प्रकाश आंबेडकर : ‘वंदे मातरम’ राष्ट्रगीत नाही, म्हणून त्याचा आग्रह घटनाबाह्य

असदउद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, असदउद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर
    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"राज्यघटना समितीनं 'जन गण मन' हे राष्ट्रगीत म्हणून निवडलेलं आहे, मग वंदे मातरमचा हट्ट कशासाठी? 'वंदे मातरम' हे राष्ट्रगीत नाही, मग ते ऐच्छिक असावं. नाहीतर आधी हे स्पष्ट करा की तुम्हाला राष्ट्रगीत का नकोय."

सोमवारी परभणीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ही भूमिका घेतली. MIMचा वंदे मातरमला विरोध आहे आणि आमचाही आहे, असं आंबेडकर यावेळी म्हणाले.

आतापर्यंत असदउद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षासह काही मुस्लीम संघटनांनी वंदे मातरम म्हणण्यास विरोध दर्शविला आहे. त्यात आता आंबेडकर यांचं नावही सामील झालं आहे.

काही आठवड्यांपूर्वी आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महसंघाने MIMबरोबर आघाडी केली होती. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला विशेष महत्त्व आहे.

पण त्यांनी अचानक ही भूमिका का घेतली?

बीबीसी मराठीने आंबेडकर यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, "जन-गण-मन हे राष्ट्रगीत असताना वेळोवेळी वंदे मातरमचा आग्रह कशासाठी? भारताचं राष्ट्रगीत जन-गण-मन असावं की वंदे मातरम, ही चर्चा घटना समितीसमोर देखील झाली होती. घटना समितीनं सर्व सहमतीनं जन-गण-मनची निवड राष्ट्रगीत म्हणून केली. त्यानुसार आम्ही राष्ट्रगीताचा मान ठेवतो."

"राष्ट्रगीताचा आदर ठेवणं ही आमची कायदेशीर जबाबदारी आहे, शिवाय ते नैतिक कर्तव्यही आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण वंदे मातरम म्हणावंच, अशी घटनात्मक आणि कायदेशीर तरतूद नाही," असं ते पुढे म्हणाले.

वंदे मातरम आणि MIM बरोबर आघाडीचं कनेक्शन?

वंदे मातरमच्या सक्तीला MIMचा विरोध आधीपासून होता. मग आगामी निवडणुकांसाठी MIMशी भारिप-बहुजन महासंघाची आघाडी झाल्यामुळे आपण हे विधान केलं का, असं विचारलं असता आंबेडकर म्हणाले, "वंदे मातरमचा आग्रह नसावा, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. ज्या-ज्या वेळी काही लोक वंदे मातरमचा हट्ट धरून इतरांना लक्ष्य करतात, तेव्हा मी माझी स्पष्ट भूमिका मांडली आहे."

"वंदे मातरम् हे ऐच्छिक असावं. ज्यांना म्हणायचं आहे त्यांनी ते जरूर म्हणावं पण त्याच वेळी त्यांनी इतरांवर ते लादू नये," असं आंबेडकर म्हणाले.

"वंदे मातरमचा हट्ट धरणारे लोक दुटप्पी भूमिका मांडतात. एका बाजूला ते वंदे मातरमचा हट्ट धरतात, मग राज्यघटनेनं मान्यता दिलेल्या राष्ट्रगीताला ते विरोध का करतात? याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं," असं आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रध्वज

फोटो स्रोत, Getty Images

प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर भाजपने असहमती दर्शवली आहे. वंदे मातरमला भारतीय राज्यघटनेनं मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आंबेडकरांनी त्याचा योग्य सन्मान राखावा, असं भाजपनं म्हटलं आहे.

"वंदे मातरम् हे गीत स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र होतं. या गीताने क्रांतिकारकांना प्रेरणा दिली, त्यांना स्फूर्ती दिली. आंबेडकरांनी प्रथम स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जाणून घ्यावा आणि मगच वंदे मातरम बाबत आपलं मत व्यक्त करावं," असं भाजप प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले.

"वंदे मातरम या गीतानं स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी लोकांना स्फूर्ती दिली, याबद्दल काही दुमत नाही. पण घटना समितीनं वंदे मातरम् हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं नाही," असं आंबेडकर स्पष्ट करतात.

वंदे मातरमचा इतिहास

बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत आहे. त्यांनी हे गीत 1870मध्ये रचलं होतं. बंकिमचंद्र हे सरकारी अधिकारी होते आणि त्यांनी 'आनंदमठ'च्या आधी 'दुर्गेशनंदिनी' नावाची कादंबरी लिहिली होती. त्यांनंतर त्यांनी कपालकुंडला ही कादंबरी लिहिली.

आनंदमठ चित्रपटाचे पोस्टर

फोटो स्रोत, Anand Math Movie

1872 मध्ये त्यांनी 'बंगदर्शन' नावाचं एक नियतकालिक सुरू केलं होतं. या नियतकालिकेद्वारे त्यांनी बंगालमधील सांस्कृतिक आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली.

रविंद्रनाथ टागोरांनी 'वंदे मातरम'ला चाल लावली आणि हे गीत लोकप्रिय झालं.

1894 मध्ये चॅटर्जींचं निधन झालं आणि 12 वर्षांनंतर बिपिनचंद्र पाल यांनी एक राजकीय नियतकालिक सुरू केलं, ज्याचं नाव होतं 'वंदे मातरम'. तेव्हापासून वंदे मातरम हे स्वातंत्र्य लढ्याशी जोडलं गेलं.

इतिहासकार शमसुल इस्लाम सांगतात, "भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकउल्लाह खान सारखे असंख्य क्रांतिकारक वंदे मातरम गात गात फासावर चढले."

वंदे मातरम

फोटो स्रोत, Getty Images

एका लेखात शमसुल इस्लाम पुढे सांगतात, "पण वंदे मातरमबरोबरच इंकलाब जिंदाबाद, हे घोषवाक्य देखील स्वातंत्र्य लढ्याशी तितकंच जोडलं गेलं होतं. 20व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांविरोधी राष्ट्रीय चळवळीने व्यापक रूप घेतलं. तेव्हा इंग्रजांनी घाबरून हिंदू राष्ट्रवाद विरुद्ध मुस्लीम राष्ट्रवाद, असा वाद निर्माण केला. या सर्व गोष्टी सुरू असताना वंदे मातरमदेखील वादाचं एक कारण बनलं."

'बंकिम चंद्र मुस्लीमविरोधी नव्हते'

"'आनंदमठ'मध्ये बंकिम चंद्रांनी भारत मातेला दुर्गा देवीचं प्रतीक मानलं. त्यामुळे मुस्लीम लीग आणि मुस्लीम समाज त्यांच्याकडे संशयानं पाहू लागला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात फूट पडेल की काय, अशी भीती काँग्रेसला वाटू लागली. त्यासाठी महात्मा गांधी, पं. नेहरू, अबुल कलाम आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांनी एक 1937मध्ये एक समिती बनवली आणि वंदे मातरमवर कुणाला हरकत असेल तर त्यानी ती आताच नोंदवावी, असं आवाहन केलं," इस्लाम सांगतात.

"हे गीत एका विशिष्ट धर्माच्या नजरेतूनच भारतीय राष्ट्रवाद सांगतं, अशी हरकत काही लोकांनी घेतली. केवळ मुस्लीमच नाही तर शीख, जैन, ख्रिश्चन आणि बौद्ध संघटनांनी ही हरकत नोंदवली होती," असं इस्लाम सांगतात.

'आनंदमठ' या कादंबरीच्या कथेत मुस्लीम राज्यकर्त्यांविरोधात काही संन्याशी बंड करतात. त्यामुळे ही कादंबरी मुस्लीमविरोधी आहे आणि यात हिंदूंचं उदात्तीकरण आहे, असं देखील म्हटलं जाऊ लागलं. त्यावेळी या शंकांबाबत तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी मौन बाळगणं पसंत केलं, असं ते पुढे सांगतात.

पण केवळ बंकिमचंद्रांच्या साहित्याच्या आधारावर त्यांना मुस्लीमविरोधी म्हणता येणार नाही, असं मत के. एन. पणिक्करांनी यापूर्वी दिलं आहे. ते म्हणतात "मुस्लीम राज्यकर्त्यांवर टीका केल्यामुळे ते मुस्लीमविरोधी ठरत नाहीत. ही एक साहित्यिक कलाकृती आहे."

सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा वाद वेळोवेळी उफाळून आला आहे आणि एक वेळ अशी आली की हा वाद न्यायालयात देखील गेला.

त्यानंतर मद्रास हायकोर्टानं निर्णय दिला की विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी म्हणून सर्व शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांनी आठवड्यातून एकदा तरी वंदे मातरम म्हणावं.

भारत सरकारची वेबसाइट knowindia.org नुसार वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत आहे (National Song). पण तत्कालीन न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्टात दिलेल्या एका निर्णयात हे स्पष्ट केलं आहे की राज्यघटनेत वंदे मातरमचा राष्ट्रीय गीत म्हणून उल्लेख नाही.

एकदा भाजप प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी एक याचिका दाखल केली होती की वंदे मातरमच्या प्रसारासाठी राष्ट्रीय धोरण ठरवण्यात यावं. तेव्हा सुप्रीम कोर्टानं ती फेटाळत सांगितलं होतं की, "राज्यघटनेचं कलम 51 (A)मध्ये फक्त राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा उल्लेख आहे."

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)