IPL 2023 MI VS GT : 5 वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा खेळ इतका खराब का होतोय?

नूर अहमद, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नूर अहमद

सूर्यकुमार यादव, कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेव्हिड या वादळी खेळींसाठी प्रसिद्ध त्रिकुटाला तंबूचा रस्ता दाखवत 18वर्षीय नूर अहमदने गुजरात टायटन्सला दिमाखदार विजयात सिंहाचा वाटा उचलला. 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 152 धावाच करु शकला. गुजरातने 55 धावांनी मोठा विजय मिळवला. 21 चेंडूत 42 धावा करणाऱ्या अभिनव मनोहरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने सातत्याने एकाच टप्प्यावर चेंडू टाकले आणि अचानक उसळता चेंडू सोडला. पुल करण्यासाठी आवश्यक पवित्र्यात नसलेल्या रोहितने तो चेंडू खेळला. चेंडू तिथेच हवेत उडाला. हार्दिकने स्वत:च झेल टिपत सापळा यशस्वी केला. रोहितने 2 धावा केल्या.

रशीद खानच्या फिरकीचं कोडं इशान किशनला उलगडलं नाही. राँगवन चेंडूवर मोठा फटका मारण्याचा इशानचा प्रयत्न जोशुआ लिटीलच्या हातात गेला. इशानने 13 धावा केल्या. उत्तम फॉर्मात असलेल्या तिलक वर्माला पायचीत करत रशीद खानने मुंबईला दणका दिला.

रशीद खान, गुजरात टायटन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रशीद खान

रशीदने दिलेल्या पायावर नूर अहमदने अक्षरक्ष: कळस चढवला. नूर अहमदने कॅमेरुन ग्रीनला त्रिफळाचीत केलं. ग्रीन चांगल्या फॉर्मात आहे पण डावखुऱ्या नूरचा वळलेल्या चेंडूवर तो मोठा फटका मारायला गेला. त्याने 26 चेंडूत 33 धावांची खेळी केली. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टीम डेव्हिडच्या अंगलट आला. नूरच्या गोलंदाजीवर अभिनव मनोहरने त्याचा चांगला झेल घेतला. सूर्यकुमार यादवने एकटाकी सगळी सूत्रं हाती घेतली. त्याने चौकार-षटकार लगावायला सुरुवात केली. पण नूरने स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याचा सुरेख झेल टिपला. सूर्यकुमारने 23 धावा केल्या.

सूर्यकुमार माघारी परतताच मुंबईच्या विजयाचा आशा मावळल्या. नेहल वढेराने 21 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 40 धावांची खेळी करत मुंबईचा पराभव लांबवला. अर्जुन तेंडुलकरला फलंदाजीची संधी मिळाली. त्याने 9 चेंडूत 13 धावांची खेळी केली. मुंबईने 152 धावा केल्या. गुजराततर्फे नूर अहमदने 3 तर रशीद खान आणि मोहित शर्माने 2 विकेट्स पटकावल्या.

मुंबई इंडियन्स संघाने अर्जुन तेंडुलकरवर विश्वास कायम राखला आहे. काही दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या मुकाबल्यात अर्जुनच्या एका षटकात 31 धावांची लूट झाली होती. त्या षटकानंतर मुंबईची लयच हरपली. पंजाबने 214 धावांचा डोंगर उभारला. मुंबईने विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले होते.

अर्जुनने मुंबईला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर हार्दिक पंड्या आणि शुबमन गिल यांनी 38 धावांची भागीदारी केली. पीयुष चावलाने हार्दिकची खेळी संपुष्टात आणली. त्याला 13 धावाच करता आल्या. अर्धशतकासह खेळपट्टीवर स्थिरावलेल्या शुबमन गिलला कुमार कार्तिकेयने बाद केलं. डाऊन द ट्रॅक येत कार्तिकेयच्या गोलंदाजीवर षटकार लगावण्याचा गिलचा प्रयत्न सूर्यकुमारच्या हातात जाऊन विसावला. त्याने 34 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 56 धावांची खेळी केली.

शुबमन गिल, गुजरात टायटन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शुबमन गिल

गिलपाठोपाठ विजय शंकरही तंबूत परतला. यानंतर डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर यांनी पाचव्या विकेटसाठी 35 चेंडूत 71 धावांची वेगवान भागीदारी केली. राईली मेरडिथने अभिनवला बाद करत ही जोडी फोडली. त्याने 21 चेंडूत 42 धावांची खेळी केली.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अभिनव बाद झाल्यानंतर मिलरला राहुल टेवाटियाची साथ मिळाली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 10 चेंडूत 33 धावांची भागीदारी केली. मिलरने 22 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांसह 46 धावांची खेळी केली. टेवाटियाने 5 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 20 धावांची खेळी केली. गुजरातने मुंबईसमोर 208 धावांचं लक्ष्य ठेवलं. मुंबईतर्फे पीयुष चावलाने 2 विकेट्स पटकावल्या.

यंदाच्या हंगामात हैदराबादविरुद्ध पदार्पण करणाऱ्या अर्जुनवर त्या महागड्या षटकानंतर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती. आयपीएलसारख्या स्पर्धेत गोलंदाजांवर आक्रमण केलं जातं. यात नवीन काही नाही.

23 वर्षीय अर्जुनवर एवढी टीका करण्याची आवश्यकता नाही असाही सूर काहींनी व्यक्त केला होता. काहींनी मात्र मुंबईने त्याला संघात घेऊ नये अशी भूमिका मांडली होती.

मैदानाबाहेरच्या चर्चांना पूर्णविराम देत मुंबई इंडियन्सने अर्जुनला गुजरात टायटन्सविरुद्धच्या लढतीसाठी संघात समाविष्ट केलं. संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत अर्जुनने अनुभवी वृद्धिमान साहाला बाद केलं.

गुजरात टायटन्सच्या यश दयाळचं नशीब या लढतीतही बदलू शकलं नाही. 9 एप्रिलला गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघामध्ये सामना झाला होता. गुजरातने 204 धावांची मजल मारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताला शेवटच्या षटकात 29 धावांची आवश्यकता होती.

यश दयाळकडे चेंडू सोपवण्यात आला. पहिल्या चेंडूवर उमेश यादवने तत्परतेने एक धाव घेतली. पुढे जे घडलं ते अद्भुत आणि अविश्सनीय सदरात मोडणारं होतं. कोलकाताच्या रिंकू सिंगने 5 चेंडूत 5 षटकार लगावत कोलकाताला थरारक विजय मिळवून दिला.

मैदानाच्या विविध भागात उत्तुंग षटकार लगावत रिंकूने यश दयाळची गोलंदाजी निष्पभ्र ठरवली. यशच्या षटकात कोलकाताने 31 धावा वसूल केल्या. त्या सामन्यानंतर गुजरातने यशला खेळवलेलं नाही.

अर्जुनला षटक दिलं आणि...

अर्जुन तेंडुलकर, मुंबई इंडियन्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अर्जुन तेंडुलकर

पंजाबविरुद्ध कॅमेरुन ग्रीन, जेसन बेहनड्रॉफ आणि जोफ्रा आर्चर यांची षटकं शिल्लक असतानाही मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने अर्जुनच्या हाती चेंडू सोपवला.

पहिल्या चेंडूवर सॅम करनने लाँगऑफ क्षेत्रात खणखणीत षटकार लगावला. दुसरा चेंडू वाईड गेला. तांत्रिकदृष्टया दुसऱ्या चेंडूवर सॅम करनने फुलटॉसवर चेंडू चांगल्या तऱ्हेने तटवून काढत चौकार वसूल केला. यानंतर करनने एक धाव काढली.

हरप्रीत सिंगने चौथ्या चेंडूवर चौकार लगावला. पाचवा चेंडू अर्जुनच्या हातून फुलटॉस पडला आणि हरप्रीतने उत्तुंग षटकार चोपला. सहावा चेंडू कंबरपेक्षा अधिक उंचीचा असल्याने पंचांनी नोबॉलचा इशारा दिला. मात्र तोवर चेंडू पीयुष चावलाला भेदून सीमारेषेपलीकडे गेला होता. अखेर सहाव्या चेंडूवर हरप्रीत सिंगने पूल करत आणखी एक चौकार लगावला. अशा रीतीने अर्जुनच्या षटकात तब्बल 31 धावा निघाल्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)