You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इर्शाळवाडी : मृतांचा आकडा 27 वर, 78 जण बेपत्ता असल्याची माहिती
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
229 लोकांपैकी 27 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जणांवर उपचार सुरू आहेत. तसंच, 124 जण सुरक्षित आहेत. अजूनही 78 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे.
रायगड जिल्हा प्रशासनानं ही माहिती दिली.
रायगडमधील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे.
मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा येत असल्यामुळे रात्री बचावकार्य थांवण्यात आलं होतं. आज (21 जुलै) सकाळपासून बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.
इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळून दुर्घटना घडली असून तिथं मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या परिसरात पाऊस सुरु असून इर्शाळवाडीजवळ नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.
अतिमुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये. आवश्यक आणि अतिमहत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.
शनिवार 22 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीजवळ भेट देऊन मदतकार्य व एकूण घटनेचा आढावा घेत पाहाणी केली.
एकनाथ शिंदेचं विधानसभेत निवेदन
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शुक्रवारी (21 जुलै) विधानसभेत निवेदन केलं. यात ते म्हणाले की, "ज्या ठिकाणी ही दरड कोसळली ते ठिकाण अतिशय दुर्गम असल्याने सगळी यंत्रणा असूनही मशिन्स तिथपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. वातावरण खराब असल्याने सरकारला हेलिकॉप्टरमधून मशिन्स पोहोचवता आल्या नाहीत."
आतापर्यंत या दुर्घटनेत 22 मृत्यू झालेत आणि आठ लोक जखमी आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत तसंच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेतून वाचलेल्या कुटुंबांचं तात्पुरतं पुनर्वसन करण्यासाठी 60 कंटेनर मागवले आहेत, कायमचं पुनर्वसन करण्याआधी ही व्यवस्था करण्यात आलीय, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
तसंच सिडकोचे एमडी डिग्गीकर यांना तात्काळ घरं बांधून पुनर्वसन करण्याचे आदेश सरकारने दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.
दरडप्रवण क्षेत्रातील लोक सुरक्षितस्थळी हलवण्याचा निर्णयदेखील घेण्यात आलाय. तसंच धोक्याच्या जागी राहणाऱ्या लोकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे मुख्य सचिवांना आदेश दिले गेले आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
अशा कठीण काळात राज्यातील विरोधी पक्षांनी देखील माणुसकी दाखवली, असंसुद्धा मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
"राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. आवश्यकता भासेल तिथे लोकांना हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांची जीवितहानी होऊ नये, यासाठी आमची यंत्रणा काम करत आहे.
ज्या ज्या ठिकाणी पूराचा धोका आहे, तिथे NDRF तैनात करण्यात आलेलं आहे", अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “इर्शाळवाडी गावात जवळपास 40-45 घरे आहेत. त्यापैकी 15 ते 17 घरे ढिगाऱ्याखाली सापडले आहेत. आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. NDRF, SDRF आणि TDRF यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.
"इर्शाळवाडी हे गाव उंचावर असल्याने त्याठिकाणी कोणतीही वाहनव्यवस्था, यंत्रसामुग्री पोहोचू शकत नाही. अशा स्थितीत मनुष्यबळाच्या माध्यमातूनच बचावकार्य करण्यात येत आहेत.
"केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही माझी चर्चा झाली. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. कोणतीही मदत आवश्यक असल्यास सांगा, असं त्यांनी सांगितलं.
"वायूदलाशीही मी संवाद साधला. पण बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येऊ शकत नाही. पाऊस आणि हवामानही खराब आहे. त्यामुळे बचाव पथकाकडून शक्य तितते प्रयत्न करून बचावकार्य सुरू आहे. सध्या तरी आमचे प्राधान्य बचावकार्य वेगाने करण्याला आहे.
हे ही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)