विशिष्ट चवीच्या चॉकलेटचे डोहाळे, महिलेनं पतीच्या साथीनं तयार केलं जगाला वेड लावणारं 'दुबई चॉकलेट'

    • Author, ॲनाबेल रॅकहॅम
    • Role, सांस्कृतिक प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात मी संयुक्त अरब अमिरात (यूएई)ला सुट्टीवर गेले होते. त्यावेळी माझं एकच मिशन होतं, ते म्हणजे त्या व्हायरल झालेल्या 'दुबई चॉकलेट' चा फडशा पाडणं. कसंही करुन आधी 'दुबई चॉकलेट' मिळवायचं आणि त्याचा निवांत आस्वाद घेणं, हेच माझ्या डोक्यात होतं.

तुम्ही सोशल मीडियावर चॉकलेटचा हा बार पाहिला असेल. चॉकलेट, पिस्ता आणि ताहिनीचे फ्लेवर्स फिलो पेस्ट्रीच्या रुपात एकत्रितपणे यात चाखायला मिळतात.

या टॉकलेटच्या निर्मितीची एक खास कहाणी आहे. पण त्याआधी याबाबत जरा जाणून घेवूयात.

अरबची प्रसिद्ध मिठाई 'कनाफे'पासून प्रेरित होऊन बनवलेला हा चॉकलेट बार आहे.

फिक्स चॉकलेटिअर कंपनीच्या या मूळ चॉकलेट बारचं नाव 'कान्ट गेट कनाफे ऑफ इट' आहे. 2022 पासून केवळ यूएईमध्येच हे विकलं जात आहे.

काही मिनिटांत 'आऊट ऑफ स्टॉक'

हा बार सोशल मीडियावर इतका लोकप्रिय झाला आहे की, दुकान उघडल्यावर काही मिनिटातं हा चॉकलेट बार आऊट ऑफ स्टॉक होतो.

दररोज फक्त दोन तासांसाठी तो विक्रीसाठी उपलब्ध असतो आणि अनेकदा काही मिनिटांतच तो संपूनही जातो.

पण आता 'दुबई चॉकलेट' या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या चॉकलेटची बनावट व्हर्जन्स ब्रिटनमधील वेटरोज, लिडल आणि मॉरिसन्ससारख्या सुपरमार्केटमध्येही पोहोचले आहेत.

काही सुपरमार्केट्समध्ये तर ग्राहकांना ठराविक संख्येनेच हे बार खरेदी करण्याची परवानगी दिली जात आहे.

येझेन अलानी आणि त्यांची पत्नी सारा हमौदा हे फिक्स या कंपनीचे को-ओनर आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, दुबई चॉकलेटला मिळणाऱ्या जागतिक प्रसिद्धीमुळं त्यांना 'अभिमान' वाटतो.

चॉकलेटच्या विशिष्ट फ्लेवरचे डोहाळे

फिक्स चॉकलेट बारची कल्पना सर्वात आधी 2021 मध्ये सारा हमौद यांच्या मनात आली. त्यावेळी त्या गर्भवती होत्या आणि त्यांना अशा फ्लेवरचं चॉकलेट खायची सातत्यानं इच्छा व्हायची.

एका वर्षानंतर अलानी आणि हमौदा यांनी या चॉकलेट बारवर काम सुरू केलं. हे करत असताना त्यांची कॉर्पोरेट नोकरी सुरुच होती. त्याबरोबरच त्यांनी हा व्यवसाय सुरू ठेवला होता.

"सारा आणि मी, आम्ही दोघंही युकेमध्ये वाढलो आणि 10 वर्षांपूर्वी दुबईला आलो. त्यामुळं आमच्यात पाश्चिमात्य आणि अरबी अशी दोन्ही प्रकारची मुळं भिनली गेली आहेत."

चॉकलेटचे आकर्षण त्याच्या वैशिष्ट्यात किंवा जे त्याच्यात आहे ते इतरांकडे नसतं यात आहे. हे चॉकलेट घेण्यासाठी तुम्हाला दुकान किंवा सुपरमार्केटमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही फक्त फूड डिलिव्हरी अॅपचा वापर करूनच ते ऑर्डर करू शकता.

त्याची किंमत प्रति बार सुमारे 15 पाऊंड इतकी आहे. हे फक्त विशिष्ट तासांमध्येच विक्रीसाठी उपलब्ध असतं. कारण तसं केलं तरच कंपनीला त्यांच्या सर्व ऑर्डर्स पूर्ण करता येतात.

बनावट 'दुबई चॉकलेट'लाही डिमांड

मी या भागातील अनेक दुकानांमध्ये 'दुबई चॉकलेट' म्हणून ओळखले जाणारे आणि पिस्ता आणि फिलो पेस्ट्रीच्या चित्रांनी सुशोभित केलेले चॉकलेट बार देखील पाहिले.

अलानी म्हणतात की, 'कॉपीकॅट बार्स' खूप निराश करणारे आहेत. लोक अशा नक्कल किंवा साधर्म्य असलेल्या चॉकलेट्सचा अनुभव घेत आहेत, ज्यामुळं आमच्या ब्रँडचं नुकसान होत आहे."

बारची लोकप्रियता वाढण्याचं एक कारण म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा बार प्रत्येकापर्यंत पोहोचला.

2023 मध्ये टिकटॉक यूझर मारिया वेहेराने पोस्ट केलेला व्हीडिओ व्हायरला झाला. हा व्हीडिओच या बारच्या लोकप्रियतेला कारणीभूत ठरला.

या व्हीडिओत वेहेरा कनाफे बार खाताना दिसते. हा बार ती पहिल्यांदा खात होती. या व्हीडिओत त्याचवेळी चॉकलेटिअरकडून बनवलेले इतर बारसुद्धा दिसतात. या व्हीडिओला तब्बल सात मिलियन्स लाईक मिळाले.

या चॉकलेट बारचं रूप सोशल मीडियासाठी अगदी योग्य आहे, गुळगुळीत मिल्क चॉकलेटवरचे आकर्षक नारिंगी आणि हिरवे ठिपके आणि तुकडा तोडताना येणारा क्रंची आवाज यामुळं ते आणखी खास बनतं.

चॉकलेट आणि पिस्ता यांचं कॉम्बिनेशन नवीन नाही, पण या बारचं खरं वैशिष्ट्यं म्हणजे त्याचं क्रंची फिलिंग. फिलो पेस्ट्रीमुळे त्याला एक खास टेक्स्चर आणि घट्टपणा मिळतो.

'कान्ट गेट कनाफे ऑफ इट' हा चॉकलेट बार फक्त एका देशातच उपलब्ध असल्यामुळं, इतर ब्रँड्सनी त्याचे व्हर्जन्स ब्रिटनमध्ये विकण्यास सुरुवात केली आहे. स्विस चॉकलेट उत्पादक लिंडट यांचाही 'दुबई चॉकलेट' आता सुपरमार्केट्समध्ये 10 पाऊंडमध्ये विकला जात आहे.

स्टॉक कंट्रोलसाठी विक्रीवर मर्यादा

हा चॉकलेट बार विक्रीसाठी आणल्यापासून वेटरोज सुपरमार्केटने स्टॉक नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्राहकांसाठी दोन बारची खरेदी मर्यादा लागू केली आहे.

होम बार्गेन्स या दुकानातही या चॉकलेट बारचा एक पर्याय विक्रीसाठी आणण्यात आला आहे. लिडल सुपरमार्केटने त्यांचं स्वतंत्र व्हर्जन 4.99 पाऊंडमध्ये उपलब्ध करून दिलं असून, तिथेही खरेदीवर मर्यादा घालण्यात आली आहे.

या कारणामुळं चॉकलेट बार काउंटरमागे ठेवण्यात येत आहे, असं एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने दाखवलं.

लिंडटचा बार आणि स्थानिक दुकांनांमध्ये मिळणारे इतर काही व्हर्जन्स चाखल्यानंतर लक्षात येतं की दोघांमध्ये खूप फरक आहे.

फिक्स चॉकलेटला 'डेझर्ट बार' म्हणून ओळखलं जातं आणि त्याला फ्रिजमध्ये ठेवावं लागतं. तसेच त्याची एक्स्पायरी (समाप्ती) डेट इतर दुग्धजन्य पदार्थांसारखीच कमी असते.

हे दुसऱ्या चॉकलेट्ससारखं नाही, इतरांना दीर्घकाळ टिकवण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.

तुम्ही चव आणि टेक्स्चरमधील फरक देखील पाहू शकता. मूळ बार लिंडट बारच्या रुंदीच्या जवळजवळ दुप्पट आहे, जो एका मानक चॉकलेट बारच्या आकाराशी जास्त जुळतो.

एकापासून सुरुवात आता 50 जणांना रोजगार

जेव्हा अलानी आणि हमौदा यांनी सुरुवात केली, तेव्हा त्यांनी दररोज सुमारे सहा ते सात ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी एक व्यक्ती कामावर ठेवली.

पण टीकटॉकमुळे लोकप्रियता वाढल्यानंतर त्यांचा व्यवसाय आता 50 लोकांना रोजगार देतो. हे 50 लोक दररोज 500 ऑर्डर्स पूर्ण करतात.

एका मोठा चर्चेचा मुद्दा म्हणजे, या प्रॉडक्टची किंमत, जी प्रत्येक एका बारसाठी 15 पाऊंड आहे.

"हे सर्व बार हातांनी तयार केले जाते, याचे डिझाइनही हातानेच तयार केले जाते," असं अलानी म्हणतात.

"आम्ही प्रीमियम घटकांचा वापर करतो आणि ही प्रक्रिया इतर बार तयार करण्यासारखी नाही. बेकिंग, चॉकलेटचं डिझाइन तयार करणं आणि त्याचं फिलिंग, अगदी पिस्ता देखील हाताने निवडला जातो आणि त्यावर प्रक्रिया केली जाते."

गेल्या वर्षी अरेबियन बिझनेसशी बोलताना, हमौदा म्हणाल्या, "माझी आई कनाफे बनवत होती आणि तेच काहीतरी मला माझ्या स्वतःच्या पद्धतीने करायचं होतं."

"कनाफे हा पहिला फ्लेवर होता, जो आम्ही परफेक्ट केला. क्रंच, पिस्ता हे सर्व अगदी योग्य असलं पाहिजे," असं ती पुढं म्हणाली.

उत्पादनाच्या यशाच्या बाबतीत, अलानी म्हणतात, "हा एक कठीण आणि खडतर प्रवास होता." ते दोघं पूर्णवेळ एकत्र काम करतात आणि त्याचवेळी ते आपल्या दोन मुलांचं संगोपनही करत आहेत.

"कधी कधी असं वाटलं की, आपण आता हार मानावं, पण आम्ही स्वतःला सांगितलं 'जितकं आपल्याला भाडं भरता येईल, तोपर्यंत आपण चालू ठेवू' आणि आता आम्हाला त्याचा काहीच पश्चात्ताप नाही. कारण आता हे सर्व यशस्वी झालं आहे."