You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने तुमच्या होमलोन किंवा इतर गोष्टींवर काय परिणाम होणार?
- Author, अजित गढवी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. 3 डिसेंबरला रुपया पहिल्यांदाच 90 रुपयांच्या पातळीखाली गेला आणि डॉलरचा दर 90.12 रुपयांवर पोहोचला.
यानंतर 4 डिसेंबरलाही रुपयाची घसरण सुरूच राहिली आणि डॉलरच्या तुलनेत तो 90.43 रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला होता.
याचा थेट परिणाम महागाई, परदेशी शिक्षण, आयात केल्या जाणाऱ्या वस्तू आणि कर्जाच्या हप्त्यांवर होणार आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत सुमारे 7 टक्क्यांनी घसरली आहे.
रुपया घसरला की त्याचा थेट परिणाम महागाईवर होतो. म्हणूनच रुपयाने 90 रुपयांचा टप्पा ओलांडल्यामुळे अनेक वस्तू महाग होऊ शकतात.
इथे अशा 6 गोष्टी किंवा वस्तूंबद्दल सांगितलं आहे, ज्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
1. कच्च्या तेलावर सर्वाधिक परिणाम
भारत हा कच्च्या तेलाचा एक मोठा आयातदार देश आहे आणि त्याच्या कच्च्या तेलाच्या बहुतेक गरजा आयातीद्वारे पूर्ण होतात. त्यामुळे डॉलर महागल्याचा फटका भारताला बसणार आहे. इंधन महागल्याने वाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्यामुळे इतर सर्व वस्तूही महाग होतात.
अहमदाबाद येथील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका नेहा शहा म्हणतात की, "आपल्या आयातीत क्रूड म्हणजेच कच्च्या तेलाचा मोठा वाटा आहे. रुपयाची किंमत घसरल्याने इंधन महाग होईल आणि त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे सर्व वस्तू महाग होतील."
"सध्या भारताचा परकीय चलन साठा मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे कदाचित रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करून मोठ्या प्रमाणात होत असलेली रुपयाची घसरण थांबवण्याचा प्रयत्न करत नाही," असं त्या म्हणाल्या.
"याशिवाय रुपयाची किंमत घसरल्यामुळे काही क्षेत्रांमध्ये भारताची निर्यात वाढू शकते. अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये भारताच्या वस्तू स्वस्त होऊ शकतात."
भारत आपल्याला लागणाऱ्या सुमारे 85 टक्के तेलाची आयात करतो. आतापर्यंत भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल घेत होता. परंतु, अमेरिकेने टॅरिफ वाढवल्यामुळे भारताने रशियाकडून तेलाची आयात सुमारे एक तृतीयांशने कमी केली आहे.
2. विदेशात शिक्षण घेणं महाग होईल
रुपयाच्या तुलनेत डॉलर महागल्यामुळे परदेशात शिक्षण घेण्याचा खर्च वाढतो. त्यामुळे डॉलरच्या मजबुतीमुळे सर्वाधिक परिणाम परदेशी शिक्षण क्षेत्रावर होतो. जे पालक आपली मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवतात, त्यांना आता जास्त पैसे खर्च करावे लागतील.
अहमदाबादमधील पाथे बजेट सेंटरचे अर्थतज्ज्ञ महेन्द्र जेठमलानी म्हणाले की, "जे भारतीय पालक आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याची योजना आखत आहेत, त्यांच्यावर डॉलरच्या वाढत्या मूल्याचा परिणाम होईल."
भारतीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये सुमारे 7.6 लाख भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले.
जेठमलानी म्हणाले की, "रुपयाच्या घसरणीमुळे भारतीयांसाठी परदेशातील शिक्षणाचा खर्च वाढला आहे आणि आता यामध्ये आणखी मोठी वाढ होईल."
अनेक पालक आपल्या मुलांना अमेरिका, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा सिंगापूरसारख्या देशांत शिक्षणासाठी मोठ्या शैक्षणिक कर्जाची मदत घेतात. त्यामुळे त्यांच्यावरचा भार वाढेल. शिवाय, विद्यार्थ्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचा खर्चही महाग होईल.
उदाहरणार्थ, जर परदेशातील एखाद्या कोर्सचा एकूण खर्च 1 लाख डॉलर असेल, तर एका वर्षाआधी त्याचा खर्च रुपयामध्ये 85 लाख रुपये होता. पण आता त्याच कोर्ससाठी 90 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च होईल.
कोविड काळ वगळता, दरवर्षी परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. 2023 मध्ये सुमारे 9 पट भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले.
3. होमलोन आणि कारसाठीचा इएमआय वाढू शकतो
रुपयाच्या घसरणीमुळे महागाई वाढली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) व्याजदर वाढवते. त्यामुळे गृहकर्ज, कार किंवा इतर सर्व प्रकारच्या कर्जांचे दरही वाढतात.
म्हणजे गृहकर्ज किंवा कार खरेदी करणार्यांना जास्त हप्ते भरावी लागतील.
मागील काही काळात आरबीआयने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कमी केले होते आणि सध्या हे विक्रमी नीचांकी पातळीवर आहेत.
पण आता कदाचित पुन्हा कर्जाचे हप्ते वाढण्याचा काळ येणार आहे.
4. परदेश प्रवास महागणार
भारतीय ज्या काही सुविधा वापरण्यासाठी रुपयाला डॉलरमध्ये बदलतील, त्या सर्व गोष्टी महाग होतील. म्हणजेच, परदेश प्रवासाचा खर्च वाढेल.
विमान तिकिटापासून हॉटेल बुकिंगपर्यंतच्या सर्व गोष्टी महाग होतील. तसेच, परदेशात जाताना घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विम्याचा खर्चही वाढेल.
भारतीयांना परदेश प्रवासाची खूप आवड आहे. 2024 मध्ये 3.89 कोटी भारतीयांनी परदेश प्रवास केला, जो एक विक्रम आहे. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये सुमारे 11 टक्के अधिक भारतीयांनी परदेश प्रवास केला.
परदेश प्रवासासाठी सर्वाधिक भारतीय यूएईला पसंती देतात. त्यानंतर सौदी अरेबिया, अमेरिका, थायलंड, सिंगापूर, यूके, कतार आणि कॅनडा यांचा क्रमांक येतो.
5. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर परिणाम
भारत 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशात वस्तूंचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही परदेशी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आयात वाढत चालली आहे.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताने 8.35 लाख कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची आयात केली.
डॉलर मजबूत झाल्यामुळे भारताला स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, गेमिंग कन्सोल यांसारख्या वस्तू आयात करणं महाग पडेल. त्यामुळे भारतीय बाजारपेठेतही या वस्तूंच्या किमती वाढू शकतात.
भारत परदेशातून मोठ्याप्रमाणात संगणक हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आणि दूरसंचार उपकरणं आयात करतो.
6. लक्झरी वस्तू महाग होतील
परदेशातून ज्या प्रीमियम किंवा लक्झरी वस्तू आयात केल्या जातात, त्या महाग होतील. यात पॅकेज्ड चॉकलेट, लेदरच्या प्रीमियम वस्तू, लक्झरी कार, काही प्रीमियम उपकरणं, सोने, चांदी आदींचा यात समावेश आहे.
सर्वात कमकुवत चलनांमध्ये रुपया आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांमध्ये रुपयाचा समावेश आहे.
या वर्षाच्या सुरुवातीपासून रुपयाची किंमत सुमारे 5 टक्क्यांनी घसरली आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्केपर्यंत टॅरिफ लावल्याचा परिणाम दिसून येत आहे. टॅरिफमुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारताचे आकर्षण कमी झाले आहे.
'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, रुपयाला 80 ते 85 वर पोहोचायला जितका वेळ लागला, त्याच्या अर्ध्या वेळेतच तो 85 वरून 90 पर्यंत घसरला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.