आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि रशियन मीडियाचे भारतातील वाढते फॉलोअर्स, काय आहे संबंध?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सुरभी कौल
- Role, बीबीसी मॉनिटरिंग
रशियातील प्रसारमाध्यमं भारतातील त्यांची उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमी अलीकडेच सोशल मीडियावर रशियन मीडियाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
भारतावर लक्ष देण्यावर रशियन मीडियाच्या एक्स या सोशल मीडियावरील अकाउंट्सना दोन मोठ्या घटनांच्या दरम्यान मोठा प्रतिसाद मिळाला, ते अधिक युजर्सपर्यंत पोहोचले, तसंच त्यांची चर्चा देखील झाली.
या घटना म्हणजे 7 ते 10 मे दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये झालेला लष्करी संघर्ष आणि 13 ते 24 जून दरम्यान झालेलं इस्रायल-इराण युद्ध.
बीबीसी मॉनिटरिंगनं ब्रँडवॉच आणि न्यूजव्हीप टूल्सचा वापर करून 1 एप्रिल ते 13 जुलै दरम्यान, स्पुटनिक इंडिया आणि आरटी इंडिया या रशियन सरकारचं समर्थन असलेल्या दोन प्रसारमाध्यमांनी भारतीय प्रेक्षक आणि वाचकांसाठी केलेल्या वार्तांकनाचं विश्लेषण केलं.
त्यातून समोर आलं की एक्स या सोशल मीडियावर या दोन्ही मीडिया हाऊसच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आहे, तसंच त्यांना मिळणारा प्रतिसाद (एंगेजमेंट) वाढला आहे.
डेटामधून हे देखील स्पष्ट झालं की, जगात लष्करी तणाव असताना आणि राजकीय अस्थिरता असताना या दोन्ही मीडिया हाऊसचं भारतातील डिजिटल अस्तित्व आणि एंगेजमेंट यांचा थेट संबंध आहे.
त्यातून ही बाब देखील समोर आली की भारत-पाकिस्तान संघर्षावर या दोन्ही मीडिया हाऊसची भूमिका रशियाच्या अधिकृत भूमिकेपेक्षा थोडी वेगळी होती.
स्पुटनिक इंडियानं एक्स या सोशल मीडियावर दावा केला आहे की त्यांच्या बातम्यांमध्ये 'पाश्चात्यांकडून केला जात असलेला पक्षपातीपणा नसतो.' 22 एप्रिल ते 7 मे दरम्यान स्पुटनिकला 4,891 नवे फॉलोअर्स मिळाले.

फोटो स्रोत, Getty Images
22 एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 6-7 मे ला भारतानं या हल्ल्याला प्रत्युत्तर देत पाकिस्तानात लष्करी कारवाई केली होती.
या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार असल्याचं भारतानं म्हटलं, मात्र पाकिस्तानी सरकारनं हा आरोप फेटाळला.
13 जूनपर्यंत स्पुटनिक इंडियाच्या फॉलोअर्सची संख्या वाढून 92,560 झाली होती. 1 एप्रिलच्या तुलनेत त्यात 17,346 नवे फॉलोअर्स जोडले गेले. 1 एप्रिलला त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 75,214 होती.
10 मे ला भारत आणि पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर देखील स्पुटनिक इंडियाच्या फॉलोअर्सची संख्या सातत्यानं वाढत राहिली.
याचदरम्यान, आरटी इंडिया या भारतावर केंद्रीत असलेल्या दुसऱ्या मोठ्या अकाउंटच्या फॉलोअर्सची संख्यादेखील वाढली. 1 एप्रिलला त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 44,600 होती. तर 13 जुलैपर्यंत ती वाढून 53,800 झाली.
संघर्षाच्या काळात एंगेजमेंटमध्ये वाढ
1 मे ते 13 जुलैपर्यंतच्या न्यूजव्हीपच्या डेटानुसार, बीबीसी मॉनिटरिंगला आढळून आलं की 9 मे ला आरटी इंडियाला सर्वाधिक डेली इंटरॅक्शन (सोशल मीडियावर लाईक, कमेंट, शेअर सारख्या प्रतिक्रिया) मिळालं.
त्या दिवशी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. त्या दिवशी डेली इंटरॅक्शनची संख्या 1,16,111 होती.

फोटो स्रोत, SHAAD MIDHAT/BBC
स्पुटनिक इंडियाला त्या दिवशी 70,294 इंटरॅक्शन मिळाले. 12 मे ला ही संख्या वाढून 1,12,526 पर्यंत पोहोचली.
अर्थात इस्रायल-इराण युद्धाच्या वेळेस दोन्ही प्लॅटफॉर्मचं एंगेजमेंट चांगलं होतं. मात्र भारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळेस ते ज्या विक्रमी पातळीवर पोहोचलं होतं, तितकं ते इस्रायल-इराण युद्धाच्या वेळेस पोहोचलं नाही.
यादरम्यान, आरटी इंडियाचं सर्वाधिक इंटरॅक्शन 12 जूनला होतं. त्या दिवशी आरटी इंडियाला 18,570 इंटरॅक्शन मिळाले.
19 जूनला इस्रायलनं इराणमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले. त्यात नतांजमधील भूमिगत अणुकेंद्र देखील होतं. त्या दिवशी स्पुटनिक इंडियाला 33,512 इंटरॅक्शन मिळाले.
रशियन सरकार आणि प्रसारमाध्यमांची वेगवेगळी भूमिका
स्पुटनिक इंडियाची भारतासाठी एक वेगळी वेबसाईट आहे. तर आरटी इंडियाची मायक्रोसाईट मुख्य आरटी वेबसाईटमध्येच आहे. दोन्ही मीडिया हाऊस एक्सवरील भारतातील जवळपास 2.7 कोटी युजर्सपर्यंत सातत्यानं बातम्या आणि कॉमेंट्री पोहोचवून त्यांच्याशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करतात.
याव्यतिरिक्त, आरटी इंडिया लवकरच त्यांचा भारत ब्युरो सुरू करणार आहे. त्यामुळे त्यांचं भारतातील कव्हरेज आणि मेसेजिंग आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
25 जूनला काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी सांगितलं होतं की आरटी, ब्रिटिश वसाहतवादावर एक माहितीपट मालिका दाखवणार आहे. हा माहितीपट त्यांच्या एका पुस्तकावर आधारित असेल.
या दोन्ही प्लॅटफॉर्मचे एक्स अकाउंट त्यांच्या पोस्टमध्ये मीम, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि ब्रेकिंग न्यूज अपडेटचा वापर करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या घडामोडी आणि संघर्षांचा वापर ते भारतीय युजर्स, वाचकांबरोबरची एंगेजमेंट वाढवण्यासाठी करत असल्याचं दिसतं.
अनेकवेळा या मीडिया हाऊसची भूमिका रशियाच्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी देखील दिसते. त्यांनी काही देशांना पाठिंबा देणारं आणि काही देशांना विरोध करणारं मत उघडपणे व्यक्त केलं आहे.
भारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळेस या दोन्ही प्लॅटफॉर्म्सनी बहुतांशवेळा भारताच्या बाजूनं पोस्ट केल्या होत्या. तर या प्रकरणात रशियाची अधिकृत भूमिका संयम आणि चर्चेचं आवाहन करण्याची होती.

फोटो स्रोत, Getty Images
7 मे ला रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं या प्रदेशातील स्थिती आणखी गंभीर होऊ नये म्हणून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना आवाहन केलं होतं की त्यांनी 'संयम राखावा'.
इराण-इस्रायल युद्धाच्या वेळेस देखील स्पुटनिक इंडिया आणि आरटी इंडिया, या दोन्ही मीडिया हाऊसनं भारतीय युजर्स आणि वाचकांसाठी पोस्ट टाकताना इराणची बाजू घेतली. त्यांनी अनेकदा इस्रायल आणि अमेरिकेला हल्लेखोर म्हणून दाखवलं.
13 जून ते 15 जुलै दरम्यान, आरटी इंडियानं, इराणला पाठिंबा देणाऱ्या 12 आणि अमेरिकेला विरोध करणाऱ्या 24 पोस्ट केल्या. तर स्पुटनिक इंडियावर इराणला पाठिंबा देणाऱ्या तीन आणि अमेरिकेला विरोध करणाऱ्या आठ पोस्ट होत्या.
स्पुटनिक इंडियानं एक्स या सोशल मीडियावर लिहिलं की "शक्तीशाली अमेरिका आणि त्याच्या पश्चिम आशियातील सहकाऱ्यांसमोर इराण ठामपणे उभा राहिला ही आश्चर्यकारक बाब आहे."
स्पुटनिक इंडियानं इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) देशांना लक्ष्य करत म्हटलं की त्यांनी इराणची मदत केली नाही. त्याचबरोबर स्पुटनिक इंडियानं जॉर्डन, सीरिया आणि इराकसारख्या अरब देशांवर देखील टीका केली. हे देश अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूनं उभे होते.
अर्थात रशिया आणि चीननं इराणला लष्करी मदत मिळाली नाही, ही गोष्ट योग्य असल्याचंही या मीडिया हाऊसनं म्हटलं. त्यांनी सांगितलं की इराणची चीन आणि रशियाबरोबर कोणतीही अधिकृत आघाडी नाही.
स्पुटनिक इंडियानं 16 जूनला इशारा दिला होता की "इराणविरोधात इस्रायल करत असलेलं युद्ध भारताच्या विकासासाठी धोकादायक आहे."
त्यांनी म्हटलं की या संकटाचा परिणाम इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (आयएनएसटीसी) सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर होऊ शकतो. हा कॉरिडॉर भारत, इराण आणि रशियाला जोडतो.
अमेरिका किंवा पाश्चात्य देशांनी संबंधित पोस्टवर एंगेजमेंट
दोन्ही संघर्षांचा अमेरिकेशी थेट संबंध होता. इराणवर इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचा सहभाग होता. तर भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याचं श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:ला दिलं. भारतानं हा दावा उघडपणे फेटाळला होता.
रशियाच्या सरकारी प्रसारमाध्यमानं भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. तसंच ट्रम्प यांच्या दाव्यांना कमी महत्त्व दिलं होतं. त्यांनी भारताच्या कारवाईसाठी पाश्चात्य देशांची धोरणं आणि मीडिया कव्हरेज यांना जबाबदार ठरवलं.

फोटो स्रोत, Getty Images
1 मे ते 15 जुलै दरम्यान, स्पुटनिक इंडिया आणि आरटी इंडियानं अमेरिका, पाश्चात्य देशांची धोरणं किंवा तिथली प्रसारमाध्यमं यांचा उल्लेख करणाऱ्या ज्या पोस्ट केल्या, त्याला एक्सवर चांगला प्रतिसाद मिळाला.
स्पुटनिक इंडियाला 'पाश्चात्यांचं वर्चस्व, ढोंगीपणा आणि हस्तक्षेप' सारख्या कीवर्ड्स असणाऱ्या पोस्टवर 98,455 इंटरॅक्शन मिळाले.
त्याचवेळी आरटी इंडियाला अशाच मुद्द्यांवर 7,890 इंटरॅक्शन मिळाले. त्यातून दिसून येतं की या मुद्द्यावर भारतीय युजर्समधील त्यांची उपस्थिती मर्यादित होती.
पडताळणीची पद्धत
बीबीसी मॉनिटरिंगनं ब्रँडवॉच आणि न्यूजव्हीपसारख्या टूल्सचा वापर करून 1 एप्रिल ते 15 जुलैदरम्यान एक्स या सोशल मीडियावर रशियाचं समर्थन असलेल्या आरटी इंडिया आणि स्पुटनिक इंडिया या दोन मोठ्या अकाउंटवरील पोस्टचा परफॉर्मन्स पाहिला.
यादरम्यान अशा पोस्ट पाहण्यात आल्या, ज्या भारत-पाकिस्तान संघर्ष आणि इस्रायल-इराण युद्धावर केंद्रीत होत्या.
दोन्हीही घटनांमध्ये अशा देशांमध्ये संघर्ष झाला, जे प्रदीर्घ काळापासून एकमेकांचे शत्रू आहेत.
न्यूजव्हीपवर भारत-पाकिस्तान आणि इराण-इस्रायलमधील चकमकींशी संबंधित की-वर्ड टाकून एक डॅशबोर्ड बनवण्यात आला. जेणेकरून त्याच्याशी निगडीत महत्त्वाच्या तारखांवर रशियाच्या एक्स अकाउंटच्या परफॉर्मन्सला ट्रॅक करता यावं.
ब्रँडवॉचद्वारे हे देखील पाहण्यात आलं की यादरम्यान दोन्ही प्लॅटफॉर्मच्या फॉलोअर्सची किती संख्या वाढली.
हा अहवाल तयार करण्यासाठी बीबीसी मॉनिटरिंगच्या डेटा हब टीमनं देखील काम केलं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











