सुंदर दिसण्यासाठी गोरंच असावं लागतं का? आम्ही काळ्या रंगाचे लोक सुंदर दिसत नाही का?

    • Author, अदिति नारायणी पासवान
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

मला आठवतं की मी दिल्लीतील जेएनयूमधील (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) मामा ढाब्याजवळ उन्हात संत्री खात होती. माझ्यासोबत एक प्राध्यापक होत्या. त्या लेक्चर देण्यासाठी पाटण्याहून आल्या होत्या. त्या एका न्यायाधीशाच्या पत्नी होत्या.

त्यांनी काळजीच्या स्वरात मला विचारलं होतं, "संत्री खात जाऊ नकोस आणि त्यांना चेहऱ्यावर लाव, त्यामुळे तुझ्या त्वचेचा रंग उजळेल."

मोठं स्मितहास्य करत मी त्यांच्याकडे पाहिलं आणि तिथून निघून गेले. मी जेएनयूमध्ये असल्यापासून याप्रकारचा आत्मविश्वास माझ्यात आला होता.

मात्र, हीच गोष्ट जर माझ्या घरात घडली असती, तर तिथून जाण्याची माझी हिंमत झाली नसती आणि मी स्वत:च्या चेहऱ्याला संत्री लावत बसले असते.

ही फक्त माझी कहाणी नाही. आयुष्यात कोणत्यातरी असुरक्षिततेला तोंड द्यावं लागत असलेल्या सर्वच मुली आणि महिलांची ही कहाणी आहे.

मग तो त्वचेचा रंग असो की त्यांची उंची असो किंवा मग वजन असो. या यादीला कोणतीही सीमा नाही. या गोष्टींमुळे महिलांना कमी लेखलं जातं. त्यांना जाणीव करून दिली जाते की त्यांच्या सुंदर दिसण्यात काहीतरी कमतरता राहून गेली आहे.

मला हे लक्षात आलेलं नाही की सुंदर कोण आहे? सौंदर्याची व्याख्या काय असते? सुंदर असण्याचे निकष कोणी ठरवले आहेत? फक्त गोरं असणं म्हणजेच सुंदर असणं असतं का?

आम्ही ब्लॅक (काळ्या) आणि ब्राउन (सावळ्या) रंगाचे लोक सुंदर नसतो का?

सौंदर्याचे उथळ निकष

'Gen Z' म्हणजे नव्या पिढीच्या भाषेत याला 'प्रिटी प्रिव्हिलेज' देखील म्हटलं जातं. त्याचा अर्थ असतो की सुंदर लोकांना अधिक विश्वासार्ह मानलं जातं. सुंदर लोकांकडे अधिक सकारात्मकतेनं लक्ष दिलं जातं.

गोरेपणाला नेहमीच शुद्ध आणि दैवी मानलं जातं. मात्र मी नेहमीच विचार करते की ब्लॅक (काळ्या) आणि ब्राउन (सावळ्या) महिलांचं काय? आमच्या अस्तित्वाला स्वीकारणार की नाही?

मला नेहमीच वाटतं की एक दिवस आमच्या त्वचेचा रंग नाही तर आमची कर्तबगारीच आमच्याबद्दल बोलेल.

मात्र केरळ सरकारच्या मुख्य सचिव सारदा मुरलीधरन यांच्याबाबतीत अलीकडेच घडलेल्या घटनेनं आम्हाला पार हादरवून टाकलं आहे. त्यामुळे लहानपणीच्या काळ्या रंगासंदर्भातील अनुभवांची आठवण पुन्हा समोर आली आहे.

त्यांनी लिहिलं, "मुख्य सचिव म्हणून माझ्या कार्यकाळाबद्दल काल मी एक रंजक टिप्पणी ऐकली. ती अशी की हा कार्यकाळ तितकाच काळा होता जितका माझ्या पतीचा पांढरा किंवा उजळ होता. हम्म्म! मला स्वत:चा काळेपणा स्वीकारण्याची आवश्यकता आहे."

"त्या म्हणाल्या की मुलाखतीत त्यांची सर्व कर्तबगारी फक्त त्वचेच्या रंगापर्यंत मर्यादित झाली आणि त्यांना अशी जाणीव झाली की जणूकाही त्यांचं अस्तित्वच नाही."

आम्हा तरुण महिलांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्यासारख्या यशस्वी महिलेचं मूल्यमापनदेखील फक्त सौंदर्याच्या उथळ निकषांच्या आधारे केलं जातं आहे, हे पाहून मन खट्टू होतं, खूपच वाईट वाटतं.

रंगभेदाची चर्चा फक्त गोरेपणा आणि काळेपणावर संपत नाही. यामध्ये अनेक छटा आहेत. उदाहरणार्थ खूप अधिक गोरा, ट्यूबलाईटसारखा गोरा, गव्हाळ रंग, रंग सावळा आहे मात्र चेहरा तजेलदार आहे. तिची चेहऱ्याची ठेवण तर सुंदर आहे मात्र रंग थोडासा काळा आहे.

या थोड्याशा काळ्या, सावळ्या रंगामुळे दररोज महिला त्यांच्या कोमल त्वचेवर रासायनिक उत्पादनांचा वापर करत आहेत. या उत्पादनांचा वापर केल्यामुळे गोरेपणाच्या व्याख्येत आपण फीट बसू असं त्यांना वाटतं.

महिला जेव्हा पार्लरमध्ये जातात, तेव्हा त्यांना असं म्हटलं जातं की तुमच्या चेहऱ्यावर फक्त ग्लो किंवा चमकची आवश्यकता नाही. तर एका सावळ्या रंगाच्या महिलेनं तिच्या त्वचेचा रंग उजळदेखील करण्याची आवश्यकता आहे.

फेअर अँड लवली आणि ब्लीचिंग एजंट सारखी दैनंदिन वापरातील उत्पादनं, क्रीम सतत आम्हाला जाणीव करून देतात की आमचं अस्तित्व आमच्या त्वचेच्या रंगाशी जोडलेलं आहे.

रंगभेदाची खोलवर रुजलेली मूळं

गोरा रंग अभिमानानं मिरवला जातो. मात्र अभिमानाच्या भावनेव्यतिरिक्त रंगभेदाचे इतरही पैलू आहेत. जाती व्यवस्था आणि समाजातील इतर वाईट गोष्टी, चालीरीतींशी रंगभेद खोलवर जोडलेला आहे.

मी अशा घटनांबद्दल ऐकलं आहे की ज्यात निव्वळ मुलगी गोरी नाही म्हणून लग्न थांबवण्यात आलं आणि जर मुलगी काळी असेल तर होणाऱ्या अपत्यावर त्याचा परिणाम होईल.

मुलगी काळी असली तर हुंड्यामध्ये स्कूटरऐवजी कार आणि 5 लाखांच्या रोकडऐवजी 20 लाखांच्या रोकडची मागणी आपोआपच केली जाते. जणूकाही रंगाची भरपाई वाढीव हुंड्याद्वारे केली जाते.

त्वचेचा रंग आणि जातीचा घनिष्ठ संबंध आहे. असं मानलं जातं की कथित खालच्या जातीतील लोकांची त्वचा काळी आहे आणि उच्च जातीतील लोकांची त्वचा गोरी असते.

सौंदर्याचा विचार फक्त त्वचेच्या रंगापुरताच मर्यादित नाही. तो चेहऱ्याच्या ठेवणीशी किंवा वैशिष्ट्यांशी देखील संबंधित आहे. उदाहरणार्थ, नाक किती लांब आहे किंवा डोळ्यांचा आकार किंवा रचना कशी आहे.

खास, तुमचं नाक छोटं दिसण्यासाठी आणि तुमचे डोळे मोठे दिसण्यासाठी बनवण्यात आलेली मेकअपची उत्पादनं उपलब्ध आहेत. असं वाटतं की तुमच्या सर्व असुरक्षिततेच्या भावनांचा फायदा उचलत तुम्हाला आणखी असुरक्षित भासवलं जातं आहे.

लहानपणी मला नेहमीच मे दिनाची (कामगार दिन), मजूरांशी निगडीत पात्र करण्याचीच संधी मिळाली. मला कधीही व्यासपीठावर माइकवर बोलण्याची संधी मिळाली नाही. मला नेहमीच मागे राहावं लागलं.

रंगभेदामुळे फक्त जातीचाच विचार प्रबळ होत नाही तर यातून वर्गभेद देखील मजबूत होतो.

यातून वैविध्याचा प्रश्न कुठे जातो? आम्हा सर्वांना वारशातून हा पूर्वग्रह मिळाला आहे. हा इतका खोलवर आहे की आपण कोणाकडेही त्याच्या रंगापलीकडे जाऊन पाहूच शकत नाही.

लहानपणापासूनच महिलांना सौंदर्याच्या निकषांबद्दल सांगितलं जातं. ते आपल्या मनात इतके खोलवर रुजतात की एक महिला म्हणून आपण ते नाकारू देखील शकत नाही आणि ते निकष कायमच आपल्याबरोबर राहतात.

पीडित आणि दुर्लक्षित असूनदेखील, आपण सौंदर्याचे हे निकष कायम ठेवणारे एजंट, वाहक बनतो.

आता जग पुढे जातं आहे आणि आपण क्वचितच रंगभेदाबद्दल बोलतो, चर्चा करतो.

लिबरल (उदारमतवादी) आणि मॉडर्न (आधुनिक) असण्याचा मुखवटा चढवून आपण म्हणतो, "त्वचेचे सर्व रंग सुंदर असतात आणि ब्राउन (सावळी) त्वचा तर खूपच आकर्षक असते."

मात्र तरीदेखील हा प्रश्न आहे की खरोखरंच आपण सौंदर्याच्या निकषांचा स्वीकार करून त्यांना अधिक व्यापक स्वरुपाचं बनवत आहोत का? की प्रश्नांवर लक्ष न देता फक्त आकर्षक असण्याचा मुद्दा त्यात जोडत आहोत.

आपली संस्कृती आणि आपल्या चेतनेमध्ये रंगभेद इतका खोलवर रुजलेला आहे की आपण नेहमीच या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की तो कशाप्रकारे आपल्या जीवनाच्या अनुभवांना, जीवनाला आकार देतो. त्यामुळे आपल्याला संधी मिळणं कसं कठीण होतं आणि त्यामध्ये सामाजिक बहिष्काराचाही समावेश आहे.

(लेखिका दिल्ली विद्यापीठात शिकवतात. हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.