अजित पवार म्हणतात, 'आताही मुख्यमंत्रिपदावर बसण्याची इच्छा'

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. आताही मुख्यमंत्री पदावर बसण्याची इच्छा - अजित पवार

2024 काय, आताही मुख्यमंत्री पदावर बसण्याची इच्छा असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती. पण, राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. काँग्रेसच्या लोकांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जाईल ही मानसिकता केली होती. पण दिल्लीत काय घडले माहिती नाही.

“राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद येणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही बहुमताने आर.आर पाटलांची निवड केली होती. त्यातून कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर 2004 मध्ये विधिमंडळ नेता म्हणून आर.आर. पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून झालेले पाहिले असते.”

“त्यानंतरच्या काळात नेहमीच आमचा पक्ष दोन नंबरला राहिला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद काँग्रेसला आणि उपमुख्यमंत्रिपद आमच्याकडे आले. 2024 ला काय, आताही राष्ट्रवादीची मुख्यमंत्रिपद मिळवण्याची तयारी आहे," असंही अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं.

2. समृद्धी महामार्गावर अडीच महिन्यांत 422 अपघात, 37 मृत्यू

समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. जानेवारी 2023 ते एप्रिल 2023 च्या पंधरवड्यापर्यत या महामार्गावर एकूण 422 अपघातात 37 जणांचा मृत्यू झाला.

यात 22 पुरूष व 22 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव यांनी दिली आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

चालकाला डुलकी लागणे, अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटणे, अतिरिक्त भार असलेले वाहन चालवणे, ताण, रस्ता संमोहन, लक्ष विचलित होणे आदी कारणांमुळे अपघात झाल्याचं यादव यांनी सांगितलं.

3. किसान सभेचा पुन्हा मार्च

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा किसान सभा आक्रमक झाली असून, त्यासाठी 26 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान अकोले ते लोणी असा मार्च काढण्यात येणार आहे.

या मार्चमध्ये हजारो शेतकरी सहभागी होतील, असं सांगण्यात आलं आहे.

अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळावी, दूध धोरण अशा अनेक मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक झाल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितलं. अॅग्रोवननं ही बातमी दिलीय.

4. मलिकांना सीबीआय नोटीस, विमा योजना गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी पाचारण

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीसाठी बोलावले आहे.

जम्मू-काश्मीरमधील सरकारी कर्मचारी वैद्यकीय विमा योजना आणि किरू जलविद्युत कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. या प्रकरणांत त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिलीय.

सध्या मलिक हे पुलवामा हल्ल्यासंदर्भातील गौप्यस्फोटामुळे चर्चेत आहेत.

‘‘पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली होती. मात्र, त्यांनी मला गप्प राहण्यास सांगितले’’, असा गौप्यस्फोट त्यांनी गेल्या आठवड्यात केला होता.

5. ‘84 लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे…’ तत्वज्ञान सांगणारे फौजदार लाच घेताना अटक

सोमनाथ देवराम चाळचूक या सहाय्यक फौजदाराला 15 हजारांची लाच घेतलाना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

सोमनाथ चाळचूक हे डिसेंबर 2022 मध्ये केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चांगलेच चर्चेत आले होते. आता त्यांनी जी पोस्ट केली त्याच्या विरोधात वर्तन केल्याने अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर तत्त्वज्ञान सांगणाऱ्या या फौजदाराला 15 हजारांची लाच घेताना पकडण्यात आलं आहे. सोमनाथ देवराम चाळचूक हे कोल्हापूरच्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)