You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बदला घेण्यासाठी 'कॅश ऑन डिलिव्हरी' करत हजारो पार्सल्स पाठवले; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
- Author, झेवियर सेल्वाकुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तामिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये एका महिलेनं आपल्या कंपनीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
याचा राग मनात धरून एका कंपनी मालकानं तिला त्रास देण्यासाठी शेकडो 'कॅश ऑन डिलिव्हरी' पार्सल्स तिच्या पत्त्यावर पाठवले.
या प्रकरणात पोलिसांनी त्या कंपनी मालकाला अटक केली आहे.
त्या महिलेने कंपनी सोडल्यामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम झाला, आणि त्याचा राग काढण्यासाठीच आपण असे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे.
या प्रकरणात नेमकं काय घडलं, याची माहिती कोईम्बतूर शहर सायबर क्राइम पोलिसांनी बीबीसी तमिळला दिली आहे.
नेमकं काय घडलं?
कोईम्बतूर येथील महिला एक कंपनी चालवते. गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या कुरिअर कंपन्यांमार्फत तिच्या नावावर अनेक प्रकारची पार्सल्स येऊ लागली.
तिने एकही वस्तू ऑर्डर केलेली नसतानाही, तिचं नाव, घराचा पत्ता, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरून 'कॅश ऑन डिलिव्हरी' (सीओडी) पद्धतीने ही पार्सल्स पाठवण्यात आली होती. यामुळे ती महिला प्रचंड गोंधळून गेली होती.
आपण काहीही ऑर्डर केलेली नाही, असं सांगत तिनं ही पार्सल्स परत पाठवली. मात्र त्यानंतरही तिला होणारा त्रास थांबला नाही. पुढील काही दिवसांत दररोज 50 ते 100 पार्सल्स तिच्या घरी येऊ लागली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पार्सल्सवर तिच्या नावाच्या आधी किंवा नंतर आक्षेपार्ह नाव जोडून तिच्या पत्त्यावर ती पाठवण्यात आली.
हे पार्सल्स देण्यासाठी एकाच वेळी अनेकजण त्या महिलेच्या मोबाइलवर फोन करू लागले. तसेच, रोज अनेक कुरिअर कर्मचारी पार्सल्स घेऊन तिच्या इमारतीबाहेर येऊन थांबत होते.
एकही दिवसही खंड न पडता हा प्रकार अनेक महिने सुरू होता. त्यामुळे त्या महिलेला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला, असं पोलिसांनी सांगितलं.
या प्रकरणी पीडित महिलेने गेल्या एप्रिलमध्ये कोईम्बतूर शहर सायबर क्राइम विभागात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
सुमारे आठ महिन्यांच्या तपासानंतर या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
'सूड घेण्याच्या उद्देशाने पार्सल्स पाठवले'
हे पार्सल्स पाठवणारा कंपनीचा मालक सतीशकुमार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ती महिला 2023 मध्ये सतीशकुमार यांच्या कंपनीत कामाला लागली होती. सुमारे एक वर्षाहून अधिक काळ ती तिथे काम करत होती. गेल्या वर्षी तिनं ती कंपनी सोडली आणि तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर काही महिन्यांनीच ही पार्सल्स येऊ लागल्याचं पोलिसांनी सांगितलं.
बीबीसी तमिळशी बोलताना कोईम्बतूर शहर सायबर क्राइम विभागाचे पोलीस निरीक्षक अझगुराजा म्हणाले की, "ही महिला त्या कंपनीत काम करत असताना कंपनीला भरपूर ऑर्डर्स आणि चांगलं उत्पन्न मिळत होतं. मात्र तिने बाहेर पडून स्वतःची कंपनी सुरू केल्यानंतर, त्या कंपनीचे अनेक ग्राहक तिच्या नव्या कंपनीकडे वळले."
यामुळे सतीशकुमार यांच्या कंपनीचं नुकसान झालं. त्याच रागातून त्या महिलेला त्रास देण्यासाठी आपण हे सगळं केल्याचं सतीशकुमारनं कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सोशल मीडियावर दिसणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू तो ऑर्डर करत होता आणि हजारो पार्सल्स त्या महिलेकडे पाठवत होता. या सगळ्या ऑर्डर्समध्ये कुठेही त्याचा थेट संबंध दिसत नव्हता. त्यामुळे त्या महिलेलाही सतीशकुमारवर संशय आला नाही आणि लगेच त्याला ओळखणंही शक्य झालं नाही.
महिलेकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, पार्सल्स पाठवलेल्या विविध कंपन्यांकडून काही माहिती मिळवण्यासाठी सायबर क्राइम पोलिसांनी संपर्क साधला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सतीशकुमारने एका कंपनीकडून ऑर्डर केलेल्या 'आयपी' अॅड्रेसद्वारे हे सगळं केल्याचं उघड झालं.
सतीशकुमारला अटक होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत त्या महिलेला असेच पार्सल्स येत होते, असं पोलिसांनी सांगितलं.
महिलेला मोबाइल नंबर बदलण्याचा सल्ला दिला गेला, परंतु तिनं हा नंबर बदलण्यास नकार दिला. कारण याचा तिच्या व्यवसायावर याचा परिणाम होईल, असे तिनं सांगितलं.
या प्रकरणाबद्दल कोणतंही मत व्यक्त करणार नसल्याचे पीडित महिलेने बीबीसी तमिळशी बोलताना स्पष्ट केलं.
'तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावं लागेल'
सायबर क्राइम पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडिया आणि इंटरनेटचा गैरवापर करून महिलांविरोधात अनेक गुन्हे होत असतानाही, अनेक लोक तक्रार दाखल करण्यासाठी समोर येत नाहीत.
त्यामुळे, कोईम्बतूर शहर पोलीस विविध कॉलेज आणि आयटी कंपन्यांमध्ये जनजागृती शिबिरे आयोजित करत आहेत.
अझगुराजा म्हणाले की, "या महिलेने धैर्याने समोर येऊन तक्रार दाखल केल्यामुळेच पोलिसांना विविध मार्गांचा अवलंब करून आरोपीला अटक करता आली. अशा परिस्थितीत, जर इतर पीडित महिलांनी लगेच तक्रार दाखल केली, तर त्यांना होणारा त्रास कमी करता येऊ शकतो."
अझगुराजा म्हणाले की, "या प्रकरणात पीडित महिला सुशिक्षित आणि कुशल असल्यामुळे कंपनीत काम करत असताना चांगलं उत्पन्न मिळवत होतं. तिने कंपनी सोडल्यामुळे कंपनी मालकाने सूड घेण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत, महिलांनी त्वरीत आणि धैर्याने पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.