You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याच्या दाव्यानंतर कोर्टाची पक्षकारांना नोटीस, काय आहे प्रकरण?
- Author, मोहर सिंह मीणा
- Role, जयपूर, बीबीसी हिंदीसाठी
राजस्थानमधल्या अजमेरमध्ये असणारा ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा एका शिव मंदिरावर बांधला गेलाय असं सांगणारी हिंदू सेनेची याचिका अजमेर न्यायालायनं सुनावणीसाठी स्वीकारली. सर्व पक्षकारांना नोटिसाही बजावल्या.
याचिकेच्या सुनावणीदरम्यान 27 नोव्हेंबरला अजमेरचे पश्चिम दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) मनमोहन चंदेर यांनी राज्य अल्पसंख्यांक विभाग, दर्गा समिती आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांना नोटीस पाठवली.
निवृत्त न्यायाधीश हरबिलास सारडा यांच्या पुस्तकासकट इतर दोन गोष्टींचा आधार घेऊन या दर्ग्याच्या जागी मंदिर असल्याचं हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी म्हटलं आणि पूजाअर्जा करण्याची परवानगी मागितली.
दुसरीकडे अजमेर दर्ग्याचे मुख्य उत्तराधिकारी आणि ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे वंशज सय्यद नसिरुद्दीन चिश्ती यांनी ही याचिका म्हणजे लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेला स्टंट असल्याचं म्हटलं आहे.
“हे लोक समाजाला आणि देशाला चुकीच्या दिशेनं घेऊन चाललेत,” ते म्हणाले.
या प्रकरणाची पुढची सुनावणी 20 डिसेंबरला होईल.
कोणत्या तीन गोष्टींच्या आधारावर दाखल केली याचिका?
दर्ग्याखाली मंदिर असण्यामागे विष्णू गुप्ता यांनी तीन गोष्टींचा आधार सांगितला आहे.
ब्रिटिश सरकारच्या काळात अजमेर नगर पालिकेत कमिश्नर म्हणून काम करणाऱ्या हरबिलास सारडा यांनी 1911 मध्ये लिहिलेल्या पुस्तकात दर्गा मंदिरावर बांधला असल्याचा उल्लेख केला आहे. याचिकेत या पुस्तकाचा मुख्य आधार घेण्यात आलाय.
“पुस्तकात दिलेल्या माहितीच्या आधारावर आम्ही दर्गामध्ये जाऊन शोध घेतला. दर्ग्याची संरचना हिंदू मंदिराला तोडून बनवली आहे. त्याच्या भिंतींवरचं आणि दरवाज्यांवरचं नक्षीकाम हिंदू मंदिराची आठवण करून देतं,” विष्णू गुप्ता म्हणाले. हाच याचिकेचा दुसरा आधार आहे.
“त्या जागी शिवलिंग असल्याचं अजमेरमधल्या प्रत्येक माणसाला आणि त्यांच्या पुर्वजांनाही माहीत होतं. इथं हिंदू मंदिर आहे असं लोकांचं म्हणणं आहे,” हा विष्णू गुप्तांचा तिसरा आधार होता.
दर्ग्याच्या जागी खरंतर संकट मोचन महादेव मंदिर होतं. त्यामुळेच दर्ग्याची नोंदणी झाली असेल तर ती रद्द करून ते संकट मोचन महादेव मंदिर असल्याची घोषणा करावी असं विष्णू गुप्ता म्हणतात. याशिवाय, मंदिरात पूजाअर्चा करायची परवानगीही मिळावी असं त्यांनी म्हटलं आहे.
दर्ग्याचं तळघर बंद करून ठेवलं आहे. तपासणी केल्यावर सगळं सत्य बाहेर येईल असंही गुप्ता यांनी म्हटलं.
2011 मध्ये त्यांनी हिंदू सेनेची स्थापना केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यांचा या संघटनेकडून प्रचार केला जातो. हिंदूंबाबतीत केलेल्या विधानांमुळे विष्णू गुप्ता अनेकदा चर्चेत असतात.
काही दिवसांपूर्वी गृह मंत्री अमित शाह यांना पत्र लिहून त्यांनी मुस्लिमांकडे असलेला अल्पसंख्यांक दर्जा काढून टाकण्याची मागणी केली होती. त्याआधी 2022 मध्ये त्यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लीम संघटनेवर बंदी घालण्याचीही मागणी केली होती.
दर्गा समितीचं म्हणणं काय?
न्यायालयाने दर्गा समितीलाही नोटीस पाठवली आहे. गेल्या अनेक वर्षांत अजमेर दर्ग्यात प्रमुख अधिकारी म्हणून कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सध्या दर्ग्याचं अधिकारीपद अल्पसंख्यांक विभागाचे उप-सचिव मोहम्मद नदीम यांच्याकडे आहे.
“न्यायालयाची नोटीस अजून आमच्यापर्यंत पोहोचली नाही. नोटीस पोहोचल्यावर त्याचा अभ्यास करून पुढे काय कारवाई करायची याचा निर्णय घेतला जाईल,” असं बीबीसीशी बोलताना नदीम म्हणाले.
दर्ग्याचे उत्तराधिकारी सय्यद नसिरुद्दीन चिश्ती यांच्याशी बीबीसीने फोनवर बोलणं केलं. “आम्ही आमच्या वकीलांचा सल्ला घेत आहोत. आमचं म्हणणं आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मांडू,” असं ते म्हणाले.
हा लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेला स्टंट असल्याचं सांगत नसिरुद्दीन पुढे म्हणाले, “कुणीही उठतं आणि अमक्या तमक्या दर्गा किंवा मशिदीच्या खाली मंदिर असल्याची याचिका दाखल करतं. एक चुकीची प्रथाच उभारली जात आहे.”
1911 च्या ज्या पुस्तकाच्या आधारावर हे दावे केले जात आहेत ते पुस्तकही विश्वसनीय म्हणता येणार नाही, असं नसिरुद्दीन म्हणतात. “शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकाच्या आधारावर आठशे वर्षांचा इतिहास खोटा ठरवता येत नाही,” ते म्हणाले.
पोलिसांच्या संख्येत वाढ
मंदिरावर दर्गा बांधला असल्याचे दावे केल्यानंतर हे प्रकरण देशभर चर्चेत आलं आहे.
गेल्या काही दिवसांत देशात अनेक ठिकाणी अशा मंदिर-मशिद वादाच्या अनेक घटना घडल्यात. त्यावरून उग्र आंदोलनंही केली गेली आहेत.
या याचिकेनंतर राजस्थानातलं वातावरणं तापलं आहे. अशा परिस्थितीत शांतता भंग होऊ नये यावर विशेष लक्ष दिलं जातंय.
“आम्ही सतत समाजातल्या लोकांशी बोलत आहोत. प्रकरण न्यायालयात सुरू आहे. न्यायलयीन प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जाईल. पण त्याने शांतता बिघडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” अजमेर जिल्हा पोलीस अधिक्षक वंदिता राणा बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.
“आपापसातलं सौदार्ह टिकून रहावं आणि शांतता कायम रहावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत,” एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं.
'समाजानं एकत्रित रहायची गरज'
अशा परिस्थितीत समाजानं एकत्रित रहायची गरज असते असं सय्यद नसिरुद्दीन चिश्ती यांना वाटतं. यासारख्या याचिका आणि दावे समाजात गोंधळ पसरवण्याचं काम करतात, असं ते म्हणतात.
“स्वस्तात मिळणाऱ्या लोकप्रियतेसाठी हे लोक जे करतात त्याने देश किती चुकीच्या दिशेने जातो हे त्यांना समजत नाही. समजाला एकजूट होण्याची गरज आहे. मंदिर-मशिदीचा वाद हे लोक अजून किती दिवस घालत राहणार आहेत?” नसिरुद्दीन सांगत होते.
ख्वाजा साहेबांच्या दरबाराला आठशे वर्षांचा इतिहास आहे. या आठशे वर्षांत जयपूर, जोधपूर, कोटा, ग्वालियरसोबतच अनेक राजांचा दर्गाशी संबंध आला आहे. मशिदीच्या जागी मंदिर असतं तर सगळ्यात पहिली तक्रार त्यांनी केली असती, असं नसिरुद्दीन पुढे म्हणाले.
“प्रार्थना स्थळांविषयीचा कायदा 1991 आणखी मजबूत केला जावा. धार्मिक स्थळांवरून 1947 च्या आधीपासून वाद सुरू आहेत, ते वेगळे ठेवले जावेत. त्यात न्यायालयाचा जो काही निकाल असेल तो नेहमीप्रमाणे सन्मानपूर्वक स्वीकारला जाईल. पण हे लोक नवे वाद उभे करत आहेत,” असं आवाहन नसिरुद्दीन चिश्ती यांनी केलं.
याचिकेला कोणत्या पुस्तकाचा आधार?
अजमेर दर्गा मंदिराच्या जागी बांधला असतानाचा दावा करताना विष्णू गुप्ता यांनी हरबिलास सारडा यांच्या पुस्तकाचा आधार दिलाय.
सारडा यांनी 1911 मध्ये ‘अजमेर: हिस्टोरिकल अँड डिस्क्रिप्टिव्ह’ असं एक पुस्तक लिहिलं होतं. 206 पानांच्या या पुस्तकात अनेक गोष्टींचा समावेश आहे.
पुस्तकात ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गावरही एक प्रकरण आहे. पान नंबर 97 वर पहिल्या परिच्छेदात दर्ग्यात महादेव मंदिर असल्याचा उल्लेख आहे.
इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकात हरबिलास सारडा यांनी लिहिलंय त्याचा मराठी अनुवाद असा करता येईल “तळघरात एका मंदिरात महादेवाची प्रतिमा असल्याचं परंपरेनं सांगण्यात आलं आहे. त्यावर एक ब्राह्मण कुटुंब चंदन ठेवत असे. आता दर्ग्यामध्ये त्याचा घंटेसारखा वापर केला जातो.”
याच वाक्यांचा आधार याचिकेत घेतला आहे.
पण या माहितीच्या सत्यतेवर सय्यद नसिरुद्दीन चिश्ती प्रश्न उपस्थित करतात. “हिंदू आणि मुस्लीम दोन्ही लेखकांनी लिहिलेल्या इतर कोणत्याही ऐतिहासिक पुस्तकात अजमेर दर्गाबद्दल असा उल्लेख नाही. अजमेर दर्गा हा खरंतर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांच्या आस्थेचं क्रेंद आहे,” ते म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)