You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'हे असंच उन्हातान्हाचं कसं तरी तडफडून पोट भरायचं', भीषण दुष्काळामुळे बिघडले जगण्याचेच गणित
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी बारामतीहून
तापलेल्या उन्हातून कोरड्या भेगाळल्या धरणाच्या जमिनीवरुन वाट काढत बाळा सुखदेव बरडे आणि त्यांची बायको धरणाची भिंत ओलांडून वर आले तेव्हा त्यांच्या हातात फक्त एक बाटली पाणी होतं. याच बाटलीभर पाण्याच्या साथीने ते पोटाची खळगी भरण्यासाठी काम शोधत दिवसभर उन्हातान्हाचं फिरत होते.
सत्तरीच्या घरात असलेल्या बाळा सुखदेव बरडे आणि त्यांच्या बायकोचा मुख्य व्यवसाय मासेमारीचा. वर्षभर एका कंत्राटदाराकडे ते कामाला जातात.
जेजुरी जवळच्या कऱ्हा नदीचं पाणी अडवणाऱ्या नाझरे धरणाच्या पाण्यात मासे सोडायचे. ते मोठे होत आले की पकडायचे आणि कंत्राटदाराला द्यायचे. दिवसाचे जेवढे मासे येतील तितकी मजुरी असं त्यांचं गणित. पण यंदा सगळं धरणच कोरडं पडलं.
इथं पाणी होतं आणि धरण आहे असं म्हणायला पाण्याचं एक डबकं तेवढं शिल्लक राहिलंय. पाणी नाही म्हणलं की मासेमारी कुठली करणार? त्यामुळं आता बरडे आणि त्यांची पत्नी दिवसदिवस लोकांनी नदीपात्रात टाकलेलं दान शोधत फिरतात. काही मिळालं किंवा मजुरी मिळाली तर त्या दिवसासाठी खायला मिळतं असं ते सांगतात.
बीबीसी मराठीच्या टीमला ते दोघं भेटले तेव्हा म्हणाले बरडे सांगतात, “काय धंदा करायचा आता. हे असं कसंच तडफडून पोट भरायचं..
वर्षभर पाणी आहे तेव्हा माशांचा व्यवसाय सुरू असतो. चार गाड्या मासे सोडले होते. पण जास्त लवकर पाणी आटलं आहे. त्यामुळे नुकसान झालं आहे.
जे मासे होते ते मरुन गेले. आता तीन चार महिने झाले मासेममारी बंद होऊन. पाणी नसल्यामुळे काय करणार, काहीच करू शकत नाही."
फक्त बरडे दाम्पत्याचीच ही अवस्था नाही. पश्चिम महाराष्ट्रातील दोन तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ पडला आहे आणि त्याची झळ लोकांना पडला आहे. दुधदुभते, पशुपालन करुन जगणाऱ्या कुटुंबावर तर दुहेरी संकट आहे. आपल्या कुटुंबीयांसोबतच आपल्याजवळील प्राण्यांना कसे जगवायचे हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
'आमचं नाही पण निदान शेळ्या-मेंढ्यांचं तरी पोट भरावं' ?
नाझऱ्यापासून काही अंतरावर पुढे असणाऱ्या न्हावळी गावातल्या धनगरांवर तर स्वत: बरोबरच आपल्या मेंढ्यांना कसं जगवायचं हे संकट उभं राहिलं आहे.
काट्याकुट्यांमधून चालत सत्तरी पार केलेले बाळू तोरवे आणि त्यांची दोन नातवंडं वाळलेल्या झाडांच्या पाला आणि वाळलेला चारा शोधत आहेत. यावरच आता त्यांच्या शेळ्या-मेंढ्यांचे पोट भरणार आहे. त्यासाठी त्यांना अनेक दिवसांची पायपीट करावी लागते इतकी विदारक परिस्थिती सध्या आहे.
गवत तर नाहीसं झालं आहेच त्यात परिसर सगळाच ओसाड. त्यामुळे एखादं झाड दिसलं तर कुऱ्हाड घेऊन त्याच्या फांद्या तोडल्या तर त्या दिवसाचं भागतं.
बीबीसीची टीम पोहोचली तेव्हा झालेल्या तापमानात तोरवेंची नातवंडं तुटलेली कुऱ्हाड हातात धरुन आता मेंढरांना काय चारायचं म्हणून विचार करत बसले होते.
पलीकडे त्यांचे आजोबा बाबू तोरवे काट्याकुट्यात एखादं पान दिसतंय का म्हणून मेंढ्या घेऊन फिरत होते.
रोजच्या जगण्यात दुष्काळामुळे सुरू असलेल्या वेदनांची कहाणी तोरवेंनी अगदी काही शब्दांत मांडली, "इथं पाणी नाही चारा नाही.. जगायचं कशावर? लय दुष्काळ.. असला दुष्काळ कधीच पडला नाही. पाणी नाही जित्राबाला खायला नाही. असं कुठं तरी घमेल्यात मांडतो इवलं इवलं पाणी. ती ओरडत राहतात खाण्यासाठी. ही अशी फिरवायची. आमचं नाही पण त्यांचं पोट भरू दे."
न्हावळीतल्या धनगर पाड्यावरची साठ कुटुंबं तर यंदा दिवाळीच्या आधीच बाहेर पडली. पाऊस पडला नाही म्हणून चाऱ्याचा शोध घ्यावा लागेल याचा अंदाज त्यांना आधीच आला. आता पाड्यावर फक्त रिकाम्या दगडांच्या भिंती राहिल्या आहेत. त्यातल्याच एका घरात बाबा तोरवे आणि त्यांचं कुटुंब रहातंय.
पाड्यावरच्या इतर घराची राखण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्यावरच आहे. पाड्यावरच्या देवाच्या पुजेची जबाबदारी असल्याने आपण इथे थांबल्याचे ते सांगतात. त्यांची पत्नी संगीता तोरवेंना पाणी आणायला काही किलोमीटर चालणं रोजचं आणि जवळपास सवयीचं झालंय.
एकावर एक तीन हंडे रचून पाणी आणायला पन्नाशीतल्या संगीता उन्हातान्हाच्या चकरा मारतात.
भर दुपारी थोडा थंडावा मिळावा म्हणून देवळात जाऊन बसलेले तोरवे सांगतात, "दसरा दिवाळीला देवाची जत्रा झाली की दरवर्षी जातेत कोकणात. यावर्षी परिस्थिती बेकार आहे. बकऱ्यांना चरायला नाही, पाणी नाही. पूर्वी इथं आमचे बकरे असायचे.
ते इथं डोंगरात चरायचे. पण तेव्हा पाऊस काळ चांगला असायचा. दिवसेंदिवस पाऊस कमी होत चालला आहे. त्यामुळे तकलीफ वाढत चालली. यंदा लोक पाऊस नसल्याने लवकरच कोकणाला निघून गेले. त्यांची मुलंबाळं इथंच शाळांमध्ये शिकतात."
'गायींनी मला माणसात आणलंय, काही झालं तरी मी त्यांना जगवणार'
मुर्टीतल्या सुनिता जगदाळे तर कर्जाच्या गर्तेत अडकल्या आहेत पण त्यांच्यासमोर आता एकच ध्येय आहे ते म्हणजे आपल्यावर कधी गायी विकायची वेळ येऊ नये.
नवऱ्याच्या मृत्यू नंतर सुनिता जगदाळे आणि त्यांची नणंद शेला जगदाळे मजुरी करत होत्या. पदरातल्या मुलांना कसं वाढवायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अशात लोकांनी त्यांना गाय घेण्याचा सल्ला दिला. गाय घरात आली आणि त्यांचं आयुष्य पालटलं.
एका गायीच्या 17 गायी झाल्या. बरं चाललंय, असं वाटत असतानाच आता दुष्काळाने त्यांच्यासमोर नवे प्रश्न उभे केले आहेत.
सुनिता जगदाळे सांगतात, "लय तोटा होतोय. पूर्वी 1 रुपया नफा होत होता ना, तर आता त्यातला पाच पैसे पण नाय होत. म्हणजे याच्याकडून उसनं घे त्याच्याकडून उसनं घे यासाठी पदर पसरावा लागतो. त्यातली ती माणसं येऊन बोलतात ना तुम्ही खाता आणि आमचे पैसे का देत नाही. ते नाही असं समजून घेत की आता पाऊस नाय बाबा.
"इतकी अवघड परिस्थिती आहे ना की गायी पाळणंच लय अवघड झालंय. म्हणजे इथलेच गोठे विकलेत माणसांनी खाण्याअभावी. माझी एक एक गाय 40 लीटर दूध देती म्हणून माझं चाललंय कसं बसं मी पण आता उसनं पासनं घेऊन भागवते. गायींनी मला माणसात आणलं, माझं काय का होईना मी गायांना सांभाळणार," असा निर्धार सुनिता करतात.
बाजारातले गिऱ्हाईक निम्म्यावर आले
लोकांच्या जगण्यावर परिणाम झालाय त्याचं प्रतिबिंब बाजारपेठेवर दिसतंच. सुप्याच्या बाजारात निम्मंही गिऱ्हाईक नसल्याचं इथले व्यापारी सांगतात.
इथल्या सगळ्यांचंच जगणं अवलंबून आहे ते टँकरच्या जाण्यायेण्यावर. तसं टँकर भोवतीचं जगणं बारामतीतल्या 23 गावांसाठी दर उन्हाळ्यात ठरलेलंच. पण यंदाची परिस्थीती नेहमीपेक्षा बिकट असल्याचं इथलं प्रत्येक जणच सांगतो.
महाराष्ट्र सरकारने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात बारामती आणि पुरंदर पट्टा गंभीर दुष्काळ या प्रवर्गात येतो. केंद्रीय पथकाची इथं पाहणी झाली आहे. सध्या या पट्ट्यातल्या 29 ठिकाणी दररोज खेपांनी टँँकरने पाणी पुरवलं जातं आहे.
राज्यात या वर्षी पावसाच्या प्रमाणात 13.4 टक्क्यांची घट झाल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या संथपणे सुरू आहेत, केवळ 12 टक्के पेरण्या झाल्या असल्याचं सरकारी आकडेवारी सांगते त्यावरुनच आपल्याला परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.
लोकांसमोर शेतीचे काय करायचे हा प्रश्न तर आहेच पण आपल्या कुटुंबासाठी आणि पशुधनासाठी त्यांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे असं चित्र आहे.
सरकारी आकडेवारीनुसार 'अजितदादा मोटार वाहतूक संस्था बारामती'च्या वतीने दिवसाकाठी प्रत्येक ठिकाणी दोन तीन खेपा करुन पाणी पोहोचवलं जातंय. जवळपास 33,117 लोकसंख्या या टँकरवर अवलंबून आहे. इथे दारोदार भलेमोठे पिंप उभे करुन ठेवलेले दारोदारी दिसतात. येणारा टँकर या पिंपात किंवा गावच्या आडात पाणी टाकून जातो. पण हे पाणी माणसांनाच कसंबसं पुरत असल्याचं लोक सांगतात. जनावरांसाठी काय करायचं, हा प्रश्न आहेच.
या परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बीबीसी मराठीने प्रश्न विचारला होता त्यावेळी ते म्हणाले, 'सध्या निवडणुकीमुळे राजकारण्यांना कोणतेही अधिकार नाहीत. मात्र प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे.'
यंदाचा दुष्काळ 1972 च्या दुष्काळाची आठवण करुन देणारा असल्याचं इथले म्हातारे कोतारे सांगतात. खाण्याचा प्रश्न नाही हाच दिलासा. पण बदललेलं अर्थचक्र आणि ऋतूचक्र याचा फटका मात्र दीर्घकाळ बसत राहणार असल्याचं स्पष्ट दिसतं.