You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बॉर्डर सिनेमात दाखवलेलं 1971 चं भारत-पाकिस्तान युद्ध प्रत्यक्षात कसं लढलं गेलं होतं?
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी हिंदी
हवाई दलाच्या साथीनं एखादा देश युद्ध जिंकू शकतो किंवा कदाचित तसं होणारही नाही. पण हवाई दलाची साथ नसेल तर मात्र पराभव निश्चित समजला जातो.
पाकिस्ताननं 1971 च्या युद्धात एक महत्वाकांक्षी पाऊल उचलत जैसलमेर सेक्टरमध्ये सुमारे 2000 सैनिकांसह टँक घेऊन घुसखोरी केली होती. अचानक हल्ला करून रामगढ आणि जैसलमेरवर ताबा मिळवण्याचा त्यांचा विचार होता.
डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच गब्बरच्या जवळ असलेल्या गावांमध्ये एक अफवा पसरली होती. ती म्हणजे, '4 डिसेंबरचा नाश्ता जैसलमेरमध्ये करणार असा पाकिस्तानचा दावा'.
पाकिस्ताननं 3 डिसेंबरला भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ला करत 'ऑपरेशन चंगेज खान' ची सुरुवात केली होती. भारतीय लष्कराच्या इतिहासात 5 डिसेंबर 1971 हा एक महत्त्वाचा दिवस समजला जातो.
डिसेंबर महिन्यात 4-5 तारखेच्या रात्री लख्खं चांदणं पडलं होतं. लोंगेवालाच्या परिसरात मंद हवा वाहत होती. त्याठिकाणी असलेल्या चौकीवर लष्कराच्या 23 पंजाबच्या अल्फा कंपनीला तैनात करण्यात आलेलं होतं.
हे ठिकाण जैसलमेरपासून 120, रामगडपासून 55 तर आंतरराष्ट्रीय सीमेपासून 20 किलोमीटर अंतरावर होतं.
लोंगेवाला-रामगड रस्त्यावर एका ठिकाणी असलेल्या सपाट भागात हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं. चौकीपासून हेलिपॅड 700 मीटर अंतरावर होतं.
भारतीय सैनिकांकडे दोन मीडियम मशीन गन, 81 एमएमचे दोन मोर्टार, टँकपासून संरक्षणासाठी खांद्यावरून चालवले जाणारे चार रॉकेट लाँचर आणि एक रिकॉयलेस गन होती.
त्यांच्याकडं काही भूसुरुंगही होते, पण तोपर्यंत ते शत्रूच्या मार्गावर पसरवण्यात आलेले नव्हते.
या चौकीची जबाबदारी असलेले मेजर कुलदीप सिंह चाँदपुरी यांनी कॅप्टन धरमवीर भान यांच्या नेतृत्वात काही सैनिकांना पुढं गस्त घालण्यासाठी पाठवलं होतं.
नंतर धरमवीर भान यांनी एअर मार्शल भरत कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, "टँकच्या इंजिनचे हळूहळू येणारे आवाज आणि पुढं सरकण्यामुळं उठणारी कंपनं यामुळं रात्रीची शांतता भंगली होती. हा आवाज नेमका कुठून येत आहे, याचा आम्हाला अंदाजच आला नाही."
"आमची संपूर्ण पलटन बारकाईनं तो आवाज ऐकत होती. आवाज वाढू लागला तेव्हा मी कंपनी कमांडर मेजर कुलदीप चाँदपुरी यांच्याशी वायरलेसद्वारे संपर्क साधला. ते म्हणाले की, कदाचित एखादं वाहन वाळूमध्ये अडकलं असेल. फार विचार करू नका. 'जा झोपा', असे त्यांचे शब्द होते."
मध्यरात्री 12 वाजेनंतर पाकिस्तानचे टँक धरमवीर यांना दिसले. ते टँक अत्यंत कमी वेगानं पुढं सरकत होते आणि त्यांचे लाईटही बंद होतं. हे टँक हळू वेगानं पुढं सरकण्याचं आणखी एक कारण म्हणजे ते रस्त्यावर नव्हे तर वाळूतून पुढं येत होते. सुरुवातीला धरमवीर यांनी कंपनी कमांडरला याबाबत सावध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा संपर्कच झाला नाही.
पहाटे 4 वाजता त्यांचा बटालियन मुख्यालयाशी संपर्क झाला. पाकिस्तानी टँक भारतीय हद्दीत घुसले असून ते लोंगेवालाकडे पुढे सरकत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मेजर चाँदपुरी यांनी बटालियन मुख्यालयाला फोन केला आणि शस्त्रांसह आणखी कुमक मागवली.
पाकिस्तानच्या रणगाड्यांनी साडे बाराच्या आसपास मारा सुरू केला. तारेच्या एका कुंपणाजवळ येऊन रणगाडे थांबलेले होते. त्याठिकाणी माईन्स किंवा भूसुरुंग पसरवले असतील असं त्यांना वाटलं होतं.
डॉक्टर युपी थपलियाल 'द 1971 वॉर अॅन इलस्ट्रेटेड हिस्ट्री' मध्ये लिहितात की, "याचा फायदा उचलत भारतीय सैनिकांनी स्थिती सावरली. सूर्योदय होताच पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौकीवर हल्लाबोल केला."
मेजर जनरल आरएफ खंबाटा यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा अचानक झालेल्या या हल्ल्यानं त्यांना धक्का बसला. त्यांना लगेच परिस्थिती गंभीर असल्याचं आणि त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशी कुमक नसल्याचा अंदाज आला.
त्यांना हवाई दलाच्या मदतीची आशा होती. रात्री अंदाजे 2 वाजता त्यांनी जैसलमेर येथील हवाई दलाच्या तळावर विंग कमांडर एमएस बावा यांच्याशी संपर्क केला.
एअर मार्शल भरत कुमार त्यांच्या 'द एपिक बॅटल ऑफ लोंगेवाला'पुस्तकाच लिहितात की, "जैसलमेर हवाई तळावर असलेली हंटर विमानं रात्रीच्या वेळी उड्डाण करण्यास सक्षम नव्हती. त्यामुळं सकाळपर्यंत वाट पाहण्यात आली."
"बेस कमांडर मेजर जनरल खंबाटा यांच्याशी बोलले. सकाळी सूर्योदय होताच हंटर विमानं उड्डाण घेतील आणि पाकिस्तानच्या रणगाड्यांचा धोका नष्ट करण्याचा प्रयत्न करतील असं आश्वासन त्यांनी दिलं. सकाळी 4 वाजता बावा यांनी स्क्वाड्रन लीडर आरएन बाली यांना ब्रीफ केलं."
दरम्यान, 5 वाजून 15 मिनिटांनी मेजर चाँदपुरी यांनी ब्रिगेडियर रामदौस यांच्याशी संपर्क साधला.
रामदौस यांनी नंतर परिस्थितीचं वर्णन करताना सांगितलं की, "पाकिस्तानचा प्रमुख रणगाडा जेव्हा लोंगेवाला चौकीच्या दक्षिण पश्चिमेला गोटारू मार्गावर फक्त एक किलोमीटर अंतरावर होता, त्यावेळी चाँदपुरी यांनी त्यांच्या रिकॉयलेस गनने त्यावर फायरिंग केलं. पण त्यांचा निशाणा योग्य ठिकाणी लागला नाही. उल्ट प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या रणगाड्यांनी चौकी उध्वस्त केली. फक्त त्याच्या शेजारी असलेलं मंदिर वाचलं. नंतर त्यांनी उंटांसाठी असलेल्या चाऱ्याला आग लावली."
त्याआधी सीमेपासून 16 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी पाकिस्तानच्या रणगाड्यांना 6 तासांचा वेळ लागला होता.
पाकिस्तानच्या 18 कॅव्हेलरीचे रेजिमेंटल कमांडर ब्रिगेडियर झेड ए खान यांनी त्यांच्या 'द वे इट वॉज, इनसाइड द पाकिस्तानी आर्मी' मध्ये लिहिलं आहे की, "मी जीपमध्ये सर्वात पुढं चाललो होतो. त्यानंतर लोंगेवाला चौकीच्या दक्षिण भागात पोहोचलो होतो. सुमारे सातडे सात वाजता मला लोंगेवालाकडून स्फोटांचे आवाज ऐकू आले. आकाशात सगळीकडं धूर पसरलेला होता."
पाकिस्तानचे रणगाडे लोंगेवालाच्या चौकीवर दुसरा हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच, जैसलमेरहून उड्डाण घेतलेले भारतीय हंटर विमानं तिथं पोहोचेले होते.
त्यावेळी पाकिस्तानचा सर्वात पुढं असलेला मुख्य रणगाडा चौकीपासून अंदाजे 900 मीटर अंतरावर होता. हंटर विमानं दिसताच पाकिस्तानचे रणगाडे गोल फिरत धूर फेकू लागले. हंटर विमानं चालवत होते, स्क्वाड्रन लीडर डीके दास आणि फ्लाइट लेफ्टनंट रमेश गोसाई.
नंतर डीके दास यांनी एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की, "आम्ही जेव्हा लोंगेवालाच्या जवळ पोहोचलो तेव्हा खाली जे दृश्य दिसलं, ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. जमिनीवरचे शत्रूचे रणगाडे काळ्या माचीसच्या पाकिटासारखे दिसत होते. त्यापैकी काही एका ठिकाणी उभे होते, तर काही चालत होते. आमच्यावर ट्रेसर फायर केले जात असल्याचंही आम्हाला दिसत होतं."
दास म्हणाले की, त्यांनी विमानांवर हल्ला करणाऱ्या तोफांपासून बचावासाठी आधी विमान अधिक उंचीवर नेलं आणि नंतर अचानक खाली झेप घेत दिशा बदलून हल्ला करण्याचा निर्णय घेतला.
दास आठवणी सांगताना म्हणाले की, "माझ्या रॉकेटनं रणगाडा उडवताच अचानक इतर सगळे रणगाडे पुढं सरकरणं थांबलं. त्यानंतर रमेशनंही विमान माझ्यासारखं खाली घेत, आणखी एक रणगाडा उडवला."
त्यानंतर दास आणि रमेश यांनी दोन वेळा पुन्हा रणगाड्यांवर हल्ले केले. हल्ल्यापासून बचावासाठी पाकिस्तानी रणगाडे गोल गोल फिरू लागले. त्यामुळं एवढी धूळ उडू लागली की, भारतीय पायलटना रणगाड्यांना लक्ष्य करणं कठिण होऊ लागलं.
रॉकेट संपल्यानंतर स्काड्रन लीडर दास यांनी एका रणगाड्यावर 30 एमएम अॅडम गनचा एक बर्स्ट केला. त्यामुळं रणगाड्याला आग लागली. त्यानंतर सूर्यास्तापर्यंत थोड्या-थोड्या वेळानं भारतीय विमानं पाकिस्तानच्या रणगाड्यांवर हल्ला करत राहिले.
दुपार होईपर्यंत भारतीय हवाई दलानं पाकिस्तानचे 17 रणगाडे आणि इतर 23 वाहनं उध्वस्त केली.
पाकिस्तानचे ब्रिगेडियर झेड ए खान लिहितात की, "सकाळी सात वाजेपासून संपूर्ण दिवस भारतीय हवाई दलाची चार हंटर विमानं सातत्यानं आकाशातून आमच्यावर हल्ला करत होतं. रात्र होताच हे हल्ले थांबले. त्यावेळी पाकिस्तानकडं दोन पर्याय होते. एकतर त्यांच्या हद्दीत परत जाणं किंवा एकत्र येऊन पुन्हा रामगड आणि जैसलमेरवर ताबा मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न करणं."
त्यांनी कदाचित रामगड आणि जैसलमेर मिळवण्याचा विचार सोडला होता. त्याच रात्री 22 कॅव्हेलरीचे पाकिस्तानी सैनिक मसितवारी भीत आणि गब्बर परिसरात परतले होते. पण लोंगेवाला चौकी ताब्यात घेण्याचा पर्यात त्यांच्याकडे शिल्लक होता.
ब्रिगेडियर जहांजेब अरब यांच्या नेतृत्वात एका पाकिस्तानी ब्रिगेडने दुसऱ्या दिवशी सकाळी लोंगेवालावर पुन्हा हल्ला करण्याची योजना आखली. 28 बलूचलाही लोंगेवाला-जैसलमेर रोडवर पुढं सरकत घोटारू ताब्यात घेण्यास सांगण्यात आलं.
पण सायंकाळपर्यंत लोंगेवालाचं युद्ध संपलं होतं. यात पाकिस्तानच्या सैनिकांच्या पराभवाचं कारण ठरले होते त्यांचे शर्मन आणि टी-59 चीनी रणगाडे. कारण ते वाळवंटात अतिशय कमी वेगानं पुढं सरकत होते.
ओव्हरहिटींगमुळं अनेक पाकिस्तानी रणगाड्यांचे इंजिन फेल झाले. त्यामुळं पाकिस्तानी सैनिकांना रणगाडे तिथंच सोडून पळावं लागलं. मोकळ्या वाळवंटात त्यांच्या रणगाड्यांना कव्हर मिळू शकलं नाही.
दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या मोहिमेसाठी पाकिस्तानकडे कोणत्याही प्रकारची हवाई मदत नव्हती. त्यामुळं भारतीय विमानांनी त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा ते 'सिटिंग डक' प्रमाणं एकापाठोपाठ नष्ट झाले.
या युद्धात पाकिस्तानच्या 45 पैकी 36 रणगाडे उध्वस्त झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर कोणत्याही देशाचे एवढे रणगाडे एकाच युद्धात नष्ट झाले नव्हते.
ब्रिगेडियर झेड ए खान लिहितात की, "आमचे पाच टँक कमांडर जॅम झालेल्या मशीनगन आणि पाय मोकळे करण्याच्या प्रयत्नात मारले गेले होते. त्यानंतर मशीन गन डिझेलनं स्वच्छ आणि दुरुस्त केल्या जाऊ लागल्या. त्याशिवाय दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या 12.7 एमएम च्या विमानांना लक्ष्य करणाऱ्या तोफाही आधुनिक लढाऊ विमानांचा सामना करण्यास सक्षम नव्हत्या."
या युद्धाचा परिणाम म्हणजे भारतानं पूर्ण लष्करी सामर्थ्य पूर्व सेक्टरवर केंद्रीत केलं.
हे युद्ध फक्त पाकिस्तानचे रणगाडे नष्ट केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्मरणात राहील असं नाही, तर पाकिस्तानी लष्कराचं मनोधैर्यही त्यामुळं खूप खचलं होतं.
या युद्धात शौर्य गाजवणारे भारतीय कंपनी कमांडर कुलदीप सिंह चाँदपुरी यांचा महावीर चक्र या दुसऱ्या सर्वात मोठ्या सन्मानानं गौरव करण्यात आला होता, तर पाकिस्तानचे डिव्हीजनल कमांडर मेजर जनरल बीएम मुस्तफा यांना तपासानंतर पदावरून हटवण्यात आलं होतं.
या युद्धात हवाई दलानं सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
पण 1997 मध्ये यावर आधारित 'बॉर्डर' चित्रपट आला तेव्हा, त्यात हे युद्ध प्रामुख्यानं आर्मीनं जिंकल्याचं दाखवण्यात आलं होतं. याच हवाई दलाची भूमिका फक्त सहायक अशी असल्याचं दाखवण्यात आलं होतं.
एअर मार्शल भरत कुमार लिहितात की, "बॉर्डर चित्रपटात लोंगेवालाच्या युद्ध कोणत्याही प्रकारे दाखवण्यात आलं असलं तरी, हवाई दलाच्या इतिहासात लोंगेवालाचं युद्ध हे कायम मैलाचा दगड समजली जाईल, हेच सत्य आहे. यात हवाई दलाच्या अवघ्या चार हंटर विमानांनी 45 रणगाड्यांसह आलेल्या सुमारे 2000 पाकिस्तानी सैनिकांना गुडघे टेकायला भाग पाडलं होतं."
युद्धाच्या सहा वर्षांनी त्याठिकाणी एक विजय स्तंभ तयार करण्यात आला होता. त्याचं उद्घाटन युद्धाच्या वेळी संरक्षण मंत्री असलेल्या जगजीवन राम यांनी केलं होतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन