You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'शिवरायांचा जन्म कोकणात', भाजप नेते प्रसाद लाडांच्या वक्तव्यानं नवा वाद
“छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला,” असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
आज (4 डिसेंबर) आयोजित स्वराज्यभूमी कोकण महोत्सव या कार्यक्रमात प्रसाद लाड बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर आणि इतर मान्यवर मंडळी बसलेली होती.
यावेळी बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटलं, “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. संपूर्ण भारताचं आराध्यदैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला.”
दरम्यान, प्रसाद लाड यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाबाबत चूक निदर्शनास येताच व्यासपीठावरील मान्यवरांनी त्यांना चूक लक्षात आणून दिली.
ते मान्य करत प्रसाद लाड यांनी होकारार्थी मान डोलावली. ते पुढे म्हणाले, “रायगडावर त्यांचं बालपण गेलं, तिथे त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली.”
त्यांच्यासोबतचे नरवीर तानाजी मालुसरे, प्रतापराव गुर्जर आणि असंख्य मावळे हे कोकणातीलच होते. त्यांनी आपलं रक्त सांडून स्वराज्याची स्थापना केली, असं लाड म्हणाले.
दरम्यान, प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत असल्याचं दिसून येतंय.
औरंगजेब-अफजलखानाने सुपारी दिल्याप्रमाणे बदनामी
प्रसाद लाड यांच्या वरील वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली.
"छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद आज भाजपा उपटसुंभानी उकरून काढला.हे ठरवून चाललंय का? औरंगजेब अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत.शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभ लोकांना मान्य आहे काय? करारा जबाब मिलेगा," असं राऊत यांनी म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेस खासदार अमोल कोल्हे यांनीही प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
प्रसाद लाड यांना कोपरापासून दंडवत, असं एका व्हीडिओमध्ये म्हणत कोल्हे यांनी त्यांची खिल्ली उडवल्याचं दिसून आलं.
राऊत यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते सुरज चव्हाण यांनीही लाड यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडलं.
ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरीवर बालपण राजगडवर गेल.वयाच्या 16 व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे,बाजी पासलकर,तानाजी मालुसरे,सूर्याजी मालुसरे,येसाजी कंक,सूर्याजी काकडे,बापूजी मुदगल,नरसप्रभू गुप्ते,सोनोपंत डबीर साथीने 1645 रोजी स्वराज्याची शपथ घेतली."
प्रसाद लाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त..
हा संपूर्ण वाद माध्यमांमार्फत समोर येताच प्रसाद लाड यांनी तत्काळ आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त करणारा व्हीडिओ पोस्ट केला आहे.
या संदर्भात प्रसाद लाड यांनी एक फेसबुक पोस्ट करत ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा मी निषेध करतो. ज्या भावनेतून हा कार्यक्रम आम्ही केला आहे, स्वराज्य कोकण भूमी. त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं होतं. तसंच मी माझी चूकही सुधारली होती. तुम्ही व्हीडिओत पाहिलं तर लक्षात येईल. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, स्वराज्याची स्थापना ही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला, असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवराव यांनीही म्हटलं. तेसुद्धा माध्यमांमध्ये आलेलं आहे. तरीदेखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करतं, त्याचा मी निषेध करतो आणि माझ्या शब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”
"छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार! कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो," असंही ते कॅप्शनमध्ये म्हणाले आहेत.