पावसात भिजल्यामुळे खरंच सर्दी-ताप येतो का? अशी घ्या पावसाळ्यात काळजी

    • Author, डॉ. अविनाश भोंडवे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पावसाच्या धारा येती झरझरा

झांकळलें नभ, वाहे सोंसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ

जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

पावसाची रम्य आणि रोमहर्षक वर्णने कवितांमधून नेहमीच केली जातात. पण कवियत्री शांता शेळक्यांनी पाऊस या त्यांच्या कवितेत रस्त्यावर जागोजागी असलेल्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्याचे वर्णन केले आहे.

पावसाळ्यात हिरवा शालू नेसून सजलेल्या सृष्टीत नेमके हेच वैगुण्य असते. वर्षा ऋतूत नटलेल्या धरतीच्या गर्द हिरव्या साजशृंगाराला या साचलेल्या पाण्याची किनार असते आणि नेमकी हीच गोष्ट पावसाळ्यातील आरोग्याचे महत्व अधोरेखित करते.

त्यामुळे पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत आपल्या आरोग्याला कशापासून धोका असतो, त्यामुळे आरोग्यविषयक कोणते बदल घडू शकतात आणि त्यापासून काय काळजी घ्यायची याचा विचार करणे उपयुक्त ठरावे.

पावसात भिजणे आणि सर्दी-तापाचा संबंध असतो?

जगातल्या सर्व साहित्यप्रकारात, कवितेत, नाटकात, सिनेमात पावसात भिजणे आणि पावसात प्रेमगीते म्हणणे असे प्रकार खूप रोमँटिक पद्धतीने दाखवले जातात.

'अंगे भिजली जलधारांनी, ऐशा ललना स्वये येउनी.....' वगैरे गीते तर अनेकांच्या अंगावर रोमांच उभे करतात; पण त्याच वेळेस पावसात भिजलो म्हणून सर्दी झाली, ताप आला अशी ताप आलाय म्हणून दवाखान्यात येणाऱ्या पेशंट्सची गाऱ्हाणीही डॉक्टर्स वर्षानुवर्षे ऐकत असतात.

डोक्यावर पावसाचे दोन थेंब पडले तरी बाळांना आजार येतो अशी अनेक लेकुरवाळ्या आयांची तक्रार असते.

एकंदरीत पावसात भिजणे हे सर्दी-तापाला निमंत्रण आहे अशी लोकांची सर्वसाधारण समजूत असते.

खरे पाहता, पावसात भिजण्याचा आणि ताप येण्याचा किंवा सर्दी होण्याचा तसा थेट संबंध नाही. पावसात भिजल्याने जर ताप येत असेल तर मग रोज आंघोळ केल्यानेही यायला पाहिजे.

कारण बाराही महिने थंड पाण्याने स्नान करण्याचा कित्येक लोकांचा नित्य परिपाठ असतो. तरीही पावसात भिजलात तर खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

  • पावसात नुसते भिजल्याने सर्दी होत नाही. भिजल्यावर बराच काळ अंग, अंगावरील कपडे, केस ओले राहिले तर आपल्या शरीराचे तपमान कमी होते. शरीर थोडे थंड झाल्यामुळे नाकातील सिलीअरी पेशी उत्तेजित होतात आणि शिंका येणे, नाकातून पाणी वाहणे सुरु होते. हा प्रकार शरीराचे संरक्षण करण्यासाठी असतो. तो आजार नसतो. पावसात भिजल्यावर केस आणि अंग कोरडे केले आणि भिजलेले कपडे लगेच बदलले तर हा त्रास होत नाही.
  • पावसाळी दमट हवा आणि पावसाळ्यातील तपमान अनेक प्रकारच्या विषाणूंना पोषक असते. पावसात भिजल्याने कमी झालेले शरीराचे तपमान अनेक विषाणूंच्या पथ्यावर पडते.
  • साहजिकच घशात आणि नाकात अनेक विषाणू शिरतात, त्यांची संख्या वाढते आणि मग घसा दुखतो आणि ताप येतो. हे विषाणू घशातून श्वासनलिकेकडे सरकले की खोकला सुरु होतो.
  • साहजिकच पावसात भिजून आल्यावर अंग कोरडे करणे, कपडे बदलणे याबरोबरच कोमट पाण्याच्या गुळण्या करणे एवढे पुरेसे असते.
  • ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ताप निवारक औषधे घ्यावीत.
  • पावसाळ्यात अनेक लोक सतत पावसात भिजतात. पावसात भिजल्यावर अंगावरचे कपडे न बदलता ओले कपडे घालून दिवसभर वावरत राहतात. यामुळे जांघा, काखा, स्त्रियांच्या स्तनांखालील जागा यात 'टिनीया क्रुरीस' हे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
  • पावसाळ्यात भिजणे झाले नाही तरी पाण्यातून जाताना पाय ओले राहतात. त्यामुळे पायांच्या बेचक्यांमध्ये चिखल्या होणे, नखांची फंगल इन्फेक्शन्स होण्याचे त्रास होऊ शकतात.
  • असे त्रास झाल्यास जाहिरातीतली दाद-खाज-खुजली असली मलमे लावू नयेत तर तुमच्या डॉक्टरांना किंवा त्वचारोग तज्ज्ञांना दाखवून घ्यावे.
  • शहरामधील पावसात प्रदूषणातील रासायनिक घटक विरघळलेले असतात. त्यामुळे डोळ्यांची आग होते.
  • पण सध्या स्वच्छ पाण्याने डोळे दिवसातून तीन-चार वेळा धुतल्यास ती आग कमी होते. न झाल्यास नेत्रतज्ञांना दाखवून घ्यावे.

कोरोनाच्या काळात पावसात भिजणे

एरवी पावसात भिजणे टाळण्यासाठी बाहेर पडताना पाउस असो किंवा नसो, बरोबर रेनकोट किंवा छत्री बाळगावी. कोरोनाच्या काळात हे पाळणे अतिशय महत्वाचे आहे.

कारण छत्री, रेनकोट बरोबर नसेल आणि अचानक पाउस सुरु झाला तर आडोसा शोधण्यासाठी एखाद्या झाडाखाली किंवा दुकानाच्या वळचणीला लोक दाटीवाटीने उभे राहतात. अशा वेळेस सोशल डिस्टन्सिंग पाळले जातच नाही.

पाऊस जर 20-30 मिनिटे पडत राहिला आणि उभ्या राहिलेल्या व्यक्तीत कोणी निदान न झालेला कोरोनाबाधित इसम असला तर मग कोरोनाचा संसर्ग झालाच म्हणून समजा.

कोरोनाच काय पण या दाटीत उभे राहिल्याने श्वसनमार्गाचे इतर आजारही संक्रमित होण्याची शक्यता असते.

पिण्याचे पाणी

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याबद्दल विशेष जागरूक राहावे. मेट्रो शहरातील पाणीपुरवठा जलशुद्धीकरण होऊनच येतो. मात्र अनेक छोटी शहरे आणि छोट्या गावांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी नदी, तळी, विहिरी वापरल्या जातात अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते.

पावसाळ्यात अनेकदा पाण्यात नदीचा गाळ, मैला, कचरा आणि अन्य प्रदूषित पदार्थ वाहून येत असतात. त्याच बरोबर अनेक प्रकारचे पचनसंस्थेचे विषाणू; त्याचप्रमाणे टायफॉइड, डिसेन्ट्री, कॉलरा अशा आजारांचे जीवाणू; अमीबा, जियार्डीया असे प्रोटोझोअल जीव, कित्येक घटक रसायने, विषारी पदार्थ, कचरा हे देखील पाण्यामध्ये एकत्रित झालेले असतात.

असे दूषित पाणी प्यायल्याने उलट्या, जुलाब, रक्ती आव, आमांश, कॉलरा, टायफॉइड, पॅराटायफॉइड अशांसारखे जीवाणूजन्य आजार होऊ शकतात.

काविळीचे हिपॅटायटिस ए आणि इ, लहान बालकांना जुलाबाची पीडा देणारा रोटाव्हायरस, बालकांना पंगू करून सोडणारा पोलिओमायलायटिस असे विषाणूजन्य आजारदेखील दूषित पाण्यातून पसरतात. राउंडवर्म.

थ्रेडवर्म असे जंत दूषित पाण्यातून मानवी शरीरात प्रवेश करतात. जगभरात दूषित पाण्यामुळे दरवर्षी 4 अब्ज लोक आजारी पडतात आणि 20 लाख बालके मृत्युमुखी पडतात.

यावर उपाय म्हणजे सुरक्षित आणि जीवजंतूविरहित शुद्ध पाणी पिणे. घरी पाण्यासाठी फिल्टर असेल तर काही प्रश्न नसतो, पण ग्रामीण भागात आणि फिल्टर्स न परवडणाऱ्या नागरिकांनी पाणी स्वच्छ तिपदरी फडक्याने गाळून घ्यावे. नंतर ते उकळून निववावे आणि पिण्यासाठी वापरावे.

बाहेरील पाणी शक्यतो पिऊ नये. स्वतःची पाण्याची बाटली जवळ बाळगावी. प्रवासात किंवा गावामध्ये फिरताना स्वतःची पाण्याची बाटली वापरण्याऐवजी अनेकदा मिनरल वॉटर वापरण्याचा प्रघात आजकाल दिसून येतो. मात्र मिनरल वॉटर बनवणाऱ्या कंपनीच्या दर्जाची खात्री करून घ्यावी.

साचलेले पाणी

पावसाळ्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचते, खड्डे पाण्याने भरलेले राहतात, गटारे तुंबल्याने सडके पाणी जमा झालेले असते. अशा पाण्यामध्ये डासांची पैदास होते.

खूप दिवस साचलेल्या पाण्यात अॅनोफेलिस डासांची वाढ होते आणि मलेरियाचा आजार पसरतो.

घरातील कुंड्या, फुलदाण्या, एअर कंडीशनर, फ्रीज यांच्यातील पाण्यात टेरेसवर ठेवलेले सामान, रिकाम्या टायर्समध्ये साचणाऱ्या पावसाच्या स्वच्छ पाण्यात एडीस इजिप्ती या डेंग्यू आणि चिकुनगुन्या हे आजार पसरवणाऱ्या डासांची पैदास होते.

हे डास म्हणजे आजाराच्या विषाणूंचे कीटकवाहक (इन्सेक्ट व्हेक्टर) असतात. जॅपनीज एनकेफेलायटिस क्युलेक्स प्रजातीच्या डासांपासून पसरतो.

याकरिता पावसाळ्यापूर्वीच नागरी प्रशासनाकडून खड्डे बुजवणे, नाल्यांची दुरुस्ती करणे, पाणी साचण्याच्या जागा साफसूफ करणे या गोष्टी अपेक्षित असतात.

तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात किंवा ऑफिसात, दुकानात, कारखान्यात, शाळा-कॉलेजात, खाजगी सभागृहात पाणी साठवून न ठेवणे, कुंड्या, फ्रीज, एसी यामधील पाणी साफ करणे, पाणी साचणारे भोवतालचे खड्डे बुजवणे अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.

तरीही घरात डास होत असतील तर घराच्या खिडक्यांना डास येऊ शकणार नाहीत अशा जाळ्या बसवणे, मस्किटो रिपेलंट वापरणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात.

अशी काळजी घेऊनही हे आजार झाल्यास वेळेवर निदान करून तज्ञ डॉक्टरांकडून त्वरित इलाज करावा.

लेप्टोस्पायरोसिस

लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे लेप्टोस्पायरोसिस होतो.

  • शरीरावर एखादी जखम झाली असेल आणि ती उघडी जखम पावसाळ्यामध्ये जागोजागी साठलेल्या सांडपाण्याच्या संपर्कात आल्यास हा आजार होण्याचा धोका वाढतो.
  • उंदीर, कुत्रा, घोडा अशा प्राण्यांना या जीवाणूचा संसर्ग होतो, पण त्यांना कोणतेही लक्षण जाणवत नाही. मात्र या प्राण्यांच्या मूत्रातून हे जीवाणू बाहेर पडतात.
  • या प्राण्यांचे मूत्र पावसाळ्यात रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यात मिसळते. ते जखमेच्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता वाढते.

लक्षणे-

अचानक भरपूर ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, थंडी वाजणे, उलट्या होणे, स्नायू दुखणे.

या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असते. त्यावेळेस अंगावर लाल चट्टे उमटणे, उलट्या होणं अशी लक्षण समोर येतात.

प्रतिबंध-

  • पाण्यातून होणारा संसर्ग रोखण्यासाठी पावसाळ्यामध्ये जागोजागी साठणाऱ्या पाण्यातून चालणे टाळावे.
  • पावसाच्या साठलेल्या पाण्यातून जावेच लागले तर गमबूट किंवा पाण्याचा पायाला थेट संपर्क होणार नाही अशी पादत्राणे वापरावीत.
  • शरिरावरील उघड्या जखमांशी साठलेल्या सांडपाण्याचा संबंध येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • चेहरा, तोंड व नाक हाताने पुसण्याऐवजी हातरुमाल किंवा टिशूपेपरचा वापर करावा. यामुळे चेहरा, नाक व तोडांला होणारा जंतूसंसर्ग टाळता येईल.
  • पावसाळ्यात नखे नियमित कापून स्वच्छ ठेवावीत.
  • लांब नखांमध्ये घाण साचल्याने जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून बचाव होण्यासाठी नखे कापलेली व स्वच्छ ठेवावीत.

वरील लक्षणांपैकी कोणताही त्रास होत असेल तर घरच्याघरी औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

घाण आणि माश्या

पावसाळ्यात सर्वत्र चिखल होतो, रस्त्यावर, घरात, सार्वजनिक ठिकाणी ओलसरपणा आणि चिकचिक होते. त्यातच साचलेला कचरा, ओला होऊन घाणीचे साम्राज्य पसरते. अशा घाणीच्या ठिकाणी माशा जमा होतात.

तिथून त्या खाण्याच्या पदार्थांवर बसतात. त्यांच्या पंखांना जीवजंतू चिकटतात त्यांच्यायोगे हगवण, कॉलरा, टायफॉइड, उलट्या-जुलाब तसेच हिपॅटायटिस ए आणि इ प्रकारची कावीळ पसरू शकते.

हे आजार तसे गंभीर होऊ शकतात. त्यामुळे अशा माश्या होऊ न देणे आणि हे आजार झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्वरित उपचार करणे गरजेचे असते.

  • माश्यांचा उपद्रव टाळण्यासाठी घराभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी.
  • घरातील खाद्यपदार्थ नीट झाकून ठेवावेत. जाळीपासून तयार केलेले माश्या मारण्यांचे साधन वापरून माश्या माराव्यात.
  • डिंकासारखा चिकट पदार्थ लावून तयार केलेला कागद ठिकठिकाणी ठेवल्यास त्याला माश्या चिकटतात. नंतर या कागदाचा नाश करता येतो.
  • सार्वजनिक संस्थानीही शहरात स्वच्छता राखण्याची दक्षता घ्यावी. कीटकनाशके वापरून माश्यांच्या अंड्यांवर व डिंभांचा नाश करावा.
  • कीटकनाशकांचा फवारा मारून जमिनीवर किंवा भिंतीवर बसलेल्या माश्यांचा नाश करावा.

पावसाळ्यातील आहार

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी शुद्ध आणि सकस आहार खूप महत्वाचा असतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया बिघडण्याची समस्या अनेकांना उद्भवतात. त्या टाळायच्या असतील तर-

  • बाहेरचे अन्न, उघड्यावरचे पदार्थ, कच्चे अन्नपदार्थ खाऊ नये. घरी बनवलेले जेवण आरोग्यास हितकारक असते. आरोग्याला पोषक असेच अन्न सेवन करावे.
  • नेहमी ताजे, गरम, शिजवलेले, पचण्यास हलके अन्न खावे. मासे, मटण असा मांसाहार टाळावा.
  • पावसाळा हा माशांचा प्रजोत्पादनाचा काळ असल्यामुळे मासे खाणे टाळावे. याकाळात माशांपासून जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता असते. मांसाहार जड असल्याने पचनक्रिया बिघडते.
  • पाणीपुरी, भेळपुरी, वडे, भजी, सामोसे असे उघड्यावरचे जंकफूड टाळावे.
  • आंबट व थंड पदार्थ खाणे टाळावे.
  • पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असे अन्न रोजच्या जेवणात असावे.
  • ताजे व गरम अन्न तसेच मसाल्याचे पदार्थ खाल्ले तरी चालतात कारण मसाल्यांमुळे पचनक्रिया चांगली राहते. व अन्नपचन करायला मसाले मदत करत असतात. मात्र खूप तेलकट व तिखट पदार्थ खाणे टाळावे.
  • फळे फळभाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात. रोजच्या आहारात फळांचा वापरही भरपूर प्रमाणात करावा. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
  • पावसाळ्यात कांदा, लसूण, मुळा, पालक खाणे टाळावे.
  • शरीराला पाण्याचा साठा भरपूर लागतो. सहसा दररोज २-३ लिटर पाणी नक्की प्यावे. या दिवसांमध्ये तहान कमी लागते त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. मात्र शरीर निरोगी व स्वस्थ राहण्यासाठी शरीराला आवश्‍यक पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी शुद्ध व उकळून घेऊन नंतर पिण्यास वापरावे.
  • कोल्ड्रिंक्स, चहा-कॉफी यांचे अतिरेकी सेवन टाळावे. कारण कॉफीमुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यातला व्यायाम

पावसाळ्यात पचनक्रिया उत्तम राहण्यासाठी आणि अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. मात्र अतिप्रमाणात येईल व्यायाम करणे घातक आहे.

अति व्यायाम केल्यास अशक्तपणा येऊ शकतो. व्यायामासोबत योगासने, प्राणायाम दररोज करावेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)