'विठाई, तुकाई, ज्ञानाई, शिवबा, संभाजी, भीम'; या एकेरी उल्लेखात अपमान आहे की आत्मीयता? - ब्लॉग

    • Author, प्रा. डॉ. मृणालिनी आहेर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

(लेखिका प्रा. मृणालिनी आहेर यांनी 2023 साली कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाचा संदर्भ दिल्यानं त्यांच्याविरोधात काहींनी आक्षेप घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंतिमत: कोर्टानं डॉ. मृणालिनी आहेर यांच्या बाजूनं निर्णय देत पोलिसांना फटकारलं होतं. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्या या लेखातून त्यांचं मत मांडत आहेत. लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर 13 जुलैला अक्कलकोट या ठिकाणी काही माथेफिरूंनी हल्ला करून त्यांच्या तोंडाला शाई फासली. हे बिनडोक कृत्य शिवधर्म फाउंडेशनचा नेता म्हणवणारा दीपक काटे व काही कार्यकर्त्यांनी केल्याचे निदर्शनास आले.

दीपक काटे हा आरोपी सध्या सरकारमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचेही काम पाहतो. शिवधर्म फाउंडेशनच्या म्हणण्याप्रमाणे 'संभाजी ब्रिगेड' असे संघटनेचे शीर्षक असू नये, तर ते धर्मवीर किंवा धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे ब्रिगेड असे असावे असा त्यांचा दुराग्रह होता. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी दहशत पसरवणारी आंदोलनेही केली.

अशा प्रकारच्या तथाकथित धर्माभिमानी व निरर्थक मागण्यांसाठी रस्त्यावर राडे करणारे तरुण जेव्हा नोकऱ्या, दर्जेदार भयमुक्त शिक्षण, आरोग्य विषयक सुविधा, पर्यावरणाचे जतन, संवैधानिक मुल्यांची जपणूक व अनुनय यासाठी आंदोलने करतील. तसेच भ्रष्टाचार, महागाई व अनेक बेकायदेशीर बाबींच्या विरोधात सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला लागतील. त्यावेळेस या देशात क्रांती घडून यायला वेळ लागणार नाही.

तरुण-तरुणींची ताकद, ऊर्जा सकारात्मक व रचनात्मक कामांच्या उभारणीसाठी वापरली गेली, तर आपला अनुनय करणारे भोंदू भक्त उरणार नाहीत, याची भीती नेहमीच सत्ताधाऱ्यांना आणि कावेबाज राजकारण्यांना वाटत असते. म्हणून ते तरुणांना निरर्थक मुद्द्यांवर झुंजवत ठेवतात. तसेच सतत उचकवत असतात.

भारतीय संविधानाचा अभ्यास करून त्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही राहणे हा सर्व सामाजिक व राजकीय कुटनीतीवरील जालीम उपाय आहे, हे राजवैभव कांबळेसारख्या तरुण संविधान संवादकाने आपल्या अनेक कृतींमधून सिद्ध केले आहे.

प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला शाई फासणाऱ्या प्रवृत्ती व मी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचा संदर्भ दिल्याने माझी गाडी फोडून माझे मॉब लिचिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती या एकच आहेत.

अशा हिंसक घटनांचा नुसताच निषेध करून चालणार नाही; तर वैचारिक-कायदेशीर लढायांबरोबरच रस्त्यावरची लढाई लढून मोठी जनआंदोलनं उभी करण्याची निकड निर्माण झाली आहे.

विधानसभेत जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर अशा प्रवृत्ती जोर धरणार, याची ही एक कुझलक आहे. बहुजनांच्या बेरोजगार पोरांना हाताशी धरून, त्यांची माथी भडकवून, कटकारस्थानं करून सामाजिक वातावरण दूषित करणे आणि मुख्य प्रश्न व समस्यांवरचे जनसामान्यांचे लक्ष भरकटवणे यासाठी अशा घटना घडवून आणल्या जातात.

यात बहुजनांच्या पोरांचा पपेटस् म्हणून वापर केला जातो, हे यांना केव्हा कळणार? बहुजनांची पोरं गुडघ्यातला मेंदू डोक्यात आणून विचार कधी करणार?

'संभाजी ब्रिगेड' या संघटनेचे नाव बदला म्हणणाऱ्या धर्मांध तरुणांना संभाजी महाराज 'धर्मवीर' व 'धर्मरक्षक' होते, या मांडणीपलीकडे त्यांच्याबद्दल काय माहिती आहे, हे विचारण्याची गरज आहे.

मुस्लीम द्वेष पसरवण्यासाठी वरील दोन शब्दांचा वापर सातत्याने काही हिंदुत्ववादी संघटनांकडून होत असतो. मात्र तरुणांनी संभाजी महाराज जसे शूर योद्धे होते तसेच ते संस्कृत व ब्रज भाषेचे अभ्यासक होते हे समजून घेतले पाहिजे.

'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. राजकारण व प्रशासनावरचा हा ग्रंथ समजावून घ्यायला हवा. त्यांनी रचलेल्या कविता वाचायला हव्यात. त्यांचे मित्र कवी कलश यांच्या बरोबरची काव्य-शास्त्र विनोदावरील चर्चा समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. संभाजी महाराजांची युद्धनीती अभ्यासायला हवी.

पुरुषी अहंकारात बुडालेल्या तरुणांनी संभाजी महाराज व त्यांची पत्नी येसूबाई यांच्यातलं मैत्रीचं नातं समजावून घ्यायला हवं. येसूबाईंना शिवाजी व संभाजी महाराजांनी राज्याची राजमुद्रा देऊन राज्याचा कारभार पाहण्याचा अधिकार दिला होता. येसूबाईंची नेमणूक त्यांनी 'कुलमुखत्यार'पदी केलेली होती. तसेच संभाजी महाराज येसूबाईंना 'श्री सखी राज्ञी जयती' असे आदरपूर्वक संबोधत.

खरे तर आजघडीला महामानवांचे विचार समजावून न घेता नको त्याच गोष्टींचा मोठा बभ्रा केला जातो. 'शिवाजी कोण होता?' या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचा मतितार्थ किंवा सार समजावून न घेता किंबहुना बरेचदा ते पुस्तक न वाचताच केवळ शीर्षकावरूनच वादंग माजवण्याचा प्रयत्न केला जातो.

वरील पुस्तकाच्या शीर्षकात एकेरी संबोधन आहे. पण त्यामध्ये आत्मीयता व जवळीक आहे, हे लक्षात घेतले जात नाही. 'लोकराजा, जनतेचा व रयतेचा राजा शिवाजी', 'शिवबा', 'माझं राजं शिवाजी राजं' यासारखी संबोधने किंवा 'होता जीवा म्हणून वाचला शिवा' यासारख्या म्हणी किंवा 'मालवण पाण्यामध्ये किल्ला, शिवाजी आत कसा गेला' यासारखी लोकगीते यामध्ये हा प्रेमाचा आपलेपणा जाणवतो.

'शिवाजी विद्यापीठ', 'शिवाजी टर्मिनस', इत्यादी अशा उल्लेखांमध्ये संक्षिप्त रूपं न करता आवर्जून 'शिवाजी' हे नाव घेतलेले दिसते कारण शीर्षक लांबलचक असेल तर त्याचा अपभ्रंश करण्याकडे कल दिसतो.

काही जण C.S.T. असा उल्लेख थोडक्यात करतात. प्रत्येक वेळेस 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' म्हणत नाहीत. 'शिवाजी' हे यदुनाथ सरकारांचं पुस्तक आहे. 'शिवाजी - जीवन आणि काळ' हे गजानन मेहंदळेंचं पुस्तक आहे. 'राजा शिवाजी' हे म.म. कुंटे लिखित खंड काव्य आहे.

पंढरीच्या विठ्ठलाला 'विठाई', 'माऊली', 'विठू' अशी संबोधने आहेत. तसेच 'विठू माझा लेकुरवाळा' यासारखं भक्ती गीत आपण गातो. त्यामध्येही विठ्ठलाप्रती असणारी प्रेम व श्रद्धा असते. डॉ. भीमराव आंबेडकरांवर तर शेकडो भीमगीते लिहिली गेली. कित्येक गीतांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख येतो तो केवळ त्यांच्यावरील अपार प्रेम व निष्ठेतून.

उदाहरणार्थ, शाहीर संभाजी भगत यांचं गीत, 'माझा भीम मला भेटला गं बाई' किंवा वामनदादा कर्डकांचं 'उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे' अशी गीते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून लिहिलेली आहेत.

यामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख प्रेमाने 'भीम' असा एकेरी आहे. त्यामध्ये आक्षेपार्ह असं काही नाही. तसेच, तसा खोट्या अस्मितेचा मुद्दाही त्याला कुणी बनवत नाही. संतांचा उल्लेख करताना माझी 'तुकाई' तसेच माझी 'ज्ञानाई माऊली' असा केला जातो. त्यात अपमान नसून अधिक आत्मीयता असते.

शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाच्या बाबतीत अति संवेदनशील असणाऱ्यांनी शिवाजी महाराज जाणून घेतलेत का? वाचलेत का?

महाराजांच्या राजनीतीचा अभ्यास ही तर खूप दूरची गोष्ट, पण शिवाजी महाराजांबद्दलच्या लोककल्याणकारी राजा म्हणून असणाऱ्या काही प्राथमिक स्वरूपाच्या गोष्टी तरी या भोंदू भक्तांना माहिती आहेत का?

याबाबत 'शिवाजी कोण होता?' या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकामध्ये काही उदाहरणे सांगितली आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांबद्दलचा राजा म्हणून असलेला आदर दुणावतो.

स्त्रियांच्या सन्मानाबाबतीत शिवाजी महाराज सदैव डोळ्यात तेल घालून असायचे. रांझ्याच्या पाटलाचे उदाहरण तर सर्वज्ञात आहेच. काही लोक शिवाजी महाराजांचे भोंदू भक्त किंवा अंधभक्तच आहेत. त्यांना शिवाजी महाराज हे लोकोत्तर व्यक्तिमत्व कळालेलेच नाही.

महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करताना हेच भोंदू भक्त दारू पिऊन, डॉल्बी लावून मिरवणुकीत नाचतात, आई-बहिणीवरून शिव्या देतात, शिक्षण अर्धवट सोडून, पालकांना दमदाटी करून आयतोबा होऊन जगत असतात.

ज्ञान संपादन करणे, विवेकाने वागणे, परिश्रम घेऊन स्वतःचे आयुष्य घडविणे, आपले भवताल सकारात्मक पद्धतीने बदलविण्याचा प्रयत्न करणे यांपासून ते कोसो मैल दूर असतात. कुठलातरी बुवा बाबा, गुरुजी, महाराज किंवा कावेबाज पुढारी या तरुणांना हेरून त्यांना आपल्या भजनी लावतात.

धर्म द्वेष, जाती द्वेष, संस्कृती द्वेष व व्यक्ती द्वेषांनी या तरुणांची कोवळी मनं ते नासवतात. चुकीचा इतिहास सांगून मेंदू बधीर करतात. मन आणि मेंदू बधीर झालेली ही मुलं-मुली या दांभिक कावेबाजांच्या इशाऱ्यावर काम करतात. 'सांस्कृतिक दहशतवाद' पसरवतात, शिक्षण संकुले ताब्यात घेऊन दडपशाही करतात.

निवडणुका आल्यानंतर हेच कावेबाज राजकारणी या तरुणांचा वापर करून घेतात. लोचट कुत्र्यासमोर तुकडा फेकावा त्या पद्धतीने ते या तरुणांना दारू मटन व गाडी देऊन प्रचारासाठी, सभेसाठी फिरवतात.

आम्हाला हे सर्व नको, कारण, ते तात्कालिक आहे. आम्हाला नोकरी द्या, व्यवसायासाठी अल्पव्याजदरात कर्ज द्या, विविध व्यवसायांचं प्रशिक्षण द्या, दर्जेदार व्यवसायाभिमुख असे शिक्षण, प्रशिक्षण तसेच सुरक्षित सामाजिक वातावरण आम्हाला द्या, अशा प्रकारच्या मागण्या तरुण तरुणींनी करणे आवश्यक आहे.

पण तसे होत नाही. कुठल्यातरी पुढार्‍याची 'की जय' म्हणण्यात यांची हयात जाते. संपूर्ण आयुष्य अंधारात चाचपडण्यात व दारिद्र्याला तोंड देत देत ते व्यथित करतात. त्यातून बरेच जण व्यसनी बनतात.

'स्वाभिमान व स्वावलंबन' त्यांच्या डोक्यातून केव्हाच हद्दपार झालेले असते. धर्माच्या ठेकेदारांचा व संधी साधू राजकारण्यांचा उद्देश सफल होतो. बहुजन समाजातील मुलं-मुली निष्क्रिय, बेजबाबदार, हिंसक, आक्रमक व मेंदू गहाण ठेवणारी बनली म्हणजे ते इथल्या अन्यायी व शोषक व्यवस्थेला प्रश्न विचारणार नाहीत. मेंढरासारखे गप-गुमान सत्ताधाऱ्यांचा अनुनय करत राहतील हाच तर त्यांचा हेतू असतो. तो हेतू सफल करण्यात ते माहीर असतात.

2023 या शैक्षणिक वर्षात काही शैक्षणिक संकुलांमध्ये धार्मिक व 'सांस्कृतिक दहशतवाद' पसरवण्याच्या घटना महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये घडल्या. प्रागतिक विचार विद्यार्थी-विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवणाऱ्या शिक्षकांना प्रामुख्याने लक्ष्य केले गेले.

संवैधानिक व मानवी मुल्ये कृतीत उतरवताना खूप मोठा संघर्ष करावा लागतो. कारण गुडघ्यात मेंदू असणारा मोठा जमाव तुमच्या विरोधात उभा ठाकतो. दुसऱ्या बाजूने तुमच्या समवेत असणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत सुद्धा नसते. अपप्रवृत्तींच्या विरोधात ठामपणे उभे ठाकण्यासाठी तुमच्याजवळ उच्च प्रतीचे मनोबल व नीतीधैर्य असावे लागते.

सामाजिक अपप्रवृत्तींनी कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, पत्रकार गौरी लंकेश व कलबुर्गी यांना शरीराने संपवले; मात्र त्यांचे विचार आपल्याला आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. तेच विचार आपल्याला उक्ती व कृतीतून पुढे न्यायचे आहेत.

गोविंद पानसरे यांची हत्या झाली, पण आजही पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या हजारो प्रती मागवल्या व वाटल्या जातात. या पुस्तकाचे जाहीर वाचन व त्यावर परिसंवाद होतात.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीतला प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला 'मी नरेंद्र दाभोलकर' म्हणून कार्य करण्यास सज्ज झाला. अंनिसचे काम संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शिक्षा सुनावली. मात्र त्यांच्या खुनाचे सूत्रधार अजूनही मोकाट फिरत आहेत.

पत्रकार गौरी लंकेश 'अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी' आयुष्यभर झगडल्या. इथल्या भ्रष्ट व्यवस्थेला त्यांचे झगडणे मान्य नव्हते, त्यांना संपविण्यात आले. पण निर्भयपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते व पत्रकार आजही त्यांचा लढाऊ वारसा चालवत आहेत.

सरकारची हुजरेगिरी व भाटगिरी न करणाऱ्या अनेक पत्रकारांना चॅनेलवाल्यांनी नोकरीवरून काढून टाकले; पण त्यांनी आपला स्वाभिमानी बाणा व सत्यासाठीचा आवाज यांच्याशी तडजोड केली नाही.

प्रत्येक मुळ धर्म 'मानवतेचा संदेश' देतो; पण कट्टर धर्ममार्तंडांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माला विकृत स्वरूप दिले. तसेच धर्माचे बाजारीकरणही केले. संवैधानिक संस्था व न्याय संस्थांचे आस्तित्व स्वतंत्र असणे आवश्यक असते, पण आज या दोन्ही संस्थांवर शासन यंत्रणा ताबा मिळवायला बघते.

लोकशाही व्यवस्थेमधल्या संवैधानिक संस्था व न्यायसंस्था म्हणजे जनसामान्यांचा न्यायिक आधार असतात. त्यांची मुस्कटदाबी म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे असते. वरील दोन्ही संस्थांमध्ये जे संवैधानिक उच्चपदे भूषवित असतात. त्यांची जबाबदारी मोठी असते.

त्यांनी परस्पर हितसंबंध राखण्यासाठी प्रोटोकॉल्स मोडून वर्तन केले, तर जनसामान्य असुरक्षित होतात. पोलीस यंत्रणांना देखील आपल्या कर्तव्याचा व जबाबदारीचा काटेकोर निर्वाह करणे आवश्यक असते; पण या यंत्रणा जनसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी काम करतात की प्रस्थापितांची गुलामगिरी करतात हा प्रश्न निर्माण होतो. भ्रष्ट कारभाराची जी साखळी बनत जाते, त्यात या यंत्रणा एकमेकांना सावरून घेतात.

हुकूमशाही वृत्तीचे शासन जनसामान्यांवर हुकूमशाही लादत असताना वेगवेगळ्या चाचण्या घेत असते; त्याची सुरुवात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून होत असते. तुमची मुस्कटदाबी केल्यानंतर तुम्ही किती आवाज उठवता व कोण कोण आवाज उठवते हे आजमाविण्यासाठी घेतलेली ती एक लिटमस टेस्ट असते.

जो आवाज सत्ताधाऱ्यांच्या अनिर्बंध सत्तेला नडू शकतो तो संपवला जातो. पत्रकार गौरी लंकेश, पथनाट्यकार सफदर हश्मी, तालिबानी हुकुमशाही व मूलतत्त्ववादावर परखड भाष्य करणारी अभिनेत्री सबा सहर, तसलीमा नसरीन, सलमान रश्दी यांच्यासारख्या सर्वांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना आपल्या प्राणांची बाजी लावली.

संभाजी ब्रिगेडचे बरेच कार्यकर्ते व प्रवीण गायकवाड यांना वारंवार धमक्या देण्यात आल्या. तसेच हिंसक कृत्यांच्या आधारे संघटनेचे नाव बदलण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हे सर्वजण आपल्या मताशी ठाम राहून प्रतिकार करत राहिले. भारतीय संविधानाने बहाल केलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा येथील प्रत्येक नागरिकांसाठी अनमोल आहे. त्या हक्कावर कोणी प्रतिबंध लादत असेल, तर प्रतिकार केलाच पाहिजे.

'शिवाजी कोण होता?' या पानसरे लिखित पुस्तकावर कोणतीही बंदी नसताना एक पोलीस अधिकारी मला 'त्याच पुस्तकाचा संदर्भ का दिला?' म्हणून दरडावून जाब विचारतो आणि माफी मागायला सांगतो. तसेच धर्मांध जमावही माझ्यावर जबरदस्ती करून माफीची मागणी करतो.

हा स्पष्टपणे 'सांस्कृतिक दहशतवाद' व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला होता. कुठल्याही प्रकारच्या 'दहशतवादाला' न जुमानता धर्मांधांना भीक न घालता पोलिसांची मुजोरी व प्राचार्यांच्या दडपशाहीला बळी न पडता मी माझ्या माफी न मागण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. माझ्या या कृत्याचा मला आयुष्यभर अभिमान वाटेल.

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निमित्ताने धर्मांध शक्तींचे हिंसक रूप सामोरे आलेले आहे, अशा विध्वंसक शक्तींचा प्रतिकार करताना संविधानासारखे प्रभावी शस्त्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात दिले आहे. त्याचा विवेकी वापर करू या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)