दारूसाठी बदनाम मोहफुलं असं ठरतंय आता वरदान

    • Author, सौरभ कटकुरवार
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मोहफुलांचा उल्लेख झाला की साधारणपणे डोळ्यांसमोर येते ती मोहाची दारू.

पण जंगलांमध्ये विपुल प्रमाणात आढळणारे आणि अत्यंत पौष्टिक असलेल्या मोहफुलांचा उपयोग ग्रामीण भागात लोकांच्या सुदृढ आरोग्यासाठी तसंच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केल्या जाऊ शकतो हे हेरलं महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी.

शासनालासुद्धा मोहफुलं कुपोषण कमी करण्यास उपयुक्त वाटली. आणि त्यातूनच निर्माण झाले मोहाफुलांचे लाडू, लोणचे, चिक्की, टॉफी, गुलाबजाम, बिस्कीटं, जॅम, केक, पुराण पोळी.

या जिन्नसांना आदिवासी गावांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता प्रयत्न आहेत आदिवासी स्त्रियांनी बनविलेल्या या पदार्थांना बाजारपेठ मिळवून देणे. जेणेकरुन याचा फायदा शहरात राहणाऱ्या लोकांना मिळावा आणि दुर्गम भागात रोजगाराला चालना मिळावी.

कायद्याने गौण वनउपज गोळा आणि विक्री करण्याचे अधिकार मिळाल्यानंतर त्याचा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बहुल भागांतील लोकांच्या उपजीविकेवर बराच सकारात्मक परिणाम झाला.

बांबू, मोहफुल, तेंदूपत्ता, सहद, चिंच यांसारख्या गौण वनउपजांचं संकलन, व्यवस्थापन आणि विक्री ग्राम सभेच्या माध्यमातून करून गडचिरोलीतील पुष्कळश्या गावांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत आहे.

आता शासन आणि सामाजिक कार्यकर्ते या गौण वनउपजांवर प्रक्रिया करून, त्याचे मूल्यवर्धन करून आदिवासी गावांना कसं सामाजिक आणि आर्थिकदृष्टया बळकट करता येईल याचे प्रयत्न करत आहेत.

याचाच भाग आहे मोहाफुलांपासून बनवलेली जिन्नसं ज्यांचे सेवन आणि विक्री आदिवासी लोकांच्या आरोग्यासाठी तसंच आर्थिक सक्षमीकरणासाठी मदतशीर ठरू शकणारं आहे.

जंगलांमध्ये विपुल प्रमाणात आढळणारे मोहफुल फक्त दारू बनविण्यासाठी उपयोगात येतात हा गैरसमज अनेक लोकांमध्ये आहे.

विशेष म्हणजे अनेक आदिवासी लोकसुद्धा दारूव्यतिरिक्त मोहफुलं अजून कुठे वापरले जाऊ शकतात याबाबत अनभिज्ञ आहेत.

मोहफुलांचं तसं गोंड आदिवासी समाजातील प्रथा आणि संस्कृतीशी अतूट नातं आहे. बाळाचा जन्मावेळी, भीमदेवाच्या आणि नागपंचमीच्या पूजेत तसेच लग्न कार्यामध्ये मोहफुलांचा उपयोग होतो.

काही ठिकाणी लहान मुलांसाठी आणि गरोदर स्त्रियांसाठी लोऱ्या, मुठ्या असे साधे खाण्याचे प्रकार बनविले जातात.

पण त्याचे इतर चविष्ट पदार्थ होऊ शकतात याची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे मोहफुलांचे गुलाबजाम, चिक्की, केक यांबाबत आदिवासी गावांमध्ये आता कुतुहल निर्माण होत आहे.

मोहफुलांपासून पदार्थ कसे बनवायचे याबाबत गडचिरोलीतील विविध गावांतील स्त्रियांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणात मेंढा (लेखा) या गावातील मुक्ता मडावी आणि तारा दुगा यांनी सहभाग घेतला होता.

“मोहाफुलांची पावडर आम्ही प्रसाद तयार करण्यासाठी करतो. पण गुलाबजाम, केक सारखे पदार्थ तयार करता येतील हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला त्याच्या पौष्टिकतेबद्दल सुद्धा माहिती नव्हती. याबाबतचं ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्ही आता हे पदार्थ घरी बनवायला सुरवात केलेली आहे. आता आमच्या गावातील इतर स्त्रियांना याचे प्रशिक्षण देऊ,” त्या सांगतात.

मोहफुलांपासून पदार्थ बनवायचे प्रयत्न काही वर्षांपासून सुरू आहेत. मोहफुलांमध्ये नेमके किती प्रोटेन्स, मिनरल्स, फॅट, कार्बोहायड्रेटस्, विटमिन्स आणि इतर घटकं आहेत हे लोकांपर्यंत पोहचावे म्हणून ते नागपूर येथील प्रतिष्ठित शासकिय प्रयोगशाळेतून तपासून घेतले गेले.

मोहफुलांमध्ये मनुका आणि दूध यांपेक्षा जास्त प्रोटेन्स, मिनरल्स, क्यल्शियम, विटमिन्स B2, B3, K आढळतात.

तसंच फॉस्फोरस, लोह, फाइबर यांचं अनुकूल प्रमाण मोहफुलांमध्ये असतं. विदर्भ विकास मंडळाद्वारे 2018 मध्ये वनउपज प्रक्रिया उद्योग निर्मितीतून वनआधारित रोजगार निर्मिती करण्यासाठी गठित केलेल्या उपसमितीने मोहाफुलांपासून सरबत, जॅम तयार करुन विक्री करण्यावर भर दिला. पण त्यास फार प्रतिसाद मिळाला नाही. पण प्रयत्न सुरु राहिले.

‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या सामाजिक संस्थेचे संयोजक डॉ. सतीश गोगुलवार सांगतात की, आदिवासी भागात काम करतांना त्यांनी जंगलात मिळणाऱ्या फळं, फुलं, रान भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांचा अभ्यास केला.

“स्थानिक लोक, वैदू, पुजारी यांच्याकडून मी मोहफुलांचे आदिवासी संस्कृतीत आणि खान-पानात काय स्थान आहे हे जाणायचा प्रयत्न केला. आम्ही 2010-12 दरम्यान मोहाचे बोंडं आणि खीर करुन बघितली. लोकांना हे पदार्थ आवडले. मग आम्ही ठरवलं की आपण मोहाफुलांपासून अजून पदार्थ करायचे,” ते सांगतात.

“आता आम्ही जवळपास 12 पदार्थ तयार केलेले आहेत. जे स्वादिष्ट आहेत. तसंच पौष्टिक पण आहेत. मोहफुलाच्या चिक्कीला फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे.”

शिक्षणाने फूड बायोटेक्नोलॉजिस्ट असलेल्या सुष्मिता हेपटे हिने हे सगळे पदार्थ तयार केलेले आहेत. पण त्यासाठी तिला बरेच परिश्रम घ्यावे लागले.

“मला ग्रामीण भागात काम करण्यात रूची होती. माझ्या लक्षात आलं की मोहाफुलांचे चविष्ट पदार्थ बनविले तर आदिवासी आणि इतर लोक ते खातील ज्यामुळे त्यांना त्यातील पौष्टिक तत्व मिळतील,” ती सांगते.

“सुरवातीला फार त्रास झाला. लाडू तुटून जायचे किंवा पदार्थामध्ये मोहाफुलांची चव नसायची. मी मोहफुलांचा सेन्सरी इव्हॅल्युएशन चार्ट बनवला, ज्यामुळे त्याच्या फूट प्रॉपर्टिज कळल्या. आणि अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर मोहाफुलांचे पदार्थ बनविण्यात यश मिळालं.”

सुष्मिता आता हे पदार्थ कसे करायचे याचं प्रशिक्षण गडचिरोलीतील विविध गावातील स्त्रियांना देत आहेत.

हे प्रशिक्षण ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेद्वारे कुरखेडा तालुक्यातील येरंडी गावात दिलं जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शबरी आदिवासी वित्त आणि विकास मंडळाकडून या प्रशिक्षणास आर्थिक सहाय्य केलं जात आहे. आत्तापर्यंत जवळपास 100 महिलांना निःशुल्क प्रशिक्षण मिळालं आहे. गडचिरोलीतील जवळपास 500 महिलांना असं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मोहगावमध्ये राहणाऱ्या राजश्री वट्टी यांनी काही महिन्यांआधी येरंडी येथे प्रशिक्षण घेतलं. आता त्या त्यांच्या गावातील महिलांना मोहफुलांपासून पदार्थ कसे करायचे शिकवत आहेत.

“हे सगळं आमच्यासाठी नवीन आहे. गावातील महिलांना आधी विश्वासच बसत नव्हता. मग मी गावात चार दिवस प्रशिक्षण दिलं. मोहफुलांपासून लाडू, चिक्की, गुलाबजाम, बोंडं बनवून दाखवले. सगळ्यांना ते फार आवडले,” त्या म्हणतात.

“विशेष म्हणजे कुटुंबातील सगळ्यांना ते आवडलं. मोहाफुलांचे पदार्थ बनवायला फार सोपे आहेत. ते पौष्टिक आणि चविष्ट पण असतात. त्यामुळे ते आता आम्ही नियमितपणे बनवू.”

प्राध्यापक कुंदन दुफारे हे मागील 25 वर्षांपासून गडचिरोलीतील आदिवासी संस्कृती आणि प्रथांचा अभ्यास करत आहेत. गडचिरोलीतील आदिवासी हक्कांसाठी झालेल्या चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

ते म्हणतात की मोहफुल हा आदिवासी लोकांच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य घटक राहिला आहे.

“पण आता एकूणच दृष्टिकोन बदलेला आहे. मोहफुलाच्या पौष्टिकतेबाबत लोक अनभिज्ञ आहेत. मोहाफुलांपासून बनविलेले जॅम, सरबत, चिक्कीच्या सेवनाने नशा येईल असं वाटतं,” ते म्हणाले.

दुफारे म्हणतात जर गडचिरोली जिल्ह्यात कोल्ड स्टोरेज बांधले गेले तर मोहफुल अधिक काळ टिकवून ठेवता येईल.

“ज्याने मोहफुल प्रक्रिया आधारित उद्योगाला चालना मिळू शकते. तसंच योग्य वेळ बघून मोहफुलांची विक्री केल्यास अधिक मोबदला मिळू शकतो,” ते म्हणाले.

मार्च ते एप्रिल महिन्यात मोहफुलं येतात आणि खाली पडायला लागतात. जवळपास 70 टक्के जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मोहफुल संकलन होतं.

दारू बनविण्यासाठी काही मोहफुलांचा भाग ठेवून बाकी साठा ग्रामसभेद्वारे किंवा स्वतंत्रपणे खाजगी ठेकेदाराला विकला जातो.

यावर्षी मात्र प्रशिक्षण घेतलेल्या महिला खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी जास्तीत जास्त मोहफुलं घरी ठेवायचा प्रयत्न करतील, असं ते म्हणाल्या.

मोहाफुलांचे पदार्थ बाजारात कसे विकता येईल याबद्दल ते विचार करत आहेत. मेंढा (लेखा) येथील कार्यकर्त्या नंदा दुगा म्हणाल्या या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे त्यांचे लक्ष आहे.

“आमच्या गावातील 34-40 महिलांनी हे प्रशिक्षण घेतलं आहे. मोहफुल पदार्थाचा कार्यक्रम आम्ही ग्राम सभेपुढे ठेवू आणि पुढील उपाय योजना करू,” दुगा म्हणाल्या.

एक -दोन पदार्थ सोडल्यास ही मोहाफुलांपासून बनवलेले जिन्नस बराच काळ टिकतात ज्यामुळे ते जवळील बाजारांमध्ये आणि शहरी भागात सुलभरीत्या विकले जाऊ शकतात.

स्थानिक कार्यकर्त्या विद्याभारती ऊसेंडी म्हणाल्या मोहफुलांच्या पदार्थांची विक्री आदिवासी आणि इतर ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी उपयोगी होऊ शकतो.

“गावातील स्त्रियांचा एक गट सुद्धा तयार झाला तरी या उद्योगास चालना मिळू शकते. त्यांना घरबसल्या काम मिळू शकतं. नैसर्गिक आणि पौष्टिक मोहफुलांच्या पदार्थांना बाहेर चांगली मागणी असेल. गावागावांतील अंगणवाड्यांमध्ये सुद्धा या पदार्थांचा पुरवठा केला जाऊ शकतो,” त्या म्हणाल्या.

नितीन पाटील ज्यांची काही महिन्यांआधी शबरी आदिवासी वित्त आणि विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावरुन जीएसटी विभागात बदली झाली. ते म्हणतात, मोहाफुलांच्या पदार्थांचा दुर्गम, ग्रामीण भागात कुपोषणाची समस्या सोडवण्यास खूप मोठा फायदा होऊ शकतो.

“आमचा उद्देश होता की अंगणवाडी शिक्षिका, आशा सेविका यांनी गावोगावी जावून मोहफुलांच्या पौष्टिकतेबाबत लोकांना जागरुक करावं. मोहफुलांचे पदार्थ कुपोषणावर मात करायला फार उपयोगी ठरू शकतात,” ते म्हणाले.

“मोहफुल पदार्थ विक्रीसाठी मोठा वाव आहे. पण त्यासाठी माल वाहतूक आणि मार्केटिंग साठी खूप प्रयत्न करावा लागेल. आजही मोठ्या शहरांमध्ये मोहफुल आणि त्यावर प्रक्रिया केलेल्या वस्तूंना मागणी आहे. पण अजून याबाबत अजून जागरुकता वाढवावी लागेल.”

गोगुलवार म्हणतात त्यांच्या संस्थेद्वारे केलेल्या जाणाऱ्या पोषण आहार कार्यक्रमांतर्गत मोहाफुलांची चिक्की आणि लाडू दिले जातात.

तसंच नागपूरसारख्या शहरांमध्ये होणार्‍या कृषी प्रदर्शनांमध्ये हे पदार्थ विक्रीला ठेवले जातात.

“मोहाफुलांच्या पदार्थांना शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन द्यायची असेल तर मोठी गुंतवणूक लागेल. तसंच market linkages आणि product standardization वर काम कराव लागेल. पण स्थानिक पातळीवर, गावोगावी हे पदार्थ सहजपणे विकता येतील,” ते म्हणाले.

हे वाचलंत का?