You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-पाकिस्तान तणावात चीन कुणाची बाजू घेणार?
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत.
दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात अनेक पावलंही उचलली आहेत.
पण या सर्व घडामोडींदरम्यान दोन्ही देशांचा शेजारी देश असलेल्या चीनने काय भूमिका घेतली आहे?
भारत आणि चीनमधील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणलेले आहेत. पण पाकिस्तान आणि चीनमधील संबंध कसे आहेत? 'शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र' हा फॉर्म्युला हे दोन देश लागू करतात का?
हेच आपण समजून घेणार आहोत.
चीनने केला पहलगाम हल्ल्याचा निषेध
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनने एका निवेदनाद्वारे या हल्ल्याचा निषेध केला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटलंय, "आम्ही सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचा ठामपणे निषेध करतो. हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांना आदरांजली आणि शोकाकुल कुटुंबीय आणि जखमींबद्दल आम्हाला सहानुभूती आहे."
चीनचे भारतातील राजदूत शू फेईहाँग यांनीही पहलगाम हल्ल्यानंतर 'एक्स'वर पोस्ट करत निषेध केला होता.
चीनची भूमिका का महत्त्वाची?
पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील आहे.
मग यामध्ये चीन नेमकी काय भूमिका घेतोय, हे पाहणं इतकं का महत्त्वाचं आहे?
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पाकिस्तान आणि चीनमध्ये असणारे मैत्रीचे संबंध होय.
सध्याच्या घडीला पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांचे सहकारी देश आहेत. आर्थिकदृष्ट्या, संरक्षण क्षेत्रामध्ये चीनने पाकिस्तानला मदत केलेली आहे.
या दोन देशांमधील संबंध फार जुने नसले, तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरही दोन्ही देशांनी एकमेकांना खुलं समर्थन दिलेलं आहे.
चीन-पाक संबंधांचा इतिहास
1956 मध्ये, तेव्हाचे चीनचे पंतप्रधान चाऊ एन् लाय यांनी पाकिस्तानचा दौरा केल्यानंतर या दोन देशांमधले संबंध वाढले आहेत.
1961 साली संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत चीनसंदर्भात एक प्रस्ताव मांडण्यात आला होता.
तेव्हा पाकिस्तानचे सिंचन आणि उद्योग मंत्री असणाऱ्या झुल्फिकार अली भुत्तोंच्या नेतृत्त्वाखालच्या पाकिस्तानच्या पथकाने यामध्ये चीनच्या बाजूने मतदान केलं होतं.
अमेरिकेने तेव्हा त्यांना याबद्दल खबरदारीचा इशाराही दिला होता. पण तेव्हापासूनच पाकिस्तान चीनचा समर्थक आहे.
चीन-पाकिस्तानची बहरती मैत्री
1962 साली भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं होतं. त्यानंतर पाकिस्तान आणि चीन यांचा भारत हा समान 'शत्रू' असल्याने त्यांच्यातील मैत्री वाढत गेल्याचं सांगितलं जातं.
भारत हा दोन्ही देशांसाठी अजूनही महत्त्वाचा मुद्दा असला, तरी चीनने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात केलेली गुंतवणूक, हा देखील आता त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे.
चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (China Pakistan Economic Corridor) - सीपेक हा चीनचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. Belt and Road Initiative मध्ये निर्माण करण्यात येणाऱ्या व्यापारी नेटवर्कचा हा एक भाग आहे.
या इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये चीन-पाकिस्तानमध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबवतोय आणि यासाठी चीनने तब्बल 62 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात असताना चीनने पाकिस्तानला कर्जदेखील दिलं होतं.
चीनकडून उइगर मुस्लिमांना देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल जगातल्या विविध देशांनी टीका केलेली आहे, पण पाकिस्तानने याबद्दल कधीही आवाज उठवलेला नाही.
तर SCO म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात येत असताना रशियाने भारताचं नाव सुचवल्यानंतर चीनने पाकिस्तानच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.
संरक्षण क्षेत्रातील गहिरे संबंध
चीन आणि पाकिस्तानमध्ये फक्त आर्थिक आणि धोरणात्मकच नाही, तर संरक्षण क्षेत्रविषयक संबंधही आहेत.
पाकिस्तानच्या सैन्याला चीनमध्ये प्रशिक्षण दिलं जातं. दोन्ही देशांची सैन्यं संयुक्त सराव - Joint Exercise करतात. शिवाय, दोन्ही देशांचा दहशतवादविरोधी अभ्यासही एकत्रच होतो.
इतकंच नाही तर चीन पाकिस्तानला युद्धनौका, विमानं आणि क्षेपणास्त्रं तयार करण्यासाठी मदत करतो.
'द एक्स्प्रेस ट्रिब्यून' या पाकिस्तानी वर्तमानपत्राने ऑक्टोबर 2018 ला छापलेल्या बातमीनुसार, पाकिस्तान हा चीनची सगळ्यात जास्त अवजारं आयात करणारा देश आहे.
2000 ते 2014 या काळामध्ये चीनच्या एकूण शस्त्रविक्रीच्या 42 टक्के हिस्सा पाकिस्तानने विकत घेतला होता, असं या बातमीत म्हटलंय.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान-चीनमधल्या या संबंधांचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
पाकिस्तान-चीन मैत्रीचा भारतावर काय परिणाम होणार?
पहलगाम हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधु जल करार स्थगित केला आहे. हा करार काय होता याबद्दलची माहिती तुम्ही इथे वाचू शकता.
तर सिंधू नदीच्या खोऱ्यात पाकिस्तान खालच्या बाजूला आणि भारत वरच्या बाजूला आहे.
पण ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात चीन भारताच्या वरच्या बाजूला आहे.
'Blood and water cannot flow together' अर्थात 'रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत' असा इशारा उरी दहशतवादी हल्ल्यानंतर 2016 मध्ये भारताने पाकिस्तानला दिला होता.
यानंतरच चीनने Yarlung Tsangpo (यार्लंग त्सांगपो) या नदीची एक उपनदी रोखून धरली होती. हीच उपनदी भारतात येऊन ब्रह्मपुत्रा बनते.
आपण सीमेजवळ उभारत असलेल्या हायड्रोपॉवर म्हणजे जलविद्युतनिर्मिती प्रकल्पाला गरज असल्यानं पाणी रोखल्याचं तेव्हा चीननं म्हटलं होतं.
पण हे ज्या वेळी केलं गेलं, ते पाहता बीजिंगनं पाकिस्तानची मदत केल्याचं म्हटलं गेलं होतं.
याच यार्लंग त्सांगपो नदीच्या खालच्या खोऱ्यात चीन जगातलं सर्वात मोठं धरण बांधतोय. या प्रकल्पाद्वारे चीन नदीचा प्रवाह स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवेल अशी भारताला भीती आहे.
तिबेटमध्येही चीननं अनेक हायड्रोपॉवर प्रकल्प बांधलेले आहेत.
पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या विरोधात अनेक पावलं उचलली.
यानंतर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि पाकिस्तानचे उप-पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इसहाक डार यांच्यादरम्यान फोनवर चर्चा झाली.
या घटनेची सखोल आणि तटस्थ चौकशी करण्याच्या पाकिस्तानच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचंही चीननं म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)