You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'तुम्हाला नको असलेले पाळीव प्राणी आमच्या वाघ-सिंहांना खायला द्या' ; प्राणिसंग्रहालयाची मागणी
- Author, मायकेल शील्स मॅकनॅमी
- Role, बीबीसी न्यूज
एका प्राणिसंग्रहालयाच्या आवाहनामुळे प्रत्येकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'तुम्हाला नको असलेले पाळीव प्राणी आमच्या शिकारी प्राण्यांसाठी' असं म्हणत लोकांना निरोगी पण नको असलेले पाळीव प्राणी शिकारी प्राण्यांच्या खाद्यापोटी दान करण्याचं आवाहन या प्राणिसंग्रहालयानं केलं आहे.
या प्राणिसंग्रहालयाच्या या योजनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
डेन्मार्कमधील एका प्राणिसंग्रहालयानं लोकांना हे अनोखं आवाहन केलं आहे.
त्यांनी आपले निरोगी पण नको असलेले पाळीव प्राणी प्राणिसंग्रहालयाला दान करावेत, जेणेकरून ते शिकारी प्राण्यांना खायला देता येतील, असं म्हटलं आहे.
ऑल्बोर्ग प्राणिसंग्रहालयानं लोकांना जिवंत कोंबड्या, ससे आणि गिनी पिग्ज दान करण्याचं आवाहन केलं आहे.
या प्राण्यांना त्यांच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून शांतपणे कोणताही त्रास न देता मारलं जाईल, असं या प्राणिसंग्रहालयानं म्हटलं आहे.
'घोडे दान करा आणि टॅक्समध्ये सूट मिळवा'
प्राणिसंग्रहालय जिवंत घोड्यांचंही दान स्वीकारतं आणि असे घोडे देणाऱ्या मालकांना टॅक्समधून सूट देखील मिळू शकते.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना प्राणिसंग्रहालयानं सांगितलं की, 'प्राण्यांच्या नैसर्गिक अन्नसाखळीचं अनुकरण करणं ही आमची जबाबदारी आहे' आणि छोटे प्राणी हे आमच्या शिकारी प्राण्यांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत.
प्राणिसंग्रहालयाचं म्हणणं आहे की, अशा प्रकारे दिलं जाणारं खाद्य हे 'जंगलात शिकारी प्राणी जे नैसर्गिकरित्या शिकार करत असतात, त्याच्यासारखंच असतं' आणि युरेशियन लिंक्ससाठी तर हे अगदी योग्य आहे.
या प्राणिसंग्रहालयात सिंह आणि वाघांसारखे इतर शिकारी प्राणीही आहेत.
छोटे किंवा लहान प्राणी हे सोमवार ते शुक्रवारपर्यंत (वीक डेज) दान करता येतात, पण अपॉइंटमेंटशिवाय एकावेळी चारपेक्षा जास्त प्राणी देता येणार नाहीत.
त्यांच्या वेबसाइटवर, मांस खात असलेल्या वाघाच्या फोटोखाली, ऑल्बोर्ग प्राणिसंग्रहालयानं घोडे दान करण्याच्या अटी दिलेल्या आहेत.
'नैसर्गिक आहार मिळावा म्हणून...'
दानासाठी पात्र होण्यासाठी घोड्याजवळ हॉर्स पासपोर्ट असणं गरजेचं आहे, आणि त्याच्यावर मागच्या 30 दिवसांत कोणतेही औषधोपचार झालेले नसावेत.
जर मालकांनी घोडा योग्यरितीने दान केला, तर त्यांना टॅक्समध्ये सूट (कर सवलत) मिळू शकते.
प्राणिसंग्रहालयाच्या उपसंचालक पिया नील्सन यांनी एका निवेदनात सांगितलं की, प्राणिसंग्रहालयातील मांसाहारी प्राण्यांना अनेक वर्षांपासून लहान प्राणी खायला दिले जात आहेत.
"शिकारी प्राणी पाळताना त्यांना मांस द्यावंच लागतं आणि शक्यतो ते मांस प्राण्यांच्या अंगावरील केस, हाडं आदींसह असावं, जेणेकरून त्यांना नैसर्गिक आहार मिळू शकेल," असं त्यांनी स्पष्ट केलं.
"म्हणूनच ज्या प्राण्यांना एखाद्या कारणानं मारण्याची गरज असते, त्यांचा उपयोग अशा प्रकारे करणं योग्य वाटतं. डेन्मार्कमध्ये ही पद्धत सामान्य आहे, आणि आमचे अनेक पाहुणे व सहकार्य करणारे लोक अशा प्रकारे मदत करण्याची संधी आनंदाने घेतात. आम्हाला दान म्हणून मिळणाऱ्या प्राण्यांमध्ये कोंबड्या, ससे, गिनी पिग्ज आणि घोड्यांचा समावेश असतो."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.