जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचं कारण समोर, अहवालात नेमकं काय म्हटलंय?

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं डिसेंबर 2021 मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं होतं.

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत यांचं 8 डिसेंबर 2021 रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण देशाला धक्का बसला होता.

या हेलिकॉप्टर अपघातात त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह इतर 12 जणांचाही मृत्यू झाला होता.

रावत यांच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीकडून मंगळवारी (21 डिसेंबर) लोकसभेत एक अहवाल सादर करण्यात आला. त्यांच्या एमआय-17 या हेलिकॉप्टरचा अपघात मानवी त्रुटींमुळे झाला असल्याचं त्यात म्हटलं गेलंय.

या अहवालात समितीने 13 व्या संरक्षण योजनेच्या कालावधीत भारताच्या हवाई दलाच्या विमान दुर्घटनांची संख्या सादर केली गेली.

अहवालातून काय माहिती समोर आली?

13 व्या संरक्षण योजनेच्या कालावधीत, म्हणजे 2017 ते 2022 या आर्थिक वर्षांत या आर्थिक वर्षात भारतीय हवाई दलाचे एकूण 34 अपघात झाले. त्यातही 2021-2022 या आर्थिक वर्षात 9 अपघात झाले.

त्यापैकी 8 डिसेंबर 2021 रोजी झालेला अपघात (ज्यात बिपिन रावत मृत्यूमुखी पडले) "मानवी त्रुटी"मुळे झाला, असं हा अहवाल सांगतो.

या कालावधीत झालेल्या सगळ्या अपघातांमागच्या कारणांची माहिती या अहवालात दिली आहे. त्यात विमानाचा प्रकार, दुर्घटनेचे तपशील आणि त्याच्या तारखेचाही उल्लेख आहे.

तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातल्या कुन्नूरमध्ये बिपिन रावत यांच्या हलिकॉप्टरला अपघात झाला होता.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातल्या कुन्नूरमध्ये बिपिन रावत यांच्या हलिकॉप्टरला अपघात झाला होता.

जुन्या अहवालालातील माहितीला दुजोरा

याआधीही हेलिकॉप्टर चालकाची चूक हे दुर्घटनेचं कारण असू शकेल, असा दावा केला जात होता. या अहवालाने त्याला बळकटी मिळाली आहे.

'एनडीटीव्ही' वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चौकशी समितीकडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासातही हेच निष्पन्न झालं होतं.

लाल रेष
लाल रेष

"हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे हेलिकॉप्टर ढगांमध्ये शिरलं. त्यामुळे हा अपघात झाला," असं चौकशी समितीने म्हटलं होतं.

हे कारण शोधण्यासाठी चौकशी समितीच्या पथकानं फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर यांच्यातील माहितीचा अभ्यास केला.

त्याचबरोबर, घटनेच्या सर्व साक्षीदारांचे जबाबही नोंदवले होते.

8 डिसेंबर 2021 रोजी काय झालं?

जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि 11 सैनिकांना घेऊन एमआय-17 हेलिकॉप्टरमधून तमिळनाडूच्या सुरूर एअर बेसवरून उड्डाण घेतलं. हे हेलिकॉप्टर उटीजवळच्या वेलिंग्टनमध्ये डिफेन्स स्टाफ सर्व्हिसेस कॉलेजला जाणार होतं.

हेलिकॉप्टर खाली उतरण्याच्या काही मिनिटे आधीच निलगिरी जिल्ह्यातल्या कुन्नूरजवळ डोंगराळ भागात अपघात झाला. त्यात जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 सैनिकांचा जागीच मृत्यू झाला.

शौर्य चक्र विजेते कॅप्टन वरुण सिंह हे एकटेच या अपघातातून वाचले. पण आठवड्याभरात उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

दुर्घटनास्थळावर बचाव दल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुर्घटनास्थळावर बचाव दल

या अपघतात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका राजे सिंह रावत, त्यांचे डिफेन्स असिस्टंट ब्रिगेडिअर एलएस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह, एमआय-17 चे चालक विंग कमांडर पृथ्वीसिंह चव्हाण आणि पायलट स्क्वॉड्रन लीडर कुलदीप सिंह हेही होते.

सोबतच ज्युनिअर वॉरंट ऑफिसर राणा प्रताप दास, ज्युनियर वॉरंट ऑफिसर अरक्कल प्रदीप, हवलदार सतपाल राय, नायक गुरसेवक सिंह, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार आणि लान्स नायक बी साई तेजा यांनाही आपला जीव गमवावा लागला.

कसं होतं हेलिकॉप्टर?

खरंतर अपघातात सापडलेलं हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात फार विश्वसनीय आणि सुरक्षित मानलं जात होतं.

रशियात बनवलेल्या या एमआय-17 हेलिकॉप्टरचा वापर हवाई दलात महत्त्वाच्या कार्यक्रमांत आणि बचाव कार्यात केला जात असे.

एमआय-17 हेलिकॉप्टर

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, एमआय-17 हेलिकॉप्टर

एमआय-17 हे अतिशय विश्वसनीय हेलिकॉप्टर असल्याचं प्लॅनेट-एक्स एअरोस्पेस सर्व्हिसेस लिमिटेडचे निर्देशक आणि सीईओ सांगतात.

उत्तराखंडसारख्या राज्यात उंच भागात बचावकार्य करण्यासाठी याचा नेहमी वापर केला जात असे, असंही ते म्हणाले.

देशाचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स'

गोरखा सैनिकांसोबत बिपिन रावत

फोटो स्रोत, PENGUIN VEER

फोटो कॅप्शन, गोरखा सैनिकांसोबत बिपिन रावत

भारताचे पहिले पहिले चीफ ऑफ डिफेन्स म्हणून जनरल बिपिन रावत यांची 31 दिसंबर 2019 रोजी नेमणूक करण्यात आली होती. 1 जनवरी 2020 रोजी त्यांनी कार्यभार स्वीकारला.

सीडीएससह जनरल रावत भारतीय सैन्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये ताळमेळ ठेवणं आणि सैन्याचं आधुनिकीकरण करणं अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संभाळत होते.

त्यापूर्वी भारतीय सैन्याचे प्रमुख म्हणूनही जनरल रावत यांनी काम पाहिलं होतं. 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 या काळात ते भारतीय लष्कराचे 27 वे प्रमुख होते.

ते कडक आणि कठीण निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जात. पूर्व भारतातून माओवाद कमी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

पाकिस्तानमधले दहशतवाद्यांच्या अनेक जागा उद्ध्वस्त करण्याच्या मिशनमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)