Bigg Boss मध्ये आलेल्या तेजिंदर पाल सिंग बग्गांनी उद्धव ठाकरेंबाबतही केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

फोटो स्रोत, Facebook/Tajinder Pal Singh Bagga
बारामतीचा सूरज चव्हाण बिग बॉस मराठी या रिअॅलिटी चा विजेता ठरला आणि आता सोशल मीडियावर हिंदी बिग बॉसची चर्चा सुरू झाली आहे.
हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांत भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांचाही समावेश आहे. बग्गा हे याआधीही देखील वादात सापडले होते. आता बिग बॉस हिंदीमध्ये ते झळकणार आहे.
या शोमध्ये बग्गा यांच्यासोबत वक्तव्यांमुळं चर्चेत असणारे महाराष्ट्रातील अॅड. गुणरत्न सदावर्ते हेदेखील असणार आहेत.
2020 मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या बग्गा यांना त्यांच्या वादग्रस्त राजकीय विधानांमुळं देशभर ओळखलं जातं.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी फिल्मस्टार सलमान खान करतो. 6 ऑक्टोबर रोजी सलमानने तेजिंदर पाल सिंग बग्गा यांची बिग बॉसच्या चाहत्यांना ओळख करून दिली.
सलमान सोबत बोलताना त्यांनी बिग बॉसच्या मंचावर सांगितलं की, ते वयाच्या चौथ्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले आणि वयाच्या 14व्या वर्षीच त्यांनी तुरुंगवारी देखील केली होती.
बग्गा यांच्या ट्विटवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता.


बिग बॉसमध्ये तेजिंदर पाल सिंग बग्गा येणार हे घोषित झालं आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली.
त्यांनी याआधी केलेले वादग्रस्त ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही जणांनी ट्विट करून हेही सांगितलं की बग्गा यांनी सलमान खानबाबत देखील वादग्रस्त ट्विट केले होते पण नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले.
याबाबत एक्स (पूर्वीचे ट्विटर) वापरणाऱ्या अंबालिका सिंह म्हणाल्या की, "सलमान खान ज्याचं सूत्रसंचालन करतो त्या बिग बॉस 18 या रिॲलिटी शोमध्ये भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा जात आहेत. सलमान खानचा उल्लेख असणाऱ्या जुन्या पोस्ट त्यांनी आता काढून टाकल्या आहेत. त्या पोस्टमध्ये बग्गा यांनी सलमानला देशद्रोही म्हणून शिवीगाळ केली होती."

फोटो स्रोत, X
कोण आहेत तेजिंदर पाल सिंग बग्गा?
39 वर्षांचे तेजिंदर पाल सिंह बग्गा दिल्लीचे भाजप प्रवक्ते आहेत. त्यांनी 2020 मध्ये दिल्लीच्या हरी नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिवसुद्धा आहेत.
तेजिंदर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या ट्वीटर खात्यावर 12 लाख फॉलोअर्स आहेत. ट्वीटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळेच त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती, असं म्हटलं जातं.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत तेजिंदर यांचं नाव आलं नव्हतं. तेव्हा त्यांच्या उमेदवारीसाठी ट्वीटरवर एक मोहिमसुद्धा चालवण्यात आली होती. इतकंच नव्हे तर यादीत नाव नसल्याच्या मुद्द्यावरून त्यांचं ट्रोलिंगही काही जणांनी केलं होतं.

फोटो स्रोत, @TAJINDERBAGGA
तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना 2017 मध्ये दिल्ली भाजपचे प्रवक्ते बनवण्यात आलं होतं.
सुरुवातीला बग्गा यांनी आम आदमी पक्षाचे माजी नेते ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता.
भूषण यांनी त्यावेळी काश्मीरमध्ये जनमताचा कौल घेण्याची मागणी केली होती. त्याविरोधात बग्गा यांनी हल्ला केला असा आरोप त्यांच्यावर होता.

फोटो स्रोत, Getty Images
हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. त्यावेळी या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले होते, "देश तोडण्याची भाषा करणाऱ्याचे असेच हाल होतील. कुणी तुमच्या आईला शिव्या देईल, तुम्ही ते ऐकून घ्याल का?"
2014 मध्ये काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी चहा किटली घेऊन त्यांनी अय्यर यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं.
अशा प्रकारचे उपक्रम करण्यात ते पटाईत आहेत. कधी केजरीवाल बेपत्ता असल्याचे पोस्टर लावणं, नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदासाठी रॉक परफॉर्मन्स करणं, अशा लक्षवेधी गोष्टी करून ते माध्यमांमध्ये चर्चेत असतात.
उद्धव ठाकरेंचा मोहम्मद म्हणून उल्लेख
तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एका ट्वीटमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरल्याची चर्चा झाली होती.
3 मे रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हिरव्या रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या फोटोवर प्रतिक्रिया देताना बग्गा यांनी उपरोधिकपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मोहम्मद उद्धव ठाकरे यांच्या कामाने मी प्रभावित झालो आहे, असं वक्तव्य तेजिंदर बग्गा यांनी केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
यानंतर लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर केलेल्या रोषणाईचे केल्याची आठवण त्यांना करून दिली होती.
तेजिंदर पाल सिंग बग्गा यांचे आणखी काही वाद
तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना याआधी बऱ्याच कायदेशीर लढायांना तोंड द्यावं लागलेलं आहे. 2022मध्ये सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
बग्गा यांनी प्रक्षोभक विधाने केल्याचा, अफवा पसरवण्याचा आणि धार्मिक आणि जातीय शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आणि निषेधादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या आप नेत्याने तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना ही अटक करण्यात आली होती.
राजकीय सूडबुद्धीने हे आरोप केल्याचं भाजपने आम आदमी पक्षावर आरोप केला होता. आणि त्यांच्या अटकेमुळे राजकीय वादळ निर्माण झाले होते. नंतर बग्गा यांची सुटका करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
2019 मध्ये, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, बंगालमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीनंतरही बग्गा चर्चेत आले होते. तिथे बंगाल पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
अमित शहा यांच्या रॅलीमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी झालेले इतर चेहरे कोण?
यावर्षी या कार्यक्रमाची थीम 'टाइम का तांडव' असेल अशी घोषणा देखील यावेळी करण्यात आली.
बिग बॉस हा कार्यक्रम युकेमधल्या बिग ब्रदर या लोकप्रिय कार्यक्रमाची भारतीय आवृत्ती आहे. खास या कार्यक्रमासाठी बांधण्यात आलेल्या घरात स्पर्धक राहतात आणि त्यांच्यावर चोवीस तास कॅमेऱ्यांची नजर असते.

फोटो स्रोत, X/BIGG BOSS 18 LIVE
प्रेक्षकांनी केलेल्या मतदानाच्या आधारे प्रत्येक आठवड्याला एक सदस्य घरातून बाहेर पडतो आणि शेवटपर्यंत घरात टिकणारा सदस्य विजेता ठरतो, असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे.
यावर्षी नायरा बॅनर्जी, करणवीर मेहरा, अविनाश मिश्रा, तेजिंदर बागा, शिल्पा शिरोडकर, श्रुतिका, चाहत पांडे, शहजादा धामी, चुम दरंग, रजत दलाल, मुस्कान बामने, अरफीन खान, सारा अरफीन, खान, ईशा सिंग, विवियन डिसेना, ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि एलिस कौशिक बिग बॉसमध्ये दिसणार आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











