नोबेल शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या मारिया मचाडो कोण आहेत? त्यांना 'आयर्न लेडी' का म्हटलं जातं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॅनियल पारडो
- Role, बीबीसी मुंडो
संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या नोबेल शांतता पुरस्काराची शुक्रवारी (10 ऑक्टोबर) घोषणा झाली. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आणि लोकशाहीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला.
नोबेल समितीने मचाडो यांना 'लॅटिन अमेरिकेतील सर्वात धैर्यशील नागरिकांपैकी एक' असं म्हटलं. त्या व्हेनेझुएलातील नागरिकांचा लोकशाही हक्क टिकवण्यासाठी अथक काम करत असल्याचं मत समितीनं नोंदवलं.
अनेक वर्षांपासून मचाडो या व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो मोरोस यांच्या विरोधात मोहीम राबवत आहेत. अनेक देश मादुरो यांच्या 12 वर्षांच्या सत्तेला अवैध मानतात.
58 वर्षांच्या मचाडो या निकोलस मादुरो यांच्या चाव्हिस्टा सरकारच्या विरोधातील प्रमुख आवाज बनल्या आहेत. हे सरकार अनेक दशकांपासून व्हेनेझुएलावर राज्य करत आहे.
मादुरो यांचे गुरु म्हणजे व्हेनेझुएलाचे माजी अध्यक्ष ह्यूगो चावेझ. त्यांची समाजवादी विचारसरणी 'चाव्हिझम' (चाविस्मो) म्हणून ओळखली जाते.
अनेक वर्षांपासून मचाडो या सत्ताधारी पक्षाच्या सर्वात मोठ्या विरोधक म्हणून ओळखल्या जातात. चाव्हिझमचा काळ मजबूत असला, तरी त्यांनी ह्यूगो चावेझ आणि त्यांच्या सरकारवर टीका करणं कधीच थांबवलं नाही.
याच्या प्रत्युत्तरात सरकारने मचाडो यांच्यावर अनेक निर्बंध लादले. त्यांना देशाबाहेर जाण्यास बंदी घातली, नॅशनल असेंब्लीतील त्यांचं डेप्युटी पद काढून घेतलं आणि सरकारी पदावर काम करण्यास मनाई केली. सरकारने हे सर्व त्यांचे अमेरिकेशी कथित 'संबंध' असल्याचे कारण देऊन केलं.
इतक्या सर्व अडचणी असूनही मचाडो यांनी आपलं राजकीय काम थांबवलं नाही.
शेवटी त्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षाच्या निर्विवाद नेत्या बनल्या.
आणि हे सर्व त्यांनी आपल्या प्रचंड जिद्दीच्या जोरावर साध्य केलं.
'शेवटपर्यंत' हेच घोषवाक्य बनलं...
2023 ते 2024 दरम्यान, मचाडो यांनी संपूर्ण व्हेनेझुएलाचा दोनदा प्रवास केला. या काळात त्यांच्यासाठी रस्ते बंद केलेले होते, विमानसेवा रद्द होत्या आणि त्यांच्या कारवर प्राण्यांचं रक्तही फेकलं गेलं होतं. तरीही न डगमगता त्या संपूर्ण व्हेनेझुएलात फिरल्या होत्या.
2024 च्या अखेरच्या महिन्यात त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघालं होतं.
प्रचंड गर्दी असलेल्या रस्त्यांवरुन प्रवास करताना, अनेक लोकांनी मचाडो यांना माळा (रोझरी) भेट म्हणून दिल्या. ज्या त्या नाव, ठिकाण आणि तारखांसह ठेवतात आणि गळ्यात घालतात. सर्वात मोठ्या सभेमध्ये त्या एकाच वेळी दहा माळा घाललेल्या दिसतात.
"प्रत्येक माळ मला आठवण करून देते की, मी हे काम का करते आणि किती जणांच्या प्रार्थना आपल्याला लढायला प्रोत्साहित करतात," असं मचाडो म्हणतात.
जुलै 2024 च्या निवडणुकांनंतर त्या बोलत होत्या. या निवडणुकीत निकोलस मादुरो यांना विजेता घोषित करण्यात आलं. या निवडणुकीत गडबड केल्याचा आणि फसवणूक झाल्याचा काहीजणांनी आरोप केला होता.
आंतरराष्ट्रीय समुदायाने मादुरो यांच्या या विजयाचा तपशील जाहीर करण्याचे आवाहन केले होते. तरीही सरकारी पक्षाशी संबंधित नॅशनल इलेक्टोरल कौन्सिलने (सीएनइ) मादुरो यांच्या विजयाचा तपशीलवार निकाल कधीच जाहीर केला नाही.
सीएनइने मादुरो विजयी झाल्याची घोषणा केल्यावर एका तासाच्या आतच, मचाडो समोर आल्या आणि त्यांनी त्यांचे उमेदवार एडमुंडो गोन्झालेझ उरुटिया यांनी निवडणूक जिंकल्याचा दावा केला. त्यासाठी आपल्याकडे पुरावे असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मचाडो, यांनी आपले राजकीय जीवन निवडणूक निरीक्षण संस्थांमध्ये सुरू केलं होतं. यावेळी त्यांनी इतर विरोधी कार्यकर्त्यांसोबत मिळून स्वयंचलित मतदान प्रणालीवर देखरेख ठेवली होती.
यामुळे त्यांना अधिकृत नोंदी वापरून एक स्वतंत्र मतमोजणी करण्याची संधी मिळाली, जी त्यांच्या साक्षीदारांनी सुरक्षित ठेवली होती.
यामुळे विरोधी पक्षाने 'मादुरोंची फसवणूक' (मादुरोज फ्रॉड) उघडकीस आणली. त्यांनी सादर केलेल्या ठोस पुराव्यांवरून अमेरिकेसारख्या देशांनी एडमुंडो गोन्झालेझ यांना विजेता म्हणून मान्यता दिली.
मचाडो यांनी आपल्या समर्थकांना दिलेल्या संदेशात म्हटलं, "जिंकायला बराच वेळ लागला आणि विजय मिळवल्याची घोषणा करायला देखील वेळ लागू शकतो. म्हणून आपल्याला सहनशक्ती ठेवावी लागेल. आपल्याला लोकांजवळ राहावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की आपण त्यांना सोडणार नाही. कारण आपण शेवटपर्यंत लढणार आहोत."
'शेवटपर्यंत' हे त्यांचं घोषवाक्य बनलं. यामुळे मचाडो लोकांचे तारणहार आणि विरोधी आघाडीच्या नेत्या बनल्या. विरोधी पक्ष काही वर्षांपर्यंत त्यांना त्रासदायक समजत होता. कारण त्या मादुरो सरकारशी चर्चेला विरोध करत होत्या, निवडणूक प्रक्रियेवर टीका करत होत्या आणि आंतरराष्ट्रीय लष्करी हस्तक्षेपाच्या बाजूने होत्या.
पण मचाडो यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, ते बदलेले आहेत- जसं लाखो व्हेनेझुएलाचे लोक बदललेत:
"आपण खूप चुका केल्या आहेत. जेव्हा चुका त्या गोष्टीवर विश्वास ठेवून, सर्व माहिती नसल्यामुळे, किंवा परिस्थितीचं खरे स्वरूप न ओळखल्यामुळे होतात, तेव्हा त्यातून शिकायला हवं."
"आपण स्वतःचा शोध घेत आहोत. आम्हाला कळलं आहे: 'अरे, मी हे करण्यास सक्षम आहे.'"
चाव्हिझमविरुद्ध आणि विरोधकांसाठी लढणाऱ्या
मारिया कोरिना मचाडो पारिस्का यांना तीन मुलं आहेत. त्या चार बहिणींमध्ये सर्वात मोठ्या आहेत.
मचाडो यांचे वडील मेटल (धातू) उद्योगातील प्रतिष्ठित व्यापारी होते. ह्यूगो चावेझ यांनी (मादुरोंच्या आधीचे अध्यक्ष) त्यांच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केलं होतं.
त्यांची आई प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि टेनिस खेळाडू आहेत.
औद्योगिक अभियंता आणि आर्थिक विषयातील तज्ज्ञ असलेल्या मारिया मचाडो यांनी त्यांच्या व्यवसायात काम केलं. त्यानंतर दारिद्र्य कमी करणं आणि निवडणूक निरीक्षण करणाऱ्या संघटनांमध्ये काम करायला सुरुवात केली.
नंतर, त्या अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या जवळ गेल्या. अमेरिकेत त्या राहिल्या होत्या आणि तिथे त्यांचे राजकीय संबंध आणि संपर्क अजूनही होते.

फोटो स्रोत, Getty Images
चाव्हिझमने त्यांना नेहमीच 'साम्राज्यवादी राज्यद्रोहाच्या भागीदार' म्हणून पाहिलं.
त्यांनी अमेरिकेतील काही फाऊंडेशन्सकडून अवैधरित्या पैसे मिळवल्याचा त्यांच्यावर सर्वात प्रथम आरोप करण्यात आला. ज्यामुळे त्यांना 3 वर्षांसाठी प्रवासावर बंदी घालण्यात आली होती.
2010 मध्ये, त्या स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून नॅशनल असेंब्लीमध्ये गेल्या आणि साम्यवादी विरोधी (अँटी कम्युनिस्ट) संदेश दिला. 2012 मध्ये, विरोधी पक्षाच्या अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकीत हेनरिक कॅप्रिल्सकडून पराभूत झाल्या.
अपात्र ठरवण्यात आल्यामुळे, मचाडो गेल्या 10 वर्षांपासून व्यवस्थेबाहेरून राजकारण करत आहेत. 2014 मध्ये लिओपोल्डो लोपेज यांच्यासोबत मादुरो यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रचार केला. 2017 व 2019 मध्ये न्यायालयीन आंदोलनांना पाठिंबा दिला.
सर्वात प्रथम सरकारला त्यांनी 'हुकूमशाह' म्हटलं. चाव्हिस्मोशी वाटाघाटीचे सर्व प्रयत्न नाकारले.
यामुळे आणि अटकेच्या धमक्यांना न जुमानता देशात राहण्यावर ठाम राहिल्यामुळे, तसेच कदाचित त्यांच्या कुटुंबाचा धातू उद्योगाशी असलेल्या संबंधांमुळे त्यांना 'आयर्न लेडी' हे नाव मिळालं.
कॅप्रिलेस, लोपेज आणि जुआन गुएदो यांच्या नेतृत्वाचा प्रभाव कमी होत असताना, त्या मादुरोंच्या विरोधात उभे राहण्यासाठी या पिढीतील शेवटचा पर्याय म्हणून उदयास आल्या.
लोकांशी एक नवं नातं
शैक्षणिक वर्तुळात असं म्हटलं जातं की, व्हेनेझुएलाच्या लोकांची राजकीय संस्कृती मजबूत, बलवान नेत्यांवर (कौडिलिस्ता) आधारित आहे. सिमॉन बोलिव्हरपासून सुरुवात केल्यास, 19व्या आणि 20व्या शतकात अनेक व्यक्तिवादी आणि पितृसत्ताक नेतृत्त्व दिसून येतं.
जरी ही संस्कृती यापूर्वीपासून अस्तित्वात असली तरी, अनेकजण तिचा मूळ स्रोत तेलाचा शोध आणि नंतरच्या राष्ट्रीयीकरणाशी जोडतात. हे एक साधन 'जादुई राज्य' या कल्पनेला चालना देतं, जे प्रत्येक व्हेनेझुएलाच्या नागरिकाची काळजी घेत असे.
ह्यूगो चावेझ, त्यांच्या स्वत: च्या मार्गाने आणि ठराविक कारणांसाठी, याचे शेवटचे प्रतिनिधी होते.
मचाडो या विरुद्ध विचारसरणीच्या आणि एक महिला म्हणून, त्याच राजकीय संस्कृतीचा वापर करून लोकांशी नवीन प्रकारे जोडण्याचा मार्ग सुचवतात.
2024 च्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान त्यांच्या मोठ्या सभांमधून हे स्पष्टपणे दिसून आलं. पुरुष, महिला आणि मुलं, सर्व सामाजिक स्तरातून त्यांना मोठं समर्थन मिळालं. लोकांनी त्यांना मिठी मारली, त्यांच्या हाताचं चुंबन घेतलं.
त्यांनी त्यांना 'माय लव्ह', 'माय क्वीन', 'टेक केअर, माय गर्ल' असं संबोधलं. ते त्यांना मुलगी, आई आणि आजी म्हणून पाहत होते. त्यांनी त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.
त्यांनी त्यांचं कौतुक आणि आदर केला. कारण त्या 'धैर्यशील', 'साहसी आणि ठाम' होत्या.
13 जानेवारी 2012 रोजी, अध्यक्ष ह्यूगो चावेझ यांनी नॅशनल असेंब्लीसमोर वार्षिक भाषण दिले.
त्यावेळी निवडून आलेले लोक प्रतिनिधी प्रश्न विचारत होते. त्यावेळी एका 44 वर्षीय विरोधी महिला सदस्याचा ठाम आणि धीट आवाज असेंब्लीत घुमला.
त्यांनी ठाम शब्दांत विचारलं, "तुम्ही खासगी मालमत्तेचा आदर करा कसं म्हणू शकता, तुम्ही तर ते जप्त करत आहात, म्हणजेच चोरी करत आहात?"
त्यावर चावेझ हे काही वेळ शांत राहिले आणि नंतर सत्ताधारी पक्षांनी सुरू केलेल्या गोंधळातच उत्तर दिलं: "मी सुचवतो की, तुम्ही प्राथमिक (प्रायमरी) निवडणुका जिंका डेप्युटी (मारिया मचाडो), कारण तुम्ही माझ्याशी वाद घालण्याइतपत मोठे नाहीत."
पुन्हा काही क्षण ते शांत राहिले. मग म्हणाले, "गरुड माशीची शिकार करत नाहीत, डेप्युटी."
बारा वर्षांनंतर, मचाडो यांनी प्राथमिक निवडणुका 95 टक्के मतांसह जिंकल्या आणि एडमुंडो गोन्झालेझ उरुटियांसोबत राष्ट्राध्यक्ष निवडणूक 70 टक्के मतांसह जिंकली. हे त्यावेळी त्यांनी जगासमोर सादर केलेल्या अधिकृत नोंदींनुसार आहे.
आणि नॉर्वेजियन समितीच्या मते, त्यांना हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष काम केल्याबद्दल जाहीर करण्यात आला आहे.
मग त्या माशीपासून गरुड बनल्या, आता त्या व्हेनेझुएलाच्या बहुसंख्य लोकांच्या हृदयात आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











