UPI, OLX किंवा क्रेडिट कार्ड वापरून होणारी फसवणूक थांबवायची असेल तर हे वाचा

ऑनलाईन व्यवहार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आयव्हीबी कार्तिकेय
    • Role, बीबीसीसाठी

हरियाणा पोलिसांनी नुकतीच एका सायबर गँगला अटक केली. त्यांनी लोकांना फसवून उकळलेल्या रकमेचा आकडा कोट्यवधींमध्ये होता.

या गँगने जवळपास 28 हजार लोकांना लुबाडलं. UPI, OLX यासारख्या अॅप्सवरून किंवा नोकरी देतो असं सांगून त्यांनी लोकांची फसवणूक केली.

यूनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआयवरून सध्या असंख्य व्यवहार होतात. स्मार्टफोनवरून अशा प्रकारचे व्यवहार आरामात करता येतात. सध्या पेटीएम, गुगल पे, फोन पे सारखे अॅप्स लोकप्रिय आहेत.

यूपीआयच्या वाढत्या वापरामुळे त्यावरून होणारे लुबाडण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत.

2020 साली अशा प्रकारच्या फसवणुकीचे 77 हजार प्रकार पुढे आले होते, 2021 मध्ये 84 हजार तर 2022-23 मध्ये 95 हजार प्रकरणं समोर आलेली आहेत.

तुमच्या मोबाईलवर एक लिंक किंवा स्कॅनिंग कोड पाठवला जातो. ज्यावेळी तुम्ही या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुमच्या अकाऊंटवरचे पैसे गायब होतात. म्हणून अशा प्रकारचे व्यवहार करताना तुम्ही सावध राहिलं पाहिजे.

OLX च्या नावाखाली फसवणूक

काही वेळा काही अॅप्सवरून ग्राहकांना इतर सेवाही मिळवता येतात. यामुळे ग्राहकांचा वेळही वाचतो. उदाहरणार्थ OLX सारख्या अॅप्सवरून गोष्टी खरेदी विक्री करता येतात.

या अॅप्सच्या नावाखाली फसवणूक होताना दिसते.

तुम्हाला एक लिंक पाठवली जाते ज्यावर क्लिक करून तुम्हाला अॅडव्हान्स भरायला सांगितला जातो. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच तुमच्या अकाऊंटमधले सगळे पैसै गायब होतात.

कधी कधी तुम्हाला भलताच यूपीआय कोड पाठवला जातो. तो स्कॅन करताच तुमच्या अकाऊंटमधले सगळे पैसे गायब होतात.

क्रेडिट/डेबिट कार्डवरून होणारी फसवणूक

क्रेडिट/डेबिट कार्ड तुलनेने सुरक्षित असतात असा सर्वसामान्य समज आहे. पण सध्या या कार्डच्या नावाखाली फसवणूक होतेय हे निदर्शनास आलंय.

डेबिट/क्रेडिट कार्डवरून फसवणूक

फोटो स्रोत, Getty Images

फसवणूक करणारे तुम्हाला फोन करतात आणि तुमच्या कार्डचे डिटेल्स मागतात, तसंच ओटीपीही मागतात. तुम्हाला ज्या व्यक्तीने कॉल केलेला असतो ती व्यक्ती तुम्हाला बोलण्यात अशी गुंगवते की तुम्ही सगळे डिटेल देता आणि तुमच्या अकाऊंटवरून पैसे गायब होतात.

ते फोनवर सांगतात की आम्ही तुमच्या बँकेकडून बोलतो आहोत. कधी तुम्हाला फ्री क्रेडिट कार्डची ऑफर असते तर कधी तुम्हाला अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टकडून व्हाऊचर मिळालेत असं सांगितलं जातं.

अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक तसंच देशातल्या इतर खाजगी आणि सरकारी बँका प्रयत्न करत आहेत.

अशी फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?

यूपीआय व्यवहार करताना खालील काळजी घ्या.

1. यूपीआय व्यवहारांसाठी एक वेगळं बँक अकाऊंट उघडा. त्यात दर महिन्याला फक्त थोडीच रक्कम भरा. सगळे यूपीआय व्यवहार फक्त याच अकाऊंटवरून झाले पाहिजेत. असं केलं म्हणजे जर फसवणूक झालीत तर होणारं नुकसान मर्यादित राहील.

2. सॅलरी अकाऊंट किंवा इतर मोठ्या बचतीचे अकाऊंट्स या यूपीआय आयडीला जोडणं टाळा. तुम्ही या अकाऊंटसाठी यूपीआय सेवा वापरू शकला नाहीत तरी इतर ऑनलाईन सेवा वापरू शकता.

3. अनोळखी लिंकवर कधीही क्लिक करू नका.

OLX वर होणारी फसवणूक कशी टाळाल?

ऑनलाईन व्यवहारात होणारी फसवणूक टाळण्यासाठी खालील गोष्टी करा.

1. कोणाच्याही खाजगी अकाऊंटमध्ये डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करू नका. या अॅप्सवर जो पेमेंट गेटवे दिला असेल त्यावरूनच व्यवहार करा.

2. जर तुम्हाला काही शंका असतील तर त्यांना संपर्क करा, आणि मगच व्यवहार करा.

क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डच्या नावावर होणारी फसवणूक कशी टाळाल?

त्यासाठी खालील मार्ग आहेत.

1. कोणत्याही परिस्थितीत बँकेकडून आलेला ओटीपी कोणालाही देऊ नका. लक्षात घ्या, बँकांनाही तुम्हाला आलेला ओटीपी विचारण्याचा अधिकार नाही.

2. जर कॉल करणाऱ्या व्यक्तीने म्हटलं की ते एका विशिष्ट बँकेकडून बोलत आहेत तर त्या व्यक्तीचा फोन नंबर आणि इमेल आयडी विचारा. लक्षात ठेवा, तुमच्या कार्डचे डिटेल्स त्यांच्याकडे आहेत याचा अर्थ ते खरंच त्या बँकेचे कर्मचारी आहेत असा होत नाही.

(सूचना : हा लेख फक्त काही प्राथमिक माहिती देण्यासाठी आहे.)

हेही वाचलंत ?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)