संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना शाई फासत मारहाण; अक्कलकोटमध्ये नेमकं काय घडलं?

    • Author, मुस्तान मिर्झा
    • Role, बीबीसी मराठीसाठी

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे शाई फासत धक्काबुक्की झाली. याप्रकरणी पोलिसांनी शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

दीपक काटे भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य सचिव असल्याचंही त्यांच्या सोशल मीडियावरून समोर येत आहे. प्रवीण गायकवाड यांनीही काटे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलं आहे.

प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथील फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातील सत्कार समारंभासाठी गेले होते. यावेळी तेथे जन्मेजयराजे भोसले हेही उपस्थित होते.

'संभाजी ब्रिगेड' हे नाव बदलून 'छत्रपती संभाजी ब्रिगेड' असे नाव करावे, या मागणीसाठी ही शाईफेक करण्यात आल्याचा दावा आरोपींनी केला आहे.

याप्रकरणी मारहाण करणे, दंगल करणे, गाडीची तोडफोड करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे याप्रकरणी दीपक काटे यांच्यासह 7 जणांवर बीएनएस कलम 115, 189, 191, 190 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र ताकाने यांनी माहिती दिली.

प्रवीण गायकवाड फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना रस्त्यावर अडवत त्यांना काळं फासण्यात आलं आणि धक्काबुक्की झाली. यात त्यांचे कपडेही फाटले. आरोपींनी गायकवाड यांच्या वाहनाची तोडफोडही केली.

नेमकं काय घडलं?

या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले, "याआधीच 'छत्रपती संभाजी ब्रिगेड' यांचे नाव देण्यात यावे यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला आहे. पण केवळ हे छत्रपती संभाजी महाराजांचे नाव संस्थेला द्यावे यापुरतेच मर्यादित नाहीये."

"तुम्हाला हे माहितीये की हे सरकार कुणाचे आहे. हा एक विचार संपवण्याचा प्रयत्न आहे. पण विचार कधी संपत नसतात. ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्याविषयी मला मनात काही राग नाही. त्यांना या गोष्टीचा कधी ना कधी पश्चाताप होईल."

या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या दीपक काटे यांनी बीबीसी मराठीला सांगितले, "संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढे छत्रपती किंवा धर्मवीर असे नाव लावण्यात यावे कारण संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने त्यांचा अवमान होतोय. छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी राजे होते, त्यांच्या नावाचा वारंवार अपमान होत असल्याने आम्ही मागील दीड ते 2 वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी करतोय."

"नुकतंच पावसाळी अधिवेशनादरम्यान आम्ही विधानभवनासमोर देखील आंदोलन केले. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवली. असे असताना संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये असं सांगत डिवचण्याचा प्रयत्न केला."

"इतकंच नाही तर संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थ महाराजांवर बेताल वक्तव्य केले होते आणि त्यांचेच प्रदेशाध्यक्ष स्वामींच्या भूमीत येऊन सत्कार स्वीकारतात, त्यामुळे हा निषेध आम्ही व्यक्त केला," असं दीपक काटे यांनी सांगितले.

ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थांबद्दल केलेल्या विधानाबद्दल विचारले असता, प्रवीण गायकवाड म्हणाले, "ज्ञानेश महाराव यांनी या संदर्भात माफी मागितली होती. त्यावर अक्कलकोट संस्थानशी आमची चर्चा झाली होती. आमचे अनेक कार्यकर्ते अन्नछत्रात सहभागी होऊन सहकार्य करतात. तेव्हा एका व्यक्तीचा विचार, हा आमचा विचार नाहीये."

संभाजी ब्रिगेडने याप्रकरणी एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलं आहे, "संभाजी ब्रिगेड संघटना 28 वर्षांपासून कार्यरत आहे. संघटनेच्या नावातून कोणत्याही प्रकारे एकेरी उल्लेख होत नाही. महापुरुषांचे नाव संघटनेला, पक्षाला, शहराला, गावाला दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्या भ्याड व्यक्तीने हा हल्ला केला त्या व्यक्तीच्या संघटनेचे नाव 'शिव धर्म फाउंडेशन' असे आहे, मग हे नाव एकेरी आहे की आदरार्थी हा प्रश्न त्या भ्याड हल्लेखोराने आधी स्वतःला का विचारला नाही."

"विरोधी विचारसरणीच्या संघटनेचे नाव काय असावे हे ठरवायचा अधिकार यांना कुणी दिला. यामागे भाजपचे वेगळेच राजकारण शिजत आहे का हा प्रश्न आहे, दीपक काटे हा गुंड भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे," असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला.

बीबीसीने संभाजी ब्रिगेडने केलेल्या आरोपासंदर्भात भारतीय जनता पक्षाची बाजू जाणून घेतली. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण बीबीसी मराठीला म्हणाले की "दीपक काटे यांची कृती ही भाजप पदाधिकारी म्हणून नाही तर शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक म्हणून आहे. असे असले तरी कोणताही पक्ष अशा कृतीचे समर्थन करणार नाही."

यापूर्वी दीपक काटे यांनी संभाजी बिडीवरील संभाजी महाराजांचा फोटो काढण्यात यावा, यासाठी आंदोलन केले होते. तर मागील काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेडच्या नावात बदल करावा अन्यथा धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड असं करावं, या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा देखील काढला होता.

प्रवीण गायकवाड कोण आहेत?

2016 साली मराठा सेवा संघाशी संबंधित संभाजी ब्रिगेडनं राजकीय वर्तुळात सक्रीयपणे उतरण्याचा निर्णय घेतला. 30 नोव्हेंबर 2016 रोजी मराठा सेवा संघाची शाखा असणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं स्वत:ला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलं.

तत्कालीन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हेच पक्षाचे प्रमुख झाले आणि पुरुषोत्तम खेडेकरांचे पुत्र सौरभ खेडेकर हे सरचिटणीस झाले.

प्रवीण गायकवाड हे मराठा सेवा संघाच्या अखत्यारित संभाजी ब्रिगेड असताना, तिचे पाच वर्षं अध्यक्षही होते. आणि 2016 साली संभाजी ब्रिगेडचा पक्ष स्थापन करणारे मनोज आखरे हे त्यावेळी प्रवीण गायकवाड यांचे सहकारी होते, जे पुढे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्षही झाले होते.

प्रवीण गायकवाड यांनी याच काळात शेतकरी कामगार पक्षात आणि नंतर काँग्रेसमध्येही प्रवेश केला. मात्र, त्यांनी कुठूनही निवडणूक लढवली नाही. पुण्यातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही. त्यामुळे गायकवाड नाराज असल्याची चर्चाही झाली.

मात्र, प्रवीण गायकवाड यांनी राजकीय प्रवेश किंवा पक्षांतरं सुरू असतानाही, संभाजी ब्रिगेडचं काम सुरू ठेवलं.

संभाजी ब्रिगेडची स्थापना

पुरुषोत्तम खेडेकर यांनी या 1 सप्टेंबर 1990 रोजी या मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली होती. मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील असणारे पुरुषोत्तम खेडेकर हे तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते.

मराठा-कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि समाजाचं प्रबोधन करणं हा प्रमुख उद्देश मराठा सेवा संघाच्या स्थापनेवेळी होता.

पुढे मराठा सेवा संघानं 30 हून अधिक विभाग सुरू केले.

याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितलं की, "नव्वद साली जेव्हा मी मराठा सेवा संघाची स्थापना केली तेव्हा माझ्यासोबत निर्मलकुमार देशमुख, अमृतराव सावंत यांच्यासारखे एकूण 17 जण प्रमुख कार्यकर्ते होते. मर्यादित उद्देशासह सुरू झालेली संघटनेनं पुढे मोठं रूप घेतलं."

संभाजी ब्रिगेडची आंदोलने

संभाजी ब्रिगेडने आक्रमक शैलीत आंदोलने केली आहे. 2004 मध्ये संभाजी ब्रिगेडने पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दुर्मीळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने स्वीकारली होती.

या हल्ल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 72 कार्यकर्त्यांना अटक झाली होती. 14 वर्षानंतर 68 जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली होती तर चार आरोपींचे सुनावणीदरम्यान निधन झाले होते.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

नाशिक येथे 2021 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती.

गिरीश कुबेर यांनी त्यांचे पुस्तक 'रेनेसाँ स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र' यात छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यातून ही शाईफेक झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते. यासंदर्भातील सविस्तर बातमी तुम्हाला इथं वाचता येईल.

दादोजी कोंडदेव प्रकरण

संभाजी ब्रिगेडने आंदोलन करत पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानंतर दादोजी कोंडदेवांचा पाठ्यपुस्तकातून उल्लेख देखील काढून टाकण्यात आला होता.

2012 साली संभाजी ब्रिगेडनं रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला होता.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.

राम गणेश गडकऱ्यांचा पुतळा हटवला

2017च्या जानेवारी महिन्यात पुण्यातील संभाजी उद्यानातला साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकणं. राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकांमधून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने त्यावेळी केला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)