दलितांचे केस कापण्यासाठी 'या' गावात उलटावी लागली स्वातंत्र्यांची 78 वर्षे

फोटो स्रोत, PARESH PADHIYAR
- Author, लक्ष्मी पटेल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"वयाच्या 35 व्या वर्षी मी पहिल्यांदाच माझ्या गावात केस कापले. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाल्यानंतर देखील आमच्याशी भेदभाव केला जातो, या गोष्टीचं मला दु:ख वाटतं," असं हितेंद्र चौहान म्हणाला.
तो गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील अलवाडा गावातील दलित तरुण आहे. गावातच केस कापण्यात आल्याबद्दल हितेंद्र चौहान याला आनंद झाला होता. तो व्यक्त करताना त्यांनं या भावना व्यक्त केल्या.
अलवाडा गावातील दलित समाजातील लोक त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढा देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अलीकडेच गावातील एका सलूनमध्ये पहिल्यांदाच त्यांचे केस कापण्यात आले.
बनासकांठा जिल्ह्यातील अलवाडा गावातील नाभिक दलित समाजातील लोकांचे केस कापत नव्हते किंवा त्याची दाढीदेखील करत नव्हते. गावातील तरुणांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
गावाचे सरपंच आणि पोलीस इन्स्पेक्टर यांनी मात्र गावात याप्रकारचा कोणताही भेदभाव होत नसल्याचं सांगितलं. मात्र, गावात सलून चालवणाऱ्या लोकांनी मान्य केलं की तिथे दलित समाजातील लोकांचे केस कापले जात नव्हते.
त्यांनी हे देखील कबूल केलं की, पोलिसांनी मन वळवल्यानंतर गावातील दलित समाजातील लोकांचे केस आता गावातच कापले जात आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अलवाडा हे गाव बनासकांठा जिल्ह्यातील धनेरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. गावातील सलूनमध्ये दलित समाजातील लोकांचे केप कापले जात नसल्यामुळे, मुकेश चौहान या गावातील तरुणानं धनेरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
25 वर्षांचा मुकेश चौहान मूळचा अलवाडा गावचा असून तो पालनपूरमध्ये राहतो आणि एका हिऱ्याच्या कारखान्यात काम करतो.
मुकेश चौहानने त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्याला आणि त्याच्या मुलाला केस कापायचे होते. म्हणून त्यानं गावातील नाभिकाला बोलावलं होतं.
मात्र, ते दलित समाजातील असल्यामुळे गावातील नाभिकानं त्यांचे केस कापण्यास नकार दिला. त्यानं मुकेशचा जातीवरुन अपमान केला आणि त्याला शिवीगाळ केली.

फोटो स्रोत, MUKESH CHAUHAN
मुकेश चौहाननं बीबीसीला सांगितलं, "शतकानुशतके आमच्याशी भेदभाव केला जातो आहे. फक्त केस कापण्याच्या बाबतीतच नाही, तर आजही आम्ही जेव्हा गावात एखाद्याच्या घरी जातो, तेव्हा ते आम्हाला घराबाहेर बसायला लावतात."
"जर गावात एखादा उत्सव किंवा सण असेल तर गावकरी आमच्या समाजातील लोकांना दूध किंवा ताकदेखील देत नाहीत. गावात जर एखादा कार्यक्रम असेल आणि संपूर्ण गावासाठी जेवण असेल, तर आम्हाला मात्र वेगळं बसवलं जातं."
त्यानं पुढे सांगितलं की, "मी नाभिकाला माझे केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी बोलावलं. मात्र त्यानं नकार दिला. त्यानंतर मी स्वत: त्याच्या दुकानात गेलो. मात्र त्यानं सांगितलं की आम्ही तुमच्या समुदायाच्या लोकांचे केस कापणार नाही. त्यानंतर मी धनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली."
पोलीस गावात आले आणि त्यांनी या विषयावर तोडगा काढल्यानंतर, नाभिकानं मला फोन करू बोलावलं आणि माझे केस कापले. मात्र हा बदल फार काळ टिकेल की नाही याबाबत गावातील दलित समुदायाच्या मनात अजूनही प्रश्न आहेत.
'मी 35 वर्षांचा आहे आणि माझ्या गावात पहिल्यांदाच माझे केस कापले'
अलवाड गावातील दलित समुदायातील लोकांना केस कापण्यासाठी 30 किलोमीटर अंतरावर जावं लागत असे.
त्याला वाटतं की, फक्त त्याच्या गावातच नाही, तर आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये अशी अनेक गावं आहेत, जिथे आजदेखील नाभिक दलित समुदायातील लोकांचे केस कापत नाहीत.
उत्तम चौहान यांनी बीबीसीला सांगितलं, "मी वयाच्या 35 व्या वर्षी माझ्या गावात पहिल्यांदा माझे केस कापले. माझ्या गावातील सलूनमध्ये माझे केस कापण्यात आले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे."
"देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाल्यानंतर देखील आमच्या दलित समुदायाला भेदभावाला तोंड द्यावं लागतं आहे. केस कापण्यासाठी सलून असूनदेखील आमच्या समुदायातील लोकांचे केस तिथे कापले जात नव्हते."
मुकेश चौहान म्हणतो, "माझ्या गावात पहिल्यांदाच माझे केस कापण्यात आले. केस कापणं ही अतिशय किरकोळ गोष्ट वाटू शकते. मात्र, आमच्या दलित समुदायाला त्यासाठी देखील लढावं लागतं. ही समानता आणि सन्मानासाठीची लढाई आहे."
भरतभाई चौहान अलवाडा गावचे आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "नाभिक समाजातील लोक वर्षानुवर्षे आमचे केस कापत नव्हते. आमच्या गावातील दलित समुदायातील लोक केस कापण्यासाठी सलूनचे भाडे देऊन 30 किलोमीटर अंतरावर जायचे."

फोटो स्रोत, PARESH PADHIYAR
जसंग परमार बीबीसीला म्हणाले, "आमच्या गावातील मुकेश चौहान पालनपूरमध्ये राहतो. मुकेशनं जेव्हा नाभिकाला फोन केला. तेव्हा नाभिकानं त्याला केस कापणार नाही असं सांगितलं आणि जातिवाचक शिवीगाळ केली."
"मुकेशनं आमच्या समुदायातील लोकांना एकत्र केलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आम्ही सर्व एकत्र आलो आणि वर्षानुवर्षे आम्हाशी केल्या जाणाऱ्या भेदभावाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला."
भरत चौहान म्हणाले, "आम्ही आधीदेखील आमचे केस कापण्यासाठी गावातील नाभिकाकडे गेलो होतो. मात्र आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही दलित आहात म्हणून आम्ही तुमच केस कापणार नाहीत."
जसंग परमार म्हणाले, "शनिवारी, 6 ऑगस्टला पोलिसांची टीम आमच्या गावात आली होती. त्यांनी गावातील नाभिकाला बोलावलं. त्यानंतर त्यांनी आमच्या समुदायातील लोकांना बोलावलं."
"पोलिसांच्या समोर त्यानं एका व्यक्तीचे केस कापले आणि त्यानंतर नाभिक दुकान बंद करून घरी गेला. त्यानंतर त्यानं पाच दिवस सलून उघडलं नाही."
"आम्ही याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस दुसऱ्यांदा गावात आले आणि त्यांनी गावात या विषयावर तोडगा काढला. त्यानंतर चार-पाच लोकांचे केस कापण्यात आले."
जशू चौहान म्हणतात, "स्वातंत्र्यानंतर गुजरातमध्ये दलित समुदायातील लोकांशी केला जाणारा भेदभाव संपलेला नाही. जर आपण धनेरा तालुक्याबद्दल बोललो, तर इथल्या अनेक गावांमध्ये दलित समुदायातील लोकांचे केस कापले जात नाहीत. याव्यतिरिक्त इथे इतर प्रकारचे भेदभावदेखील केले जातात."

फोटो स्रोत, Getty Images
मुकेश चौहान यांना शंका आहे की हा बदल किती काळ टिकेल.
"सध्या आमच्या समुदायातील लोकांचे केस कापले जात आहेत. भविष्यातदेखील हे असंच सुरू राहील की नाही हे आम्हाला माहित नाही," असं ते म्हणतात.
गावातील एक दलित वृद्ध बीबीसीला म्हणाले की, "पूर्वी, जर गावातील एखादा वृद्ध आला तर आम्ही त्याच्यासमोर देखील येऊ शकत नव्हतो. आम्हाला एक तास उभं राहावं लागायचं."
"आम्ही जरी चांगले कपडे घातलेले असले तरी गदारोळ व्हायचा. परिस्थिती सुधारत असली तरी, अजूनही आम्हाला अनेक बाबतीत अन्याय्य वागणूक दिली जाते."
बनासकांठातील अनेक गावांमध्ये अजूनही अशाप्रकारचा भेदभाव केला जात असल्याचं मानलं जातं.
सामाजिक कार्यकर्ते असलेल्या चेतन दाभी यांनी बीबीसीला सांगितलं, "ही फक्त अलवाडा गावातील समस्या नाही. तर बनासकांठातील बहुतांश गावांमध्ये अशी समस्या आहे. दलितांना त्यांचे केस कापण्यासाठी 30 किलोमीटर अंतरावर जावं लागतं. काहीवेळा तर त्यांना त्यांची ओळखदेखील लपवावी लागते."
पोलीस आणि गावचे सरपंच काय म्हणाले?
धनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर एम. जे. चौधरी बीबीसीला म्हणाले, "अलवाडा गावातील नाभिक तिथल्या दलित समुदायातील लोकांचे केस कापत नसल्याची तक्रार आमच्याकडे नोंदवण्यात आली."
"आम्ही जेव्हा गावात गेलो आणि यासंदर्भात चौकशी केली, तेव्हा आम्हाला आढळलं की गावातील नाभिक तिथल्या दलितांचे केस कापतात. आम्हाला गावात कोणताही भेदभाव आढळला नाही."
मात्र गावातील नाभिकांनी मान्य केलं की त्यांच्या गावात दलितांचे केस कापले जात नाहीत. मग पोलिसांनी तडजोड घडवून आणल्यानंतर दलितांचे केस कापण्यास सुरूवात झाली.
गावच्या सरपंच वर्षाबेन चौधरी बीबीसीला म्हणाल्या, "आमच्या गावातील प्रत्येकजण मिळून मिसळून सौहार्दानं राहतात. गावात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही."

फोटो स्रोत, PARESH PADHIYAR
गावातील नेते सुरेश चौधरी बीबीसीला म्हणाले, "दलित समुदायातील तरुणांनी मला सांगितलं की गावातील नाभिक त्यांचे केस कापत नाहीत. मग आम्ही नाभिक समुदायातील नेत्यांशी बोललो."
"ते म्हणाले की आम्ही केस कापतो. मात्र जरी कोणी यासाठी नकार दिला असेल तरी आते ते नकार देत नाहीत. सर्व समुदायातील लोकांचे केस कापले जातील. पोलीस आमच्या गावात आले आणि त्यांच्यासमोर त्यांचे केस कापण्यात आले."
गावातील कार्यक्रमांमध्ये दलित समुदायांतील लोकांना वेगळं बसवलं जातं आणि गावात इतर प्रकारे भेदभावदेखील केले जातात, या आरोपांबद्दल बोलताना गावचे नेते सुरेश चौधरी म्हणाले, "आमच्या गावातील सर्वजण बंधुभावानं एकत्र राहतात. मात्र जर कोणताही मतभेद असेल किंवा असहमती असेल तर आम्ही सर्व समुदायाच्या लोकांबरोबर एकत्र बसून त्यावर मार्ग काढू."
गावातील नाभिकांचं काय म्हणणं आहे?
अलवाडा गावात सलून चालवणाऱ्या दोन नाभिकांशी बीबीसी बोललं. त्यांनी कबूल केलं की वर्षानुवर्षे गावातील दलितांचे केस कापण्यात आलेले नाहीत.
दिलीप नाई बीबीसीला म्हणाले, "आम्ही गावातील दलित समुदायातील लोकांचे केस कापत नव्हतो कारण गावकऱ्यांबरोबर समस्या होत्या. मात्र आता त्यावर उपाय सापडला आहे. आता आम्ही दलित समुदायासह सर्व समुदायातील लोकांचे केस कापतो."

फोटो स्रोत, PARESH PADHIYAR
दिनेश नाई गावात सलून चालवतात. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "वर्षानुवर्षे गावात अशी परंपरा होती की आम्ही दलित समुदायातील लोकांचे केस कापत नव्हतो. गावातील कोणीही दलितांचे केस कापण्यास नकार देत नव्हतं."
"मात्र, वर्षानुवर्षे गावातील दलित समुदायातील लोकांचे केस कापले जात नव्हते. ही प्रथा गावात पाळली जात होती. त्यामुळे आम्हीदेखील दलितांचे केस कापत नव्हतो. मात्र आता आम्ही सर्व समुदायातील लोकांचे केस कापतो."
दिनेश नाई पुढे म्हणाले, "धनेराहून एक पोलीस टीम आली आणि त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की हा सरकारी नियम आहे. आता काळ बदलला आहे आणि सर्वांना त्यांचं काम करावं लागेल."
"पोलिसांनी हा मुद्दा समजावून सांगितल्यानंतर, आता आम्ही सर्व समुदायातील लोकांचे केस कापतो. आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. आमचा व्यवसायदेखील चांगला सुरू आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











