You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिवाळीत अनेकांना जखमी करणारी कॅल्शियम कार्बाईड गन काय असते? तिच्या वापराने कसं येऊ शकतं अंधत्व?
यंदाच्या दिवाळीदरम्यान देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याच्या मुद्द्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे.
याव्यतिरिक्त फटाक्यांप्रमाणे वापरण्यात येत असलेल्या उपकरणांबाबतही मोठी चर्चा होते आहे. ही उपकरणं तशी खूप स्वस्त आहेत, मात्र त्यामुळे गंभीर दुखापती होऊ शकतात.
असंच एक उपकरण म्हणजे 'कॅल्शियम कार्बाईड गन'. पीव्हीसी किंवा धातूच्या पाईपपासून ती बनवलेली असते.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये कॅल्शियम कार्बाईड गनच्या वापरामुळं जखमी झाल्यानं 180 हून अधिक जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
यात लहान-लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांच्या रेटिनाला (डोळ्यातील पडदा) यामुळं गंभीर दुखापत झाली आहे.
'कॅल्शियम कार्बाईड' गन काय आहे?
कार्बाईड गनमध्ये पीव्हीसी किंवा धातूच्या पाईपचा वापर केला जातो.
यात एक चेंबर किंवा पोकळी असते आणि त्यात कॅल्शियम कार्बाईड भरलेलं असतं. त्यात पाणी भरलं की एक रासायनिक अभिक्रिया होते आणि ॲसिटीलीन वायू तयार होतो.
त्यानंतर गॅस लायटरचा वापर करून त्याचा स्फोट केला की, त्यातून फटाक्यासारखा मोठा आवाज येतो.
मात्र या कार्बाईड गनमधील रासायनिक अभिक्रिया ही काही नियंत्रित स्वरुपातील नसते.
म्हणजे ती किती तीव्रतेनं किंवा किती प्रमाणात व्हावी यावर नियंत्रण नसतं. त्यामुळंच ही कॅल्शियम कार्बाईड गन धोकादायक ठरू शकते.
भारतात कॅल्शियम कार्बाईड गनचा वापर शहरी भागात माकडांना पळवून लावण्यासाठी केला जातो.
तर शेतकरी याचा वापर वन्यप्राण्यांना शेतांपासून दूर ठेवण्यासाठी करतात. ई-कॉमर्स वेबसाईटवरही देखील या गनची विक्री केली जाते.
गुजरातमध्ये कार्बाईड गनचा वापर
गुजरातमध्ये गुराढोरांमुळे, गाईंमुळे त्रस्त झालेले शेतकरी मुख्यत: याप्रकारच्या गनचा वापर करतात.
मात्र याप्रकारच्या कार्बाईड गनमुळे होणाऱ्या दुखापती किंवा अपायांमुळे गुजरातमधील भावनगरमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
दिवाळीच्या आधी 17 ऑक्टोबरला भावनगरच्या अतिरिक्त जिल्हा मॅजिस्ट्रेट किंवा दंडाधिकाऱ्यांनी एक आदेश जारी केला. त्यात पीव्हीसी कार्बाईड गनच्या वापरावर, साठवणुकीवर, विक्रीवर आणि खरेदीवर बंदी घालण्यात आली.
या आदेशात म्हटलं आहे की "जेव्हा पीव्हीसी कार्बाईड गनचा वापर केला जातो, तेव्हा ॲसिटीलीन नावाचा वायू बाहेर पडतो. या वायुमुळे डोळ्यांना अपाय होतो किंवा डोळे चुरचुरतात."
"लहान मुलांच्या डोळ्यांना यामुळे गंभीर स्वरुपाची आणि कायमस्वरुपाची हानी होते. त्यामुळे कार्बाईड असलेल्या चिनी फटाक्यांवर आणि पीव्हीसी कार्बाईड गनवर बंदी घालण्यात आली आहे."
मात्र, कार्बाईड गनवरील ही बंदी कायमस्वरुपी नाही. ती 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत (देव दिवाळी) असणार आहे.
भावनगर पोलिसांनी गेल्या आठवड्यात कार्बाईड गनचा साठा असलेल्या एका व्यक्तीला अटक केली.
गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील टंकारा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "आम्हाला हरीण आणि रानडुकरांचा प्रचंड त्रास आहे. त्यांना पळवून लावण्यासाठी अनेक शेतकरी पीव्हीसी कार्बाईड गनचा वापर करतात. या गन 100 ते 200 रुपयांना मिळतात."
"या गन म्हणजे प्रत्यक्षात दोन पीव्हीसी पाईप असतात. त्या पाईपमध्ये कॅल्शियम कार्बाईडची गोळी एका छिद्रातून आत टाकली जाते. त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला हलवलं की त्यातून वायूची निर्मिती होते आणि स्फोट होतो. यामुळे प्राण्यांना कोणतीही इजा किंवा अपाय होत नाही. मात्र स्फोटाच्या आवाजानं ते तिथून पळून जातात."
टंकारामधील एक शेतकरी म्हणाला, "जामनगर, सुरेंद्रनगर, मोरबीसह अनेक जिल्ह्यांमध्ये वन्यप्राणी शेतांमध्ये शिरतात आणि पिकांची नासधूस करतात. अनेक शेतकऱ्यांनी शेताभोवती कुंपण घातलं असून त्यात विजेचा धक्का देणारी व्यवस्था केली आहे."
"यामुळे जेव्हा रानडुक्कर, डुकरं किंवा इतर प्राणी शेतात घुसण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना हलकासा विजेचा धक्का बसतो. मोठे शेतकरीदेखील शेताभोवती कुंपण घालतात. मात्र त्यासाठी खूप खर्च येतो. याशिवाय पाच-सहा फूट उंचीच्या कुंपणांवरून रानडुक्कर सहजपणे उडी मारतं."
"अनेकदा तर दिवसादेखील हरणांचे कळप येतात. तर रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांना शेताची राखण करण्यासाठी शेतात थांबावं लागतं आणि कार्बाईड गनचा वापर करावा लागतो."
अनेक मुलांच्या डोळ्यांना दुखापत
यंदा दिवाळीच्या वेळी या कार्बाईड गन चर्चेत आल्या आहेत, कारण मध्य प्रदेशात 180 हून अधिक जणांना भोपाळमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
या सर्वांना कॅल्शियम कार्बाईड गनच्या वापरातून दुखापती, जखमा झाल्या आहेत.
यात 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचाही समावेश आहे. त्यांच्या डोळ्यांना दुखापती किंवा जखमा झाल्या आहेत.
दिवाळीच्या काळात सोशल मीडियावर एक ट्रेंड व्हायरल झाला होता. त्यात लोक कॅल्शियम कार्बाईड गनचा वापर फटाक्यांप्रमाणे करताना दिसतात.
मात्र या गनच्या वापरात काळजी किंवा खबरदारी न घेतल्यास त्यातून लोकांच्या डोळ्यांना जखमा किंवा दुखापती झाल्याचं आढळून आलं आहे.
इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, "186 जणांवर डोळ्याच्या दुखापतीसंदर्भात जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. त्यातील 10 जणांच्या डोळ्यांना कायमस्वरुपी अपाय किंवा इजा झाली आहे. एकूण 15 जणांवर शस्त्रक्रिया करावी लागली."
या वृत्तात म्हटलं आहे की, "कॅल्शियम कार्बाईड गनचा वापर फटाक्यांप्रमाणे करण्यात आल्यामुळे काही जणांच्या चेहऱ्यावर भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. लहान मुलांचं डोळे सुजले आहेत आणि त्यांच्या कॉर्निआला (डोळ्याचं बाह्य पारदर्शक आवरण) दुखापत झाली आहे."
हैदराबादमधील एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूटच्या एका अहवालानुसार, फटाक्यांमुळे झालेल्या एकूण दुखापती किंवा जखमांमध्ये 15 टक्के जखमा या डोळ्यांशी संबंधित असतात.
कॅल्शियम कार्बाईडचा वापर कृषी उत्पादनांमध्ये तसंच फटाके तयार करण्यासाठी केला जातो. ही कॅल्शियम कार्बाईड गन पीव्हीसी पाईपपासून बनवलेली असते.
याप्रकारचं जुगाडू उपकरण केरळ, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्येदेखील वापरलं जातं. वन्यप्राण्यांना पळवून लावण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
फटाक्यांमुळे जेव्हा डोळा भाजला जातो, तेव्हा डोळ्याचा पडदा किंवा रेटिनाची स्वत:हून दुखापतीतून बरं होण्याची क्षमता नष्ट होते. त्यामुळे दृष्टी अंधुक किंवा अस्पष्ट होते. तर काहीवेळा, अंधत्वदेखील येतं असं या अहवालात म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)