि त्यांच्या टीमनं ही माहिती गोळा करण्यासाठी सात देशांत सर्वेक्षण केलं.

हे देश आहेत केनिया, नायजेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, आयव्हरी कोस्ट, बांग्लादेश, व्हिएतनाम आणि अमेरिका.

सर्वेक्षणासाठी या देशांची निवड करण्यामागे खास कारण होतं. धनंजय सांगतात की कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या अशा देशांची निवड करण्यात आली कारण तिथे गर्भनिरोधक उत्पादनांची मागणी पूर्ण होऊ शकत नाही.

सोबतच या देशांची निवड करताना भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता लक्षात घेतली गेली.

अमेरिकेची निवड का केली याविषयी ते सांगतात, की ही गर्भनिरोधकांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इथे या उत्पादनांना किती मागणी आहे हे जाणून घेण्यात गुंतवणूकदारांना रस असेल.

या माहितीच्या आधारे नवी गर्भनिरोधकं बनवण्याच्या संशोधनासाठी निधी गोळा करणं मग शक्य होऊ शकतं.

या सर्वेक्षणात अठरा हजारांहून अधिक लोकांशी संपर्क साधला गेला. गर्भनिरोधकांचा वापर करण्यासाठी जे अजून तयार नाहीत, त्यांना काय वाटतं, हेही समजून घेतलं गेलं.

यातून अशी माहिती समोर आली, ज्याची कल्पनाही केली नव्हती.

धनंजय सांगतात, "लोकांना याविषयी वाटणारा उत्साह थक्क करणारा होता. सर्व्हेमध्ये एक प्रश्न होता की गर्भधारणा टाळण्यासाठी पुरुषांकरिता नवं उत्पादन बाजारात आलं, तर ते किती लवकर त्याचा वापर करू इच्छितात.

"सगळ्या गरीब देशांतल्या बहुतांश लोकांनी ते नवीन उत्पादनाचा वर्षभरातच वापर करू इच्छितात. नव्या गर्भनिरोधकांविषयी असा उत्साह लक्षवेधक आहे."

सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलं की ते कुठल्या रुपातलं गर्भनिरोधक वापरण्याला पसंती देतात?

लोकांनी सांगितलं की पिल किंवा जेलच्या रूपातलं गर्भनिरोधक त्यांना जास्त आवडेल. अनेक आफ्रिकन देशांतल्या लोकांनी पिलपेक्षा जेलला पसंती दिली.

पुढचा प्रश्न होता की आपला साथीदार गर्भनिरोधकांचा वापर करतो आहे, यावर महिला विश्वास ठेवू शकतील का?

"अमेरिका वगळत इतर सहा देशांतल्या महिलांना आम्ही हा प्रश्न विचारला," अशी माहिती धनंजय देतात.

"जवळपास सत्तर टक्के महिलांनी सांगितलं की त्यांचा साथीदार पुरुषांसाठीचं गर्भनिरोधक वापरत असल्याचं सांगत असेल, तर त्या त्यावर विश्वास ठेवतील. अर्थात नायजेरिया आणि आयव्हरी कोस्टमध्ये पन्नास ते साठ टक्के महिलांनीच साथीदारावर आपण विश्वास ठेवू असं सांगितलं."

पण ज्या देशांत हे सर्वेक्षण झालं, त्यातला सर्वात विकसित देश म्हणजे अमेरिकेतून मिळालेली माहिती जास्त आश्चर्यकारक होती.

अमेरिकेत केवळ 40 टक्के लोकांनी सांगितलं की पुरुषांसाठी बनलेली गर्भनिरोधकं बाजारात आल्यावर वर्षभरातच ते वापरतील.

अमेरिकेत इतक्या मोठ्या संख्येनं पुरुषांनी गर्भनिरोधकांचा वापर करण्यास नकार दिला, हे लक्षणीय आहे. कारण अमेरिकेत गर्भनिरोधकांविषयी सर्वाधिक जागरुकता आहे, आणि ती उपलब्ध आहेत असं मानलं जातं.

पण अमेरिकेत गर्भनिरोधक या मुद्द्याकडे सनातनी दृष्टीनं पाहण्याचं प्रमाणही जास्त आहे. म्हणजे गर्भनिरोधकांच्या वापराला विरोध करणाऱ्यांचं प्रमाणही आहे.

या सर्वेक्षणातून मिळालेली माहिती गुंतवणूकदारांना जास्त निधी गुंतवण्यासाठी प्रेरणा देईल अशी अपेक्षा केली जाते आहे. पण हे शक्य आहे का?

जोखीम आणि फायदे

लोगन निकल्स अमेरिकेतली एनजीओ मेल काँट्रासेप्टिव इनिशिएटिव्हचे संशोधन अधिकारी आहेत. या संस्थेनं धनंजय वैद्यनाथन रोहिणी यांच्या टीमनं केलेल्या सर्वेक्षणासाठी आर्थिक मदत दिली होती.

औषधं बनवणाऱ्या कंपन्यांना पुरुषांची गर्भनिरोधकं तयार करण्यावर पैसा गुंतवणं जोखमीचं का वाटतं आणि यात निधीचा पुरवठा पुरेसा का होत नाही, याविषयी ते माहिती देतात.

लोगन सांगतात की गर्भनिरोधकं हे काही कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावरचं औषध नाही, तर या औषधांचा वापर तरूण, तंदुरुस्त लोक दीर्घकाळ करणार आहेत.

त्यांच्या मते औषध तयार करणाऱ्या मोठ्या कंपन्यांना जेव्हा गर्भनिरोधकं फायदेशीर असल्याचं पटेल आणि त्यातून फायदा होऊ शकेल असं वाटेल, तेव्हाच ते यात पैसा गुंतवण्यासाठी तयार होतील.

गर्भनिरोधक उत्पादनांचा बाजार अब्जावधी डॉलर्सचा आहे. पण मोठ्या कंपन्यांशिवाय गुंतवणुकीचे आणखी कुठले पर्याय आहेत?

"मोठ्या औषध कंपन्यांशिवाय सरकारी आणि चॅरिटेबल संस्थांची मदत घेता येईल. अशा संस्थांनी महिलांसाठीची गर्भनिरोधकं तयार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

"पण अशा प्रकारची उत्पादनं बाजारात विकण्यात मोठ्या औषध कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. या कंपन्या या मोहिमेत सहभागी झाल्या, तर यशाचा मार्ग गाठणं नक्कीच सोपं जाईल."

पण लोगन निकल्स स्वतः पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधकांचा वापर करतील का?

ते उत्तर देतात, "मी हे उत्पादन नक्कीच वापरू इच्छितो. मला दोन मुलं आहेत. मी बऱ्याच काळापूर्वी नसबंदी केली आहे. त्याआधी मी माझ्या जोडीदारासाबोत कुटुंब नियोजनाविषयी बोलायचो. पण प्रत्यक्षात त्या दृष्टीनं काही करण्यात माझं योगदान मर्यादीत आणि वरवरचं होतं."

अनेक पुरुषांना वाटतं की गर्भधारणा होणं, ही त्यांची समस्या नाही. अशात मग पुरुषांसाठी तयार केलेली गर्भनिरोधकं बाजारात आली, तर त्यांचा वापर करण्यासाठी पुरुषांना कसं प्रेरित करायचं?

लोगन सांगतात, "अशा लोकांना जबाबदारीची जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे. अशानं गर्भधारणा व्हावी की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्यांच्याही हाती येईल. तसंच कुटुंब नियोजनाची लक्ष्य गाठण्यात त्यांना यामुळे मदत होईल हे आपण समजावून सांगू शकतो.

"पण जगभरात पुरुषांची गरज वेगवेगळी असू शकते. त्यामुळे केवळ एक गर्भनिरोधक नाही तर गर्भनिरोधकांचे वेगेवगळे पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत. म्हणजे ते आपल्या सोयीनुसार गर्भनिरोधकं निवडू शकतात."

मग पुरुषांसाठीची गर्भनिरोधकं स्वीकारण्यास आपला समाज कितपत तयार आहोत?

आपले एक्सपर्ट्स सांगतात की आपण तयार आहोत आणि सात देशांतल्या सर्वेक्षणानुसार बऱ्याच मोठ्या प्रमाणात पुरुषांनी दाखवलेला रस आशादायक आहे.

दहा वर्षांतच पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही फक्त बायकांची जबाबदारी न राहता पुरुषांवरही येऊ शकते.

आता गर्भनिरोधकांविषयी पुरुष आणि महिलांचं मत बदलेल की नाही, हे काळच सांगेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)