सनातन धर्म: सर्वसमावेशक संकल्पना की असमानतेचा आधार?

फोटो स्रोत, Getty
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"जिस 'सनातन'ने उन्हे अस्पृश्यता के खिलाफ आंदोलन चलाने के लिए प्रेरित किया..." पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 14 सप्टेंबरला मध्य प्रदेशच्या सभेत महात्मा गांधींचा उल्लेख करुन म्हणाले. संदर्भ सहाजिकच होता सध्या सुरु असलेल्या सनातन धर्माबद्दलच्या वादाचा.
मोदींचं म्हणणं हे होतं की महात्मा गांधींच्या अस्पृश्यतेविरोधातल्या लढाईमागे सनातन धर्माची प्रेरणा होती. हे मत, तामिळनाडूच्या 'डिएमके'चे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी काही काळापूर्वी, या वादाची सुरुवात जिथून झाली, केलेल्या सनातन धर्माच्या मांडणीपेक्षा वेगळं आहे.
मोदींनी गांधींच्या दिलेल्या या संदर्भामुळे हा वाद अधिक तीव्र झाला की सनातन धर्मामुळे भारतीय समाजात जातींचा गुंता अधिक घट्ट झाला की त्यामुळे सामाजिक सुधारणांना बळ मिळालं?
अलिकडेच प्रकाशिक झालेल्या ' कास्ट प्राईड: बॅटल्स फॉर इक्वॅलिटी इन हिंदू इंडिया या पुस्तकाचे लेखक मनोज मित्ता यांच्या मते गांधींनी स्वत: जाणीवपूर्वक सनातनी म्हणणं हा त्यांच्या परंपरावादाविरोधातल्या संघर्षातली एक रणनीती होती आणि यावर शंका घेता येईल की सनातन धर्म ही त्यांच्या अस्पृश्यतेविरोधातल्या लढ्याची प्रेरणा होती.
मनोज मित्ता याची आठवण करुन देतात की जेव्हा गांधींच्या आग्रहामुळे कॉंग्रेसनं 1920 मध्ये नागपूरच्या अधिवेशनात जेव्हा अस्पृश्यतेविरोधात ठराव आणला तेव्हा त्यांनी रुढीवाद्यांच्या असलेल्या दोषांची अजिबार खैर केली नाही.
या ऐतिहासिक ठरावात 'सगळ्या हिंदूंना अस्पृश्यतेपासून हिंदू धर्माची सुटका करण्यासाठी विशेष प्रयत्नांचं आणि अस्पृश्यतेचा निषेध करण्याचं आवाहन केलं गेलं'.
जातींच्या भेदभावाला मिळणा-या धार्मिक समर्थनाचं वास्तव मान्य करत हा ठराव "आदरपूर्वक सगळ्या धार्मिक नेत्यांना शोषित वर्गांना मिळणा-या अन्याय्य वागणुकीविरोधात हिंदू धर्मात सुधारणा घडवण्याचा वाढीस लागलेल्या भावनेला सहकार्य करण्याचे आवाहन करतो."

अस्पृश्यतेविरोधात लढा उभारण्यासाठी त्यांच्या मनात पूर्ण स्पष्टता असली तरीही, मनोज मित्ता यांनी पुराव्यांसहित दाखवल्याप्रमाणे, गांधींच्या मनात सतत एक द्वंद्व होतं आणि त्यांच्या कारर्कीर्दतला बराच काळ वर्णव्यवस्थेचे समर्थक होते.
गांधींनी 1924-25 मध्ये झालेल्या केरळातल्या वायकोम इथल्या सत्याग्रहाला समर्थन दिलं होतं कारण तो दलित समुदायासाठी मंदिराकडे जाणारा रस्ता खुला करण्यासाठी होता, पण मंदिर खुलं करण्याकरता नव्हता.
मनोज मित्ता यांच्या मते, "गांधींचं मत मंदिरप्रवेशाबाबत खुलं झालं जेव्हा त्यांना 1932 मध्ये पुणे करारादरम्यान मोठा संघर्ष करुन मिळवलेल्या स्वतंत्र मतदारसंघांचा अधिकार सोडायला दलित समाज तयार झाला आणि गांधींना त्याला प्रतिसाद म्हणून काही कृती करावीशी वाटली." तरीही गांधींनी, सर्वांना असणा-या समान अधिकारापेक्षा, त्या त्या ठिकणच्या भाविकांचं जनमत घेऊन, ते प्रयत्न हळूहळू वाढवत नेले.

फोटो स्रोत, Getty
मित्ता हेही सांगतात की कसं ही सुधारणा आणण्यासाठी गांधीच्या पुढाकारातून तयार झालेल्या विधेयकामुळे त्यांच्यात आणि मदन मोहन मालवियांच्यात मोठा वाद झाला होता कारण मालवियांचं मत मंदिरप्रवेशासारख्या प्रश्नामध्ये सरकारच्या सरकारच्या हस्तक्षेपाविरुद्ध होतं.
जरी गांधींचा पाठिंबा असणारं विधेयक शेवटी अधिकार हिंदूंनाच देणारं होतं, तरीही वाद एवढा पुढे गेला की त्या विरोधात मालवीय यांनी वाराणसीत 23 जानेवारी 1933 रोजी 'सनातन धर्म महासभा' बोलावली होती.
मथितार्थ हा, की सनातन धर्म वा सनातन संकल्पना, त्यात अंतर्भूत असलेल्या व्यवस्था-परंपरा, त्याबद्दल विविध कालखंडात असलेल्या प्रभावी व्यक्तींच्या भूमिका आणि त्या भूमिकांचं आकलन, यात फरक होता. त्यात सातत्यानं बदलत गेल्या. त्यावर वाद-चर्चा होत राहिल्या.
सनातन व्युत्पती: शाश्वत, प्राचीन की रुढी-परंपरावादी?
आज जेव्हा सनातन धर्माच्या बाजूनं आणि विरुद्ध असा वाद होतो आहे, तेव्हा 'सनातन' या संकल्पनेचे संदर्भ कसे कालौघात बदलत गेले हे ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ आणि मानववंश अभ्यासक डॉ गणेश देवी विस्तारानं सांगतात. ते इथं समजून घेणं आवश्यक आहे.
"अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बंगालमध्ये एक चर्चा सुरु झाली. त्यात दोन बाजू होत्या. नूतन आणि सनातन. त्यातल्या 'नूतन'मध्ये इंग्रजीतून शिक्षण दिलं जावं, सतीला बंदी व्हावी, बालविवाह बंद व्हावा अशा विविध मागण्या होत्या. 'सतानत' बाजूला, या सगळ्या नवीन बदलांमुळे आपला समाज कलंकित होईल, अशी धारणा होती."
"हा वाद जवळपास 3 दशकं चालला आणि त्यातून आधुनिक बंगाल किंवा बंगालचं प्रबोधनपर्व (रेनसॉं) ज्याला आपण म्हणतो, त्याची निर्मिती झाली. 18 शतकात प्राचीन परंपरांसाठी 'सनातन' हा शब्द वापरण्यात येऊ लागल्यानंतर, या शब्दाच्या चौकटीत अनेक परंपरा बसवण्यात आल्या. त्यात वेदांची, उपनिषदांची, शास्त्रांची आणि धर्मार्थांची परंपरा बसवण्यात आली," डॉ.देवी सांगतात.

फोटो स्रोत, Getty
"ही चर्चा सुरु होण्याच्या काहीच काळ अगोदर, म्हणजे 17 व्या शतकात, ऋग्वेदाची तारीख ही इसवी सन पूर्व 1400 असावी हा कयास बांधण्यात आला. तेव्हापासून वेद, त्यानंतर उपनिषदं आणि मग स्मृती, शास्त्रं यांच्या निर्मितीचा जवळपास दीड हजार वर्षांचा कालखंड, त्यात निर्माण झालेली संस्कृत भाषेतलं वेगवेगळं लिखाण, हे सगळं १८ व्या शतकात या 'सनातन' शब्दाच्या चौकटीत बसवण्यात आलं."
"पूर्जा-अर्चा कर्मकांड यांच्यासंबंधी, तत्वज्ञानासंबंधी किंवा सामाजिक विचारासंबंधी या सगळ्या वैदिक आणि त्यानंतरच्या लिखाणात एकवाक्यता होती का, असा प्रश्न जर विचारला तर त्याचं स्पष्ट उत्तर 'नव्हती' असं आहे. म्हणजे ती जी 1500 वर्षांची परंपरा होती, तीच स्वत: एक मानत नव्हती. पण ती एकच परंपरा आहे, असं 18 व्या शतकात गृहित धरण्यात आलं," डॉ देवी पुढे सांगतात.
'सनातन' ही शब्द अथवा संकल्पना शाश्वत, कायमस्वरुपी अशा अर्थानं वापरला जातो. तसा तो जुन्या संस्कृत वाड्मयात वापरलाही गेला. पण त्यानंतर अलिकडच्या काळात, म्हणजे 18 शतकापासून भारताच्या विविध प्रांतांमध्ये एक नवी चर्चा सुरु झाली. हा काळ ब्रिटिशांच्या आगमनानंतर सुधारणांचा होता. तेव्हा सनातन हा शब्द प्राचीन अशा अर्थानं घेतला गेला. शिवाय, जे परंपरांना धरुन आहेत त्यांना सनातनी असंही म्हटलं गेलं.
डॉ गणेश देवींच्या मते जो 'सनातन' हा शब्द त्या 1500 वर्षांमध्ये वापरला गेला होता, तो 'इटर्नल' म्हणजे 'शाश्वत' या अर्थानं वापरला गेला होता. ज्याला सुरुवातही नाही आणि अंतही नाही. 'ना आदि ना अंत' याला 'सनातन' हा शब्द वापरला गेला होता. मात्र 18 व्या शतकामध्ये त्या शब्दाचा अर्थ वेगळा बनवला गेला. असं लिखाण प्रामुख्यानं इंग्रजीत लिहिणा-या भारतीयांकडून अथवा परदेशी अभ्यासकांकडून झालं.

फोटो स्रोत, Getty
त्यामुळे 'सनातन' हा एकच शब्द असला तरीही त्याचा अर्थ सुरुवातीला जो होता तो आणि नंतर जसा करण्यात आला तो, वेगळा होता. शिवाय आज सनातन धर्म जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तोच हिंदू धर्मही आहे का, असाही उपप्रश्न पुढे येतो. डॉ देवींच्या मते 'हिंदू' या शब्दाची व्युत्पत्ती फार नंतरच्या काळात झाली.
"हा सनातन शब्द आता 21 व्या शतकात पुन्हा एकदा वापरला जातो आहे. ही सनातन अशी शास्त्रं होती, ती हिंदू धर्मशास्त्रं अशा अर्थानं झाली नव्हती. हिंदू नावाच्या धर्माला कोणता प्रेषित वा कोणी जाणूनबुजून धर्मासाठीचा ग्रंथ असा लिहिला नव्हता," डॉ देवी सांगतात.
"जेव्हा 18 व्या शतकात नूतन विरुद्ध सनातन असा वाद सुरु झाला, तेव्हा सनातन वर्गातले जे होते त्यांनी सगळी ही 1500 वर्षांतली परंपरा आहे ती 'हिंदू' ही एकधारेची परंपरा आहे असा दावा सुरु केला. तेव्हापासून पुढे हिंदू, हिंदुत्व या कल्पना वेगवेगळ्या पद्धतीनं आकार घेऊ लागल्या. त्यामुळे आजची जी 'सनातन'ची कल्पना आहे ती भारताच्या प्राचीन काळातल्या 'सनातन'शी मिळतीजुळती नाही आहे," डॉ गणेश देवी सनातन धर्म आणि प्रचलित हिंदू धर्म यांच्या परस्परसंबंधांबद्दल म्हणतात.
सनातन धर्म, जातिव्यवस्था आणि 19 व्या, 20 व्या शतकातली घुसळण
उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयाच्या वक्तव्यावरुन वाद सुरु झाल्यावर त्याच्या अनेक
कंगोऱ्यापैकी एक हा जातिव्यवस्था होता. हा हिंदू धर्मासमोरचा, भारतीय समाजासमोरचा शतकांपासूनचा गंभीर सामाजिक प्रश्न आहे. या टीकेचा रोख जातींच्या उतरंडीतून निर्माण झालेल्या विषमतेकडे आहे. या मुद्द्यावर धर्माची चिकित्सा कायम झाली आहे आणि मोठी सामाजिक आंदोलनंही झाली.
धर्माचा जातिव्यवस्थेला आधार राहिला. म्हणूनच आज जेव्हा सनातन धर्माच्या बाजूनं सध्या चालू असलेल्या वादात बोललं जातं, तेव्हा ते समर्थन जातींचंही होतं का? हा प्रश्न विचारला जातो.
जेव्हा 19व्या आणि 20 शतकात, सामाजिक सुधारणांचे वारे वाहू लागले, तेव्हा सनातन विरुद्ध सुधारक असे गट पडले, असं डॉ देवींच्या मांडणीत पाहिलं आहेच. त्या काळच्या वादातही प्रमुख मुद्दा हा जाती आणि त्यातून आलेली विषमता हाच होता. तो विविध प्रांतातील चळवळींमध्ये त्या प्रांतातल्या स्वरुपाप्रमाणे या प्रश्नाची मांडणी झाली.

फोटो स्रोत, Getty
व्ही. गीता या चेन्नईस्थित सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत. चळवळींच्या या इतिहासावरही त्यांच्या अभ्यास आहे. "हिंदू धर्माचं अथवा सनातन धर्माचं रुप हे वर्णाश्रम धर्माचंच राहिलं आहे. जातिव्यवस्थेशिवाय हा धर्म नाही किंवा तो असा धर्म होतो जो जातिव्यवस्थेचं समर्थन करतो. जे समर्थन वास्तविक कोणत्याही प्रकारे करता येत नाही," असं त्या म्हणतात.
त्या म्हणतात, "सनातन म्हणजे कायमचं टिकणारं. त्याला एकोणिसाव्या शतकाच्या आसपास एक नवं आयुष्य मिळालं जेव्हा हिंदू परंपरांबद्दल एक कमालीचं आकर्षण निर्माण झालं. देशभर सनातन सभा स्थापन झाल्या होत्या. जे पारंपारिक अथवा पुराणमतवादी होते आणि जातिव्यवस्थेचे समर्थकही बनले होते.
एका प्रकारे तो जातिआधारित विषमतेला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न होता. या सभांनी एकत्रित हिंदू अशी ओळख तयार करणं सुरु होतं, जी दुस-या धर्मांच्या विरोधातही होती. उत्तरेत ती बहुतांशानं इस्लामविरोधी होती तर दक्षिणेत तिला ब्राम्हण विद्वानांचं समर्थन लाभलं."
गीता हेही सांगतात की सवर्णांचा पाठिंबा सनातन धर्माला होता तरीही त्यातल्या काही विद्वानांनी कायम हे जाहीर सांगितलं त्यातल्या काळाशी सुसंगत नसलेल्या परंपरांचा त्याग करायला हवा.

दक्षिणेतलं असं उदाहरण देतांना त्या मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असणा-या सदाशिव अय्यर यांचा उल्लेख करतात ज्यांनी 'हा जो सतानत धर्माचा जो पुराणवृक्ष आहे तो छाटणी करुन, कापून रि-मॉडेल करायला हवा कारण तो आधुनिक काळातल्या समतेच्या संकल्पनांशी सुसंगत नाही' असं म्हटलं होतं.
सनातन धर्मात वैदिक काळात वर्णाश्रम व्यवस्था तयार झाली. त्यानंतर ब-याच कालखंडानं जातिव्यवस्था तयार झाली असं म्हणत ती वर्णाश्रमव्यवस्थेपेक्षा वेगळी होती असं डॉ गणेश देवी सांगतात.
"जात आणि वर्ण या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. सनातन काळात जी काही शास्त्रं वगैरे लिहिली गेली, त्यात वर्णाला पुष्टी दिलेली आहे. वर्ण म्हणजे जात नव्हे. वर्ण हे पुनर्जन्माच्या संकल्पनेवर आधारित सामाजिक वर्गीकरणाचा छ्द्म अधिभौतिक (pseudo-metaphysical) प्रयत्न होता. पण जात ही कामाच्या स्वरुपावर आधारलेली सामाजिक उतरंड होती. त्याला कोणता तात्विक (metaphysical) पाया नव्हता. त्याला देवाचा, वेदाचा अथवा उपनिषदाचा असा कोणताही आधार नाही. शून्य आधार आहे," डॉ देवी सांगतात.

फोटो स्रोत, Getty
जातिव्यवस्था जशी पुढच्या काळात बळकट झाली आणि सोबत विषमताही घट्ट झाली, तेव्हा एका टप्प्यावर तिच्या विरोधात आवाजही उठू लागला. काही जातींना श्रेष्ठ ठरवणारी आणि इतरांना शोषित बनवणारी ही रचना होती.
'हिंदू ही पूजापद्धतींमध्ये खूप वैविध्य असलेल्या एका मोठ्या लोकसमूहाला कवेत घेणारी संकल्पना आहे. पण ती संकल्पना जातव्यवस्था मानणा-या सगळ्या समूहांनाही एकत्र आणते. जातिव्यवस्था ही आजच्या हिंदूंनाही घट्ट धरुन आहे."
"धर्माने तिला मंजूरी आहे का यावर लोक अनंत काळ चर्चा करत राहतील. सत्य हेच उरतं की हा एक जातींनी बरबटलेला समाज आहे. आपण त्या सत्यापासून पळून जाऊ शकत नाही. सनातन धर्म जातीव्यवस्थेचं समर्थन करत होता. त्यामुळेच असंख्य लोकांनी, दक्षिणेत आणि भारताच्या अन्य भागांतही, त्याला विरोध केला आहे," व्ही. गीता म्हणतात.
या विषमता विरोधी चळवळी देशाच्या विविध प्रांतांमध्ये सुरु होत्या. उदाहरणार्थ महाराष्ट्रात वारकरी संप्रदायानं अध्यात्मिक क्षेत्रात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलं. एकोणिसाव्या शतकापासून त्याला सामाजिक चळवळीचं रुप मिळालं.
महात्मा फुलेंनी याच विषमतेविरुद्ध कणखर आवाज उठवला आणि पर्याय म्हणून 'सार्वजनिक सत्यधर्मा'ची मांडणी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जातींविरुद्धची ही लढाई एका निर्णायक टप्प्यापर्यंत नेली. आर्य समाजानं एका मर्यादित स्वरुपात प्रचलित असमानतांना हटवण्याचे प्रयत्न केले.
सनातन धर्म: दक्षिण आणि उत्तर
उदयनिधी यांच्या विधानावरुन वादंग निर्माण झाल्यावर सनातन धर्म या विषयावर अजून एक फरक दिसून आला. तो म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत. उदयनिधी यांच्या वक्तव्याशी सहमती दर्शवत दक्षिणेतले पुढारी पुढे आले. डी. राजा, प्रियांक खर्गे यांनी समर्थन केलं.
पण या वक्तव्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उत्तरेतून आली. भाजपाचे नेते यात अग्रेसर होतेच, पण 'इंडिया आघाडी'त सहभागी असलेल्या उत्तरेतल्या नेत्यांनाही या वक्तव्याशी असहमती दाखवावी लागली. त्यांना ते अडचणीचं वाटलं.
याचा अर्थ सनातन धर्म या संकल्पनेची समज, त्याचं महत्व उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात वेगळं आहे का? तो फरक आहे असं सगळ्याच अभ्यासकांना वाटतं. परिणामी त्याच्या समर्थनार्थ अथवा विरोधात झालेल्या चळवळींचं स्वरुपही दोन्हीकडे वेगळं आहे.

फोटो स्रोत, Getty
"दक्षिणेकडे भक्ती, श्रद्धा या मूल्यांना हिंदू लोकांनी जास्त महत्व दिलं. उत्तर भारतामध्ये जन्म, वारसा, कुल आणि गोत्र यांना जास्त महत्व देण्यात आलं. त्यामुळे या दोन्ही परंपरांमध्ये फरक हा राहिला आहे," डॉ गणेश देवी सांगतात.
व्ही गीता यांच्या मते उदयनिधी यांच्या वक्तव्यावर एवढा हलकल्लोळ का व्हावा हा दक्षिणेतल्या कोणालाही पडणारा प्रश्न आहे. हिंदू अथवा सनातन धर्माची चिकित्सा करण्याचा इथे एक मोठा इतिहास आहे. ते दक्षिणेसाठी नवीन नाही.
पेरियार यांच्या चळवळीतून तयार झालेली सामाजिक जाण, त्यातून तयार झालेली राजकीय विचारधारा आणि त्याची आजच्या राजकारणावरही असलेली पक्की मांड तामिळनाडूमध्ये आहे. पण हे केवळ या एकट्या राज्याचं नाही. केरळ, आंध्र, कर्नाटक या राज्यांमध्येही असे प्रवाह आहेत. त्यातून एक सामाजिक आकलन तयार झालं आहे.
"आधुनिक काळात हिंदू धर्माची चिकित्सा करण्याची, त्याला प्रश्न विचारण्याचा मोठा इतिहास दक्षिण भारतात आहे. 19 व्या शतकाच्या मध्यापासून अनेकांनी जो आजचा हिंदू धर्म आहे वा ओळख आहे त्याविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. वास्तविक तो धर्म हा ब्राम्हणवर्गानं चालवलेला धर्म होता."
"तत्कालीन ब्राम्हणवर्गानं विषमतेचं एक राजकारण चालवलं होतं. ते इतर वर्गांची कदर करत नव्हते. अशा वर्गातल्या लोकांनी आधुनिक काळातल्या हिंदू धर्माची समीक्षा करणं सुरु केलं. त्यामुळे हा वर्णाश्रमधर्म वा हिंदू धर्म हा ब्राम्हणवादी धर्म असल्याची टीका सातत्यानं दिसते," गीता म्हणतात.

फोटो स्रोत, Dhileepan Ramkrishnan
"पेरियार आणि त्यांचे सहकारी हे काही पावलं अधिक पुढे गेले आणि म्हणाले की, ते नास्तिक आहेत, अज्ञेयवादी आहेत. ते सगळ्याच धर्मांची चिकित्सा करतील आणि त्यातही हिंदू धर्माची, कारण त्यात विषमतेला परवानगी दिली आहे. त्यामुळे दक्षिण भारतात असा धर्म हा ब्राम्हणवादी आहे असं मत नवीन नाही. असं म्हटलं जातं की तो सर्वांसाठी आहे, पण ते खरं नाही. तो जातीव्यवस्थेचं समर्थन करतो. उच्च जातींच्या, विशेषत: ब्राह्मणांच्या, श्रेष्ठतेचं समर्थन करतो. ही एक जुनी टीका आहे," गीता सांगतात.
त्यामुळे उदयनिधी यांनी ज्या प्रकारची टीका केली तशी टीका गेल्या शंभर वर्षांपासून दक्षिणेत आम्ही ऐकत आलो आहोत असं गीता म्हणतात. शिवाय दक्षिणेतलं राजकारण, विशेषत: पेरियार यांच्या चळवळीनंतर, याच मुद्द्यांशी आजही जोडलं गेलं आहे.
"खरं तर दक्षिण विरुद्ध उत्तर असा हा प्रश्न नसून तो जातिव्यवस्थेला विरोध करणारे विरुद्ध तिचं समर्थन करणारे असा आहे. दक्षिण भारतात इतिहास असा आहे की जे असा विरोध करतात ते राजकीय सत्तेत येतात. त्यामुळे तो नवीन नाही," गीता म्हणतात.
"दक्षिण भारतात धर्मावर अशा प्रकारची टीका होणं याची परंपरा जुनी आहे. त्यामुळे अशी टीका केल्यानं तिथं नव्यानं वादळ निर्माण होत नाही. उत्तर भारतात हिंदू धर्मावर, सनातन धर्माच्या संकल्पनेवर अशी टीका सहसा झालीच नाही आहे. त्यामुळे तिथे खळबळ माजते. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपा करतो," असं निरिक्षण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ सुहास पळशीकर मांडतात.
संघाची भूमिका
रा. स्व. संघप्रणित हिंदुत्ववाद हा आज भारताच्या राजकारणातलं महत्वाचं अंग आहे. भाजपानंही सध्याच्या वादात आक्रमक भूमिका घेतली आहे. संघाची भूमिका हीसुद्धा कायम हिंदू धर्म हाच सनातन धर्म असल्याची पहिल्यापासून राहिली आहे.
'द इंडियन एक्स्प्रेस'नं 5 सप्टेंबर 2023 च्या अंकात लिहिलं आहे की, '2003 साली संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेनं ठराव केला ज्यात सनातन धर्म हा हिंदू धर्म आणि राष्ट्रीयतेशी जोडला गेला. ठरावात असं म्हटलं गेलं की, श्री अरबिंदोंचं ठाम मत होतं की हिंदू धर्म हा अन्य काही नसून सनातन धर्मच आहे जी आपल्या देशाची खरी राष्ट्रीयता आहे. सनातन धर्माचा उदय आणि अस्त याचा थेट संबंध हा हिंदूराष्ट्राच्या उदय आणि अस्ताशी आहे."

फोटो स्रोत, Getty
सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत हेही सनातन धर्माविषयी सातत्यानं बोलत असतात. एप्रिल 2022 मध्ये हरिद्वार इथं बोलतांना ते म्हणाले होते, "भारताची प्रगती ही धर्माच्या प्रगतीशिवाय शक्य नाही. सनातन धर्म हाच हिंदू राष्ट्र आहे. त्यातच प्रगतीची शाश्वती आहे."
पण मग सनातन धर्माचा एवढा आग्रह धरणा-या संघाचं जातीव्यवस्थेबद्दल मत काय आहे? या धर्माच्या आधारे इथे जाती रुजल्या या आक्षेपावर म्हणणं काय आहे?
त्यावर उत्तर देताना संघाचे संस्थापक डॉ हेडगेवार यांचे चरित्रकार आणि राज्यसभा खासदार राकेश सिन्हा म्हणाले, "सनातन हे पुरोगामी प्रक्रियेचं नाव आहे. समता, समरसता आणि विविधता ही सनातन धर्माची मूलभूत परिमाणं आहेत. जर या परिमाणांमध्ये विविधता नसती तर उपनिषदांमध्ये 'नेति-नेति' म्हणजेच 'हे ही नाही, ते ही नाही' सांगितलं नसतं. सनातन धर्मात समतेची प्रवृत्ती नसती, तर व्यवस्थेला विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे 'नेति-नेति'चा प्रश्नच उद्भवत नाही."
ते म्हणतात, "समाजात पंथांचा, जीवनपद्धतीचा आणि विविधतेचा निरंतर प्रवाह सुरू असतो. आणि त्याकडे कोणीच अस्वस्थपणे पाहत नाही. त्यामुळेच सनातन आणि हिंदू धर्मात फरक करणं देखील चुकीचं आहे. कारण हिंदू धर्माचा जो मूळ आत्मा आहे तो सनातन धर्मच आहे."

फोटो स्रोत, Getty
हा वाद सुरु असतांनाच 7 सप्टेंबरला नागपूरमध्ये बोलतांना मोहन भागवत म्हणाले, "आम्ही आमच्याच माणसांना सामाजिक पद्धतीत मागे ठेवलं. त्यांच्या विषयी 2000 वर्षं काहीही आस्था दाखवली नाही. त्यांना समानता मिळण्यासाठी विशेष कृतीचीच गरच आहे आणि आरक्षण हे त्यापैकी एक आहे. समाजातल्या ज्या घटकांनी 2000 वर्षं अन्याय सहन केला, तर आम्ही 200 वर्षं थोडा त्रास का सहन करुन नये?"
पण डॉ सुहास पळशीकरांना वाटतं की यात विरोधाभास आहे.

"उदयनिधीनं जे सनातन धर्मावर असं आक्रमक बोलल्यावर जे हिंदू अथवा सनातन धर्माची पाठराखण करतात त्यांची पंचाईत झाली. ते सनातन धर्माची बाजू घेत आहेत, पण व्यवहारात जातींचा प्रश्न बिकट आहे हे त्यांना मान्य आहे. त्यासाठी मार्ग काय याचं उत्तर देता येत नाही. म्हणून एका बाजूला मोहन भागवत जातिव्यवस्थेच्या विरुद्ध आणि आरक्षणाच्या बाजूनं बोलतांनाही दिसतात आणि दुसरीकडे सनातन धर्माच्या बाजूनही बोलतांना दिसतात," पळशीकर म्हणतात.
एका बाजूला धार्मिक विवाद आहेत, जे भारताला नवीन नाहीत. त्यात अपेक्षित काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, या चर्चा निरंतर आहेत. पण दुस-या बाजूला वास्तव टाळता येत नाही. त्या वास्तवाची ऐतिहासिक जबाबदारी कोणी घ्यायची?
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








