'वंदे मातरम'वरून लोकसभेत नेमका काय गदारोळ सुरू? या गीताचा इतिहास काय?

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Prakash Singh/Bloomberg via Getty Images

'वंदे मातरम'च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (8 डिसेंबर) लोकसभेत चर्चा सुरू केली. 9 डिसेंबरपासून राज्यसभेतही या विषयावर चर्चा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधानांनी म्हटलं, "जेव्हा वंदे मातरमला 50 वर्षे झाली होती, तेव्हा देशाला गुलामगिरीत जगणं भाग पडलं होतं. जेव्हा त्याला 100 वर्षे झाली, तेव्हा देश आणीबाणीच्या साखळदंडात अडकला होता. तेव्हा भारताच्या संविधानाचा गळा दाबण्यात आला होता."

"याची 150 वर्षांनिमित्त त्या महान अध्यायाला, त्या वैभवात परत आणण्याची संधी आहे," असं मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "1857 च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटीश साम्राज्य अशांत असताना हे गीत लिहिलं होतं. भारतावर खूप दबाव होता. अनेक प्रकारचे अत्याचार होत होते, भारतीय लोकांची इंग्रजांकडून अडवणूक सुरू होती."

'वंदे मातरम' या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. भारतीय जनता पक्षानं स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी काँग्रेसवर गाण्यातील काही महत्त्वाचे भाग काढून टाकल्याचा आरोप केला आहे, तर काँग्रेसनं हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं.

7 नोव्हेंबरला 'वंदे मातरम'च्या 150 व्या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला होता, "1937 मध्ये वंदे मातरममधील काही महत्त्वाच्या भागांना काढून टाकण्यात आलं होतं. त्याचा आत्मा असलेला एक भाग काढून टाकला गेला होता. वंदे मातरम तोडण्यात आलं. हा अन्याय का करण्यात आला? यातूनच विभाजनाची बीजे पेरली गेली."

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेतील भाषणात नेहरूंचाही उल्लेख केला. ते म्हणाले , "वंदे मातरमला मुस्लीम लीगचा विरोध वाढत चालला होता. 15 ऑक्टोबर 1937 रोजी लखनौमधून मोहम्मद अली जिना यांनी वंदे मातरमच्या विरोधात घोषणाबाजी केली. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरूंना वाटलं की, त्यांचं स्थान धोक्यात आलं आहे. मुस्लीम लीगच्या निराधार दाव्यांना जोरदार प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांनी वंदे मातरमचीच चौकशी सुरू केली."

"20 ऑक्टोबरला जिनांनी केलेल्या विरोधानंतर 5 दिवसांनी नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रात नेहरूंनी जिनांच्या भावनांशी सहमती दर्शवली आणि म्हटलं की, वंदे मातरमची आनंद मठाची पार्श्वभूमी मुस्लिमांना भडकावू शकते. मी नेहरूंचं विधान वाचलंय. नेहरू म्हणाले की, मी वंदे मातरम गीताची पार्श्वभूमी वाचली आहे. त्यानंतर नेहरूंनी लिहिलं की, मला वाटतं की या पार्श्वभूमीमुळे मुस्लीम भडकतील."

पंतप्रधान मोदींच्या भाषणावर विरोधक काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सभागृहाच्या आत आणि बाहेर विरोधकांनी उत्तर दिलं.

लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी काँग्रेस पक्षानंच वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा दिला होता, असं मत व्यक्त केलं.

ते म्हणाले, "संपूर्ण 'वंदे मातरम'वर बहिष्कार टाकण्याची मागणी करणाऱ्या मुस्लीम लीगला आम्ही संविधान सभेत योग्य उत्तर दिलंय. आम्ही स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मुस्लीम लीगच्या मागण्यांचं पुर्ण करणार नाही आणि 'वंदे मातरम' ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊ."

ग्राफिक कार्ड

पुढे ते म्हणाले, "त्याच संविधान सभेत असंही म्हटलं होतं की 'जन गण मन' हे आपलं राष्ट्रगीत असेल आणि 'वंदे मातरम' हे आपलं राष्ट्रगान असेल. आमच्या प्रस्तावाशी सहमत असलेल्यांमध्ये राजेंद्र प्रसाद, सी. राजगोपालाचारी, जीबी पंत, मौलाना आझाद आणि रविशंकर शुक्ला यांचा समावेश होता."

गौरव गोगोई असंही म्हणाले की, "आज देशातील जनता अनेक मुद्दे उपस्थित करत आहे, परंतु पंतप्रधानांच्या भाषणात त्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही. देशाच्या राजधानीत बॉम्बस्फोट झाला, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही त्याचा उल्लेख केला नाही."

"आपण 'वंदे मातरम'ची 150 वी जयंती साजरी करत आहोत, पण आपण सध्याच्या भारताला सुरक्षा देऊ शकतो का? आपण दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरच्या लोकांना सुरक्षा दिली का?"

काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, गौरव गोगोई यांनी म्हटले आहे की, देशाच्या राजधानीत बॉम्बस्फोट झाला होता, परंतु पंतप्रधान मोदी याबद्दल एकदाही बोलले नाहीत.

संसदेच्या बाहेर काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी विचारलं की, "पंतप्रधान, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा स्वातंत्र्यलढा लढला जात होता, जेव्हा मुंबईत 'भारत छोडो'चा नारा देण्यात आला होता, तेव्हा तुमची मूळ संघटना, ज्याचे तुम्ही स्वतः सदस्य होता आणि जी आजपर्यंत नोंदणीकृत नाही, ती लोकांना ब्रिटिश सैन्यात भरती होण्यास का सांगत होती?"

"ती इंग्रजांना पाठिंबा देण्यास का सांगत होती? त्यावेळी इंग्रजांच्या बाजूनं उभं राहिल्याबद्दल तुम्ही लोकसभेत माफी मागाल का? स्वातंत्र्य चळवळीदरम्यान तुमचा दृष्टिकोन देशभक्तांसोबत नसून इंग्रजांच्या बाजूनं होता म्हणून तुम्ही संपूर्ण देशाची माफी मागाल का?"

काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, संसदेच्या बाहेर काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणाले की, "इतिहास तपासून पहा आणि पहा की कोणत्या आरएसएस कार्यक्रमात याचं कौतुक झालं, लाठीनं मारहाण झाल्यानंतर यांचा कोणता नेता तुरुंगात गेला, रस्त्यावर लाठीचा मार खात काँग्रेसी घोषणा देत होते."

ते म्हणाले, "गुरु रवींद्रनाथ टागोरांनी त्यात दोन परिच्छेद समाविष्ट केले होते, त्यामुळे आता त्यांच्याविरुद्ध बोलायला सुरुवात करा. इतिहास माहिती नाही आणि अपूर्ण गोष्टी सांगाल. नेहरूंनी देशाला स्वावलंबी बनवलं, त्यांनी वैज्ञानिक विचारसरणी निर्माण केली. त्यांनी देशाला पुढे नेण्यासाठी एक ब्लूप्रिंट तयार केली."

'पहिल्या दोन कडव्यांना कोणाचाच विरोध नाही'

वंदे मातरमचा मुद्दा खरंतर कधीच निकालात निघाला आहे. मात्र त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो, असं मत गुजरातमधील ज्येष्ठ लेखक उर्विश कोठारी यांनी बीबीसी मराठीला बोलताना व्यक्त केलं.

आनंदमठ कादंबरीवर 1952 साली हेमेन गुप्ता यांनी सिनेमा काढला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आनंदमठ कादंबरीवर 1952 साली हेमेन गुप्ता यांनी सिनेमा काढला.

ते म्हणाले, "या गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना कोणाचाच विरोध नव्हता. त्यामुळे योग्य चर्चेनंतर या दोन कडव्यांना स्वीकारण्यात आलं. त्यात जमीन, मातृभूमीचे वर्णन आहे. मात्र पुढच्या कडव्यांमध्ये राष्ट्राला देवीचे स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे त्याला विरोध झाला."

"आता पहिल्या दोन कडव्यांना कोणाचाच विरोध नाही हे कित्येक वर्षांपूर्वी सर्वांनी मान्य केले होते. परंतु तरीही हा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. याचा राजकारणाशी संबंध असावा," असंही त्यांनी नमूद केलं.

आनंदमठ कादंबरीबद्दल मतमतांतरे

बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीबद्दल गेल्या अनेक दशकांमध्ये चर्चा झाली आहे.

आनंदमठची कथा 1772 साली पूर्णिया, दानापूर आणि तिरहूत येथे इंग्रज आणि स्थानिक मुस्लीम राजांविरोधात झालेल्या विद्रोहावर आधारित आहे.

हिंदू संन्यासी लोकांनी मुस्लीम शासकांचा कसा पराभव केला हे यामध्ये लिहिले आहे. बंगालमधील मुस्लीम राजांवर बंकिमचंद्र यांनी कादंबरीतून टीका केली होती.

आनंदमठमध्ये एकेठिकाणी ते लिहितात, "आपण आपला धर्म, जाती, प्रतिष्ठा आणि कुटुंबाच्या नावाचा त्याग केला आहे. आता आम्ही जीवन अर्पित करू. जोपर्यंत 'यांना' पळवून लावत नाही तोपर्यंत हिंदू आपल्या धर्माचं रक्षण कसं करू शकतील?"

इतिहास अभ्यासक तनिका सरकार यांच्यामते, "भारतात इंग्रज येण्यापूर्वी मुस्लीम राजांनी बंगालची दुर्दशा केली होती असं बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं मत होतं."

बंकिमचंद्र यांचे लिहायचे डेस्क कोलकात्याच्या व्हिक्टोरिया मेमोरियल म्युझियममध्ये आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बंकिमचंद्र यांचे लिहायचे डेस्क कोलकात्याच्या व्हिक्टोरिया मेमोरियल म्युझियममध्ये आहे.

'बांग्ला इतिहासेर संबंधे एकटी कोथा'मध्ये बंकिमचंद्रांनी लिहिलं होतं, "मुघलांच्या विजयानंतर बंगालची संपत्ती बंगालमध्ये न राहाता दिल्लीला नेण्यात आली."

परंतु ज्येष्ठ इतिहास अभ्यासक के. एन. पण्णीकर यांच्यामते, "बंकिमचंद्रांच्या साहित्यात मुस्लीम राजांच्या विरोधात मतप्रदर्शन करण्यात आले आहे हे खरे आहे, पण ते मुस्लीमविरोधी होते असं म्हणता येणार नाही. आनंदमठ एक साहित्यिक रचना आहे."

"बंकिमचंद्र इंग्रज सरकारचे कर्मचारी होते. आनंदमठमध्ये इंग्रजांवर लिहिलेला मजकूर काढून टाकण्याचा त्यांच्यावर दबाव होता. 19 व्या शतकाच्या शेवटी लिहिलेल्या कादंबरीला तेव्हाच्या संदर्भांना समजून वाचलं पाहिजे," असं मत ते व्यक्त करतात.

वंदे मातरम गाण्याचा इतिहास

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बंकिमचंद्र चॅटर्जी (1838-1894) हे पहिले भारतीय होते ज्यांना 1858 मध्ये इंग्लंडच्या राणीनं भारतीय वसाहत ताब्यात घेतल्यानंतर डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्त केलं होतं.

1891 मध्ये ते निवृत्त झाले आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांना 'रायबहादूर'सह अनेक पदव्या देऊन त्यांचा गौरव केला.

त्यांनी हे गाणं 1875 मध्ये लिहिलं जे बंगाली आणि संस्कृत भाषेत होतं. हे गाणं नंतर बंकिम यांनी त्यांच्या प्रसिद्ध परंतु वादग्रस्त पुस्तक 'आनंदमठ' (1885) मध्ये घेतलं.

या गाण्याशी संबंधित एक मनोरंजक तथ्य म्हणजे यात नमूद केलेली सर्व चिन्हं आणि दृश्यं बंगालच्या भूमीशी संबंधित आहेत.

या गाण्यात बंकिम यांनी त्या वेळच्या बंगाल प्रांताची (ज्यात ओडिशा आणि बिहारचा समावेश होता) एकूण लोकसंख्या असलेल्या सात कोटी लोकांचा उल्लेखही केला आहे. यावरून अरबिंदो घोष यांनी जेव्हा त्याचा अनुवाद केला तेव्हा त्यांनी त्याला 'बंगालचं राष्ट्रगीत' असं नाव दिलं.

रवींद्रनाथ टागोर यांनीही या गाण्यासाठी एक सुंदर धून तयार केली होती.

बंगालच्या फाळणीमुळे हे गीत बंगालचं राष्ट्रगीत बनलं. 1905 मध्ये ब्रिटिश सरकारच्या बंगालच्या विभाजनाच्या विरोधातील जनतेनं या गाण्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढताना एका शस्त्राप्रमाणे केला.

तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या लोकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध निदर्शनं करताना या गीताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यात हिंदू आणि मुसलमान या दोघांचाही समावेश होता.

बंकिमचंद्र चॅटर्जी

फोटो स्रोत, Twitter@RailMinIndia

फोटो कॅप्शन, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1875 मध्ये 'वंदे मातरम्' हे गीत लिहिले होते.

वंदे मातरम गाण्याबद्दल शेतकरी नेते एम. रसूल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बारीसाल (आता बांगलादेशात असलेला प्रदेश) येथील बंगाल काँग्रेसच्या प्रांतीय अधिवेशनावर ब्रिटिश सैन्यानं क्रूर हल्ला केला, तेव्हा "वंदे मातरम" हा नारा संपूर्ण बंगालमध्ये वाऱ्यासारखा पसरला. केवळ बंगालमध्येच नाही तर तो देशभरात प्रतिध्वनीत झाला.

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्ला खान यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनीही वंदे मातरम गायलं.

ही घोषणा इंकलाब जिंदाबादप्रमाणेच समान राष्ट्रवादाचा मंत्र बनली. 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकापर्यंत ब्रिटिशविरोधी राष्ट्रीय चळवळीनं देशव्यापी रूप धारण केलं होतं.

स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसनं 1937 मध्ये गांधी, नेहरू, अबुल कलाम आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली, ज्यामुळे फाळणी रोखण्यासाठी वंदे मातरम या गाण्यावर आक्षेप घेण्यात आले.

सर्वात मोठा आक्षेप असा होता की या गाण्यात भारतीय राष्ट्रवादाची व्याख्या एका विशिष्ट धर्माच्या संदर्भात करण्यात आली होती. हा प्रश्न केवळ मुस्लीम संघटनांनीच नव्हे तर शीख, जैन, ख्रिश्चन आणि बौद्ध संघटनांनीही उपस्थित केला होता.

यावर उपाय काढण्यात आला की, या गाण्याची फक्त पहिली दोन कडवीच गायली जातील, ज्यामध्ये कोणताही धार्मिक संदर्भ नव्हता.

मात्र, आरएसएस आणि हिंदू महासभेकडून हे संपूर्ण गाणं स्वीकारण्याची मागणी केली गेली, तर मुस्लिम लीगकडून संपूर्ण गाण्याला विरोध केला गेला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)