ट्रेनच्या डब्यात कोंबलं आणि दार बंद केलं, 70 जणांचा गुदमरून जीव गेला; मुस्लिमांच्या दुर्लक्षित योगदानाची कहाणी

केरळमधील तिरूर शहरात मेमोरियल हॉल कॉम्प्लेक्समध्ये एका मालवाहू डब्याचं (वॅगन) मॉडेल ठेवण्यात आलं आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केरळमधील तिरूर शहरात मेमोरियल हॉल कॉम्प्लेक्समध्ये एका मालवाहू डब्याचं (वॅगन) मॉडेल ठेवण्यात आलं आहे
    • Author, सेव्हियर सेल्वकुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

(इशारा: या लेखातील काही माहिती विचलित करणारी असू शकते.)

'दक्षिण भारतातील जालियनवाला बाग' म्हणून ओळखली जाणारी 'रेल्वे वॅगन ट्रॅजेडी' भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कुठेतरी हरवली आहे.

मलबारमध्ये मोपला दंगल झाली होती. मलबार प्रदेश हा ब्रिटिश राजवटीतील मद्रास प्रांतात होता. आता हा प्रदेश तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये आहे.

या दुर्घटनेत, शेकडो लोकांना मालवाहू डब्यामध्ये कोंबून आजच्या तामिळनाडूतील (ब्रिटिशांच्या काळातील मद्रास प्रांत) कोईंबतूरला पाठवण्यात आलं होतं. काही इतिहासकार या घटनेचं वर्णन ब्रिटिश राजवटीविरोधातील मुस्लीम बंड किंवा उठाव असं करतात.

मालवाहू डब्यामध्ये लोकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे गुदमरून 70 जणांचा मृत्यू झाला होता. कारण तो मालवाहू डबा असल्यामुळे त्यात हवा किंवा प्रकाश अजिबात येत नव्हता.

लेखक या दुर्घटनेचं वर्णन इंग्रजीत 'वॅगन ट्रॅजेडी' असं करतात. तर मल्याळी भाषेत या दुर्घटनेला 'बरवंडी मन होमम' असं म्हटलं जातं.

"त्यांनी आम्हाला बंदूकीची भीती दाखवली आणि एखाद्या उशीत कोंबावं तसं रेल्वेच्या मालवाहू डब्यात कोंबलं आणि डब्याचे दरवाजे बंद केले. डब्याच्या आत उभं राहायलादेखील जागा नव्हती."

"तहानेनं व्याकुळ होत आम्ही ओरडलो. तहान सहन झाली नाही, म्हणून काहीजणांनी लघवी प्राशन केली. काहीजण बंधूभाव विसरले, त्यांनी विवेक गमावला आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांवर हल्ला केला."

"काही जणांनी डब्यातील खिळा निघाल्यानं पडलेल्या छोट्या छिद्रातून येणाऱ्या हवेतून श्वास घेतला. आम्ही बेशुद्ध पडलो. आम्हाला जेव्हा शुद्ध आली, तेव्हा आमच्यावर चार-पाच जण मृतावस्थेत पडलेले होते."

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, (प्रतीकात्मक फोटो)

पुढे बोलताना ते म्हणाले, "पोदानूरला आमचा डबा उघडला तेव्हा आतील भयावह दृश्य सैतानालाही हादरवून टाकणारं होतं. डब्यामध्ये 64 जण मृतावस्थेत, रक्तस्त्राव होत असलेले आणि जखमी अवस्थेत आढळले."

"रेल्वे जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवर आणखी काही जणांचा मृत्यू झाला. तर कोईंबतूरच्या हॉस्पिटलमध्ये काहीजण मृत्यू पावले. डब्यातील आम्ही फक्त 28 जण वाचलो."

हे शब्द आहे कोनोला अहमद हाजी यांचे. 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर 2021 ला घडलेल्या दुर्दैवी 'वॅगन ट्रॅजेडी'चा त्यांच्यावर थेट परिणाम झाला होता.

मल्याळी लेखक थिरूर दिनेश यांनी 'मोपला रायट्स' (मोपला दंगल) हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी अहमद हाजी यांच्या अनुभवांबद्दल लिहिलं आहे. अहमद हाजी हे केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कोट्टापाडीचे रहिवासी आहेत.

तिरूरमधील शहिदांच्या नावांचा दगडी फलक

केरळमधील तिरूर इथं या दुर्घटनेत मृत्यूमुख पडलेल्या 70 जणांच्या स्मरणार्थ एक फलक उभारण्यात आला आहे. मात्र जिथे या सर्वांचा मृत्यू झाला त्या कोईंबतूरमधील पोदानूरमध्ये तिथे कोणतंही स्मारक नाही.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात घडलेल्या विविध घटना अनेक भाषांमध्ये विशेष पुस्तकं, पाठ्यपुस्तकं आणि ऐतिहासिक संशोधनातून समोर आल्या आहेत. त्यावर लिहिलं गेलं आहे.

वॅगन ट्रॅजेडीत मृत्यूमुखी पडलेल्या नावांचा फलक
फोटो कॅप्शन, वॅगन ट्रॅजेडीत मृत्यूमुखी पडलेल्या नावांचा फलक

मात्र इतिहासकारांचं म्हणणं आहे की 'वॅगन ट्रॅजेडी'च्या या सामूहिक हत्याकांडाच्या कोणत्याही विशेष नोंदी, दस्तावेज नाहीत.

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तिरूर रेल्वे स्टेशनावर सुरू झालेल्या आणि तामिळनाडूतील कोईंबतूर जिल्ह्यातील पोदानूर रेल्वे जंक्शनपर्यंत घडत गेलेल्या या शोकांतिकेत 70 जणांचा जीव गेला होता.

त्या दोन दिवसांत नेमकं काय घडलं होतं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर 2021 ला घडलेल्या या घटनेबद्दल विविध पुस्तकांमधून थोडा उल्लेख करण्यात आला आहे. तिरूर दिनेश यांनी 'मोपला रायट्स' (मोपला दंगल) हे पुस्तक इंग्रजी आणि मल्याळी भाषेत लिहिलं आहे. या पुस्तकात या 'वॅगन ट्रॅजेडी'ची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

तिरूर दिनेश यांनी या दंगलीतील पीडितांच्या मुलाखती, विविध दैनिकांमधील लेख, न्यायालयीन कागदपत्रं आणि ब्रिटिश सरकारच्या अधिकृत कागदपत्रांमधील नोंदीच्या आधारे 'मोपला रायट्स' (मोपला दंगल) हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

या 'वॅगन ट्रॅजेडी'बद्दल तिरूर दिनेश बीबीसीशी बोलले.

तिरूर दिनेश म्हणाले, "त्याकाळी, मलप्पुरम हा मद्रास प्रांताचा भाग होता. मोपला दंगल जेव्हा शिगेला पोहोचली होती, तेव्हा ब्रिटिश सैन्य आणि मलबार विशेष पोलीस दलानं त्याचं दमन करण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली होती."

"या लोकांना मालगाडीच्या डब्यांमध्ये भरण्यात आलं आणि अंदमान, मद्रास (आताचं चेन्नई), कोईंबतूर, कन्नानोर आणि इतर ठिकाणी पाठवण्यात आलं. या सर्व कारवाईचा भाग म्हणूनच अनेक जणांना जेव्हा कोईंबतूरला पाठवण्यात येत होतं, तेव्हाच ही घटना घडली."

तिरूर दिनेश यांनी लिहिलेलं 'मोपला रायट्स' हे पुस्तक

फोटो स्रोत, Tirur Dinesh

फोटो कॅप्शन, तिरूर दिनेश यांनी लिहिलेलं 'मोपला रायट्स' हे पुस्तक

ते पुढे म्हणाले, "19 नोव्हेंबर 1921 ला शंभराहून अधिक लोकांना मालवाहू डब्यात चढवण्यात आलं. मालगाडीचा डबा असल्यामुळे त्यात हवा येण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे आत कोंबण्यात आलेल्या लोकांना श्वास घेणं कठीण झालं."

तिरूर दिनेश म्हणाले, "मग त्यांनी डब्याच्या छताला असलेल्या छोट्या छिद्रातून श्वास घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी ट्रेन पोदानूरला पोहोचल्यावर डब्याचे दरवाजे उघडण्यात आले. त्यावेळेस अनेकजण मृत्यूमुखी पडल्याचं दिसून आलं. काहीजणांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये नेल्यावर झाला."

"या घटनेत एकूण 70 जणांचा मृत्यू झआला. मात्र या मृतदेहांना पोदानूरमध्येच दफन करण्याची परवानगी देण्याऐवजी, ते त्याच ट्रेननं तिरूरला पाठवण्यात आले."

'1921' या चित्रपटात आहेत वॅगन ट्रॅजेडीची दृश्यं

तिरूरच्या गोरांगड मशीद परिसरातील लोकांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 70 जणांपैकी फक्त 4 जण हिंदू होते. उर्वरित सर्वजण मुस्लीम होते.

तिरूर रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या गोरांगड मशिदीच्या आवारात 44 मृतदेह दफन करण्यात आले. तर कोट जुम्मा मशिदीच्या आवारात 11 मृतदेह दफन करण्यात आले. तिथे त्यांच्या नावांच्या दगडी पाट्या लावण्यात आल्या. उर्वरित मृतदेह इतरत्र दफन करण्यात आले.

केरळमधील मेमोरियल हॉल
फोटो कॅप्शन, केरळमधील मेमोरियल हॉल

केरळमधील पत्रकार प्रमोद म्हणाले की मृत पावलेल्या 4 हिंदूंवर तिरूर शहराच्या बाहेरील भागात असलेल्या मुत्तूर भागात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या 70 शहिदांच्या स्मरणार्थ, तिरूर नगरपरिषदेनं शहराच्या मध्यवर्ती भागात 'वॅगन ट्रॅजेडी मेमोरियल टाऊन हॉल' बांधला.

1993 मध्ये या दुर्दैवी घटनेची आठवण म्हणून तिथे रेल्वेचं चिन्हदेखील बसवण्यात आलं.

बीबीसीच्या टीमनं या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली आणि तिथल्या लोकांशी संवाद साधला.

1988 मध्ये '1921' हा मल्याणी चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो 'वॅगन ट्रॅजेडी'मधील घटनांवर आधारित होता. या चित्रपटात मम्मूटी, गोपी, पार्वती जयराम, उर्वशी, सीमा आणि इतर अभिनेत्यांनी अभिनय केला होता. हा चित्रपट मोपला दंगलीवर आधारित आहे.

'मोपला'ची पार्श्वभूमी काय आहे?

मलप्पुरम (मलबार) आणि त्याच्या आसपासच्या भागातील मुस्लीम समुदायाच्या विशिष्ट वर्गाला 'मोपला' असं म्हणतात.

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1920 च्या दशकात या भागात हिंदू-मुस्लीम संघर्ष झाला. तसंच ब्रिटिश सरकारविरोधात मुस्लीम समुदायानं आंदोलनदेखील केलं. या सर्व गोष्टींना एकत्रितपणे 'मोपला दंगल' म्हटलं जातं.

लेखक तिरूर दिनेश
फोटो कॅप्शन, लेखक तिरूर दिनेश

मोपला रायट्स या पुस्तकाचे लेखक तिरूर दिनेश बीबीसीला म्हणाले,

"मोपला दंगलीशी संबंधित विविध ठिकाणांना भेट देण्यात, शेकडो लोकांना भेटण्यात, ब्रिटिश सरकारी कार्यालयांमधून अधिकृत कागदपत्र मिळवण्यात आणि मोपला दंगलीवर पुस्तक लिहिण्यात मी जवळपास 25 वर्षे खर्च केली आहेत."

"सर्वसाधारणपणे 'मोपला दंगली'वर दोन मतप्रवाह असतात...पहिलं मत म्हणजे, तो ब्रिटिश सरकारविरोधात मुस्लीम समुदायाचा संघर्ष होता. तर दुसरं मत आहे की तो जमीन वाचवण्यासाठी केलेला संघर्ष होता."

"मी अतिशय काळजीपूर्वक या दोन्ही दृष्टीकोनांचा अभ्यास केला आहे आणि त्यांची नोंद या पुस्तकात केली आहे."

'हे दक्षिण भारतातील जालियनवाला बाग हत्याकांड'

"भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेस जालियनवाला बाग हत्यांकाड झालं होतं. ही घटना दक्षिण भारतातील जालियनवाला बाग हत्याकांडच आहे. कोलकात्यात झालेल्या 'ब्लॅक होल ट्रॅजेडी' पेक्षाही ती भयावह आहे. या घटनेबद्दल फार कमी ऐतिहासिक नोंदी आहेत," असं लेखक आणि इतिहासकार सी. आर. इलांगोवन यांनी बीबीसीला सांगितलं.

ते पुढे म्हणाले, "1920 च्या दशकात गांधीजी खिलाफत चळवळीत सहभागी होऊन ब्रिटिश सरकारविरोधात लढा देत होते. त्यावेळेस मलबार भागात संघर्षाची सुरुवात झाली. मलबारमधील कष्टकरी आणि लढवय्या मुस्लिमांनी ब्रिटिश राजवटीविरोधात बंड केलं."

"त्यामुळे ब्रिटिश सरकारनं सैन्य आणि मलबार विशेष पोलीस दल तैनात केलं. त्यांनी केलेल्या गोळीबारात अनेकजण मारले गेले. ही वॅगन ट्रॅजेडीदेखील त्याचाच परिणाम म्हणून घडली."

त्यावेळेस रेल्वेची मालकी मद्रास सदर्न मराठा या एका खासगी कंपनीकडे होती. लेखक म्हणतात की कोलकात्याहून तिरूरला येणाऱ्या एका ट्रेनला एक मालवाहू डबा जोडण्यात आला. त्यात अनेक जणांना कोंबण्यात आलं.

लेखक सी. आर. इलांगोवन
फोटो कॅप्शन, लेखक सी. आर. इलांगोवन

लेखक एलांगोवन म्हणतात की अशा रितीनं शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या डब्यात गुदमरून आणि तहानेनं न्याकुळ होत 70 जणांचा मृत्यू झाला. त्यांनी खुलासा केला की त्यावेळच्या वृत्तपत्रांनी या दुर्दैवी घटनेवर टीका करणाऱ्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या.

लेखक म्हणतात की अशी अत्याचाराच्या घटनांना जबाबदार असणाऱ्या फार थोड्या अधिकाऱ्यांना नाममात्र शिक्षा देम्यात आली. मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 300 रुपयांची भरपाई देण्यात आली.

व्ही एस मोहम्मद अमिन समरसम मासिकाचे मुख्य संपादक आहेत. त्यांनी आरोप केला आहे की या 'वॅगन ट्रॅजेडी'त मारले गेलेले 66 जण मुस्लीम समुदायातील होते, त्यामुळे हा इतिहास मोठ्या प्रमाणात लपवण्यात आला आहे.

व्ही एस मोहम्मद अमिन, समरसम मासिकाचे मुख्य संपादक
फोटो कॅप्शन, व्ही एस मोहम्मद अमिन, समरसम मासिकाचे मुख्य संपादक

"ती दुर्दैवी घटना घडून शंभर वर्षे होऊन गेली आहेत. मात्र आता देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील मुस्लीम समुदायाचं योगदान पूर्णपणे विसरण्यात आलं आहे. त्याचं विकृतीकरण केलं जातं आहे," असं अमिन बीबीसीला म्हणाले.

अमिन म्हणाले की तिरुवरूरमध्ये दफन करण्यात आलेल्या 55 जणांच्या कबरींवर सध्या देखभालीचं काम सुरू आहे. मशीद पुन्हा बांधली जाईल, तेव्हा या कबरी तिथे असतील की नाही हे त्यांना माहित नाही.

त्यांनी केरळ सरकारला विनंती केली की या घटनेत जे मारले गेले, त्यांच्या बलिदानाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी तिथे एक स्मारक बांधण्यात यावं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)