'मंगेशकर रुग्णालय प्रकरणा'नंतर विदर्भात प्रसुतीनंतर 2 मातांचा मृत्यू, कुटुंबांकडून गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?

विदर्भात 2 बाळंतिणींचा मृत्यू

फोटो स्रोत, Bhagyashri Raut

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"माझा तर पूर्ण आधारच गेला. माझं दोन दिवसांचं लेकरू आयसीयूमध्ये आहे, तर दुसरं लेकरू दोन वर्षाचं आहे. माझ्या आईला तिच्या डोळ्यांनी काहीच दिसत नाही आणि यांनी माझ्यासोबत असं केलं. मला न्याय पाहिजे"

प्रसूतीनंतर आपल्या पत्नीला गमावलेले मुकेश रडत रडतच बोलत होते. मुकेश उके हे गोंदियातील असून त्यांच्या पत्नीचा केटीएस जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर मृत्यू झाला आहे.

पुण्यातील गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरण ताजं असतानाच गोंदियातही तसाच प्रकार घडलाय. फक्त गोंदियाच नाहीतर गडचिरोली जिल्ह्यातही आदिवासी महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला.

या दोन्ही प्रकरणात नेमकं काय घडलं? रुग्णांच्या नातेवाईकांचं म्हणणं काय आहे? डॉक्टरांचं म्हणणं काय आहे? जाणून घेऊयात.

गोंदियात बाळंतीण महिलेचा प्रसूतीच्या दोन दिवसातच मृत्यू

गोंदियातील केटीएस जिल्हा रुग्णालयात सामान्य प्रसूती झाल्याच्या मातेचा दोन दिवसानंतर मृत्यू झाला. प्रतिभा मुकेश उके असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून ती गोंदियातील सिंगलटोली इथली रहिवासी होती.

तिचे पती मुकेश उके यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा यांचं माहेर गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आहे. गेल्या 25 दिवसांपूर्वी ती विश्रांती घेण्यासाठी आईकडे गेली होती. तिनं 9 एप्रिलला सोनोग्राफी काढली. त्यानंतर सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. तिथल्या डॉक्टरांनी प्रसूतीसाठी प्रयत्न केले. पण, प्रसूती न झाल्यानं त्यांनी 11 एप्रिलला गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात रेफर केले.

प्रतिभा आपल्या आईसोबत गोंदियाच्या बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी येत असल्याचं त्यांनी पती मुकेश यांना कळवलं. त्यांना याच दिवशी बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी प्रतिभा अगदी ठणठणीत होत्या. आम्ही दोघांनी सोबतच नाश्ता केला, असं मुकेश यांनी सांगितलं.

"11 एप्रिलच्या रात्री तिला दवाखान्यात जेवणाचा डबा आणून दिला. त्यावेळीही ती अगदी ठीक होती. घरी जा आणि आपल्या मुलाला जेवण द्या, असं मला म्हणाली. माझा दोन वर्षांचा मुलगा घरीच होता. त्यामुळे मी घरी गेलो," असंही मुकेश यांनी नमूद केलं.

प्रतिभा यांचे पती मुकेश यांनी बाई गंगाबाई रुग्णालयातील डॉक्टरांवर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे.

फोटो स्रोत, Mukesh Uke

फोटो कॅप्शन, प्रतिभा यांचे पती मुकेश यांनी बाई गंगाबाई रुग्णालयातील डॉक्टरांवर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बाई गंगाबाई रुग्णालयात प्रतिभा यांची नॉर्मल प्रसूती झाली. पण, प्रसूतीच्या एक दिवसानंतरच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे पती मुकेश यांनी बाई गंगाबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे.

"मध्यरात्री तिला प्रसूती वेदना झाल्या. यावेळी डॉक्टरांनी रात्री दोन वाजता तिची प्रसूती केली. आम्हाला मुलगा झाला. त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. पण, माझ्या पत्नीला खूप रक्तस्त्राव सुरू होता. याला जबाबदार फक्त डॉक्टर आहेत. त्यांना रात्री अडीच वाजता जबरदस्तीनं शस्त्रक्रिया करायची काय गरज होती?"

"त्रास सहन होत नसल्यानं माझं सिझर करा, अशी विनंती माझ्या पत्नीनं डॉक्टरला केली होती. पण, डॉक्टरांनी तिचं काहीही ऐकलं नाही. तिची जबरदस्तीनं नॉर्मल प्रसूती केली. त्यामुळे तिला रक्तस्त्राव सुरू झाला. त्यासाठी डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया केली."

"या रुग्णालयात व्हेंटीलेटर नसल्यानं माझ्या पत्नीला केटीएस जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. आम्ही 13 आणि 14 एप्रिल दोन दिवस तिथं होतो. पण, ती शुद्धीवर आलेली नव्हती. तिला अनेक रक्त्याच्या बाटल्या दिल्या, पण तिनं डोळेच उघडले नाही."

"बाई गंगाबाई रुग्णालयातल्या डॉक्टरांनी प्रसूती करताना कुठली नस कापली काय माहिती. मरेपर्यंत माझ्या बायकोचा रक्तस्त्राव थांबला नाही. डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळेच माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे", असे आरोप मुकेश उके यांनी केले.

तसेच याविरोधात मुकेश पोलिसांत तक्रार दाखल करणार असून डॉक्टरांवर कारवाई करून न्याय देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली.

प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत

मृत महिलेच्या पतीनं डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केल्यानंतर आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांच्यासोबत संपर्क साधला.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "या प्रकरणात रितसर तक्रार झालेली नाही. तरीही आम्ही चौकशी समिती गठीत केली असून या प्रकरणाची चौकशी करत आहोत. डॉक्टरांनी ज्या शस्त्रक्रिया केल्या त्या पेशंटच्या नातेवाईकांना सांगून केल्या."

"पेशंटचा सर्व्हिक्स फाटला होता तो शस्त्रक्रिया करून बंद केला. तरीही पेशंटला अंतर्गत रक्तस्त्राव होत होता. मृत्यू का झाला? हे चौकशी समितीचा अहवाल आल्यावरच समजू शकेल. पुढच्या 8 दिवसांत अहवाल येईल."

गडचिरोलीतही आदिवासी महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील विसोरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राअंतर्गत आदिवासी गर्भवती मातेचा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे. मनिषा धुर्वे (वय 31) असे या महिलेचं नाव असून आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

मनिषा यांना 14 एप्रिलला पहाटे साडेतीन वाजता विसोरा प्राथमिक उपकेंद्रात नेण्यात आले. तिथे डॉक्टर आणि कंत्राटी परिचारिका कार्यरत होती. त्यांनी सर्व तपासण्या केल्या. तपासण्या नॉर्मल वाटल्यानं त्यांनी प्रसूतीसाठी वाट पाहिली. पण, खूप वेळ वाट पाहूनही प्रसूती झाली नाही.

अखेर मनिषा यांना देसाईगंज इथल्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं एक तासातच त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाली. त्यामुळे त्यांना गडचिरोलीच्या स्त्री रुग्णालयात रेफर करण्यात आलं. मात्र, नातेवाईक महिलेला खासगी रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच माता आणि बाळाचा मृत्यू झाला, अशी माहिती गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी दिली.

डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.
फोटो कॅप्शन, डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

विसोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी रुग्णालयात खूप वेळ थांबवून ठेवले. त्यामुळे मनिषा यांचा बाळासह मृत्यू झाला, असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला. तसेच शिवसैनिकांनी देखील देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाच्या समोर आंदोलन केलं.

विसोरा उपकेंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकेवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. यावेळी आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी देखील देसाईगंज इथं भेट दिली होती.

डॉक्टर, परिचारिकेची सेवासमाप्ती

अधिक तणाव निर्माण होत असल्यानं शिंदे यांनी प्राथमिक चौकशी केली. यामध्ये महिलेला प्राथमिक उपकेंद्रात अधिक वेळ न घालवता लवकर दुसऱ्या रुग्णालयात रेफर करता आले असते असं समोर आलं. त्यामुळे उपकेंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकेची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. तसेच चार सदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढे काय कारवाई करायची ते ठरवू असं प्रताप शिंदे म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)