एअर इंडिया आणि बोईंगची विमानं आत्तापर्यंत कितीवेळा जीवघेण्या अपघातात सापडली?

फोटो स्रोत, Chetan Singh
- Author, जॅस्मिन निहालनी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जून 12 ते 17 या काळात एअर इंडियाने 83 उड्डाणं रद्द केली, असं भारतातल्या विमान वाहतूक नियामक संस्था डीसीजीएनं एका निवेदनात म्हटलं आहे.
या 83 पैकी 63 उड्डाणांसाठी बोईंग 787 या मॉडेलचं विमान वापरण्यात येणार होतं. हे तेच मॉडेल आहे जे कोसळल्याने मागच्या आठवड्यात अहमदाबादमध्ये 270 लोकांचा जीव गेला.
हा गेल्या दशकभरातला जगातला सर्वात भीषण विमान अपघात मानला जातोय.
एअर इंडियाच्या AI-171 या 12 जूनला लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये 242 लोक होते. पण अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या धावपट्टीवरून उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं.
विमानातून प्रवास करणारा एकच प्रवासी वाचला. पण विमान एका वैद्यकीय महाविद्यालयावर कोसळल्यानं मृतांचा आकडा वाढला.
या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे.
आकडेवारी काय सांगते?
आमच्या विश्लेषणानुसार गेल्या 78 वर्षांत एअर इंडिया या विमान कंपनीच्या नावावर 30 पेक्षा जास्त अपघात नोंदवले गेले आहेत. त्यातले 14 अपघात अतिशय भीषण म्हणजे जीवघेणे होते.
या यादीत काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये झालेला अपघात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर आहे 1985 साली घडलेली घटना.
त्यात AI-182 या फ्लाईटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे विमानातल्या 329 लोकांचा मृत्यू झाला होता.
डीजीसीएच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार एअर इंडिया ही कंपनी बोईंग विमानांची भारतातली सर्वात मोठी ग्राहक आहे.
त्यांनी बोईंगकडून 54 विमानं घेतली आहेत. त्यातली 28 विमानं 787 या मालिकेतली होती.
एअर इंडिया एक्सप्रेस ही त्यांचीच कमी खर्चिक उपकंपनी 48 विमानांचा ताफा चालवते. त्यातली 43 बोईंग विमानं आहेत.
गेल्याच वर्षी या विमानसेवा कंपनीनं बोईंगकडून आणखी 220 विमानं मागवली. त्यातली 20 विमानं या 787 सीरिजमधील होती.
बोईंग विमानांचे अपघात
अहमदाबादचा अपघात झाल्यानंतर कुठे कुठे एअर इंडियाच्या फ्लाईट्स थांबवल्या किंवा तांत्रिक अडचणींमुळे परत खाली उतरवल्या गेल्या याच्या बातम्या येताना दिसत आहेत.
सॅन फ्रान्सिस्कोवरून मुंबईला येणाऱ्या एका एअर इंडियाची फ्लाईट कोलकात्त्यात उतरून पुढे जाणार होती. पण तांत्रिक बिघाड झाल्यानं फ्लाईट जाता तिथेच थांबवली गेली.
तशीच बोईंग 787-8 हे हाँग-काँगवरून दिल्लीला निघालेलं एअर इंडिया कंपनीचं विमानही वैमानिकाला तांत्रिक बिघाड झाल्याची शंका आल्यानं मागे फिरवलं गेलं.
आणखी एक, दिल्लीवरून वडोदऱ्याला चाललेलं विमान गिअरमध्ये बिघाड झाल्यानं परत दिल्लीत आणलं गेलं अशी बातमी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडलेली बोईंग ही विमान बनवणारी कंपनी विमानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनंही संकटात सापडली आहे. गेल्या वर्षी कंपनीला एक अब्ज डॉलर्सचं नुकसानही सोसावं लागलं होतं.
2018 आणि 2019 मध्ये त्यांची 737 मॅक्स मालिकेतली दोन विमानं उड्डाण घेताच कोसळली. त्यातलं एक इंडोनेशियात पडलं, ज्यात 189 लोकांचा जीव गेला. तर दुसऱ्या इथोपियामध्ये झालेल्या अपघातात 157 लोकांना प्राण गमवावे लागले.
या विमानाच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे हे अपघात झाल्याचं निदान केलं गेलं. त्यामुळे त्यावर 18 महिने बंदीही घालण्यात आली.
एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क या संस्थेकडून दिल्या गेलेल्या आकडेवारीचं विश्लेषण केल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की 2014 ते 2025 या काळात 40 प्रवासी विमानांचे जीवघेणे अपघात झाले आहेत. त्यातल्या 12 विमानं बोईंगची होती.
पण बोईंगच्या मार्की 787-8 ड्रीमलायनर या विमानाचा एवढा भीषण अपघात पहिल्यांदाच अहमदाबादमध्ये झाला. यापुर्वीही ड्रीमलायनरचे अपघात झाले होते. पण त्यात कोणाचा जीव गेला नव्हता.
बोईंगच्या सगळ्या मॉडेलची आकडेवारी लक्षात घेतली तर आत्तापर्यंत 2,500 अपघातांची नोंद झाली आहे. त्यातल्या 500 अपघातात लोकांचे जीव गेले आहेत.
अहमदाबादच्या अपघाताने विमानप्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विमान अपघात आणि उपस्थित प्रश्न
व्यावसायिक विमान उड्डाणांच्या आकडेवारीचा ऐतिहासिक आढावा घेतला तर असं लक्षात येतं की 1970 आणि 1980 च्या दशकात असे अपघात नेहमी होत असत.
पण काळानुसार, फ्लाईट्सच्या संख्येत लक्षणीयरीत्या वाढ होत गेली तशी दरवर्षी होणाऱ्या भीषण अपघातांची संख्याही कमी होत गेली.
1970 साली 68 लाख उड्डाणांची नोंद आहे. तर 2024पर्यंत हा आकडा 338 लाख एवढा वाढला आहे.
पण त्यातुलनेत 2024 साली भीषण अपघातांचा दर प्रत्येक दहा लाख उड्डाणांमागे 0.12 इतका होता.
प्रवास संपत असताना असे भीषण अपघात होण्याची शक्यता जास्त असते असं आकडेवारीतून दिसून येतं.

2015 आणि 2024 या काळात व्यावसायिक उड्डाणांच्या भीषण अपघातांपैकी 37 टक्के अपघात हे विमान उतरताना झाले आहेत. खरंतर, संपूर्ण विमान प्रवासात लागणाऱ्या वेळापैकी फक्त 1 टक्का वेळ विमान उतरवण्यासाठी लागतो.
याउलट, प्रवासाचा सर्वाधिक वेळ (सुमारे 57%) जिथं खर्च होतो त्या 'क्रूझिंग' टप्प्यात, केवळ 10% जीवघेणे अपघात घडले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











