'आपलं सरकार खेकड्यांमुळं कोसळलं, त्यांना कितीही शिकवलं तरी ते तिरकेच चालतात'

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, samana

“जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान असतील अशीच माणसं मला हवीत.

कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात."

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांनी 'आवाज कुणाचा' या पॉडकास्टसाठी राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही सत्तेत जाण्याचा घेतलेला निर्णय या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपली मतं मांडली आहेत.

देशातील विविध मुद्द्यांवरही ते यात बोलले आहेत.

पूर्वी राजकारणाऱ्यांना गेंड्याच्या कातडीचे म्हणायचे, आता गेंडे आपल्या पिलांना राजकारण्यांच्या कातडीचा आहेस का असं विचारतात, अशा शब्दांत त्यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली.

ते म्हणाले, “काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगूळं निघतात. तरीदेखील ती आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असतात. वृक्षाला वाटतं हे आपल्याच सोबत आहेत. मात्र तसं नसतं.”

'कूटनीती की मेतकूटनीती'

उद्धव ठाकरेंनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं.

त्यांनी म्हटलं, की "महाराष्ट्रात जे राजकारण घडवलं गेलंय त्यामागे जे सत्तेत बसलेत त्यांची सत्तालोलुपता कारणीभूत आहे. आता पक्ष चोरण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना भाजपाबरोबर 25-30 वर्षं एकत्र होतीच.2014 साली भाजपानं युती सोडली होती. 2019चं वचन पाळलं असतं तर 2.5 वर्षं दोन्ही पक्षाचे मुख्यमंत्री अधिकृतरित्या दिमाखात बसले असते.

"मी खंजीर खुपसला म्हणता तर मग तुम्ही राष्ट्रवादी पक्ष का फोडलात. स्थिर सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस का फोडलात? ज्याला तुम्ही कुटनीती म्हणता ती कूटनिती आहे की आधीपासूनची मेतकूटनीती आहे मला माहिती नाही. ही कूटनीती कुटून टाकायची वेळ आली आहे."

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

खेकडा हा खेकडाच असतो, तो तिरकाच चालणार

वर्षभरापूर्वी भर पावसाळ्यात आपलं सरकार कोसळलं. त्याबद्ल काय सांगाल, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, वर्षभरापूर्वी आपलं सरकार कोसळलं याला कारण खेकडे आहेत. त्यांना कितीही सरळ चालायचं शिकवलं तरी ते तिरकेच चालतात.

ते पुढे म्हणाले, “खेकड्यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्या टोपलीवर झाकण ठेवावं लागत नाही. कारण ते एकमेकांचा पाय ओढतात,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पक्षातून फुटून गेलेल्या आणि पक्ष फोडणाऱ्यांना टोमणा मारला आहे.

‘शिवसेना नाव आम्हालाच मिळणार’

निवडणूक आयोगाबद्दल बोलताना ते म्हणाले, “निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय .

मला खात्री आहे की, ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपण केली आहे आणि ती पूर्तता केल्यामुळेच मला खात्री आहे की, 'शिवसेना' हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल.

एनडीए हा अमिबा

उद्धव ठाकरे मुलाखत

फोटो स्रोत, saamana

विरोधकांच्या आघाडीला उत्तर देण्यासाठी भाजपाने पुन्हा जुन्या मित्रांची जुळवाजुळव करायला सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, “बऱ्याच वर्षांनंतर या देशात 'एनडीए' नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची 'इंडिया' नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या ठेवणीतल्या. छत्तीस पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली.

खरं म्हणजे, छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीय. त्यांच्या 'एनडीए'मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत.”

‘मला निष्ठावंत आवडतात’

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Samana

उद्धव ठाकरे म्हणाले, “जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान •असतील अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात.

शिवसेना मजबूत होतीच, पण आता अडीच वर्षांत मी जे काही करू शकलो त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली. ही माझी कमाई आहे. मोठी कमाई आहे. त्या एका नात्याने शिवसेनेसोबत पूर्वी कधीही नव्हते असे लोकही, अशी जनताही शिवसेनेसोबत जोडली गेली

लोकं म्हणताहेत की, जे तुमच्यासोबत घडलं ते अयोग्य आहे. ही संस्कृती, हा संस्कार महाराष्ट्राचा नाही. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सोबत आहोत. म्हणजे मला लोकांना काही सांगावंच लागत नाही.”

अजित पवारांचा गट रेल्वेचं इंजिन की गार्डाचा डबा?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याबद्दलही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.

“केंद्र सरकार हे फक्त मोदी-शहांचं आहे. निवडणूक आल्या की ते एनडीएचं होतं. पण झाल्या की ते मोदींचं होतं. या सरकारमुळे लोकशाहीचा खाईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू आहे. ते थांबवण्यासाठी लोकांनी विचार केला पाहिजे. आपण मत देत नसून तर आपलं आयुष्य देत आहोत याचा विचार व्हावा.

खुर्चीच्या मोहापायी त्या खुर्चीखाली जनता भरडली जात नाहीये याकडे लक्ष द्या असं मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो. ज्याची त्याची स्वप्नं ज्याला त्याला लखलाभ होवो. सामान्य माणसाला आजचा दिवस आणि उद्याचा दिवस कसा जाईल याची चिंता आहे. या डबल इंजिनला आता जे तिसरं लागलं आहे ते रेल्वेचं इंजिन आहे की गार्डाचा डबा?”

अजित पवारांनी प्रशासन आणि खातं नीट सांभाळलं असल्याचंही त्यांनी म्हटलं.

नीलम गोऱ्हेंबद्दल मला काही बोलायचं नाही. त्याना जे देता येत होतं तेव्हा मी दिलं. आजही काही लोक मिळूनही ते लोक निष्ठावंत राहिले आहेत. ज्यांचा जन्मच राजकारणात शिवसेनेत झाला त्यांनी शिवसेना या आईवर वार केलाच, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

काश्मीर ते कन्याकुमारी गोवंशहत्याबंदी करुन दाखवा

उद्धव ठाकरेंनी यावेळी समान नागरी कायदा, मणिपूरच्या विषयांवरही भाष्य केलं.

त्यांनी म्हटलं, की समान नागरी कायदा फक्त कोणाच्या लग्नापुरता मर्यादित ठेवू नका. काश्मीर ते कन्याकुमारी गोवंशहत्याबंदी कायदा करुन दाखवा, मणिपूर शांत करुन दाखवा.

“आम्ही समान नागरी कायद्याबद्दल आमची भूमिका स्पष्ट करुच. बाळासाहेब ठाकरेंनीही आपली भूमिका यापूर्वी स्पष्ट केली होती. तुमच्या पक्षातल्या भ्रष्ट नेत्यांवरही कारवाई झाली पाहिजे तर समान नागरी कायद्यांना अर्थ आहे.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)